‘चाणक्य’ या व्यक्तिनामाचे सर्वसाधारण भारतीय मनावर आजही प्रगाढ गारूड आहे. चाणक्य, त्यांचा काळ, कर्तृत्व यांबद्दल केवळ जुजबी माहिती असलेल्यालाही ‘चाणक्य’ हे नाव उच्चारल्यावर आठवते अर्थशास्त्र. मुळात भारतीय मन कमालीचे परंपरापूजक. त्यातच पूर्वगौरववादी मनोधारणेला सध्यासर्वत्रच अपरंपार बहर आलेला. त्यामुळे ‘‘अर्थशास्त्राबद्दल भारतीयभूमीमध्ये पार इसवी सनपूर्व काळापासूनच चिंतन, अध्ययन व लेखनाची किती प्रदीर्घ परंपरा आहे,’’ यांसारखी प्रतिपादने चाणक्यांचे नाव घेतल्या घेतल्या हिरिरीने सुरू होतात. मुळात ‘अर्थशास्त्र’ (इकॉनॉमिक्स) या नावाने जी ज्ञानशाखा १८-१९व्या शतकापासून पुढे विकसित झाली तिचा आणि चाणक्यांना अभिप्रेत असलेल्या अर्थशास्त्राचा संबंध फार कमी आहे. आज जिला आम्ही ‘अर्थशास्त्र’ असे म्हणतो, त्या ज्ञानशाखेचे मूळ नाव ‘राजकीय अर्थशास्त्र’ (पोलिटिकल इकॉनॉमी). मूलत: नीतिशास्त्राचे अध्यापक व अभ्यासक असलेले अ‍ॅडम स्मिथ हे आधुनिक अर्थशास्त्राचे प्रवर्तक गणले जातात.
चाणक्यांच्या काळात ‘अर्थशास्त्र’ या संज्ञेचा अर्थ ‘राज्यव्यवहारशास्त्र’ असा होता. याच अर्थाने चाणक्यांनी ते ग्रंथनाम म्हणून वापरलेले आहे. महाभारतपूर्व काळात तर समाजाच्या व्यावहारिक जीवनाशी ज्या ज्या गोष्टींचा संबंध पोहोचतो, अशा सर्वच बाबींचा अंतर्भाव ‘अर्थशास्त्र’ या संज्ञेमध्ये केला जात असे. या शास्त्राचे राजकारणविषयक जे अंग होते त्याला ‘नीतीशास्त्र’ असे म्हणत असत. महाभारत काळापासून पुढे राजधर्म आणि राज्यकारभार, राजाची कर्तव्ये यांसारख्या विषयांचे महत्त्व वाढू लागल्याने राजधर्माचा विचार ‘अर्थशास्त्र’ या स्वतंत्र ज्ञानशाखेअंतर्गत होऊ लागला, असे अभ्यासकांचे प्रतिपादन आहे. साहजिकच, सनपूर्व तिसऱ्या शतकातील चाणक्यांच्या काळात ‘राज्यव्यवहारशास्त्र’ हाच ‘अर्थशास्त्र’ या संज्ञेचा अर्थ क्रमाने प्रस्थापित होत आलेला दिसतो. ‘अर्थशास्त्र’ या एकाच वैचारिक कृतीमुळे चाणक्यांचे नाव सर्वतोमुखी गाजू लागल्याने, असाधारण प्रतिभा लाभलेल्या त्या राजपंडिताने निर्माण केलेल्या अन्य ग्रंथकृतींकडे कोणाचेच फारसे लक्ष जात नाही. ‘सूत्रे चाणक्याची.. सूत्रे गव्हर्नन्सची’ या डॉ. वसंत गोडसे यांनी परिश्रमपूर्वक तयार lr19केलेल्या अनुवादकृतीमुळे ‘चाणक्यसूत्रे’ ही चाणक्यांची आणखी एक प्रगल्भ साहित्यकृती आपल्याला ठाऊ क होते. या ग्रंथाची पहिली मोठी आणि महत्त्वाची उपलब्धी हीच. मूळ ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात आलेल्या एकंदर ५७१ सूत्रांचे संकलन करत चाणक्यांनीच ही ‘चाणक्यसूत्रे’ सिद्ध केली, अशी धारणा आहे. अर्थात, ही धारणाही निरपवाद नाही. कारण महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्यासारख्या विद्वानांच्या मते, ही सूत्रे चाणक्यांच्या नंतरची आहेत. मात्र, डॉ. शामशास्त्र यांनी चाणक्यांच्या ५७१ सूत्रांचा समावेश असलेला एक ग्रंथ पूर्वी प्रकाशित केलेला होता. चाणक्यांच्या या सूत्रांचा सटीप विस्तार विद्यालंकार रामावतार यांनी ‘चाणक्यसूत्राणि’ या नावाच्या ग्रंथात १९५९ साली केला. हिंदीमध्ये लिहिलेल्या या ग्रंथाचा मराठी भाषेमध्ये डॉ. वसंत गोडसे यांनी सिद्ध केलेला अनुवाद म्हणजे प्रस्तुत ग्रंथ. चाणक्यांचा काळ हा राजेशाहीचा काळ होता. साहजिकच, राज्याची आणि पर्यायाने संपूर्ण समाजाच्या सर्वागीण क्षेमकुशलाची सूत्रे ज्या राजाच्या हाती तो राजा कसा असावा, कसा असू नये, राजाची कर्तव्ये काय असतात, राज्यकारभार करत असताना राजाने कोणती काळजी घेतली पाहिजे, राजाने त्याचे मंत्री व सल्लागार कसे निवडावेत, राजशकट हाकत असताना राजाने कशा प्रकारची दक्षता किती बाबतींमध्ये घेतली पाहिजे.. अशांसारख्या अनंत पैलूंचा ऊहापोह चाणक्यांनी सूत्रमय पद्धतीने केलेला या ग्रंथात आढळतो.
आज ज्याला आपण ‘सुशासन’ म्हणजेच ‘गव्हर्नन्स’ असे म्हणतो त्यात यातील अनेक बाबींचा समावेश होत असल्याने, व्यवहारात चाणक्यांची ही सूत्रे ‘गव्हर्नन्स’शी संबंधित असल्याने त्यांची प्रस्तुतता आजच्या काळातही ओसरत नाही, या धारणेने डॉ. गोडसे या ग्रंथाच्या अनुवादास प्रवृत्त झाले. मुळात विद्यालंकार रामावतार यांचीही धारणा तीच आहे. मूळ ग्रंथकर्ते आणि अनुवादक यांची ही धारणा ढोबळ मानानेच यथार्थ आहे, याचे भान मात्र हा ग्रंथ वाचत असताना सतत जागते ठेवावे लागते. त्याचे कारण सोपे आणि उघड आहे. ते असे की, आपण सगळे आज लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये जगत आहोत. त्यामुळे मूळ राजेशाही व्यवस्थेला अनुलक्षून निर्माण झालेल्या या सूत्रांचा संबंध आणि संदर्भ आजच्या लोकतंत्रप्रधान व्यवस्थेच्या चौकटीला लावताना काही ठिकाणी मूळ लेखकाला बरीच कसरत करावी लागलेली आहे. त्यातच चाणक्यांसारख्या अलौकिक प्रतिभेच्या विचारवंताच्या राज्यकारभारविषयक प्रगल्भ चिंतनाकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच आपल्या देशात ठायीठायी दुरवस्था अनुभवास येते आहे, अशी लेखकाची असलेली ठाम धारणाही अनेक सूत्रांसंदर्भातील भाष्य कमालीचे अभिनिवेशपूर्ण बनवते. लेखनाचा आणि प्रतिपादनाचा तोल अशा ठिकाणी ढळलेला जाणवतो. या ग्रंथाची ही मर्यादा समजून घेत ज्या वेळी आपण त्याचे अंतरंग बघतो, त्या वेळी काही बाबी प्रकर्षांने मनावर ठसतात. भारतीय संस्कृती आणि परंपरा ही बव्हंशी निवृत्तिवादी आहे, ही आपल्या मनावर पूर्वापार ठसलेली अथवा ठसवण्यात आलेली धारणा स्वच्छ नजरेने एकवार तपासून बघण्यास हा ग्रंथ आपल्याला प्रवृत्त करतो. केवळ प्रवृत्त करतो इतकेच नाही, तर ती धारणा सुधारून घेण्यासाठी आवश्यक असलेली सामग्रीही मुबलक प्रमाणात पुरवतो. या लौकिक व भौतिक जगातील मानवी जीवन सुखी व संपन्न व्हावे यासाठी किती प्रकारे इथे चिंतन घडत होते याचे दर्शन हा ग्रंथ घडवतो. राज्यव्यवहार हा अखेर लोकव्यवहाराचाच एक अंश असतो. त्यामुळे हा लोकव्यवहार शक्य तेवढा निकोप राहावा, यावर चाणक्यांचा भर दिसतो. लोकव्यवहाराचा पोत सुधारण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेकानेक जीवनसूत्रांचा समावेश चाणक्य त्यांच्या चिंतनामध्ये करतात. सर्वसामान्य माणसाने रोजच्या जीवनात जगावे कसे, या संदर्भातील अगदी बारीकसारीक तपशिलांनाही चाणक्यांनी त्यांच्या सूत्रांमध्ये गुंफलेले आहे. उगाचच भडक आणि प्रथमदर्शनीच प्रतिकूल मत बनवणारे कपडे परिधान करू नयेत, इथपर्यंत चाणक्यांचे निरीक्षण पोहोचलेले दिसते. सर्वसामान्य माणसाचे लौकिक जीवन काही किमान गुणांनी