२८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रिया-हंगेरीची सर्बियाविरुद्ध युद्धाची घोषणा झाली आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. या घटनेला उद्या, २८ जुलै २०१४ रोजी शंभर वर्षे होत आहेत. या पहिल्या महायुद्धाची परिणती म्हणजे दुसरे महायुद्ध! पहिल्या महायुद्धात काय काय घडले, याचा इतिहास सर्वपरिचित आहेच. परंतु त्याहीपलीकडे या महायुद्धाने जगभर कोणत्या उलथापालथी घडवून आणल्या, त्याचा हा अंगावर शहारे आणणारा, तसेच मानवी अस्तित्वाचे महत्त्व ठसविणारा गतेतिहास सांगताहेत- महायुद्धांचे अभ्यासक आणि त्यावर ग्रंथनिर्मिती करणारे प्रसिद्ध इतिहासकार!   
मीपहिल्या व दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास लिहिण्यास प्रवृत्त झालो याचं कारण या विषयावर मराठी भाषेत तुलनेने खूपच कमी साहित्य उपलब्ध आहे. सैन्यातल्या रँक, सैन्य चालते कसे, जनरल स्टाफ म्हणजे काय, हे आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे. पहिले आणि दुसरे महायुद्ध म्हणजे एकाच मॅचच्या दोन इनिंग्ज आहेत. ‘प्रथम महायुद्ध’ हा ६५० पृष्ठांचा ग्रंथ असणार आहे. यात १९१४ ते १९१८ अशा पाच वर्षांवर पाच स्वतंत्र प्रकरणे असतील. या महायुद्धाची पाश्र्वभूमी- १८१५ ते १९१४ अशी ९९ वर्षे ६० पृष्ठांत मांडायची आहे. व्हर्सायचा तह, २० पेक्षा जास्त नकाशे, ५० पेक्षा जास्त छायाचित्रे, २०० ते ३०० संदर्भग्रंथांची यादी- जी मराठीत प्रथमच येणार आहे, असा हा प्रकल्प आहे.
या युद्धाचे खरे स्वरूप लक्षात आलेला पहिला शहाणा माणूस म्हणजे ब्लॉश जेन (Bloch Jean). या पोलिश व्यक्तीचे नाव नोबेलच्या स्पर्धेत होते. हा ज्यू धनिक रेल्वेचा कॉन्ट्रॅक्टर होता. त्याने पहिल्या महायुद्धापूर्वी आगामी युद्ध कसे होईल, यावर सहा खंड लिहिले. त्यातील सहावा खंड सारांश स्वरूपात आहे. असे युद्ध पुन्हा होणार नाही, हा त्याचा एकमेव अंदाज मात्र चुकला. लष्करी अधिकाऱ्यांनाही जे लक्षात आले नाही, ते या गृहस्थाच्या लक्षात आले होते. या युद्धाची भीषणता म्हणजे जे सैन्य खंदकांत राहत होते, त्यांना भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. मांजराएवढय़ा आकाराचे उंदीर मेलेल्या सैनिकांचे फक्त डोळे खात असत. झोपलेल्या सैनिकांच्या अंगावरून ते फिरत. मलमूत्र, खरकटे, बंदुकीच्या दारूचा आसमंतात भरलेला वास, उवा, पिसवा यामुळे येणारा ताप, दलदलीमुळे पाय सडणे (ट्रेंच फूट).. या सगळय़ावर मात करण्यासाठी रणगाडा अवतरला. अमेरिकेतील शेतीकामास लागणाऱ्या ट्रॅक्टरवरून रणगाडय़ाची कल्पना स्वींटन या माणसाच्या डोक्यात आली. इंग्लंडमध्ये विन्स्टन चर्चिल यांनी स्वत:च्या खात्याच्या अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन रणगाडा संशोधनासाठी पैसे उपलब्ध करून दिले. ही कल्पना यशस्वी झाली आणि यशासारखे दुसरे यश नाही म्हणून चर्चिल वाचले. अन्यथा.. जर्मनांनी विमानाच्या पंख्यातून गोळय़ा मारणारी यंत्रणा उभी करून विमानांचे लढाऊ विमानात रूपांतर केले.
