स्वित्झर्लंडमधलं बासेल (जर्मन उच्चार बाऽझल, फ्रेंच उच्चार बाऽले) शहरात १९७० पासून, गेली ५५ वर्षं भरणारा ‘आर्ट बासेल’ हा कलाव्यापार मेळा जगातल्या चित्र-शिल्प कलेची ‘मुख्य धारा’ ठरवणारा म्हणून ओळखला जातो. तिथं गेल्यावर, हा मेळा अनुभवल्यावर ते खरंही वाटू लागतं… पण कलेत ‘मुख्य धारा’ असं काही असतं का आणि ते बाजारावर अवलंबून असतं का?
‘बाजार’ या शब्दाबद्दल भारतीय, महाराष्ट्रीय चित्रकारांना जितकी नफरत २५-३० वर्षांपूर्वी होती तितकी आता उरलेली नाही, याचा पुरावा म्हणजे इन्स्टाग्राम! ‘मेटा’ कंपनीच्या मालकीच्या त्या समाजमाध्यमावरून आपापलं ‘मार्केटिंग’ तरुण चित्रकार मंडळी करतच असतात. त्यात गैर काही नाही. चित्रं, शिल्पं, मांडणशिल्पं, व्हिडीओ/ डिजिटल कला यांचा बाजार हाच दृश्यकलेच्या इतिहासलेखनाचा आधार ठरतो की काय, अशी परिस्थिती गेल्या ५० वर्षांत वाढू लागली आहे. दुसरीकडे, सन २०२४ या एका वर्षभरात जगभरच्या कलाबाजारानं ५७.५ अब्ज डॉलरच्या विक्रीचा टप्पा ओलांडला, असा निष्कर्ष ‘आर्ट बासेल’ आणि ‘यूबीएस बँक’ यांनी एप्रिल २०२५ मधल्या वार्षिक अहवालात काढला होता. यातलं ‘आर्ट बासेल’ हे एक भारी प्रकरण. कलाव्यापार हेच उद्दिष्ट असलेला, स्वित्झर्लंडच्या बासेल या शहरात १९७० पासून भरणारा हा व्यापारमेळा. तो आज आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड झालाय.‘आर्ट बासेल पॅरिस’, ‘आर्ट बासेल मायामी बीच’ आणि ‘आर्ट बासेल हाँगकाँग ’असे तीन मेळे तीन खंडांत, बासेल या मूळ शहराशी काही संबंध नसूनही ‘आर्ट बासेल’च्या गुंतवणुकीतून भरतात. आपल्या भारतातही, दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’ मध्ये या ‘आर्ट बासेल’च्या ‘एमसीएच’ या मालक कंपनीनं दोन वर्षं पैसा गुंतवला. नोटाबंदी येण्याआधीच तो काढूनही घेतला. इतके हातपाय पसरूनही बासेल इथं भरणारा कलाव्यापारमेळा आजही मुख्य स्थान टिकवून आहे. तिथं भेट दिल्यानंतरचं हे लिखाण.
