‘धर्म खऱ्या अर्थाने समजलेले लोकच सर्व धर्मांचा आदर करतात…’

धर्म या संकल्पनेजवळ खेळत आणि आपल्याला खेळवत हा महानायक उभा आहे. त्यांना केवळ धर्माभोवतालची जळमटेच नाही, तर आपल्या मनातली जळमटे नाहीशी करायची आहेत.

डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर लिखित ‘स्वामी विवेकानंदांची खरी ओळख’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. विवेकानंदांना अभिप्रेत हिंदू धर्म आणि हिंदुत्वासंबंधीचे त्यांचे विचार यासंबंधात सध्या जे विकृतीकरण सुरू आहे त्यास छेद देणाऱ्या या सत्यान्वेषी पुस्तकातील ‘धर्म, विज्ञान आणि मुक्ती’ या प्रकरणाचा संपादित अंश…

विवेकानंदांच्या धर्मविषयक मांडणीमुळे लंडन इथे १८९६ मध्ये ‘संडे टाइम्स’ने घेतलेल्या मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारण्यात आला, ‘‘तुमची शिकवण म्हणजे धर्माच्या तुलनात्मक अभ्यासाची एक पद्धत आहे का?’’ त्यावर विवेकानंदांनी दिलेले उत्तर असे आहे- ‘‘सर्व प्रकारच्या धर्मांचे सार असा शब्दप्रयोग केल्यास माझ्या शिकवणीची अधिक स्पष्ट कल्पना येईल. सर्व धर्मांतील गौण अंगे सोडून त्यांतल्या आधारभूत गोष्टींवर भर देणे हेच माझ्या शिकवणीचे सार आहे.’’

विवेकानंद हे अधिक स्पष्टपणे किंवा आक्रमकपणे २८ फेबु्रवारी १९०० रोजी कॅलिफोर्नियातील ऑकलंड इथल्या ‘युनिटेरियन चर्च’मध्ये दिलेल्या भाषणात मांडतात. ते म्हणतात, ‘‘जगातल्या सर्व धर्मांमध्ये साम्याचे पुष्कळ मुद्दे आहेत. आणि कित्येक वेळा हे साम्य इतके आश्चर्यकारक असते की त्यामुळे निरनिराळ्या धर्मांनी पुष्कळ गोष्टी एकमेकांपासून उचलल्या आहेत असे वाटते. प्रत्येक धर्माचा प्रमाणभूत व अधिकृत असा एक ग्रंथ असतो. आणि प्रत्येक धर्माचा असा दावा असतो की, त्याचा धर्मग्रंथ हाच ईश्वराचा अधिकृत शब्द आहे. इतर सर्व धर्मांचे सर्व धर्मग्रंथ खोटे आहेत आणि गरीब बिचाऱ्या माणसांवर ते लादले गेले आहेत. त्यांचे अनुकरण करणाऱ्या माणसांची अधोगती होत आहे. आपण त्यांना वाचवले पाहिजे.

‘‘असा हटवाद व दुराग्रह सर्व धर्मांतील सनातनी लोकांमधील एक समान दुवा आहे. उदाहरणार्थ, वेदांचे सनातनी अनुयायी असे मानतात की, केवळ वेदच या जगात ईश्वराचे अधिकृत शब्द आहेत. केवळ वेदांद्वारेच ईश्वर या जगाशी बोलला आहे.’’ ते इथेच थांबत नाहीत, तर पुढे म्हणतात, ‘‘सगळे जगच वेदांमुळे अस्तित्वात आले आहे. जगातली प्रत्येक वस्तू अस्तित्वात आहे, कारण ती वेदांमध्ये आलेली आहे. गाय अस्तित्वात आहे, कारण ‘गाय’ हा शब्द वेदांमध्ये आहे. वेदांची भाषा ही ईश्वराची भाषा आहे. बाकी भाषा म्हणजे फक्त खुळखुळे आहेत. वेदांमधील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक अक्षराचा उच्चार अगदी शुद्ध रीतीने केला पाहिजे. प्रत्येक अक्षर योग्य त्या स्वरात उच्चारले पाहिजे. आणि त्यात थोडी जरी चूक झाली तरी ते महापाप होय! असाच हटवाद सर्व धर्मांतील सनातनी वृत्तीच्या लोकांमध्ये प्रबळ आहे. परंतु केवळ शब्दांवरून होणाऱ्या भांडणात अज्ञानी, मूर्ख आणि ज्यांना धर्म अजिबात समजलेला नाही असे आंधळे सनातनी लोक भाग घेतात. ज्यांना कोणताही धर्म खऱ्या अर्थाने थोडाफार जरी समजलेला असेल, ते लोक सर्व धर्मांचा आदर करतात. काळाची आणि शब्दांची चौकट वेगळी आहे हे त्यांना समजलेले असते. मात्र, सर्व धर्म एकच गोष्ट सांगताहेत… तुम्ही सगळे भाऊ-भाऊ आहात. समतेने, आनंदाने, गुण्यार्गोंवदाने राहा.’’