अलंकारित असावे, ही दृष्टी चाणक्यांच्या चिंतनात मध्यवर्ती आहे. आर्थिक कुवतीनुसारच ज्याने त्याने दान करावे, दुष्ट माणसांशी संपर्क ठेवू नये, कधीही कोणाचा अपमान करू नका, रागाला उत्तर देताना रागावू नका, रास्त व सबळ कारण नसताना दुसऱ्याच्या घरी जाऊ नये, अकारण खूप जेवणे प्रसंगी प्राणघातक ठरू शकते.. यांसारख्या अत्यंत व्यावहारिक सूचनाही सूत्रांद्वारे समाजाला देण्यामागे चाणक्यांची तीच दृष्टी दिसते. लौकिक जीवनाबद्दलची किती निकोप आणि जबाबदार भूमिका सनपूर्व तिसऱ्या शतकामध्ये इथे नांदत होती, याचे अनेक दाखले या सूत्रांद्वारे आपल्याला मिळतात. राजेशाहीमध्ये अखेर राजाचे वर्तनच प्रजेच्या जीवनाचा गुणात्मक पोत ठरवत असते. पण त्याचवेळी सर्वसामान्य प्रजाजन नीतिमान असतील तर राजसत्तेवर प्रजेच्या नैतिकशक्तीचे बळ अंकुश राखून राहते, ही चाणक्यांची धारणा त्यांच्या सूत्रमय चिंतनाला अस्तराप्रमाणे चिकटलेली दिसते. त्यामुळे या ग्रंथात एकत्रित केलेल्या सूत्रांमध्ये बहुतांश सूत्रे ही नीतिमान जीवनशैलीचे दिग्दर्शन करणारी आणि व्यक्तिगत, तसेच सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा आग्रह धरणारी आहेत. सुशासन अथवा ‘गव्हर्नन्स’ यांचा विचार निर्वात पोकळीमध्ये करता येत नाही. राजसत्ता आणि प्रजासत्ता एकंदरीने किती नीतिमान आहेत यावरच त्या त्या समाजव्यवस्थेतील शासनसंस्थेची गुणवत्ता आणि पर्यायाने परिणामकारकता निर्भर असते. म्हणजेच, किमान नीतिमूल्यांची जीवनव्यवहारात जोपासना केली जाणे, हा सुशासनाचा प्राण ठरतो. त्यामुळे नीतिमान जीवनप्रणालीचा आग्रह धरणाऱ्या अनंत सूत्रांची पखरण चाणक्यांच्या अक्षरधनात सर्वत्र दिसते. केवळ सत्यामुळेच मानवसमाज सुरक्षित राहतो, नम्रता हेच माणसाचे सर्वात मोठे भूषण होय. सदाचारामुळेच यश व आयुष्य वाढते, दुसऱ्याच्या पैशाचा लोभ धरू नये, इतरांच्या धर्मपत्नीशी संपर्क ठेवण्याचा विचार मनातदेखील आणू नका, कर्तव्यपालन हे सुखाचे मूळ आहे, इतरांचा पैसा पळवणे हे आपल्या पैशाच्या विनाशाचे कारण ठरते.. अशांसारखी सूत्रे या ग्रंथात पानोपानी आढळतात. त्यामुळे चाणक्यांची ही सूत्रे ‘गव्हर्नन्स’ संदर्भातील आहेत अथवा असली तरी त्याहीपेक्षा त्यांचा थेट रोख हा नीतिमान जीवनशैलीचा परिपोष करण्यावर प्रकर्षांने आहे. व्यक्ती तसेच समाजाच्या जीवनव्यवहारात किमान नैतिकतेचाच अभाव असेल, तर त्या समाजात सुशासन अथवा गव्हर्नन्सची चर्चा आणि अपेक्षा फिजुल आहे, हाच चाणक्यांच्या या सूत्रांचा इत्यर्थ!
‘सूत्रे चाणक्याची.. सूत्रे गव्हर्नन्सची ’
डॉ. वसंत गोडसे,
परममित्र पब्लिकेशन्स,
 पृष्ठे – ५३४,
किंमत – ६०० रुपये.