रघुनंदन गोखले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीकडेच मुंबईजवळ रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठान, भाईंदर येथे अंधांची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेतून पुढील वर्षीच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी खेळाडूंची निवड झाली आहे. काय असतं अंधांचं बुद्धिबळ? ते कसं बुद्धिबळ खेळतात? जिद्द आणि परिश्रम यांची हृदयाला भिडेल अशी ही कहाणी..

आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की, बुद्धिबळ हा एकमेव खेळ असा आहे की ज्यामध्ये अंध खेळाडूंना डोळस खेळाडूंच्याच नियमांनी खेळावं लागतं. फक्त त्यांना वेगळय़ा प्रकारच्या पटावर खेळावं लागतं. आज भारतात ६००हून अधिक अंध आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू आहेत आणि त्यांना हे गुण डोळसांना हरवून मिळवावे लागलेले आहेत. भारतातच नव्हे तर जगात कोठेही जा, तुम्हाला अंध खेळाडू डोळसांच्या स्पर्धेत खेळताना आढळतील. कारण अंधांसाठी वेगळे मानांकन (Rating ) नाही. किंबहुना याच गोष्टीमुळे अंध बुद्धिबळ खेळाडू कमालीचे जिद्दी असतात. जन्मजात असलेल्या वैगुण्यामुळे त्यांना डोळसांबरोबर खेळताना किती कष्ट पडत असतील याचा तुम्हीच विचार करा. तरीही सगळेच खूप आनंदी असतात. आणि त्यांना थोडं जरी कमी लेखून एखादी कमी दर्जाची चाल कराच! मग तुमच्या राजावर कधी मात होईल तुम्हाला कळणारही नाही.

हे आंतरराष्ट्रीय खेळाडू इतर क्षेत्रातही कमी नाहीत. डॉ. चारुदत्त जाधव हे पूर्ण अंध असूनही संगणक क्षेत्रातले मोठे तज्ज्ञ आहेत. त्यांच्या हाताखाली १०० हून अधिक डोळस अभियंते टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसमध्ये काम करतात. दर्पण इनानी हा माजी राष्ट्रीय अंध विजेता सनदी लेखपाल (C.A) आहे, तर सौंदर्य प्रधान हा गतवर्षीचा राष्ट्रीय विजेता  NIIT मध्ये शिकलेला अभियंता असून आज मोठय़ा पगारावर नोकरी करत आहे. आशियाई विजेत्या किशन गंगोलीसारखे अनेक अंध खेळाडू पदव्युत्तर परीक्षेत चमकले आहेत.

डोंबिवलीमधील आर्यन जोशी हा अंध खेळाडू २०२२ च्या जागतिक अंधांच्या ज्युनिअर स्पर्धेत उपविजेता ठरला होता आणि या वर्षी कमाल म्हणजे, मुंबईतील पोदार महाविद्यालयातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पारितोषिक त्याला मिळालं ते डोळस मुलांना मागे टाकून! मुंबईतील स्वप्निल शहा आणि मदन बागायतकर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय अंधांच्या स्पर्धेतील पारितोषिक विजेते आहेत. जोसेफ डिमेलो नावाचा अंध खेळाडू प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पांडा यांच्या मुलाचा बुद्धिबळ प्रशिक्षक होता.

या अंधांचं वैशिष्टय़ म्हणजे त्यांची अखिल भारतीय संघटना ते स्वत: चालवतात आणि नागपूरचे मनीष थूल हे समर्थपणे सचिवपदाची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉ. चारुदत्त जाधव तर आज जागतिक अंध बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आहेत. बुद्धिबळ क्षेत्रात जागतिक अध्यक्षपदाचा मान आजपर्यंत अंध अथवा डोळस व्यक्तींमध्ये इतर कोणाही भारतीयाला मिळालेला नाही. माझ्यासारखे काही  बुद्धिबळाशी संबंधित डोळस त्यांच्या सल्लागार मंडळावर आहेत, पण आम्हाला मतदानाचा अधिकार नाही. थोडक्यात अखिल भारतीय अंध बुद्धिबळ संघटना ही पूर्णपणे अंधांची, अंधांसाठी, अंधांनी चालवलेली संघटना आहे.

या संघटनेची सुरुवात अपघातानेच झाली. मी त्या वेळी एक सामाजिक कार्य म्हणून मुंबई महापालिकेनं दिलेल्या एका शाळेत अंधांना बुद्धिबळ शिकवत असे. शनिवारी (त्या वेळी ) अर्धा दिवस नोकरी करून अथवा कॉलेज संपवून बुद्धिबळ खेळण्यात स्वारस्य असलेले खेळाडू तेथे जमत असत. चारुदत्त जाधव, स्वप्निल शाह, मदन बागायतकरसारखे खेळाडू त्या वेळी कोणीतरी प्रायोजक मिळवून छोटय़ा स्पर्धापण आयोजित करत असत. त्यांनी महाराष्ट्र राज्याची संघटनापण उभारली होती.