त्याचवेळी लंडन इथे दिलेल्या दुसऱ्या एका भाषणात हा मुद्दा अधिक प्रभावीपणे मांडताना विवेकानंद म्हणतात, ‘‘भारतातल्या एखाद्या पुरोहिताला जर मी विचारले, ‘वेदान्तावर तुझा विश्वास आहे का?’ तर तो त्यावर म्हणेल, ‘पूर्णपणे विश्वास आहे. वेदान्त माझा श्वास आहे. तो माझा धर्म आहे. वेदान्त माझे जीवन आहे.’ ‘ठीक आहे… मग तू सर्व जीव समान आहेत, हे मानतोस काय?’ तो म्हणेल, ‘हेच तर वेदान्त मला सांगतो.’ पण जर पुढच्याच क्षणी खालच्या जातीचा एखादा माणूस या पुरोहिताच्या जवळ येईल, तर तो त्या माणसाचा स्पर्श टाळण्यासाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उडी घेईल! ‘तू असा दूर का पळालास म्हणून त्याला विचारले तर तो म्हणेल, ‘कारण या माणसाच्या स्पर्शाने विटाळ झाला असता.’ त्यावर मी त्याला म्हणेन की, ‘तू तर आताच म्हणाला होतास- आपण सगळे समान आहोत; आत्म्या-आत्म्यांमध्ये भेद नसतो. त्याचे काय झाले?’ त्यावर तो शांतपणे उत्तर देईल, ‘गृहस्थांसाठी हा केवळ शास्त्रातला सिद्धान्त आहे.’ त्या सनातनी माणसाचे राहू देत. तुम्ही लंडनमधल्या एखाद्या कुलीन व श्रीमंत अशा माणसाला विचारा की, ‘एक ख्रिस्ती या नात्याने त्याचा ‘सगळी माणसे ईश्वराची लेकरे आहेत, ती भाऊ-भाऊ आहेत यावर त्याचा विश्वास आहे की नाही?’ तो याचे उत्तर होकारार्थी देईल; पण पाच मिनिटांच्या आत तो सामान्य लोकांबद्दल तिरस्काराने बोलेल. त्यांना समतेने वागवणे तर फार दूरच्या गोष्टी आहेत. पुरोहितगिरी व श्रीमंती या स्वभावत:च निर्दय व कठोर आहेत. म्हणूनच श्रीमंती आणि पुरोहितगिरी माजू लागली की धर्माचे पतन होते. आणि म्हणूनच वेदान्त म्हणतो- आणि सारेच धर्म सांगतात, आपण विशेषाधिकाराची कल्पनाच टाकून दिली तरच धर्माचा प्रारंभ होईल. त्यापूर्वी धर्माचे अस्तित्व असूच शकत नाही.’’