पहिल्या महायुद्धाची एक देणगी म्हणजे ‘लॉजिस्टिक्स’! सैन्याला वस्तूपुरवठा करण्याच्या शास्त्रामधून हे शास्त्र विकसित झाले. १९१६ मध्ये  फ्रान्समधील Somme (सोम) नदीच्या परिसरात ब्रिटिश विरुद्ध जर्मन यांच्यात लढाई चालली होती. युद्धाची पूर्वतयारी झाल्यावर या लढाईत एकटय़ा इंग्लंडने या परिसरात १७ लाख तोफगोळे टाकले. २५,००० यार्ड बाय २००० यार्डाच्या परिसरात हे तोफगोळे टाकण्यात आले होते. एक तोफगोळा पडला की मोठा खड्डा पडतो. पुढे पुढे खड्डय़ात गोळे पडल्यावर खड्डय़ात आणखी खड्डे निर्माण झाले. एक तोफ १००० गोळे उडवल्यावर त्याची नळी निकामी होते. याचा अर्थ १७०० तोफांच्या नळय़ा निकामी झाल्या. या तोफांसाठी लागणारा दारूगोळा युद्धस्थळी पोहोचवणे, तसेच ऐनवेळी युद्धक्षेत्र बदलल्यास दळणवळण, पुरवठा या सगळय़ाचेच गणित बदलायचे.
११ नोव्हेंबर १९१८ रोजी शस्त्रसंधी झाली तेव्हा ब्रिटनकडे २३,००० विमाने होती. विमानांच्या संदर्भात ती पाडण्याचा व नादुरुस्त होण्याचा धोका युद्धकाळात जास्त असतो. परिणामी विमानांचा ‘वेस्टेज रेट’ वाढतो. सुधारित विमाने आल्यास हा वेग अधिकच वाढतो. पायलट ट्रेनिंगचा प्रश्न निर्माण होतो. शांततेच्या काळात एक प्रशिक्षक अनेकांना ट्रेनिंग देऊ शकतो. युद्धकाळात कमी काळात अधिक लोकांना ट्रेनिंग द्यावे लागते. शत्रूपासून स्वत:च्या विमानांचा बचाव करावा लागतो. फ्रान्समध्ये पाच विमाने पाडणाऱ्यास ‘एसीई’ (ACE) म्हणजे ‘हवाई एक्का’ (पत्त्यांमधील सर्वश्रेष्ठ पत्ता) म्हणत. बॅरन मॅनफ्रेड रिश्टोफन याने ८० विमाने पाडली आणि शेवटी तो स्वत:च विमान पाडताना मरण पावला. त्याचे पहिल्या महायुद्धातील रेकॉर्ड कायम आहे. या यादीत एकाच भारतीयाचा समावेश आहे. इंद्रकुमार राय या भारतीय पठ्ठय़ाने नऊ विमाने पाडली. तो विमानदलात भरती झाला तेव्हा त्याचे वय फक्त १८ वर्षे होते. तो इंग्लंडमध्ये शिकला आणि त्याने हा भीमपराक्रम गाजवला. भारत सरकारने त्याच्यावर टपाल तिकीट काढले आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर भारतीय हवाई दलाचे पहिले भारतीय प्रमुख सुब्रतो मुखर्जी हे राय यांचे भाचे होत.
लॉजिस्टिकच्या संदर्भात आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. जर्मनांना सैन्य सरहद्दीवर नेण्यासाठी ११ हजार रेल्वेगाडय़ा लागल्या. फ्रान्सला सात हजार रेल्वेगाडय़ा लागल्या. युद्धसमाप्ती झाल्यावर ब्रिटनच्या जहाजांचा हिशोब केला तर गोळाबेरीज ८० लाख टनाची जहाजे बुडाली. जर्मनीकडे १३५ पाणबुडय़ा शिल्लक राहिल्या. या युद्धात अंदाजे एक कोटी सैनिक मरण पावले. त्यात ब्रिटनचे सात लाख, फ्रान्सचे १४ लाख, भारताचे ६० हजार, अमेरिकेचे एक लाख, रशियाचे १७ लाख, जर्मनीचे २० लाख, ऑस्ट्रिया-हंगेरीचे १२ लाख, तुर्कस्थान नऊ लाख- यात आर्मेनियन लोकांची संख्या धरलेली नाही. युद्धातला एक ठोकताळा असा असतो की, जेव्हा एक सैनिक मृत्युमुखी पडतो तेव्हा तीन सैनिक जखमी होतात. युद्धात एक कोटी सैन्य मरण पावले याचाच अर्थ तीन कोटी जखमी- म्हणजेच मृत्यूच्या दारात उभे होते. एकटय़ा ब्रिटनमध्ये किमान एक अवयव गमावलेले ४० हजार सैनिक होते. १९३१ ते १९४० या काळात सहा लाख सैनिकांना ‘अपंगत्व पेन्शन’ देण्यात आले होते. यावरून यातल्या जखमींचा अंदाज करता येतो.