मी १९९७ साली स्पेनमध्ये एक स्पर्धा खेळायला गेलो असताना तेथे काही अंध खेळाडू बघितले. त्यांच्याकडे छोटे टेपरेकॉर्डर होते आणि डोळस खेळाडू चाली लिहितात त्याऐवजी ते प्रत्येक चाल बोलून रेकॉर्ड करत होते. त्यांच्यात एक जण तोडकंमोडकं इंग्रजी बोलत होता. मला त्यांच्याकडून माहिती कळली की जागतिक अंध बुद्धिबळ संघटनेचं कार्यालय स्पेनमध्येच आहे. भारतात संघटना नाही, पण खेळाडू आहेत म्हटल्यावर त्यांनी मला २०० डॉलर भरून सदस्यत्व देण्याची तयारी दाखवली. मी दोन स्पर्धामधल्या काळात माद्रिदला गेलो आणि  All India Chess Federation for the Blind( AICFB) ही संस्था पंजीकृत केली. धडाडीचा खेळाडू चारुदत्त जाधव कार्यवाह झाला. मी अध्यक्ष म्हणून सही केली.

एकदा अखिल भारतीय संघटनेची स्थापना केल्यावर चारुदत्त जोरानं कामाला लागला. त्याच्या मदतीला होता एक बुद्धिबळप्रेमी विनय शेट्टी! पहिली राष्ट्रीय स्पर्धा मुंबईमधील शहाजी राजे क्रीडा संकुलात घेण्याचं ठरलं. सगळय़ा राज्यांमध्ये माहितीपत्रकं गेली. १०० जण येतील अशी अपेक्षा होती. त्यामध्ये ५० खेळाडू आणि त्यांचे साहाय्यक असतील या तयारीत सगळे होते. आणि झालं भलतंच! तब्बल ६०० अंध खेळाडू आणि त्यांचे साहाय्यक संपूर्ण भारतातून मुंबईमध्ये उतरले.

चारुदत्त आणि त्याच्या संघानं कशीबशी व्यवस्था केली. लोकांनीपण उत्स्फूर्तपणे पैसे उभारायला मदत केली. पहिली अंधांची राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा यशस्वी झाली आणि भारतातील अंध बुद्धिबळ खेळाडूंना नवी दिशा मिळाली. मग नव्या जोमानं सर्वानी ठरवलं की भारतीय संघ अंधांच्या जागतिक स्पर्धेत उतरला पाहिजे. खर्च होता ५ लाख आणि संघटनेला सरकारची मदत होणार नव्हती, कारण एका खेळासाठी एक संघटना असं सरकारचं धोरण होतं.

आम्ही जेमतेम लाख-दीड लाख जमा केले. सगळय़ाची सोंगे आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. अशा वेळी कुमार मंगलम बिर्ला यांच्या मातोश्री राजश्री बिर्ला मदतीला धावून आल्या. त्यांनी संघटनेचा खजिनदार स्वप्निल शाहला सांगितलं की त्यांच्या दोन अटी आहेत. १) त्या सर्व खर्च करतील.  आणि २) त्यांचे नाव कोठेही येता कामा नये. आता २५ वर्षे लोटली असल्यामुळे मी जाहीरपणे त्यांचं नाव देऊ शकतो आहे. मला खात्री आहे की अजूनही त्यांना हे आवडणार नाही. 

संघाबरोबर जाण्यासाठी प्रशिक्षक म्हणून अनुभवी खेळाडू सजनदास जोशी यांना विनंती करण्यात आली. त्यांनी आनंदानं ही जोखीम पत्करली. ५ अंध खेळाडूंना परदेशात घेऊन जाणं सोपं काम नव्हतं. प्रत्येक वेळी त्यांना फॉर्म भरणं, खेळाडूंना विमानात योग्य जागी बसवणं इत्यादी कामं करावी लागली. त्यानंतर विविध स्पर्धामध्ये खेळण्यासाठी भारतीय संघ गेले आणि काही स्पर्धामध्ये बक्षिसंही मिळवली. परंतु चारुदत्त जाधवनं मोठी उडी घेण्याचं ठरवलं. त्यानं जागतिक अंध स्पर्धा भारतात घेण्याची तयारी सुरू केली. मी गोव्याचे बुद्धिबळप्रेमी उद्योगपती समीर साळगावकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी लगेच गोव्यात स्पर्धा घेण्याचं निश्चित केलं. २००६ ची जागतिक अंध अजिंक्यपदाची स्पर्धा गोव्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये यशस्वी झाली.

आतापर्यंत अंधांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनं एकूण ३५ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा आयोजित केल्या असून, दरवर्षी जागतिक स्पर्धासाठी संघ पाठवण्यात येतात. आत्तापर्यंत त्यांना सरकारी मदत नव्हती, पण हल्ली केंद्र सरकार त्यांच्या परदेश प्रवासाची काळजी घेतं. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे, मुंबईची अंध महिला खेळाडू वैशाली साळावकर हिची जागतिक महिला बुद्धिबळ संघात निवड झाली होती आणि ती डोळसांच्या ऑलिम्पियाडमध्ये  खेळलेली एकमेव भारतीय अंध खेळाडू आहे. तिची प्रशिक्षक म्हणून सध्याची महाराष्ट्र महिला विजेती मिताली पाटील ही बाटुमी, जॉर्जिया येथे सहभागी झाली होती.

हे अंध खेळाडू डोळसांबरोबर कसे खेळू शकतात, याची सर्वानाच उत्सुकता असेल. त्यांचा पट आणि सोंगटय़ा थोडय़ा वेगळय़ा असतात. त्यांच्या खास पटाला प्रत्येक चौरसाच्या मध्यभागी भोक असतं आणि प्रत्येक सोंगटीच्या खाली एक खिळा असतो. त्यामुळे ती सोंगटी त्या खाचेत बसते आणि हातानं चाचपून खेळणाऱ्या खेळाडूच्या हातानं धक्का लागून पडत नाही. आता या अंधांनी काळी आणि पांढरी मोहरी ओळखायची कशी? काळा राजा आणि पांढरा राजा यांचा स्पर्श एकच असतो. मग त्यासाठी एक युक्ती केलेली असते. काळय़ा सोंगटय़ांच्या वरती एक टाचणी लावलेली असते. त्यामुळे खेळाडूंना काळी आणि पांढरी मोहरी ओळखणं सहज शक्य होतं. पटावर काळे चौरस थोडे वर असतात आणि त्या मानानं पांढरे चौरस खाली असतात.

अखिल भारतीय अंध संघटनेचे सचिव मनीष थूल हे कर्तबगार आहेत. संस्थेला मिळालेल्या देणग्या प्राप्तिकराच्या नियमानुसार देणगीदारास करात सवलत मिळवून देतात. संघटनेच्या सभा नियमित होतात, त्यांचे हिशेब चोख ठेवले जातात. क्रीडा क्षेत्रात इतका चोख कारभार ठेवणं डोळस संघटनांनासुद्धा जमत नाही. अंधांच्या राष्ट्रीय स्पर्धाना प्रायोजक म्हणून अनेकजण  स्वत:हून पुढे येतात. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धा कुठे घ्यायची असा प्रश्न होता. करोनाच्या महासंकटातून देश नुकताच बाहेर येत होता. अचानक पुण्याच्या रोटरी क्लबचे अध्यक्ष विनायक पेठे पुढे आले आणि त्यांनी आत्तापर्यंतची सर्वोत्तम स्पर्धा प्रायोजित केली.

विश्वनाथन आनंद असो, विदित गुजराथी असो – आघाडीचे भारतीय खेळाडू कधीही अंध खेळाडूंना मदत नाकारत नाहीत. मागे ग्रँडमास्टर संदीपन चंदा, सागर शहा अशा खेळाडूंनी अंधांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धाच्या आधी शिबिरे आयोजित केली होती.

या अंध खेळाडूंनी आपले वैगुण्य किती सहजपणे पचवले आहे हे जाणवणारा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. एका स्पर्धेला मी प्रशिक्षक म्हणून गेलो असताना डॉ. चारुदत्त जाधव आणि मी एकत्र राहत होतो. मी सकाळी फिरायला निघत होतो आणि खोलीची एकच किल्ली  होती. ती काढून घेतली तर खोलीतील दिवे जाणार होते. चारुदत्त सहजपणे मला म्हणाले, ‘‘सर, तुम्ही किल्ली घेऊन जा. मला दिवे असले काय आणि नसले काय, काहीही फरक पडत नाही.’’ मला धक्का बसला. एवढा मोठा माणूस, संगणक क्षेत्रातला तज्ज्ञ, पण त्यानं किती नैसर्गिकरीत्या परिस्थितीशी जुळवून घेतलं आहे आणि अहर्निश अंधांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र सरकारनं पुढील वर्षी डॉ. चारुदत्त जाधवांचं नाव पद्म पुरस्कारासाठी पाठवलं तर त्यामुळे पुरस्कर्त्यांपेक्षा त्या पुरस्काराचा मोठा सन्मान होईल आणि अंधांच्या बुद्धिबळाला राजमान्यता मिळेल असं मला वाटतं. अखिल भारतीय अंध बुद्धिबळ संघटनेला २५ वर्षे पूर्ण झालेली असताना याहून चांगलं आणखी काय घडणार?

gokhale.chess@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Story of blind chess player chess for blind chess for visually impaired blind chess zws
First published on: 19-03-2023 at 01:04 IST