जयश्री कुलकर्णी
सुनाद त्याचे माई-अप्पा, आई-बाबा आणि आत्या या सर्वांबरोबर एका टुमदार घरात राहत असे. घराच्या अंगणात तुळस होती, शेजारीच चाफ्याचं झाड होतं. चाफ्यावर रोज अनेक पक्षी किलबिल करीत. त्यावर चिमण्यांनी आपलं घरटंही बांधलं होतं.
माई पहाटे उठून अंगणातला केर काढी. सडा शिंपडून नाजूकशी रांगोळीही… आज सुनाद सकाळी लवकर उठला, तो डोळे चोळतच बाहेर आला. माईनं चाफ्याखाली एका छोट्या मातीच्या भांड्यात पाणी ओतलं. एका पसरट भांड्यात तांदळाचे दाणे ठेवले. सुनाद ते सर्व पाहत होता. तो म्हणाला, ‘‘माई हे कुणासाठी ठेवलंय?’’
‘‘बाळा, या चाफ्यावर चिमण्या येतात ना, त्यांच्यासाठी ठेवलंय. ये बस इथे, तुला एक गाणं शिकवते. म्हण, ‘‘ये गं चिऊ, दाणा खा, पाणी पी आणि भूर्रर्रर्र उडून जा.’’
सुनादही गाणं म्हणू लागला. एक चिमणी आली, इवल्याशा चोचीनं दाणे टिपू लागली, पाणी प्यायली आणि पंख फडफडत भुर्रकन् उडून गेली. एक एक करत सर्व चिमण्या येऊ लागल्या. त्याला भारी मौज वाटली.
आत्या आली, तिनं त्या झाडाला एक पिटुकला झोपाळा बांधला. सुनादनं विचारलं, ‘‘आत्तू, हा झोपाळा कुणासाठी गं?’’
‘‘बाळा, या झाडावर चिमणा-चिमणीचं घरटं आहे. त्यात त्यांची पिल्लं आहेत, त्यांच्यासाठी.’’
‘‘ती बाहेर का येत नाहीत?’’
‘‘ती अजून लहान आहेत, त्यांना पंख फुटायचे आहेत. ही पिल्लं थोडी मोठी झाली की या झोपाळ्यावर बसतील, वारा त्यांना झोके देईल.’’ या गोड कल्पनेचं चित्र सुनादच्या डोळ्यांसमोर छान झोके घेत राहिलं.
एक दिवस काय झालं, माई आजारी असल्यानं त्या झोपून राहिल्या. सुनाद सवयीप्रमाणे सकाळी उठून अंगणात गेला. माईला शोधू लागला. झाडावर चिमण्या किलबिलाट करत होत्या. तो घरात आला, पाहिलं तर माई आपल्या खोलीत झोपली होती. आई नेहमीप्रमाणे काम करत होती, बाबा दाढी करत होते. तो बाबांना म्हणाला, ‘‘मला तो तांदळाचा डबा काढून द्या.’’ त्याच्या बाबांनी डबा खाली काढून दिला, त्याने त्यातून आपल्या चिमुकल्या मुठीत तांदूळ घेतले आणि चाफ्याच्या झाडाखालील भांड्यात ठेवले. पुन्हा घरात आला. अप्पा वर्तमानपत्र वाचत बसले होते. तो अप्पांना म्हणाला, ‘‘मला थोडं पाणी द्या.’’ अप्पांनी त्याला छोट्या पेल्यात पाणी दिलं. ते पाणी सांडत सांडत तो चिमुकल्या हातानं पेला घेऊन बाहेर आला. मातीच्या भांड्यात पाणी ओतलं. मग तो अंगणातल्या पायरीवर बसला. आता माईनं शिकवलेलं गाणं म्हणू लागला.
‘‘ये गं चिऊ, दाणा खा, पाणी पी आणि भूर्रर्रर्र उडून जा.’’
खरंच की! एक चिऊताई आली दाणे टिपून, पाणी पिऊन भुर्रकन् उडून गेली. त्याला खूप आनंद झाला. मग एक एक करता अनेक चिमण्या येऊन दाणे टिपून, पाणी पिऊन भुर्रर्रर्र उडून गेल्या. त्याला खूप आनंद झाला. तो धावतच माईच्या खोलीत गेला. ‘‘माई, आज आपल्या अंगणात खूप चिऊताई आल्या…’’ माईला आजची गंमत त्यानं छान रंगवून सांगितली.
माईच्या कपाळावर आपला हात ठेवत म्हणाला, ‘‘माई, मी आता रोज चिऊताईसाठी पाणी आणि तांदूळ ठेवेन.’’ माईनं त्याच्या गालावरून मायेनं हात फिरवला.
तो पुन्हा अंगणात आला, सर्व चिमण्या आकाशाच्या दिशेनं उडाल्या होत्या. घरट्यातून पिल्लं बाहेर आलीत का म्हणून तो चाफ्याकडे उत्सुकतेने बघू लागला.
jayshreekulkarni05@gmail.com