हे सगळे वाचल्यावर सेनानी वेव्हेलचे विचार पटतात. तो म्हणतो, ‘हौशी लोक स्ट्रॅटेजीचा अभ्यास करतात; पण प्रोफेशनल लोक लॉजिस्टिकचा अभ्यास करतात.’
युरोपात कित्येक हजार एकर जमीन सैनिकांच्या स्मशानभूमीसाठी वापरण्यात आली आहे. त्या जागेची बागेप्रमाणे उत्तम निगा राखली जाते. युरोपातील एका देशात तर लग्न झाल्यावर वधू-वर सर्वप्रथम सैनिकांच्या स्मारकाला भेट देतात असे ऐकिवात आहे.
* आकडेवारीच्या संदर्भात पहिल्या महायुद्धाचा खर्च ३३८ अब्ज डॉलर्स झाला. तोही १९१८ मध्ये. २०१४ मध्ये हा खर्च काढायचा झाल्यास तो ६ हजार ८०० अब्ज डॉलर्स होईल. (एक डॉलर = ६० रुपये अंदाजे) पहिल्या महायुद्धाची सर्वव्यापकता
* अमेरिकेला कुठलीही गोष्ट व्यापक प्रमाणावर करण्याची सवय आहे. अमेरिकेत पहिल्या महायुद्धाचा प्रभाव आणि अमेरिकेची न्याय्य भूमिका समजावून सांगण्यासाठी जी योजना आणण्यात आली तिला ‘फोर मिनिट मेन’ म्हणतात. पूर्वी सिनेमा सलग बघता येत नसे. मध्ये सिनेमाची रीळे बदलत असत. त्यास चार मिनिटे लागत. ही चार मिनिटे वाया जाऊ न देता या वेळात अमेरिकेने केवळ चार मिनिटांत भाषणे देणाऱ्यांची फौज उभी केली. या भाषणांचे विषय असत : अमेरिकेची न्याय्य बाजू, अन्न वाचवा, सरकारी कर्जरोखे विकत घ्या, स्त्रियांनो- युद्धसंबंधित कामांमध्ये सहभागी व्हा. या योजनेत सहभागी झालेल्या वक्त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्रुडो विल्सन यांनी राष्ट्रीय प्रमाणपत्रे दिली. या योजनेत साडेसात लाख वक्ते सहभागी झाले होते.
* पहिल्या महायुद्धात इंग्लंडचे १८० खासदार प्रत्यक्ष लढाईवर गेले होते. इंग्लंडचे पंतप्रधान अ‍ॅस्क्विथ यांचा मुलगा या युद्धात मारला गेला. व्हर्डूनच्या लढाईत फ्रान्सचा खासदार लढत होता. युद्धात काही आलबेल चाललेले नाही हे सांगण्यासाठी तो युद्धावरून थेट देशाच्या विधिमंडळात सत्यस्थिती सांगायला गेला होता. फ्रान्सचे संरक्षणमंत्री मेस्मी यांनी राजीनामा दिल्यावर लष्करात भरती होऊन युद्धात सामील झाले होते. दुसऱ्या महायुद्धातील नामांकित सेनापती अचिनलेक, ब्रुक, मॅकॉर्थर, मार्शल, माँटेगोमेरी आणि हिटलर हेही पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते.
* पहिले महायुद्ध संपतेवेळी जर्मनीत प्रत्येक माणसाला रोज १५०० कॅलरीज् भोजनातून मिळत होत्या. युद्धापूर्वी त्यांना ३००० कॅलरीज मिळत होत्या. याचाच अर्थ ते अर्धपोटी राहत होते. मांस मिळत नव्हते म्हणून दुभत्या प्राण्यांची कत्तल केली गेली. त्यातून पुढे दुधाची कमतरता निर्माण झाली.
* पहिल्या महायुद्धाचा वाङ्मयाच्या दृष्टीने विचार केल्यास ‘लढाई’ हा मुख्य विषय केंद्रस्थानी ठेवून पहिल्या महायुद्धावर जेवढे लिहिले गेले, तेवढे दुसऱ्या महायुद्धावर लिहिले गेले नाही.
* दुसऱ्या महायुद्धावर लिहून चर्चिलला नोबेल पारितोषिक मिळाले. पहिल्या महायुद्धासंदर्भात असे काही झाले नाही. ‘All quiet on western front’ हे एरीश मारिया रेमार्क यांचे पुस्तक गाजले. अर्नेस्ट हेिमग्वे यांचे ‘Farewell to arms’ हेही चांगलेच गाजले.
* या युद्धावर खूप सैनिकांनी कविता केल्या. जणू कवींची फौजच उभी राहिली. यात कवी कवी रूपर्ट ब्रुक, विल्फ्रेड ओवेन, सिफ्रिड ससून यांचा समावेश आहे. ‘जर मी लढाईत मरण पावलो तर एवढी आठवण ठेवा, की परदेशात कुठेतरी एक कोपरा आहे- जिथे माझ्या थडग्याच्या रूपाने इंग्लंड सदैव आहे..’ अशा आशयाची रूपर्टची एक कविता खूप गाजली. यातील देशाभिमान महत्त्वाचा!
या युद्धात जर्मनीने प्रथमच विषारी वायूचा वापर केला. या विषारी वायूमुळे मृत्यूच्या दारात असणाऱ्या सैनिकांची कैफियत मांडताना कवी ओवेन लिहितो- ‘आपल्या पितृभूमीकरिता मरण पत्करणे हे मधुर आहे. पण माझा आता भ्रमनिरास झाला आहे. कारण मरण हे मरण आहे.’
यातूनच युद्धविरोधी वाङ्मयही मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ठराव केला की, ‘आम्ही आता राजा व देशासाठी मरणार नाही.’ यासंदर्भात चर्चिलने वेळीच इशारा देऊन दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी उपाययोजना केली.
* ‘लंडन टाइम्स’चा वार्ताहर रेपिंग्टन याने सर्वप्रथम ‘First World War’हा शब्द वापरला तो १९२० मध्ये. त्याअगोदर सर्वत्र या युद्धाचा उल्लेख ‘ग्रेट वॉर’ किंवा ‘World War’ एवढाच व्हायचा.
* टी. ई. लॉरेन्स (तोच ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’वाला!) याने ‘सेव्हन पिलर्स ऑफ विस्डम’ या नावाचे एक पुस्तक लिहिले. शीर्षकाचा आणि आतील युद्धविषयक मजकुराचा प्रत्यक्ष संबंध नव्हता. या पुस्तकाच्या त्याने फक्त १०० प्रती छापल्या आणि पुस्तक विकत घ्यायला पात्र लोकांची यादी त्याने तयार केली. अन्य लोकांना पुस्तक विकण्यास त्याने नकार दिला. ही कादंबरी वाचल्यावर त्यावरील सिनेमा अपेक्षाभंग करतो. काव्यमय शैलीतील ही कादंबरी वाचकाला भुरळ घालते.
* पहिले महायुद्ध संपल्यावर व्हर्सायचा तह करण्यात आला. या तहातील २४६ वे कलम पुढीलप्रमाणे आहे : जर्मनीने ईस्ट आफ्रिकेतील सुलतान क्वावा (mkwawa) याची कवटी बर्लिनला नेलेली आहे, ती सहा महिन्यांच्या आत ब्रिटनच्या राजाला आणून द्यायची.
संपूर्ण तहाच्या अटींमध्ये- हा सुलतान क्वावा कोण? त्याची कवटी बíलनला जर्मनीने का नेली? आणि ती ब्रिटनला का परत द्यायची? याबद्दलचा खुलासा नाही. यासंबंधी इंटरनेटच्या साहाय्याने शोध घेतला असता मनोरंजक माहिती समोर आली.
आफ्रिकेतील हे हे जमातीचा क्वावा हा राजा होता. त्याने जर्मनांविरुद्ध आपल्या देशबांधवांना एकत्र करून बंड केले. सुमारे आठ-दहा वर्षे त्याने गनिमी काव्याने जर्मनांना तोंड दिले. शेवटी १८९८ मध्ये जर्मनांनी त्याची कोंडी केली. जर्मनांच्या हातात सापडून स्वत:ची विटंबना होऊ देण्यापेक्षा सुलतानाने स्वत:च्या डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. जर्मनीने सुलतानाचे मुंडके आणून देणारास बक्षीस जाहीर केले होते. एका जर्मन सरजटने सुलतानाचे मुंडके कापून ते बर्लिनला पाठविले. तहात हे कलम घातल्यावर जर्मनीने हे मुंडके त्याच काळात नष्ट झाल्याचे कळवले. १९५४ साली टांगानिका येथील ब्रिटिश गव्हर्नरने जर्मनीला जाऊन ब्रेमेन येथील मानववंशशास्त्र म्युझियमला भेट दिली. त्यातील २००० कवटय़ांमधून आफ्रिकन कवटय़ा वेगळय़ा शोधल्या. त्यातली बंदुकीचे छिद्र असलेली कवटी सुलतानाची म्हणून त्याने परत नेली. आजही ती कवटी बघायला मिळते.