याच बासेल (जर्मन उच्चार बाऽझल, फ्रेंच उच्चार बाऽले) शहरात जगभरचे बँकव्यवहार सुकर करणारे नियम ठरले होते. रोश, नोवार्टिस या औषधकंपन्यांची मुख्यालयं इथंच. शिवाय, ५०० वर्षांपूर्वी हे युरोपातलं व्यापारकेंद्र होतं. आज हे कलेचंच व्यापारकेंद्र आहे. हा मेळा वर्षातले फक्त तीन-चार दिवस. पण हल्ली ‘आर्ट बासेल’या मुख्य मेळ्याच्याच दिवसांमध्ये अन्य कंपन्या आपापले कलाव्यापार मेळे बासेल शहरातच भरवतात. यंदा १७ जूनपासून भरलेल्या ‘आर्ट बासेल’सह लिस्टे, व्होल्टा, जून आणि आफ्रिका बासेल या नावांचे चार मेळे भरले होते. मुख्य मेळ्याला यंदा ८८ हजार लोकांनी भेट दिली; त्याच्या निम्मीही गर्दी अन्य चार मेळ्यांना नव्हती. ते अपेक्षितच; कारण ‘आर्ट बासेल’ हीच जणू कलाबाजाराची ‘मुख्य धारा’ असा अनेकांचा विश्वास! तो खरा ठरवणं हे या मेळ्यासाठी जगभरच्या खासगी कलादालनांचे जे अर्ज येतात त्यांतून निवड करणाऱ्या पथकाचं मुख्य काम. एकंदर सर्वच खासगी मालकीची कलादालनं कलाविक्रीत रस घेणारी असली तरी, ‘तोलामोलाचे’ व्यवहार व्हावे म्हणून निवडकांनाच इथं संधी. ‘आर्ट बासेल’चा बाजार हा अखेर या आर्ट गॅलऱ्यांच्या ठेल्यांचाच, पण या ठेल्यांसोबत आम्ही तुम्हाला कलानुभवही देणार अशी ईर्षा ‘आर्ट बासेल’नं गेल्या दोन दशकांत दाखवली. म्हणजे विक्रीपर ठेल्यांसोबत ‘अनलिमिटेड’ हा अवाढव्य आकारांच्या शिल्पं वा अन्य कलाकृतींचा खास विभाग, गॅलऱ्यांनाच कधी तरुण, तर कधी ज्येष्ठ- पण दुर्लक्षित अशा चित्रकारांना प्राधान्य द्यायला लावणं, असे प्रकार आर्ट बासेलपासून सुरू झाले. त्याचं अनुकरण मग दिल्लीसह जगभरच्या कलाव्यापार मेळ्यांनी केलं. आर्ट बासेलमध्ये यंदाही २८९ ठेल्यांखेरीज खास प्रदर्शनांसारखे भासणारे उपविभाग होतेच. त्यातला ‘अनलिमिटेड’ हा विभाग प्रत्यक्ष पाहिला तेव्हा लक्षात आलं- अरेच्च्या! ज्या कलाकृतींना कुठंतरी… म्यूझियम म्हणा किंवा शहरातच सार्वजनिक जागी म्हणा… अशी कायमस्वरूपी जागा हवीय, त्याच अवजड किंवा आकारानं मोठ्या कलाकृती इथं ‘अनलिमिटेड’ विभागात आहेत! उदा.-(या लेखासोबतच्या छायचित्र क्रमांक ‘१’ मधली) मारिनेला सेनातोरे या इटालियन चित्रकर्तीची, लांबून सर्कसच्या तंबूचीच आठवण देणारी ‘वी राइज बाय लिफ्टिंग अदर्स’ ही रोषणाईनं बनलेली ३४ मीटर लांबीची कलाकृती- ती मुळात रियाध इथल्या ‘नूर फेस्टिव्हल’ (अरबी ‘नूर’ म्हणजे प्रकाश) या प्रदर्शनासाठी २०२३ मध्ये घडवली गेली. तिथं त्यावरली प्रकाशाक्षरं अरबीतही होती, पण इथं ती इंग्रजीत आहेत इतकाच फरक. जरा नेटवर शोध घेतला तर कळलं की, रियाधमध्ये वाहत्या पाण्याच्या अगदी तटावर ही कलाकृती होती. कलाकृती आकर्षक आहे, ‘इटालियन गावखेड्यांतल्या मेळ्यांच्या सजावटीपासून मी प्रेरणा घेतली’ हे मारिनेला यांचं म्हणणंही छानच; पण इथं ती ‘गिऱ्हाईक शोधायला’च होती हे नक्की. यात वाईट काही नाही. मुंबईतल्या ज्येष्ठ दृश्यकलाकार शकुंतला कुलकर्णी यांचीही एक मोठी कलाकृती (वेताच्या चिलखत/ शिरस्त्राणांचा समूह) २०१८ सालच्या आर्ट बासेल अनलिमिटेड मध्ये होती, ती आता कुणा संग्रहालयात आहे!