त्याच वर्षी लंडन इथल्या सिसेम क्लबमध्ये दिलेल्या भाषणात विशेषाधिकारांवर त्यांनी विस्तृत भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘विशेषाधिकार नाहीसे करणे हे मात्र शक्य आहे. तेच जगापुढचे खरे कार्य आहे. प्रत्येक देशात व प्रत्येक जातीत सगळ्या सामाजिक जीवनात या विशेष अधिकारांविषयींचा झगडा चालू आहे. काही लोक किंवा काही लोकांचा समूह दुसऱ्या समूहापेक्षा जास्त बुद्धिमान असतो. यात तसे अनुचित काही नाही. पण खरा प्रश्न तेव्हाच उपस्थित होतो, जेव्हा हे बुद्धिमान लोक ज्यांना कमी बुद्धी आहे अशा लोकांकडून भौतिक उपभोगांची साधने हिरावून घेतात. खरा संघर्ष हा विशेष अधिकार नष्ट करण्यासाठीचा आहे. काही जण इतरांपेक्षा जास्त ताकदवान असतील व ते दुबळ्या लोकांना पराभूत करतील, हे एक स्वयंसिद्ध सत्य आहे. पण त्यामुळे त्यांनी आयुष्यातली सगळी सुखे भरभरून उपभोगावीत आणि इतरांना त्यापासून वंचित ठेवावे, हे योग्य नाही. काही जणांना आपल्या नैसर्गिक बुद्धिमत्तेमुळे इतरांहून जास्त पैसा मिळवता येत नाही. पण म्हणून त्यांच्यावर हवे तसे जुलूम करावेत किंवा त्यांना चिरडून टाकावे हे मात्र पूर्णपणे अन्यायाचे आहे. कोणत्याही कारणाने, कोणत्याही मार्गाने दुसऱ्यांपेक्षा जास्त सवलती प्राप्त करून घेणे हा विशेषाधिकार आहे आणि या विशेषाधिकाराला हाणून पाडणे, त्याचा पूर्णपणे नाश करणे, हेच पुरातन काळापासून नीतीचे आणि सर्व धर्मांचे ध्येय आहे. हेच एकमेव असे कार्य आहे की जे विविधता नष्ट न करता समता व एकता निर्माण करू शकेल.’’

आणखी एका भाषणात विवेकानंद म्हणतात, ‘‘व्यवसायांवर आधारित जाती समाजात निर्माण होणार हे अगदी उघड आहे. पण त्या जन्मावर आधारित नसाव्यात. आणि या अशा जाती भारतातच नव्हे, तर जगभर अस्तित्वात आहेत. आपल्याला विशेषाधिकार आणि इतरांना वेगळी वागणूक हे सर्वत्र होतेय. त्यातूनही विशेषाधिकार निर्माण होताहेत. दुसऱ्या जातीला वेगळी, अपमानास्पद वागणूक दिली जाते. या तुमच्या प्रगत देशात (इंग्लंड) न्यायालयात पंच मंडळी- म्हणजे जे ज्यूऽरी असतात, त्यात तुम्ही खाटकांना घेत नाही. खाटीक हा हिंसक मनोवृत्तीचा आहे, ही त्यामागची तुमची धारणा आहे. खाटीक हिंसक; त्यांनी दिलेले मांस खाणारे आम्ही मात्र चांगले अशी ही मनोवृत्ती आहे. हा एक प्रकारे विशेषाधिकारांचा खेळ आहे आणि सर्व प्रकारचे विशेषाधिकार ही विकृती आहे असे सांगत सर्व धर्म उभे आहेत.’’

