डोमरी नावाच्या एक आडबाजूच्या खेड्यात पोटापाण्यासाठी शेती करणं आणि सोबत एक छोटं किराणामालाचं दुकान चालवणं, गणेशोत्सवात एखादं नाटक बसवणं, व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करणं असा साधा जीवनक्रम असणारा एक तरुण के. डी. जोशी यांच्या संस्कार शिबिरात डोमरीला जातो… तिथं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्याच्या दृष्टीनं काय करता येईल यावर चर्चा होते… तरुणाचा विचार पक्का होतो. आईच्या नावे असलेली सात एकर जमीन या कामासाठी दान करतो आणि २१ जुलै १९८६ रोजी सोनदरा गुरुकुलाची मेढ रोवली जाते. झाडाच्या फांद्यांच्या आधारे कशाबशा उभ्या चार झोपड्या, २३ विद्यार्थी, मातीचा एक माठ, ॲल्युमिनिअमचे एक पातेले, तीन दगडांची चूल आणि एक कंदील एवढ्या साधनांवर हा प्रकल्प सुरू होतो. अक्षर गिरवण्यासाठी साध्या पाट्या नसतात. मग जमिनीवर पाणी मारून त्यावर काडीनं अक्षरलेखन सुरू होतं. त्या तरुणाचे नाव सुदाम भोंडवे. त्याने पुढे तीन तपे, म्हणजे ३६ वर्षं हा प्रकल्प कसा पुढे नेला, कसा विकसित केला, त्याचे फलित काय? हे सर्व समजून घेण्यासाठी वाचले पाहिजे ‘शिक्षणाच्या ओव्या’. ओव्या? हो! बायका नाही का, जात्यावर दळायला बसल्या की त्या ओव्या गाऊ लागतात. त्या ओव्या त्यांनी पाठ केलेल्या असतात किंवा कोणी तरी शिकवलेल्या असतात असं नाही. त्या क्षणी स्फुरलेल्या असतात त्या. मनीचे हितगुज सांगणार्या, अनुभव आणि भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणार्या असतात. तसंच हे चरित्र. व्यक्तिचरित्र नव्हे तर ‘कार्यचरित्र.’ आपल्या अनुभवातून, संस्कारातून सहज सुचत गेलं… कागदावर मांडलं. आपलं सर्वस्व ओतून, स्वत:ला झोकून देऊन एखादं काम कसं उभं राहतं ते पाहायचं असेल तर हे साधं अनघड कार्यचरित्र वाचायला हवं.
सुरुवातीच्या काळात सुदाम भोंडवे (आता ते सर्वांचे सुदामकाका झाले) आणि मुलं मिळूनच सगळा स्वयंपाक करत. सर्व पदार्थ फक्त बाजरीचे. बाजरीचीच भाकरी, आमटी, शिरा… सगळं… कारण पालक शुल्क म्हणून द्यायचे बाजरीच. मग हळूहळू मुलांच्या मदतीने शेतात भाजीपाला लावला गेला. नंतर फळझाडेही लावली. सुदामकाकांनी पालकांना ज्वारी द्यायला सुचवलं… मुलांचा आहार चौरस होत गेला… मुलं रस्त्यावरून जाणार्या बैलगाडीतले ऊस काढून खातात म्हणून मग जमिनीच्या छोट्या तुकड्यावर ऊस लावला. मुलांना हक्काचा ऊस खायला मिळू लागला. अशा किती तरी घटना सुदामकाकांनी समोर ठेवल्यात. पर्णकुट्या उभारून मुलांच्या राहण्याची सोय केली होती खरी, मात्र समाधानकारक नव्हती. खेरीज पावसाळ्यात त्या कुट्या बदाबदा गळायच्या. शिवाय जंगली जनावरांची भीती. सहा वर्षांनंतर पहिला कक्ष उभा राहिला- नालंदा कक्ष. गवंडी काम वगळता पाया खोदणं, दगड गोळा करणं, सिमेंट कालवणं, पाणी मारणं, वाळू विटा पत्रे यांची वाहतूक… ही कामे विद्यार्थी आणि सुदामकाका यांनीच केली. कक्षांची संख्या हळूहळू वाढत गेली.
