ऐश्वर्या रेवडकर यांची ‘स्वत:ला जगवत ठेवण्याचे प्रयोग’ ही दुसरीच कादंबरी. मुक्ता ही या कादंबरीची नायिका. पुण्यात एमबीबीएस झालेली मुक्ता दिल्लीत एका मोठ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये पीजी करायला जाते. त्या तीन वर्षांतील तिच्या आयुष्यातील घडामोडी तिने स्वत:च कथन केल्या आहेत. त्यामुळे निवेदन अर्थातच प्रथमपुरुषी. संस्कृतीमधील एकूणच मूल्यव्यवस्था ‘पुरुषी’ असेल तर स्त्रीच्या निवेदनाला आपल्या भाषेत दुसरा शब्दही सुचत नाही. मुक्ता ही ‘बाईपणा’चे तथाकथित संस्कार झुगारून देणारी स्त्री. त्यामुळे बाई म्हणून व्यक्त होताना लाज-लज्जा-शरम वाटावी, असे गंडही तिच्यात नाहीत.

मुक्ताने एका समवयस्क सर्जन मित्राशी लग्न केले. पण लग्न नावाच्या सापळ्यात आपले आयुष्य कुजतेय, असे तिला वाटते. स्वत:ला हरिश्चंद्राचा अवतार समजणारी मुक्ता, एकांतात मित्राशी प्रणय केला, ही गोष्ट नवर्‍याला सांगून टाकते. आपली विवाह आणि कुटुंबव्यवस्था पुरुषप्रधान आहे, हे तिला ठाऊक असले तरी ती मूल्यव्यवस्था अनैसर्गिक आणि अनैतिक असल्याची तिची भावना पक्की. एक स्त्री म्हणून त्या व्यवस्थेविरुद्ध जाणीवपूर्वक बंड करावे, असे तिला वाटत नाही; तर ती तिला ‘व्यक्ती’ म्हणून निरपेक्ष स्वातंत्र्य हवे आहे. तिला माणूस म्हणून नितळपणे जगण्याची असोशी आहे.

म्हणूनच मुक्ता पीजी करायला पुण्याहून दिल्लीला जाते. सर्जरीला मुली जात नाहीत. पण मुक्ताला सर्जन व्हायचे आहे. सर्जरी शिकणार्‍या मुलीला आणि एकूणच वैद्यकीय शिक्षणात किंवा व्यवसायात स्त्रियांच्या वाट्याला अवहेलना, अपमान आणि हिंस्त्र थट्टा कशी येते, याचे दर्शन या कादंबरीतून होते. प्रोफेसर्स, इंटर्न्स, सीनियर-ज्युनियर रेसिडेंट नर्सेस, वॉर्डबॉय यांचे एक अलिखित विषमेतच्या बंधनांनी विणलेले जग लेखिकेने चितारलेय.

आपल्या जगण्याला कंटाळून भुलीचे इंजेक्शन स्वत:ला टोचून मुक्ता आत्महत्येचा प्रयत्न करते, हे तिच्या कथनाचे मुख्य सूत्र आहे. मुक्ताला वडील नाहीत आणि आईचे अनेकांशी संबंध आहेत. मामाकडे त्या दोघी आश्रित असतात. त्या आश्रितपणातून सुटका म्हणून मुक्ता लग्न करते. कुटुंबव्यवस्थेच्या पारंपरिक संकेतानुसार नवरा अशोक हा ‘यशस्वी पुरुष’ आहे. म्हणून त्याच संकेतानुसार मुक्ताने ‘गृहिणी’ म्हणून आनंदात जगावे, अशी अपेक्षा असते. पण हेच संकेत मुक्ताच्या ‘व्यक्तिस्वातंत्र्या’च्या आड येतात. ते ती झुगारते.