शकुंतला कुलकर्णी यांची ती कलाकृती बासेलच्या ‘अनलिमिटेड’ विभागात नेली, ती मुंबईतल्या ‘गॅलरी केमोल्ड प्रिस्कॉट रोड’ या गॅलरीच्या संचालक शिरीन गांधी यांनी. गेली सलग १३ वर्षं बासेलच्या मेळ्यात त्यांच्या गॅलरीचा सहभाग असतो. यंदाही होता (फोटो क्र. ४). अतुल दोडिया, जितीश कलाट, मिठू सेन, धृवी आचार्य अशा ‘केमोल्ड’च्या नित्याच्या चित्रकारांसह यंदा मोहित शेलारे याचीही निवड ‘बासेल’साठी या गॅलरीनं केली होती. ‘हे आमचे चित्रकार’ असं दाखवण्यात प्रत्येक गॅलरीला रस असतोच. गॅलरीचे संचालक स्वत: चित्रांबद्दल बोलताहेत, यातून त्यांची कलाविषयक समज रुळांवर असल्याचंही समजतंय, हे एरवी आपल्या दिल्लीतल्या कलाव्यापार मेळ्यात फार दिसतंच असं नाही; ते इथं दिसलं. याखेरीज दुसरी भारतीय गॅलरी इथं होती, ती मूळची कोलकात्याची आणि मुंबईत शाखा असणारी ‘एक्स्पेरिमेंटर’! प्रतीक व प्रियांका राजा यांची ही गॅलरी मोजक्याच प्रयोगशील दृश्यकलावंतांसह कार्यरत आहे, तिच्या ठेल्यावर यंदा पहिल्यांदाच विक्रांत भिसे यांचा समावेश होता.
अनेक आंतरराष्ट्रीय गॅलऱ्या या त्यांच्या संचालकांनी स्वत:च्याच नावानं सुरू केल्यात. उदा.- इमॅन्युएल पेराताँ, कामेल मेनूर, डेव्हिड झ्विर्मर, (उर्सुला व थॉमस) क्रिन्झिन्जर, तान्या बोनकदार… जगभर प्रदर्शनं लावणाऱ्या आणि मोठी ‘पहुॅँच’ असणाऱ्या या गॅलऱ्यांच्या नावाचे धनी एरवी प्रत्येक ठिकाणी दिसतातच असं नाही, पण बासेलच्या मेळ्यासाठी ते सारे खुद्द हजर होते. त्यांचे मदतनीस आपण एखाद्या चित्राकडे जरा अधिक वेळ, टक लावून पाहात असू तर लगेच आपल्याकडे पाहू लागायचे. नजरानजर झाली तर फक्त स्मितहास्य. मग आपणच पुढाकार घेऊन ‘इज इट अव्हेलेबल?’ असं काही विचारलं तर, ‘येस, फाइव्ह मिलियन’ असं कॉर्पोरेट नम्रतेचं उत्तर! हा खेळ अर्थातच, तुलनेनं कमी विख्यात असलेल्या चित्रकारांबाबत अधिक चालतो. फोटो क्र. ६ मध्ये जो क्रोशे कारागिरीनं विणलेला काँक्रीट मिक्सर दिसतोय, त्या मोठ्या कलाकृतीची कर्ती कोसिम व्हॉन बोनिन ही आता जर्मन. तिची ख्याती युरोपात वाढते आहे. पण ती आजतरी ‘स्थानिक’ दृश्यकलावंत. त्यामुळे ही आकारानं मोठी नवी कलाकृती आणि अवघ्या फूटभर रुंदीचं साक्षात् ‘क्युबिझम’चा उद्गाता जॉर्जेस ब्राकचं चित्र (फोटो क्र. ५) यांची किंमत साधारण सारखीच!
या किमती यंदा फार वाढल्या नाहीत. जास्तीत जास्त किंमत डेव्हिड हॉकनी या प्रख्यात ज्येष्ठ ब्रिटिश चित्रकाराच्या चित्राला मिळाली आणि ती ‘१३ दशलक्ष ते १७ दशलक्ष डॉलर’ अशी असल्याचा ‘आर्ट्सी’ या कलाबाजार संकेतस्थळाचा अंदाज आहे. पण हे अंदाजच असतात. यंदा विक्री गेल्या वर्षीपेक्षा जास्त असली तरी किमतीत घासाघीस होते आहे, हा अनुभव इथं येतच होता. विख्यात चित्रकारांच्या किमती वाढणारच, प्रश्न नव्यांचा असतो. हेच बाजाराचं दुखणं असतं. त्यावर मात करण्यासाठीच बासेल वा कोणत्याही कलाव्यापार मेळ्यांतले ठेले, ‘जुन्यांसह नवेही चित्रकार’ अशी रचना करून विक्री वाढवत असतात. नव्यांची खास काळजीही घेतली जाते, हे बासेलमध्ये तरी दिसत होतं. उदाहरणार्थ, न्यू यॉर्कच्या ‘स्पेरॉन वेस्टवॉटर गॅलरी’नं ज्येष्ठांपैकी ब्रूस नाउमान, रिचर्ड लाँग अशा दोघांच्याच कलाकृती यंदा आर्ट बासेलमध्ये मांडून, आज चाळिशी-पन्नाशीत असलेल्यांवर लक्ष केंद्रित केलं, त्यातही एमिल लुकास यांच्या कलाकृतीला मध्यवर्ती स्थान दिलं. या लुकास यांची ती मोठी, वर्तुळाकार कलाकृती खरोखर लक्षवेधी होती. पण तिची किंमत सुमारे ५ दशलक्ष डॉलर, म्हणून याच ठेल्याच्या आतल्या भागात आकारानं लहान कलाकृतीही ठेवल्या गेल्या होत्या. लुकास यांच्याबद्दल कुतूहल आहे, योग्य प्रश्न विचारले जाताहेत, असं लक्षात येताच या गॅलरीचे संचालक केव्हिन कुरन यांनी ही आतली कलाकृती काढून दाखवली- ‘‘या रेषा दिसताहेत ना, त्या या पृष्ठभागावर कीटक चालल्यानं तयार झालेल्या आहेत… असे अनेक प्रयोग एमिल लुकास करत असतो. आमची गॅलरी ‘मिनिमलिस्ट आर्ट’ या प्रवाहावर लक्ष केंद्रित करते, त्याच्याशी हे सुसंगतच,’’ असं केव्हिन सांगत होते.
चित्रांचे ‘व्यापारी’ निराळे असतात, त्यांना त्यांच्या विक्रयवस्तूबद्दल अधिक आस्था असू शकते, असा दिलासा देणारे अनुभव आर्ट बासेलमध्ये अनेक गॅलऱ्यांच्या ठेल्यांवर येत होते. ‘विक्री प्रतिनिधी’ म्हणूनही कलाइतिहास वा कलाव्यवस्थापन यांचं शिक्षण घेतलेली माणसंच अनेक गॅलऱ्यांनी नेमल्याचं दिसत होतं. ‘याच चित्रकाराची मोठी कलाकृती मी व्हेनिस बिएनालेमध्ये पाहिल्याचं आठवतंय’ असं म्हणण्याचा अवकाश- की हे प्रतिनिधी लोक नेमकं साल सांगायचे- ‘२०१५ ची व्हेनिस बिएनाले… तेव्हाही आमची गॅलरीच या चित्रकाराचं प्रतिनिधित्व करत होती. पण आताच्या चित्रांत फरक दिसतोय असं नाही वाटत?’ वगैरे गप्पा सुरू व्हायच्या. अनेक जण इतके खरोखर रस घेऊन बोलले की, ‘मी फक्त लिहितो हं कलेबद्दल- खरेदी नाही करत’ असं सांगूनही गप्पा थांबल्या नाहीत.
हाच अनुभव दरवेळी आर्ट बासेल देत असणार, हे नक्की. पण हा जो काही ‘कलेतला रस’ आहे, तो बाजारात इतका घाऊक प्रमाणात पाझरतो कसा काय? आणि या रसाचे परिणाम काय होतात? ‘आमचं भलं, तुमचंही भलं’ हे सूत्र भांडवलशाही नेहमीच वापरत असते. त्यात ‘आमचं भलं आम्ही पाहाणारच- तुमचं भलं होत असल्याचा आभास निर्माण करणार’ असाही भाग असतो, पण तो इतक्या खुबीनं लपवलेला असतो की आभासच खरा वाटू लागतो. ‘आर्ट बासेल’ हा असा एक आभास आहे, अशी टीका आजवर काही अभ्यासकांनी केलेली आहे. ‘आर्ट बासेल’ ला जाणं, तिथं भरपूर संख्येनं खरोखरच निवडक कलाकृती पाहाणं, लोकांशी बोलणं हा एक अनुभव म्हणून समृद्धच असतो, पण फक्त कलाप्रेमाचा चष्माच जर चढवलात, तरच. मुळात, आर्ट बासेलनं ‘सामान्यजनांसाठी’ ठेवलेल्या तिकिटांच्या दरांपासून ते तिथं आतमध्ये मिळणाऱ्या कॉफीच्या किमतीपर्यंत सगळं इतकं महाग की विषमतेची जाणीव झालीच पाहिजे! यावर कुणी म्हणेल, ‘हे तर प्रत्येक कलाव्यापार मेळ्यात असंच असतं’- खरं आहे. पण हे सारे कलाव्यापार मेळे बासेललाच आदर्श मानतात. ‘असंच असतं’ या विधानात ते तसं असायला हवं असंही अपेक्षित असेल, तर त्याचा संबंध भांडवलशाहीतल्या ‘अपरिहार्य शिस्ती’च्या कल्पनांशी असतो. पण गंमत अशी की, या शिस्तीच्या बाहेर जाऊ पाहाणारेही पुढे कसे अंकित होत असतात, हेही ‘आर्ट बासेल’चा उप-मेळा किंवा सॅटेलाइट फेअर असं हल्ली म्हणवल्या जाणाऱ्या ‘व्होल्टे बासेल’ या कलाव्यापार मेळ्यातून दिसलं (फोटो क्र. ३). इथंही गॅलऱ्यांचे ठेले होतेच, जरा अधिक तरुण किंवा कमी प्रसिद्धी पावलेल्या चित्रकारांना इथं वाव होता. पण अखेर, या मजकुरासोबतच्या ‘फोटो क्र. २’ मध्ये दिसणारा मिखाइल बाकुनिन याची जी गत इथं कॉन्स्टान्टिन बेझ्मेर्टनी यांनी कसबानं रंगवलेल्या चित्रात झालीय, तशीच गत ‘व्होल्टे’ आणि बासेलमधल्या अन्य उप- मेळ्यांची झाली होती. बाकुनिन हा दिवंगत तत्त्वज्ञ ‘अराजकतावादा’चा (अॅनार्किझम) सिद्धान्तकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या व्यक्तिचित्रावर ‘बी फॅब्युलस’ अशी आजच्या काळाला शोभणारी मल्लिनाथी चित्रकारानं केली आहे. चित्रातून दिसतंय असं की, एकंदर ‘फॅब्युलस’ होण्याच्या नादात सगळे वाद, सगळे सिद्धान्त, सारे विचार हे आता निव्वळ एखाद्या सौंदर्यप्रसाधनाच्या, कपड्यांच्या, बॅगांच्या ब्रॅण्डसारखे वापरले जाऊ लागणार की काय, असाच प्रश्न पडतो आहे. हा प्रश्न बीजरूपानं, एकंदर कलाव्यापार मेळ्यांच्या प्रारूपालाही लागू पडणारा आहे.
एकीकडे मोठमोठ्या कलादालनांचे ठेले इथं एकाच वेळी पाहायला मिळतात म्हणून हुरळून जायला होतं, पण दुसरीकडे- ‘मेक्सिकोतली एकच गॅलरी इथं कशी?’, ‘भारतातल्या दोनच कशा?’ असे प्रश्न पडतात. आर्ट बासेलमध्ये दर वर्षी पिकासो, ब्राक, कान्डिन्स्की असे आता ‘सेकण्डरी मार्केट’ मध्ये असलेले चित्रकार किमान आठ ते दहा टक्के तरी दिसतात. म्हणजे चित्रकारांशी थेट संबंध नसलेला आणि त्याऐवजी संग्राहकांच्या फायद्याचा बाजार. तो प्रत्यक्षात मोठा आहेच, चित्रांचे लिलाव हे मुख्यत: ‘सेकण्डरी मार्केट’च आहे. पण आम्ही कलाबाजाराला वळण लावतोय, असं जणू गृहीत धरूनच ‘आर्ट बासेल’ची धुरिणमंडळी बोलत असतात, हे दरवर्षी जनसंपर्क यंत्रणेतून येणाऱ्या त्यांच्या ‘कोट्स’ मधूनही जाणवत असतं. यांना जर कलाबाजार खरोखरच घडवायचाय, तर ‘सेकण्डरी मार्केट’कडे दुर्लक्ष करून प्रायमरी- ज्याचा चित्रकाराशी थेट संबंध असू शकतो असं- मार्केटच महत्त्वाचं, असं का नाही ठरवता येत? – हा प्रश्न नेहमीच पडतो. अर्थात, हे प्रायमरी मार्केटही इथं दिसलं. त्यात वैविध्यही होतं. उदाहरणार्थ, तैवानचा तरुण चित्रकार सु मेंग हुंग याची तैवानच्याच टिना केन्ग गॅलरीनं ‘अनलिमिटेड’ विभागात दाखवलेली कलाकृती. हुंग यानं चिनी, तैवानी, पौर्वात्त्य दृश्यकला संचितातल्या काही आकृती दिसतील न दिसतील अशा प्रकारे चिनी पद्धतीच्या लाकडी पार्टिशनांवर रंगवल्या होत्या. एकत्रित परिणाम या आकृतींचा नसावा आणि तैलरंगच वापरूनही लाखेसारखा परिणाम दिसावा हे कसब या चित्रकाराकडे पुरेपूर असल्याचं (फोटो क्र. ८) दिसत होतं. याउलट, डॅन पेरजोव्षी या रोमानियाचा चित्रकार/ लेखक व्यंगचिकाराची ‘ट्रम्पुतिन’ ही साध्या वर्तमानपत्री कागदावरली मालिका (यापैकी एक चित्र- फोटो क्र. ९) व्हिएन्नातल्या ग्रेगॉर पोदनर गॅलरीनं मांडली होती. ही दोन टोकांची दोन उदाहरणं. याच्या मध्ये आर्ट बासेलच्या अन्य कलाकृती होत्या.
‘आम्ही निवडू तेच इथं दिसेल’ हे कुठल्याही व्यापारी प्रदर्शनातल्या ठेल्याचं मूळ तत्त्वच. त्याबद्दल तक्रारीचा सूर न लावता उलट, बासेलचा अनुभव हा समृद्धबिमृद्ध असल्याचं मान्य करावं लागतं… आणि तिथंच प्रश्न सुरू होतात.
हे प्रश्न फार नवे नाहीत. आर्ट बासेल सुरू झाल्यानंतर काही वर्षांतच, ‘सी इट इन व्हेनिस, बाय इट इन बासेल’ असं म्हटलं जाऊ लागलं, तेव्हापासूनच हे प्रश्न सुरू झाले असं म्हणता येतं. ‘व्हेनिस बिएनाले’ हे १८९३ पासून सुरू झालेलं आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शन; ते पाश्चात्त्य कलेलाच प्राधान्य देणारं आहे अशी टीका करत ‘बिएनाले’ म्हणजे दर दोन वर्षांनी भरणारं दुसरं महाप्रदर्शन ब्राझीलमधल्या साओ पावलो इथं १९५१ पासून भरू लागलं आणि तिथं ‘तिसऱ्या जगा’तल्या चित्रकारांच्या/ सामाजिक जाणिवेनं केलेल्या कलेला प्राधान्य मिळू लागलं; पुढे १९६८ मध्ये युरोपभर विद्यार्थी आंदोलनं पेटली असताना व्हेनिस बिएनालेला तोवर आलेल्या विकृत- विक्रीपर स्वरूपाचा ठाम निषेध इटलीतल्या कलाविद्यार्थ्यांनी केला आणि त्याच वर्षीपासून ‘व्हेनिस बिएनालेत कलाकृतींची विक्री बंद’ अशी घोषणा करायला भाग पाडलं; लगोलग बासेलच्या बँक/ विमा आदी व्यवसायांत असलेल्या तिघा धनिकांनी ‘आर्ट बासेल’ची घोषणा केली आणि १९७० पासून हा वार्षिक कलामेळा सुरू झाला… हे पूर्वसूत्र कधीही नाकारताच येणार नाही. ते लक्षात घेतलं तर ‘व्हेनिसला जे बघाल, ते बासेलमध्ये खरेदी करा’ या विधानातला बेपारीपणा उमगतो.
होय, बेपारीपणाच- त्यातलं जे कलाप्रेम आहे, ते आर्ट बासेलसारख्या कलाव्यापार मेळ्यांमध्ये स्वयंभूपणे नसतं. व्हेनिस बिएनालेसारख्या अनेक उपक्रमांमधून ते आलेलं असतं किंवा कलेचा इतिहास आज कसा घडतो आहे आणि भावी इतिहास कसा असायला हवा, याची खरोखरच काळजी करणाऱ्या- दृश्यकलेतल्या अभिव्यक्तीचं भवितव्य समन्यायी असावं अशी कळकळ असणाऱ्या अनेकांच्या विचारांचं एकत्रित पाठबळ आर्ट बासेलसारख्या अव्वल व्यापारमेळ्याला अप्रत्यक्षपणे मिळत असतं. कलेचा भावी इतिहास घडवू पाहणारे आज काय करताहेत? राजकीय आशयाची कला? चला तर मग, आपणही त्या कलेकडे पाहू या… पण एकतर पॅलेस्टाइन वगैरे अवघड विषय नकोत आणि दुसरं म्हणजे, आपल्या डिझाइनवजा नाजूक कलाकृती, पानंफुलं वगैरे सगळं विकूयाच हं… अशा प्रकारेच अखेर कलाव्यापार चालणार, हे उघड असतं. त्यामुळेच हल्ली ‘आर्ट फेअर’च्या पाठोपाठ ‘डिझाइन फेअर’ भरू लागलेले दिसतात. असा ‘डिझाइन फेअर’ आर्ट बासेलनं सुरू केला नाही. उलट, ‘आर्ट बासेल प्राइझ’ असा उपक्रम यंदापासून सुरू करून त्यात कलाविषयक संस्थांनाही सामील करून घेतलं आहे, हे स्वागतार्ह. अशा उपक्रमशीलतेमुळेच आर्ट बासेल आजही आघाडीवर आहे, हेही खरं. थोडक्यात, आर्ट बासेल हे गेल्या काही वर्षांत कलाबाजाराचं सत्ताकेंद्र ठरलेलं आहे. सत्ता अप्रत्यक्षपणे मिळणं, ती टिकवण्यासाठी अनेक उपक्रम आखले जाणं, अव्वलपणाची मोहोर याच एका केंद्रावर उमटून अधिसत्ताही प्रस्थापित होणं आणि या अधिसत्तेमुळे, ‘आर्ट बासेल’ मध्ये सहभागी होणाऱ्या गॅलऱ्या किंवा त्यांनी निवडलेले दृश्यकलावंत यांनाही अधिमान्यता मिळू लागणं- अशी ‘सत्ताकेंद्र’ या संज्ञेला लागू पडणारी सगळी लक्षणं आर्ट बासेलमध्ये दिसतात.
गेल्या सुमारे साठ-सत्तर वर्षांत एकही कलाचळवळ जगभर पसरलेली नाही. अशा वेळी ‘आजची कला’ म्हणजे काय, याबद्दल शोधाशोधच सुरू ठेवणं आणि शोधत-शोधतच विचार करणं आवश्यक असतं. ही शोधाशोध- म्हणजेच आजच्या दृश्यकलेचा प्रसार – जरी ‘बिएनाले’ किंवा अन्य उपक्रमांतून झाला, तरी हे आजचे कलाप्रवाह टिकून राहण्यासाठी पैसा हवा म्हणून बाजार हवा आणि बाजार हवा म्हणून ‘आर्ट बासेल’सारखे भलेमोठे कलाव्यापार मेळेसुद्धा हवे, ही साखळी आज तरी तोडता येत नाही. जागतिकीकरणात कलेच्या इतिहासाचा ‘मुख्य प्रवाह’ बाजाराच्या मार्गानेच ठरतो आहे, हे वास्तवही नाकारता येत नाही. फार तर जागतिकीकरणालाच आपण प्रश्न विचारू शकतो, ते काम आर्ट बासेलचं नसून दृश्यकलावंतांचं आहे.
बर्लिन बिएनालेचा बेधडकपणा…
दृश्यकलेच्या ‘मुख्य धारे’ला आव्हान देणारे- किंवा आम्हीच नवी मुख्य धारा आहोत असा दावा करणारे प्रयोग नेहमीच होत असतात. मात्र आजच्या काळात, खासगी कलादालनांपेक्षा निराळे असे संस्थात्मक प्रयोगही होताहेत- चित्रकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या संस्था, रेसिडेन्सी, गॅलऱ्यांऐवजी पर्यायी जागांवर किंवा थेट लोकांमध्ये जाऊन कलाप्रदर्शनं, हे सारं गेली काही दशकं सुरू होतं. यातूनच ‘फ्लक्सस’सारखी कलाचळवळ बहरू शकली होती. पण बर्लिन बिएनालेच्या तेराव्या खेपेला यंदा जे पाहायला मिळालं, ते अशा पर्यायी दिशेनं चाललेल्या प्रयोगांचा अर्क म्हणावं असंच होतं. या बिएनालेच्या गुंफणकार (क्युरेटर) झाशा कोला यांच्या सुमारे २५ वर्षांच्या ध्यासातून यंदाची ‘बर्लिन बिएनाले’ त्यांनी सिद्ध केली, असं म्हणता येतं.
सालिक अन्सारी, अमोल पाटील, विक्रांत भिसे या मुंबईकर (सालिक भिवंडीचा, अमोल वरळीचा तर विक्रांत विक्रोळीचा) चित्रकारांचा सहभाग इथं आहे, म्हणून बर्लिनला जाण्याचं आकर्षण होतं. सालिकनं रंगचित्रांचा वापरच मांडणशिल्पांसारखा करण्याची पद्धत विकसित केली आहे आणि तो अल्पसंख्याक समाजाच्या स्थितीबद्दल संयतपणे अभिव्यक्त होतो आहे, हे इथं दिसलं, किंवा अमोल आणि विक्रांत यांना वंचित-शोषितांबद्दल विविध प्रकारे व्यक्त होता येतं हेही दिसलं. पण लक्षात राहिला तो या बिएनालेतला म्यानमारच्या दृश्यकलावंतांचा सहभाग!
बर्लिन बिएनालेतल्या यंदाच्या ६७ कलावंतांपैकी १० हून अधिक म्यानमारचे होते. यापैकी तेन्ह लिन यानं तुरुंगात, कापडांच्या तुकड्यांवर काढलेली चित्रंही इथं होती. या चित्रकाराला म्यानमारच्या लष्करशाहीनं बर्लिनला जाण्याची परवानगी नाकारली, हेही सांगितलं जात होतं. लिनच्या चित्रांतून लोकांचं संघटन, उठाव असेच विषय सूचकपणे येतात… पण एका छोट्याशा रुमालवजा कापडावर त्यानं शिवणयंत्रावर बसलेली स्त्री आणि शेजारी तिची मुलगी यांचं चित्रण केलं, हे एकमेव व्यक्तिगत विषयावरलं चित्र.
एल्शाफे मुख्तार यांनी इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाबद्दल केलेली ‘येस टु पीस, नो टु वॉर’ ही कागदावरल्या चित्रांची मालिका आणि मूळच्या बर्मीवंशीय, पण थायलंडमध्ये राहाणाऱ्या चित्रकर्ती बुसुई अजाव यंनी केलेलं ‘लष्करशाहीचे अत्याचार’ हे चित्र या मजकुरासोबत आहे. कमी साधनं, धड कलाशिक्षणही नाही अशाही स्थितीत अभिव्यक्ती करता येते आणि कला हा केवळ शैली-तंत्राचा प्रकार नसून तो अभिव्यक्तीचा उद्गार आहे, हा विश्वास देणारी यंदाची बर्लिन बिएनाले ‘बेधडक’ होती, म्हणूनच तिचं महत्त्व कळायला काही काळ जावा लागेल.
abhijit.tamhane@expressindia.com