मात्र, या मांडणीतल्या त्रुटी आणि अडचणी विवेकानंदांना माहीत आहेत. भगिनी निवेदिता म्हणजे मार्गारेट नोबेल यांची ओळख झाल्यावर त्यांना ७ जून १८९६ रोजी पाठवलेल्या पत्रात विवेकानंद लिहितात, ‘‘प्रिय कुमारी नोबेल, आजच्या जगातले सगळे धर्म हे निर्जीव विडंबनाच्या स्वरूपात उरले आहेत, हे ओळखून आपल्याला आपले काम करायचे आहे.’’ प्रेमदास मित्र म्हणजे ‘सनातन धर्मा’चे खंदे समर्थक, त्या धर्माचे मान्यवर नेते. अमेरिकेतून परत आल्यावर भारतात आपले काम सुरू करताना ३० मे १८९७ रोजी त्यांना जहाल शब्दांत विवेकानंदांनी शेवटचे पत्र लिहिलेय. त्यात ते लिहितात, ‘‘मी म्लेंच्छ आहे, शूद्र आहे. देशात आणि विदेशांत अगदी जाहीररीतीने मी कुणाच्याही पंक्तीला बसून कुठेही, काहीही खातो. मी वाटेल ते खातो म्हणजे माझ्या मनातही बरेच विकृत परिवर्तन घडून आलेले आहे, हे ओघाने आलेच. त्यामुळे निर्गुण ब्रह्म मला आता चांगल्या प्रकारे कळते आणि कोणत्याही माणसात ते मला दिसले तर मी त्याला ईश्वर मानतो. त्याच्या पलीकडे जाऊन दुसरा एखादा काल्पनिक जग निर्माण करणारा, जगाचे नियंत्रण करणारा ईश्वर आहे, ही हास्यास्पद कल्पना मला मान्य नाही. तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, स्मृती आणि पुराणे हे ग्रंथ सामान्य बुद्धिमत्तेच्या लोकांनी रचलेले असून ते तर्कदोष, चुका, भेदभावना, द्वेषभावना यांनी ओसंडून वाहत आहेत. रामानुज, शंकराचार्य म्हणजे कोत्या मनोवृत्तीचे नुसते कोरडे पंडित होत. दुसऱ्याचे दु:ख पाहून व्याकूळ होऊन विव्हळणारे मन त्यांच्याजवळ अजिबात नाही. स्वत:ला लवकर मुक्ती कशी प्राप्त होईल, या एकाच विवंचनेत ते गढून गेलेले असतात. परंतु अशी मुक्ती मिळणे कधीतरी शक्य आहे का? ‘मी’चा, ‘अहं’चा बिंदुमात्रही शिल्लक असेल तोवर आयुष्यात काहीही साध्य होणार नाही.

‘‘आपल्या धर्मातली दुसरी एक घोडचूक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. जातिकल्पना हाच सर्वांत मोठा विभाजक घटक आहे. कोणतीही जात- ती जन्मगत असो वा गुणगत असो- पूर्णपणे चुकीची आहे. काही मित्र सांगतात- ‘तुमचे म्हणणे खरे आहे; पण हे सर्व मनात ठेवा. बाहेर व्यावहारिक जगात वावरताना जातिबंधनाचे भेद पाळलेच पाहिजेत!’ कमाल आहे. मनात आणि शब्दांत समतेचा उद्घोष करायचा आणि बाहेर मात्र एखाद्या भित्र्या, घाबरट, दुबळ्या माणसासारखे बाहेर सुरू असलेले राक्षसी अत्याचार पाहत बसायचे, त्यांत सामीलही व्हायचे. बिचाऱ्या दलितांचे आणि गरिबांचे यात अक्षरश: मरणच आहे. स्पष्टपणे सांगतो, मी म्लेंच्छ आहे. मला म्लेंच्छांचे अन्न काय आणि चांडाळांचे अन्न काय, दोन्ही सारखेच. जातभेद इत्यादी खुळचट कल्पना पुरोहितांनी लिहिलेल्या ग्रंथांमधूनच सापडणार. कोणत्याही ईश्वरप्रणीत ग्रंथांत त्या सापडणार नाहीत. मला दुसरे एक सत्य जाणवले आहे. ते असे की, परोपकार हाच एकमेव धर्म आहे. विधी-अनुष्ठाने म्हणजे निव्वळ खुळेपणा आहे.’’

धर्म या संकल्पनेजवळ खेळत आणि आपल्याला खेळवत हा महानायक उभा आहे. त्यांना केवळ धर्माभोवतालची जळमटेच नाही, तर आपल्या मनातली जळमटे नाहीशी करायची आहेत. ते ठामपणे सांगतात, चमत्कार हे सत्यप्राप्तीच्या मार्गातले सर्वांत मोठे अडथळे आहेत. महात्मे, गूढ संदेश आणि अवतार यांवर आपला विश्वास नाही. त्याचप्रमाणे विषमतेचा नाश करणे हे सर्व धर्मांचे एकमेव आणि समान उद्दिष्ट आहे. जगातल्या सर्व धर्मांत जलप्रलयाची कथा आहे. म्हणजे जगभरची एक विकसित मानवी संस्कृती एका नैसर्गिक आपत्तीत नाहीशी झाली आणि मग अंधारात चाचपडत, जुने आधार शोधत धर्माचा प्रवास सुरू झाला आहे, अशा प्रकारच्या चर्चाही केल्या आहेत. 

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहजपणे कशी मिळतील, हे सांगताना विवेकानंद म्हणतात, ‘‘शिकणे हा माणसाचा खरा धर्म आहे. तुमचा धर्मग्रंथ आणि इतर धर्मग्रंथांच्या साहाय्याने शिकायला प्रारंभ करा… मग अगदी नकळत तुम्हालाच जाणवेल. एकच धर्म खरा आहे व इतर सर्व धर्म खोटे आहेत असे कुणी म्हणत असेल तर ती विकृती आहे. इतर धर्मांच्या खरेपणावरच त्याच्या धर्माचा खरेपणा अवलंबून आहे. मग तुमच्या लक्षात येईल की, एखाद्या पंथात जन्म घेणे चांगले आहे; पण त्यातच शेवट होणे फार वाईट. लहान मुलाच्या रूपाने जन्माला येणे चांगले; पण शेवटपर्यंत लहान मूलच राहणे फार वाईट. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या; प्रार्थनागृहे, कर्मकांडे आणि प्रतीके ही बालबुद्धीच्या अज्ञ लोकांसाठी उपयुक्त असतील; पण कायम बालबुद्धीने राहू नका. तुम्ही जाणते व्हा. त्या सर्वांच्या पलीकडे जा. एरवी तुमचा आध्यात्मिक मृत्यू ओढवलाच म्हणून समजा. कर्मकांडे आणि काय खावे, काय खाऊ नये याचाच विचार करत बसणारे महात्मेसुद्धा ब्रह्मलोकांत जाण्याऐवजी वेड्यांच्या इस्पितळात भरती होण्याचा संभव अधिक आहे!’’

‘धर्मग्रंथातील शब्दांच्या आणि संकल्पनांच्या मागचे आशय समजून घ्या,’ असं सांगत ते म्हणतात, ‘‘र्अंहसा परमो धर्म: हे तर खरेच; पण र्अंहसा म्हणजे काय? मांस-मच्छी न खाता शाकाहारी बना असे काही आहे का? र्अंहसेचे खरेखुरे गमक म्हणजे मत्सराचा अभाव. समोरच्या माणसाच्या मनाला मी यातना देत नाही ना, माझ्या वागणुकीने तसे काही होत नाही ना, याचा मनात सुरू असलेला व आचरणात आणला जाणारा विचार. र्अंहसा म्हणजे शाकाहारी असणे आणि एखाद्या खुळचट समजुतीला बळी पडून वा पुरोहित-पंड्यांच्या भुलावणीने भुलून इतरांना यातना देत मिळवलेल्या संपत्तीमधील थोडीफार रक्कम योग्य वा अयोग्य ठिकाणी दान करणे नव्हे. हे र्अंहसेचे ढोंग फार वाईट आहे. एक गोष्ट लक्षात घ्या- गाय कधी मांसाला शिवत नाही, बकरी कधी मांस खात नाही, म्हणून त्या काय महायोगी झाल्या? मोठ्या र्अंहसक ठरल्या? नुसते हे किंवा ते खाण्याचे टाळणे कुणाही महापापी माणसाला जमणे शक्य आहे. गवत खाणाऱ्या पशूंपेक्षा त्याने एवढे विशेष ते काय केले? उभी हयात गवतावर राहणारे पशू जसे तेवढ्यानेच श्रेष्ठ ठरत नाहीत; तसेच अमुक खात नाही, तमुक खात नाही म्हणून कुणी र्अंहसक ठरत नाही. ज्ञानी, योगी, ऋषी वगैरेही ठरत नाही. तुम्ही भोवतालच्या गरिबांना, दलितांना खरोखर किती मदत केलीत, त्यांच्या मनात तुम्ही किती आनंद निर्माण केलात, यावरून तुम्ही र्अंहसक ठरता. मग तुम्ही नुसत्या डुकराच्या मांसावरच राहत असलात तरी हरकत नाही.’’ 

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swami vivekananda only people who understand true meaning religion respect all religions akp

Next Story
पुस्तक परीक्षण : नरसिंह रावांच्या कारकीर्दीचे तटस्थ मूल्यांकन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी