डॉ. हेमचंद्र प्रधान
गेली दोन वर्षे कोविडच्या जगभरातील संकटाने माणसाच्या जगण्यात अनेक बदल घडवून आणले. त्यापैकी शिक्षणाचे आभासी (ऑनलाइन) रूप हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल. परंतु आता हे संकट ओसरल्याने यंदा शाळा-कॉलेजेस सुरू होत आहेत आणि आपण पुनश्च प्रत्यक्ष शिक्षणाकडे (ऑफलाइन) वळतो आहोत. या दोन्ही प्रकारच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या जीवनात काय घडले आणि काय घडू शकेल याचा सांगोपांग वेध घेणारा लेख..
शिक्षण म्हणजे शिकण्याची.. नवीन ज्ञान, माहिती, आकलन, कौशल्ये, सामाजिक व नैतिक मूल्ये, समजुती प्राप्त करण्याची प्रक्रिया. शिक्षण हे बव्हंशी शिकणाऱ्यापेक्षा अधिक जाणकार असलेल्यांच्या मार्गदर्शनाखाली होते. परंतु ते स्वयंअध्ययनाद्वारेही होऊ शकते. तसेच ते शाळा, कॉलेजांसारख्या संस्थांमधून रचनाबद्ध (structured) स्वरूपात- म्हणजेच औपचारिक आणि अशा संस्थांच्या बाहेर अरचनाबद्ध (unstructured) स्वरूपात- म्हणजेच अनौपचारिक असू शकते.

कोणत्याही समाजातील शिक्षणव्यवस्था ही त्या समाजाने आपल्यासाठी (टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी) निर्माण केलेली आणि चालवलेली असते. साहजिकच शिक्षणव्यवस्थेमध्ये त्या, त्या समाजाचे विचार, जगाकडे पाहण्याची दृष्टी, आकांक्षा प्रतििबबित झालेल्या असतात. सर्वसामान्यत: या बाबी समाजासाठी निर्णय घेणारे जे घटक (सत्ताधारी आणि अभिजन) असतात, त्यांच्याच असतात.

Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

कोविडच्या काळात शिक्षणाचे आभासी (ऑनलाइन) आणि प्रत्यक्ष वा समोरासमोर (फेस-टु-फेस वा ऑफलाइन) असे वेगळे वर्गीकरण निर्माण झाले. ऑनलाइन वा आभासी शिक्षणामध्ये शिक्षक वर्गामधून एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांशी संपर्कात असतात आणि विद्यार्थी मात्र त्याच्या घरी किंवा अन्य ठिकाणी एकेकटाच शिक्षकाला प्रतिसाद देत असतो. त्याच्याबरोबर वर्गमित्र वगैरे नसतात. असलेच तर आई, वडील किंवा भावंडे असतात. या प्रक्रियेत मुलाला मदत करताना आई-वडिलांचीही बऱ्याचदा दमछाक होत असते. शिवाय या संवादप्रक्रियेला संसाधनांची जरुरी असते. जसे की- संगणक, अखंडित वीजपुरवठा, निदान स्मार्ट फोन, न तुटणारे इंटरनेट इत्यादी. विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांकडे फोन आणि डेटावापराचे महिन्याचे बिल भरण्याची आर्थिक क्षमता असावी लागते. आणखी एक बाब म्हणजे ही संसाधने वापरण्याची तंत्रे विद्यार्थी आणि शिक्षकांना आत्मसात करण्याची जरुरी असते. ती प्रत्येकाला सारखीच जमतील असे नसल्याने अडचणी उद्भवतात. जरी घरटी एक स्मार्ट फोन उपलब्ध असला तरी तो कुटुंबप्रमुखाकडे असतो. मुलांना- त्यातही मुलींना- अभ्यासासाठी तो मिळणे कठीण असते. त्यामुळे ‘पोहोच’ (access) ही समस्या सुरुवातीस जेवढी भेडसावत होती तेवढी राहिली नसली तरी अजूनही चांगलीच बिकट आहे. एक किंवा अधिक संसाधनाच्या अभावी ग्रामीण तसेच शहरी कमी उत्पन्न गटातील- म्हणजे ५०% पेक्षा जास्त विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहिले, हे विदारक सत्य आहे. अनेक शहरी विद्यार्थी ऐन साथीच्या काळात गावाकडे गेले ते दीर्घकाळ परतलेच नाहीत. अनेक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात इतकी अनियमितता आली, इतका खंड पडला की त्यांचे ज्ञान दोन वर्षांच्या कालावधीहून मागे पडलेले दिसून येते. अशा विद्यार्थ्यांसाठी शाळा जेव्हा प्रत्यक्ष (ऑफलाइन) सुरू होतील तेव्हा पहिले काही महिने उजळणीचे, उपचारात्मक (remedial) अभ्यासाचे असावेत अशी ‘प्रथम’ या शैक्षणिक संस्थेने केलेली सूचना शासनाने स्वीकारावी असे मलाही वाटते. ‘ऑनलाइन’ प्रकाराने आणखी एका तऱ्हेचे शैक्षणिक नुकसान होण्याची संभाव्यता आहे. शिक्षण म्हणजे फक्त ‘ऑनलाइन शिक्षण’ असा समज समाजात- विशेषत: तरुण पिढीत रूढ होऊ पाहत आहे. ‘ऑनलाइन’ प्रकारात केवळ बहुपर्यायी सोपे प्रश्न महत्त्वाच्या परीक्षांच्या मूल्यांकनासाठी वापरल्याने विद्यार्थ्यांच्या एका गटाने संपूर्ण शिक्षण आणि मूल्यमापन ‘ऑनलाइन’ असावे अशी मागणी केली होती. सुदैवाने ती मान्य केली गेली नाही. नाही तर गुणवत्तेत जगात आधीच अतिशय खालच्या क्रमांकावर असलेले आपले शिक्षण कोठे पोहोचले असते हे सांगणे कठीण झाले असते.

माझे स्पष्ट मत आहे की, विविध (विशेषत: आर्थिक) कारणांनी आपल्याकडे संगणकीय दरी निर्माण झाली आहे. या दरीचा परिणाम आभासी शिक्षणाने अधिकच वाढला आहे. एका बाजूने बहुसंख्य विद्यार्थी नवीन माहिती तंत्रज्ञानाचा फारसा परिणामकारक उपयोग करून घेऊ शकत नाहीत; तर दुसऱ्या बाजूने जगात असे दिसून येते की स्वयंअध्ययनासाठी नवे माहिती तंत्रज्ञान अत्यंत प्रभावी आहे. जागतिक महाजालावर अनेकविध विषयांत तज्ज्ञ व्यक्तींनी दिलेले सुविहित कौशल्य आणि ज्ञान दोन्ही तऱ्हेचे आभासी अभ्यासक्रम मिळतात. तसेच आपल्याला पाहिजे तो माहिती व ज्ञानाचा स्रोत क्षणात उपलब्ध होतो. यामुळे उच्चभ्रू घरातील विद्यार्थी त्यांना मिळालेल्या सुखसुविधा आणि संधींच्या जोरावर या तंत्रज्ञानात आणखी पुढे जात राहतात.. जागतिक स्तरावर आणखी चांगल्या नोकऱ्या मिळवून अधिक सुखवस्तू होतात.

परिणामी शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विषमता वर्षांगणिक वाढतच राहते. स्मार्ट फोनचा स्क्रीन छोटा असल्याने ते वापरणाऱ्यांच्या डोळ्यांवर ताण येतो. त्यातच आपली शिक्षणपद्धती ‘चॉक अँड टॉक’ असल्याने मुलाचे लक्ष स्क्रीनकडे किती काळ अविचलित राहते, हे तर शासकीय शिक्षण संस्थांच्या अधिकृत कार्यक्रमांतदेखील ध्यानात घेतलेले दिसत नाही. अभिमानाची एक गोष्ट मात्र ही, की अनेक शिक्षकांनी आणि बिगर शासकीय उपक्रमांनी अशी खबरदारी घेतली. अनेक शिक्षकांनी तर तंत्रे शिकून घेतलीच, शिवाय सहकाऱ्यांनासुद्धा ती शिकविली, अभिनव उपक्रम राबवले, तसेच संगणकात बहुविध (चित्र, फोटो, शब्द, व्हिडीओ, ध्वनी) माध्यमे (multi-media) कशी वापरतात हे शिकून त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
आपल्याकडच्या शालेय शिक्षणाच्या- म्हणजे ६ ते १८ वर्षे यादरम्यानच्या मुलांच्या शिक्षणाच्या पाठय़क्रमाचे (curriculum) उद्दिष्ट त्यांचा सर्वागीण विकास हे आहे. किंबहुना, जगातील कोणत्याही चांगल्या शिक्षणाच्या मॉडेलमध्ये, आदर्श शिक्षणाच्या कल्पनेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वागीण- म्हणजे बौद्धिक (cognitive), शारीरिक (physical), सामाजिक-भावनिक (social- emotional), सांस्कृतिक (ethical), नैतिक (cultural’), व्यावसायिक (vocational’) आणि तंत्रज्ञानविषयक ((technological’)- विकास होणे आणि अशा शिक्षणातून विद्यार्थी पुढे जाऊन राष्ट्राचा उत्पादनक्षम, जबाबदार, सुसंस्कृत नागरिक होईल ही अपेक्षा असते. आता या सर्वागीण विकासाला पर्यावरणीयदृष्टय़ा शाश्वत विकासाची जोड मिळाली आहे. बौद्धिक विकास हा पैलू सोडला तर सर्वागीण विकासाचे अन्य कोणतेही पैलू आभासी शिक्षणाने साध्य होऊच शकणार नाहीत, इतके ते मर्यादित आहे. शाळेत विद्यार्थी केवळ शिक्षकांकडून शिकण्यासाठी जात नाहीत. अन्य विद्यार्थ्यांबरोबर त्यांची दोस्ती होते. प्रसंगी भांडणे होतात. या सगळ्या बऱ्यावाईट अनुभवांतून ती शिकतात. त्यांची स्वप्रतिमा तयार होते. व्यक्तिमत्त्व घडत जाते. ते एकमेकांना मदत करतात. याच वयात मुख्यत: शाळा-कॉलेजांत मित्रांबरोबर त्यांचे सामाजिकीकरण (socialization) होते. त्यांना छंद गवसतात. आवडी निर्माण होतात. ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी या सामाजिकीकरणाला मुकतील. समाजाला त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल.

मेंदूच्या वाढीसाठी मुलांच्या वयाची पहिली आठ वर्षे- म्हणजे शिशुशाळा आणि प्राथमिक शाळा यांतील त्यांचा प्रत्यक्ष अनुभवाचा काळ निर्णायक असतो. म्हणूनच पहिली आठ वर्षे- निदान पहिली सहा वर्षे तरी- मुलांना ऑनलाइन शिक्षणापासून दूर ठेवावे असे जगभरातले शिक्षणतज्ज्ञ सांगतात. या वयात मुलांची वेदनकारक (sensory- motor) कौशल्ये विकसित होत असतात. या प्रक्रियेत आपण त्यांना लेखन तसेच ऑनलाइन प्रकारात संगणकाचा व स्मार्ट फोनचा की-बोर्ड हाताळणे अशा गोष्टी करायला लावून व्यत्यय आणतो, त्यांची प्रगती कुंठित करतो. याचा अनिष्ट परिणाम मुलांच्या मेंदूच्या वाढीवरसुद्धा होऊ शकेल.

शालेय वर्गशिक्षणाचा प्राथमिक हेतू मुलांचा बौद्धिक विकास हा असतो. तथापि शाळेत इतर सर्व पैलूंच्या दृष्टीनेदेखील विद्यार्थ्यांचा विकास घडावा अशी रास्त अपेक्षा असते. किंबहुना, हे सर्व पैलू अनेक वेळा परस्परपूरक असतात. बौद्धिक विकासातही केवळ पाठांतर, स्मरण, माहिती या निम्नस्तरीय क्षमतांपेक्षा उच्चस्तरीय बौद्धिक क्षमता- जसे संबोध बांधणे,संबोध एकमेकांशी जोडणे, साकलिक (comprehensive) चित्र समजून घेता येणे, विश्लेषणात्मक (साधकबाधक) विचार आणि मांडणी, कल्पना व काल्पनिक चित्र उभे करणे (imagination and visualization), नेमके आणि समर्पक प्रश्न विचारणे, समस्या सोडवणे, संश्लेषणात्मक (सर्जनशील) विचार, व्यावहारिक विचार आणि उपयोजन, प्रकल्प (डिझाइन- कार्यवाही- सादरीकरण) या महत्त्वाच्या बाबी आहेत. जसजसे विद्यार्थी वरच्या वर्गात जातात तसतशी या क्षमतांची गरज वाढते. याशिवाय प्रभावी बोलणे व लिहिणे, अभिव्यक्ती कौशल्य कमावणे यावर शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासात भर असायला हवा. जेव्हा आपण एखादे सादरीकरण करतो तेव्हा आपले विषयज्ञान एकत्र करतो, त्याची व्यवस्थित मांडणी (organisation) करतो, आपल्याला काय चांगले समजले आहे आणि कोठे आपण कमी पडतो, हे तपासतो आणि त्यानुसार आणखी तयारी करतो. आपल्या ज्ञानावर चिंतन (reflection) करतो. व्यवस्थित मांडणी आणि चिंतन या अधिबोधीय (metacognitive) क्षमतांची उदाहरणे आहेत. अधिबोधीय क्षमता आपल्याला काय समजले आहे, काय बोध झाला आहे हे दाखवतात.

आधुनिक बोधीय मानसशास्त्राचे पहिले गृहीतक हे की, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक मूल स्वत:च शिकते.. त्याला कोणी शिकवत नाही. शिक्षक मुलांसाठी शिकण्याच्या संधी निर्माण करतात. मात्र मुलांना त्यात अडचणी येतात. जसे आई-बाबा आपल्या मुलाला रस्ता ओलांडायला शिकवतात, त्यासाठी ते मुलाचा हात धरतात (hand-holding). शिक्षकही असेच विद्यार्थ्यांच्या अडचणीच्या वेळेस त्यांना मदत करतात. विद्यार्थ्यांच्या ज्या अंगभूत क्षमता असतात त्यांच्या जोरावर ते जी उंची गाठू शकतात, त्या उंचीपेक्षा जास्त उंची ते शिक्षकांच्या मदतीने गाठू शकतात. या प्रक्रियेला इंग्लिशमध्ये scaffolding म्हणतात. मराठीत त्याला आपण ‘सोपानक्रिया’ म्हणू. ऑनलाइन शिक्षणात सोपानक्रिया अशक्य नाही, पण कठीण असेल; कारण शिक्षक आणि विद्यार्थी समोरासमोर असतील तर ती सहज होऊ शकेल. इथे क्रिकेटचा कोच (प्रशिक्षक) फलंदाजांचे कौशल्य टप्प्याटप्प्याने कसे वाढवतो हे लक्षात घ्यायला हवे.

शेवटी दोन मुद्दे.. मुले उच्चस्तरीय बौद्धिक क्षमता कशा प्राप्त करतात, हा एक मुद्दा. विद्यार्थ्यांच्या या क्षमता त्यांची भाषाकौशल्ये, संवेदन (perception), विचारप्रक्रिया (thought processes) ,अमूर्तन (abstraction), युक्तिवाद (reasoning) अशा उच्चतर, गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांतून दिसून येतात. मुले या मानसिक प्रक्रिया त्यांच्या भोवतीच्या प्रौढ व्यक्तींशी होत असलेल्या आंतरक्रियांतून शिकतात. मुले आणि प्रौढ यांच्यामध्ये एखाद्या नियत कार्यासाठी (task) अशी आंतरक्रिया पुन:पुन्हा घडावी लागते आणि ते त्या दोघांचे सहशिक्षण असते. या आंतरक्रियांतून मुले ते नियत कार्य आत्मसात (internalize) करतात. भाषेच्या बाबतीत हे प्रकर्षांने जाणवते. भाषा शिकणे म्हणजे केवळ अक्षरे, अक्षरे जोडून शब्द, शब्द जोडून वाक्ये शिकणे नसते. शब्दांना, वाक्यांना अर्थ असतो. काही शब्दांचे अनेक अर्थ असतात आणि संदर्भानुसार शब्दाचा अर्थ बदलू शकतो. शब्द म्हणजे वस्तूंची, क्रियांची, संबोधांची प्रतीके (symbols) असतात. ही प्रतीके ते शब्द ज्या भाषेतील असतात ती भाषा बोलणाऱ्या गटातील सदस्यांनी मान्य केलेली, स्वीकारलेली असतात. (उदा. एक ठराविक आकाराचे बसण्याचे आसन दर्शवण्यासाठी मराठीभाषक ‘खुर्ची’ हे प्रतीक (शब्द) वापरतात. इंग्लिशभाषक याच संबोधासाठी ‘chair’ हा शब्द वापरतात.) थोडक्यात, मुले त्यांच्या जवळच्या प्रौढांशी होणाऱ्या सामाजिक आंतरक्रियेतून भाषा शिकतात. आणि ती शिकताना मुले त्यांच्या भोवतीच्या भाषिक गटाचा, परिप्रणालीचा (ecosystem), एका दृष्टीने संस्कृतीचा (culture) भाग होत असतात. दिवाळी, ख्रिसमस असे उत्सवी सण दाखवणाऱ्या शब्दांवरून वरील आंतरक्रियेचे स्वरूप ठळकपणे समोर येते.

परंतु एकूणच भाषेबाबत हे खरे आहे. केवळ शब्दच नव्हे, तर हात हलवून बाय बाय करणे, टाळी वाजवणे यांसारखे हावभाव (gestures) किंवा केकसारखा पदार्थ, चित्र, मूर्ती हेसुद्धा या आंतरक्रियेचे घटक असू शकतात. एका वर्षांच्या मुलापुढे केक ठेवल्यास ते झडप घालून खाण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय त्या मुलाची अधिक गुंतागुंतीची प्रतिक्रिया होणार नाही. पण तोच केक एखाद्या पाच वर्षांच्या मुलीपुढे ठेवल्यास काय प्रतिक्रिया येईल? विशेषत: तो जर तिच्या वाढदिवसासाठी आणला गेला असेल तर? तिच्या प्रतिक्रियांतून तिच्या केक खाण्याच्या इच्छेपेक्षा तिच्या आठवणी, भावभावना, आनंद, अपेक्षा जास्त व्यक्त होतील. त्या मुलीच्या अशा प्रतिक्रिया तिच्या भोवतालच्या माणसांशी झालेल्या सामाजिक-सांस्कृतिक आंतरक्रियेचा भाग आणि परिणामही असतात. येथे केक हा निव्वळ पदार्थ राहत नाही, तो एक सामाजिक-सांस्कृतिक आंतरक्रियेचे माध्यम, एक सांस्कृतिक- मानवी उत्पादन (cultural artefact) होते. म्हणूनच वरील सामाजिक आंतरक्रियेचा उल्लेख सांस्कृतिक मध्यस्थन (cultural mediation) असाही केला जातो. वायगोत्स्की या मानसशास्त्रज्ञाने सांस्कृतिक मध्यस्थनाचे तत्त्व जगापुढे प्रथम मांडले. मुलांचे सांस्कृतिक मध्यस्थन ज्या प्रौढांशी किंवा अन्य अधिक ज्ञानी (more knowledgeable others) व्यक्तींशी घडणाऱ्या आंतरक्रियेतून होते, त्यामध्ये आई-वडील आणि शिक्षक यांना सर्वात महत्त्वाचे स्थान असते. या चर्चेतून निष्कर्ष असा निघतो की, शाळा-कॉलेजे नसतील तर विद्यार्थ्यांना अशा सांस्कृतिक मध्यस्थनात आणि पर्यायाने त्यांच्या उच्चस्तरीय बौद्धिक क्षमता विकसित होण्यात अडथळे येतील. यादृष्टीनेदेखील ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेची आपण जाण ठेवायला हवी.

शिक्षण मुख्यत: ऑफलाइन हवे. मात्र, स्वयंअध्ययनासाठी ऑनलाइन अधिकाधिक प्रभावी होत चाललेले आहे हे लक्षात घेऊन दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचा मिलाफ करता आला तर..? प्रत्येक विद्यार्थ्यांने फोन वापरण्याऐवजी शिक्षकाने वर्गात टेलिव्हिजन स्क्रीनचा वापर करून एका केंद्रीय स्थानाकडून आलेल्या आदर्श पाठाद्वारा सर्व वर्गाला शिकवता येईल. असे प्रयोग यशस्वी होत आहेत. आणि त्यांना शिक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद व उत्साहपूर्ण सहभाग मिळतो आहे.आपण ऑनलाइनची पोहोच वाढवू शकलो तर ऑफलाइन शिक्षणातल्या त्रुटी दूर सारून अशी गुणवत्तापूर्ण मिश्र (हायब्रीड) पद्धत उद्याच्या भारतासाठी तयार करू शकू. अशा मिश्र पद्धतीचा खर्चदेखील बराच कमी असेल.

१५ जूनला आपण पुन्हा एकदा नियमित ऑफलाइन शिक्षणाला प्रारंभ करत आहोत. कोविडचे दीर्घ दु:स्वप्न सरते आहे. शाळा, शिक्षक, सहकर्मचारी, व्यवस्थापन, पालक आणि मुख्य म्हणजे सर्व विद्यार्थी आतुरतेने या दिवसाची वाट पाहत आहेत. कोविडच्या अनुभवाने आपल्याला शिक्षणाचे, विशेषत: प्रत्यक्ष समोरासमोरील (ऑफलाइन) शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्याचबरोबर ऑनलाइन तंत्रांचा पूरक उपयोग करून शिकणे आणि शिकवणे कसे प्रभावी करता येईल हेही समजू लागले आहे. शिक्षणातील या नव्या आरंभाचे आपण स्वागत करू या आणि त्याचबरोबर नजीकच्या भविष्यकाळात आपली शिक्षणपद्धती जगामध्ये उत्कृष्ट ठरेल यादृष्टीने कामाला लागू या.
(लेखक शास्त्रज्ञ, विज्ञानशिक्षणतज्ज्ञ आणि विज्ञानसंप्रेषक आहेत.)
hcpradhan46@gmail.com