व्हर्सायचा तह आणि भारत
व्हर्सायच्या तहावर ज्या सहय़ा झाल्या त्यात भारताच्या वतीने दोन सहय़ा आहेत. यात अमेरिका- ५, इंग्लंड- ५, ऑस्ट्रिया-कॅनडा-दक्षिण आफ्रिका- प्रत्येकी २, तर न्यूझीलंड- १ आणि भारत- २ अशा सहय़ा आहेत. १८ व्या क्रमांकावर भारतमंत्री माँटेग्यू यांची सही आहे. एकोणिसाव्या क्रमांकावर बिकानेरचे महाराजा गंगासिंह यांची सही आहे. त्यांच्यानंतर विसाव्या क्रमांकावर फ्रान्सच्या व्याघ्र क्लेमेन्सो यांची सही आहे. ते भारतात आल्यावर गंगासिंह आणि क्लेमेन्सो यांची भेट झाली होती. पहिले महायुद्ध झाल्यावर क्लेमेन्सो आणि दुसरे महायुद्ध झाल्यावर चर्चिल पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाहीत.
युद्धाचे परिणाम
* इंग्लंडमध्ये सार्वत्रिक मतदानाचा अधिकार अस्तित्वात आला. महायुद्धात एवढय़ा सैनिकांनी देशासाठी प्राणत्याग केल्यावर त्यांच्या विधवा, जखमी व अपंग सैनिकांना डावलून चालणार नव्हते. या दबावातून पूर्वीच्या अटी जाऊन सार्वत्रिक मतदानाचा अधिकार देण्यात आला. महिलांना ३० वर्षे पूर्ण झाल्यावर, तर पुरुषांना २१ वर्षे पूर्ण झाल्यावर हा मताधिकार देण्यात आला.
इंडियन आर्मीत भारतीय अधिकारी नेमण्याची पद्धत आली. इंदूरमध्ये या अधिकारपदाचे प्रशिक्षण सुरू झाले. अधिकारपदांचे भारतीयीकरण झाल्याने पुढे करिअप्पा हे लष्करप्रमुख होऊ शकले. या लष्करी युद्धाला भारतीय नेत्यांनी पाठिंबा दिला. याचा अप्रत्यक्ष फायदा भारतीय स्वातंत्र्य चळवळीस झाला.
* रशियात क्रांती घडून आली आणि लेनिनच्या नेतृत्वाचा उदय झाला. यात प्रचंड मोठय़ा प्रमाणावर उपासमार झाली. सैन्य परत बोलावण्यात आले, कारण शेती करायला शेतकरीच उरले नव्हते.
* तुर्की साम्राज्य कोसळले आणि आर्मेनियन हत्याकांडात दहा लाख माणसे मारली गेली. केमाल पाशाचा उदय झाला. पुढे त्याने तुर्कस्थानचे आधुनिकीकरण केले.
* राष्ट्रसंघाचा प्रयोग अस्तित्वात आला.
* औद्योगिक क्रांतीचा वेग आणखीन वाढला. लष्कर, शस्त्रास्त्र, रेल्वे उत्पादन वाढले. स्त्रियांचा सार्वजनिक क्षेत्रातला सहभाग वाढला. या र्सवकष युद्धाचा परिणाम लोकांच्या मानसिक स्वास्थ्यावरही झाला. स्वैराचार, चोऱ्यामाऱ्या वाढल्या. तरुण मुलींना नवरा मिळणे दुष्कर झाले.
* ‘स्क्रॅप ऑफ पेपर’ हा शब्दप्रयोग प्रथमच वापरात आला. जर्मनीचे पंतप्रधान बेथमान हॉलपेक यांना भेटण्यासाठी इंग्लंडचा राजदूत गेला होता. ‘पूर्वी आपण जो पवित्र करार केला आहे त्याचे तुम्ही पालन करा,’ असे त्याने त्यांना सांगितले. जर्मनीचे पंतप्रधान म्हणाले, ‘अहो, त्या कागदाच्या तुकडय़ाचे काय महत्त्व? तो तर स्क्रॅप ऑफ पेपर आहे.’ राजदूताने या शब्दाचे भांडवल केले. अत्यंत पवित्र तह न पाळणे म्हणजे काय? जर्मनीला बेल्जियमवरचा हल्ला भोवला आणि हा शब्द जगभर पोहोचला.