विद्यार्थ्यांची राहण्याची- भोजनाची सोय मार्गी लागली तरी अध्ययन-अध्यापन या क्षेत्रात म्हणावं तसं समाधान मिळत नव्हतं. वीस वर्षांनंतरही मिळावं तसं यश मिळत नाही असं दिसल्यावर सुदामकाका अस्वस्थ झाले. कारणाचा शोध घेऊ लागले. ते त्यांना स्वत:तच सापडलं. एक वर्षभर त्यांनी स्वत:ला वेळ दिला. नवं तंत्रज्ञान, नवे विषय यात लक्ष घातलं. नव्या दमानं उभे राहिले… योग्य तो लाभ मिळत गेला. खरं तर हा प्रवास मुळातून वाचायला हवा. या काळात त्यांनी विद्यार्थी-शिक्षक-पालक-संस्था -भोवतीचा समाज यात घडवून आणलेलं पारदर्शी नातं खूप काही सांगून जातं. कोणतंही सरकारी अनुदान न घेता हे गुरुकुल आजही समाजसहयोगातूनच चालते आहे. नोटाबंदीच्या काळात लाखोंनी काळा पैसा दान म्हणून मिळत असतानाही सुदामकाकांनी तो तत्त्वनिष्ठ राहून नाकारला. केवळ परीक्षेत उच्च श्रेणी मिळवण्यातच समाधान मानणार्यांपैकी सुदामकाका नव्हते. मुलांच्या सर्वांगीण विकासाचा त्यांना ध्यास होता. विविध जबाबदार्या पार पाडणं, श्रमप्रतिष्ठा याही गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलं. वेळोवेळी पालकांचं प्रबोधन करत राहिले.
२०१० च्या सुमारास भारतभर स्वाइन फ्लूने सर्वत्र संचार केला होता. सुदामकाकांनी काळजी घेऊनही त्यानं गुरुकुलात शिरकाव केलाच. एकाच वेळी ६५ मुलं आजारी झाली. एवढी मुलं पालकांकडे परत पाठवायची तर इतरत्र ही साथ पसरणार. संस्थेनं निर्णय घेतला, शासकीय डॉक्टरांची टीम संस्थेत बोलवून घेतली. प्रत्येक पालकाला फोनवर वस्तुस्थितीची कल्पना दिली. त्यांचा संस्थेवर विश्वास होताच. सर्वांनी सहकार्य दिलं. हे गुरुकुल बालाघाटच्या डोंगररांगात आहे. गुरुकुलानं आता आणखी जमीनही विकत घेतली आहे. वेळोवेळी वृक्षारोपण करून तो पट्टा हिरवा राखला आहे. फळझाडं लावलीत. नानाजी देशमुखांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाची सुरुवात झाली. संघ परिवारातील विविध संस्थांच्या बैठकाही इथे होत असतात. त्यामुळे समाजवाद्यांना हे गुरुकुल हिंदुत्ववादी वाटते. तर विविध विचारधारेच्या लोकांशी संस्थेचा संबंध नित्यही येत असतो. त्यामुळे हे समाजवादी आहे असे संघाच्या लोकांना वाटते. यावर खुलासे करत न बसता दोन्ही विचारधारांचे लोक भारतीय आहेत, म्हणून दोघांवर सारखेच प्रेम करणे गुरुकुलाने आपले नैतिक कर्तव्य मानले आहे.
संस्थेला महत्त्वाचे मार्गदर्शक लाभलेत. अध्यापनाच्या पारंपरिक आणि रुक्ष पद्धतीला बाजूला ठेवून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला सुरुवात केली. पाच ‘E’ म्हणजे Engage, Explore, Extend, Explain, Evaluate या आधारे मुलांच्या आकलनात, अभ्यासात गती आणली. मुलांचे वाचन वाढवण्याच्या दृष्टीनेही अनेक उपक्रम राबवलेत. हे सर्व करत असताना संस्था आपल्या विध्यार्थ्यांच्या पालकांशी भावनिक नातं कसं जोडून घेते याची उदाहरणेही वाचनीय आहेत. पालक मेळावे न चुकता भरवले जातात. फटाकेमुक्ती, व्यसनमुक्ती, कार्बन ऑडिट, अंधश्रद्धा अशा विषयाबाबतही जागरूकतेनं कृतिशील असतात.
एका सामान्य तरुणाने अनेकांच्या सहकार्यानं हे गुरुकुल नावारूपाला आणलं. ते परिसराला ऊर्जितावस्था आणणारं ठरलं. यात सुदामकाकांच्या पत्नीचा हातभार विशेष म्हणावा असाच होता.
१९८६च्या मे महिन्यात डोमरी गावातील संस्कार शिबिरात ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचं सामूहिक वाचन होऊन त्यावर चर्चा झाली. त्यातून प्रेरणा घेऊन सुदाम भोंडवेंनी हे ‘सोनदरा गुरुकुल’ साकार केलं. या कार्यचरित्राच्या प्रस्तावनेतील एक वाक्य आहे- ‘‘…वीणा गवाणकर लिखित ‘एक होता कार्व्हर’ पुस्तकाच्या वाचनामुळे (सुदाम)काका व त्यांच्या सहकार्यांना सोनदरा गुरुकुल स्थापनेसाठी मानसिक-वैचारिक बळ मिळाले.’’ तसेच बळ आडवळणाच्या ठिकाणी कार्यरत असणार्या अज्ञात कार्यकर्त्यांस ‘शिक्षणाच्या ओव्या’ वाचून मिळो.
‘शिक्षणाच्या ओव्या’,
सुदाम भोंडवे, राजहंस प्रकाशन,
पाने-१३०, किंमत- २०० रुपये.