या संपूर्ण कादंबरीचे एक केंद्र स्त्रीची लैंगिकता आहे. मुक्ता स्वत:च्या लैंगिक गरजांचा विचारही रूढ सामाजिक व नैतिक मूल्यांच्या पलीकडे करते. विवाहसंस्थेत लैंगिक इच्छांचे दमन होते. तिच्या निवेदनात तिला आवडलेल्या अवतीभवतीच्या पुरुषांच्या सौंदर्याचे, आकर्षणाचे उल्लेख अगदी सहज येतात. कामाच्या ठिकाणी पुरुष जाता-येता स्त्रियांच्या संदर्भात फ्लर्टिंगच्या मूडमध्ये असतात. पण स्त्रियांकडून मात्र तशी अपेक्षा नसते. मुक्ता स्वत:च्या जगण्याचा आणि लैंगिक इच्छांचा विचार करताना, तिची भूमिका पुरुषांशी स्पर्धा करण्याची किंवा पुरुषांच्या स्वातंत्र्याचा मत्सर करण्याची नाही. तिचा स्वत:च्या अस्तित्वाचा विचारच निरपेक्ष आहे. हनी या अत्यंत देखण्या पंजाबी रेसिडेंट डॉक्टरवर मुक्ता फिदा होते. त्याची बायको तिकडे दक्षिणेत असते. हनीच्या आलिशान फ्लॅटवर मुक्ता मुक्तपणे आनंद अनुभवते. हनीच्या बायकोला हनीपासून दिवस जात नाहीत आणि इकडे मुक्ता तिच्या पोटातील गर्भ कसा खुडून टाकावा या विचारात मानसिक आजारी बनते. अखेर ती गर्भपात करते. हनीला आपले पुरुषत्व सिद्ध करण्याची ती संधी असते, पण आश्रित आई, मालक म्हणून वागणारा नवरा आणि सगळ्या संवेदना बोथट करणारा चोवीस तास हॉस्पिटलच्या रामरगाड्यातून मुक्त होण्यासाठी केलेला आत्महत्येचा प्रयत्नही फसतो. कादंबरीच्या उत्तरार्धात जगणे असह्य झाल्याने नीट मरताही येत नाही म्हणून मग मुक्ता पुढचे दिवस ज्या विमनस्क अवस्थेत काढते, त्यालाच ‘स्वत:ला जगवत ठेवण्याचे प्रयोग’ असे संबोधते. पुढच्या भागात ज्या घडामोडी येतात त्यात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, शिकाऊ आणि रेसिडेंट डॉक्टर्स, सिस्टर्स, पेशंट्स, त्यांचे नातेवाईक यांच्यातील परस्परसंबंध, भावनिक, मानसिक व शारीरिक ताणतणाव, यावर घडलेल्या प्रसंगातून निरीक्षणं येतात.

एकटेपण आणि ही परात्मता या कादंबरीच्या प्रत्येक प्रसंगातून, संवादातून व्यक्त होते. एक प्रकारे हा मुक्ताचा अस्तित्वाचाच शोध आहे. ती पुष्कळदा स्वत:ला व्यभिचारिणी-बदफैली असे संबोधते. सत्याच्या जवळ जाण्यासाठी कलावंत कलाकृतीच्या पातळीवर रूढ नितिनियमांची चौकट ओलांडतो. इथे मुक्ताचे प्रत्यक्ष आयुष्य आहे. तिने स्वत:चे जगणे पणाला लावलेय.

मुक्ताच्या अस्तित्वशोधाचे प्रमुख परिमाण लैंगिक आचरण हेच आहे, हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. लैंगिक भावनांचे शमन हाच जणू काही तिच्या अस्तित्वाचा मूलाधार. ता्त्विवक, मानसिक आणि शारीरिक पातळीवर ती या संदर्भात राजा हरिश्चंद्राचा अवतार असली तरी भोवतालचा समाज मात्र सत्याची पाठराखण करणारा देव नाही. हा खरा संघर्ष आहे.
pramodmunghate304@gmail.com
‘स्वत:ला जगवत ठेवण्याचे प्रयोग’, ऐश्वर्या रेवडकर, भारलिपी प्रकाशन, पाने-१८०, किंमत ३०० रुपये.