* युद्धकाळात ‘शेल शॉक’ हा मनोविकार वाढला होता. याचे प्रमुख लक्षण म्हणजे शांत सैनिक बोलका होतो, तर बोलका सैनिक घुमा होतो. असा सैनिक मग लढाईसाठी निरुपयोगी ठरतो. यामुळे युद्धाच्या काळात सैन्यातून पळून जाणे, आज्ञा न पाळणे, पहाऱ्याच्या वेळी झोपणे या गुन्हय़ांसाठी अशा शिपायांस गोळय़ा घालून ठार मारण्यात आले होते. या शिक्षेपायी ३४० ब्रिटिश शिपाई आपल्या प्राणास मुकले. आता फक्त बंडखोर व देशद्रोह्य़ालाच गोळय़ा घालतात. पूर्वी अशा सैनिकास समोर उभे करायचे, त्याच्या पलटणीतील किंवा दुसऱ्या पलटणीतील सैनिकांना बोलवायचे. ज्याला ठार मारायचे आहे अशा सैनिकाच्या छातीवर एक कागद चिकटवत. त्या सैनिकाला कसे ठार मारायचे, यावर नियमपुस्तिका होती. म्हणूनच फ्रेडरिक द ग्रेट म्हणाला होता की, ‘सैनिकाला शत्रूपेक्षा स्वत:च्या अधिकाऱ्याची भीती वाटली पाहिजे.’
* इंग्लंडमध्ये सक्तीचे लष्करी शिक्षण नव्हते, तर युरोपातील काही राष्ट्रांमध्ये सक्तीचे शिक्षण होते. १९१६ मध्ये इंग्लंडमध्ये सक्तीची लष्करभरती सुरू झाली. याविरोधात ‘आम्ही माणसे मारणार नाही’ अशी चळवळ इंग्लंडमध्ये सुरू झाली. तत्काळ इंग्लंडमध्ये ट्रॅब्युनल स्थापण्यात आले. स्थानिक पदाधिकारी आणि मेयर यांचे मंडळ तयार करण्यात आले. या बोर्डासमोर जाऊन प्रत्येक विरोधकाला आपला जबाब द्यावा लागे. त्या व्यक्तीची भूमिका पटली आणि त्याने पर्यायी काम स्वीकारले तर त्या व्यक्तीला काही त्रास होत नसे. परंतु या मंडळाचे ऐकले नाही तर तुरुंगात रवानगी करण्यात येई. पार्लमेंटमध्ये अशा लोकांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा का, अशी चर्चाही झाली. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. रसेलने युद्धात सामील होण्यास व दंड भरण्यास नकार दिल्यावर सरकारने त्याच्या पुस्तकांची विक्री करून त्याच्याकडून दंड वसूल केला. दुसऱ्या महायुद्धात सुरुवातीला इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या चेंबरलेनने ही परिस्थिती पाहिलेली होती. पहिले महायुद्ध आणि त्याचे परिणाम यांची कल्पना असल्यानेच त्याने दुसरे महायुद्ध लांबवण्याच्या प्रयत्न केला. तो मूलत: भित्रा नव्हता, पण आपल्याकडे त्याची प्रतिमा ‘भित्रा’ अशी करण्याचा प्रयत्न झाला.
पहिल्या महायुद्धाचे दूरगामी परिणाम आणि त्याने मानवी अस्तित्वाबद्दल निर्माण केलेली आस्था यातून जगभरात पुढे अनेकानेक बदल झाले. अर्थात तरीही दुसरे महायुद्ध काही टळले नाही.
शब्दांकन : प्रा. गणेश द. राऊत

israel iran tensions updates israel hits back at iran
पश्चिम आशियावर युद्धाचे ढग? इराणच्या इस्फान शहरावर इस्रायलचा ड्रोनहल्ला   
candidates chess 2024 vidit gujrathi beats nakamura
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विदितचा नाकामुरावर पुन्हा विजय, गुकेशची प्रज्ञानंदशी बरोबरी; नेपोम्नियाशीसह संयुक्त आघाडीवर
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इराणचा इस्रायलवर हवाई हल्ला, शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्रे डागली! UN मध्ये आज तातडीची बैठक
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा