कलास्वाद : प्रतिभावंत शिल्पी | Talented sculptor On the art world Sculpture J J School of Art Sculptor Narayan Laxman Sonavadekar amy 95 | Loksatta

कलास्वाद : प्रतिभावंत शिल्पी

नारायण सोनावडेकरांचा जन्म २१ जानेवारी १९३३ साली कोकणातील आकेरी गावातील कलाकार घराण्यात झाला.

कलास्वाद : प्रतिभावंत शिल्पी

प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
स्वातंत्र्यपूर्व काळात कलाविश्वावर ब्रिटिशांचा मोठा पगडा होता. पुढे चित्रकला, शिल्पकला यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट या संस्थेची स्थापना झाली आणि जे. जे.च्याच एका विद्यार्थ्यांने या ब्रिटिश अहंकाराला धक्का दिला. विद्यार्थिदशेतच त्याने आपले ‘मंदिर पथगामिनी’ हे शिल्प बनवून देशभरात नाव केले. हाच विद्यार्थी पुढे रावबहादूर म्हात्रे या नावाने नावाजला गेला. पुढे वि. पां. ऊर्फ नानासाहेब करमरकर यांनी त्यांचा शिल्पकलेचा वारसा चालविला. त्यानंतर अनेक शिल्पकारांनी आपल्या कलेची वाटचाल केली. त्यातील एक अग्रणी नाव म्हणजे शिल्पकार नारायण लक्ष्मण सोनावडेकर.

नारायण सोनावडेकरांचा जन्म २१ जानेवारी १९३३ साली कोकणातील आकेरी गावातील कलाकार घराण्यात झाला. त्यांचे आजोबा व वडील दोघेही शिल्पकार. त्यामुळे नारायणकडे हा पिढीजात वारसा चालून आला यात नवल नव्हते. त्यांना ओढ होती चित्रे काढण्याची, पेंटिंग करण्याची. त्या ओढीमुळे ते मुंबईला सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले ते पेंटिंगचा अभ्यास करण्यासाठी. नंतर काही काळ त्यांनी कमर्शियल विभागातही अभ्यास केला. पण ते पुढे रमले ते शिल्पकला विभागात. त्यामागची त्यांची प्रेरणा होती ती शिल्पकार नानासाहेब कमरकरांची, तसेच स्कूल ऑफ आर्टमधील कला व हस्त व्यवसाय विभागाचे प्रमुख प्रा. नागेश साबण्णवार यांची. १९५८ साली ते शिल्पकलेची अंतिम परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांना त्या काळातील सुवर्णपदक तसेच संस्थेची फेलोशिप मिळाली. १९५९ पासून नारायणरावांनी व्यावसायिक शिल्पकार म्हणून वाटचाल सुरू केली. त्यावेळच्या मुंबई सरकारच्या राज्य कला प्रदर्शनात त्यांच्या शिल्पकृतीला प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात राज्यपालांचे खास पारितोषिकदेखील त्यांना मिळाले होते. १९६२ साली त्यांना जे. जे.च्या शिल्पकला विभागात अधिव्याख्याता म्हणून नियुक्त केले गेले आणि विद्यार्थ्यांना एक चिंतनशील, कलासक्त असे अध्यापक मिळाले. जे. जे.मध्ये शिकवत असताना सोनावडेकर विद्यार्थ्यांच्या कलाजाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न करीत असत.

माझा सोनावडेकरांशी संबंध आला तो १९६९-७० साली. तेव्हा कला संचालक होते माधवराव सातवळेकर. त्यावेळी खेळाडूंना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे पुरस्कार देण्यात यावा अशी योजना महाराष्ट्र शासनाने ठरवली. भरघोस रकमेसोबत तोलामोलाचे एक मानचिन्हही देण्याचे ठरले. साहजिकच या मानचिन्हासाठी राज्याच्या कलासंचालनालयाचे नाव समोर आले. हे काम उत्कृष्ट तऱ्हेने पार पाडू शकणारे कलाकार म्हणून सोनावडेकरांना त्याचे संकल्पन करण्याचे काम सातवळेकरांनी दिले. हा पुरस्कार शिवाजी महाराजांच्या नावे देण्यात येत असल्याने महाराज ज्या पद्धतीने नजराणा देत असत, तीच कल्पना सोनावडेकरांनी शिल्परूपात बांधली. नजराण्याचे तबक, त्यामध्ये शेला आणि जिरेटोप व त्यावर आडवी ठेवलेली तलवार असे ते देखणे शिल्प मानचिन्ह म्हणून तयार झाले. त्याच्या चौथऱ्यावरील महाराष्ट्र राज्याचे लामणदिव्याचे सील व त्यावरील अक्षरांकन सोनावडेकरांनी मला बनवण्यास सांगितले. हे मानचिन्ह त्यावेळचे मंत्री व त्यांचे सचिव यांनी पाहिले तेव्हा त्यांना अत्यानंद झाला. त्यावेळेपासून मी सोनावडेकरांच्या सान्निध्यात आलो आणि अधिकाधिक जवळ येत गेलो.

यानंतरचे नारायणरावांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद मेमोरियल रॉकवरील स्वामी विवेकानंदांचे पूर्णाकृती शिल्प. कन्याकुमारी येथील समुद्रकिनाऱ्याजवळील एका खडकावर स्वामी विवेकानंद ध्यानधारणेसाठी बसले होते. त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विवेकानंद केंद्राने त्या खडकावर विवेकानंदांचे पूर्णाकृती स्मारक शिल्प उभारण्याचे ठरवले. त्यासाठी आधार होता तो कलामहर्षी एस. एम. पंडित यांनी केलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पेंटिंगचा. त्याकरता तसाच तोलामोलाचा शिल्पकार शोधण्याचे काम समितीने पंडितजींकडे सोपवले. पंडितजींनी शोध घेण्यास सुरुवात केली. पंडितजी त्यासाठी मित्र साब्बणवार यांना भेटले. दोघेही एकाच गावचे, एकत्र शिकलेले आणि कलेत दोघेही दिग्गज! त्यामुळे साब्बणवारांच्या शब्दावर पंडितजींचा पूर्ण विश्वास होता. आणि एका क्षणात साब्बणवार म्हणाले, ‘‘नारायण सोनावडेकर!’’ आणि त्यांचे काम पाहिल्यावर पंडितजींचीही खात्री पटली. सोनावडेकरांनी स्वामीजींना पूर्ण न्याय देणारे स्मारकशिल्प बनविले. या शिल्पात त्यांनी स्वामीजींचे शांत, सात्विक, पण करारी भावाविष्कार मोठय़ा कौशल्याने आविष्कृत केले आहे.

विवेकानंदांच्या शिल्पामुळे सोनावडेकर एकदम प्रकाशझोतात आले. अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. मात्र याच काळात काही कटू प्रसंगही त्यांच्या वाटय़ाला आले. १९७६ साली बाबूराव सडवेलकर हे राज्याचे कलासंचालक म्हणून नियुक्त झाले. एक उत्तम पेंटर, कला शिक्षणतज्ज्ञ, कला-समीक्षक अशी त्यांची ख्याती होती. पण पुढे त्यांच्या जवळचे अध्यापक मित्र काही ना काही कारणांमुळे त्यांच्यापासून दूर गेले. त्यात सोनावडेकर हे स्वभावाने अत्यंत स्पष्टवक्ते व निर्भीड स्वभावाचे. त्याचीच परिणती १९७७ साली सोनावडेकरांनी जे. जे.मधील नोकरीचा राजीनामा देण्यात झाली. सोनावडेकरांच्या कामातील कौशल्य तसेच त्यांच्या शिल्पनिर्मितीसाठी अपुऱ्या जागेची अडचण जाणून महाराष्ट्र शासनाने त्यांना खार येथे स्टुडिओसाठी जागा दिली. त्या जागेवर भव्य स्टुडिओ सोनावडेकरांनी बांधला.

विधान भवनासमोर महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसवायचे ठरले तेव्हा त्या समितीने सोनावडेकरांनाच आमंत्रित केले. शासकीय नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी एखादे शिल्प उभारण्यात येते तेव्हा त्यातील व्यक्तीची ओळख, सौंदर्यशास्त्र आदी बाबी जे. जे. स्कूलच्या शिल्पकला विभागप्रमुखांकडून तपासून त्यांचे प्रमाणपत्र घ्यावे लागते. पण आपल्या कलेची क्षमता जाणून असणाऱ्या सोनावडेकरांनी त्यांना अट घातली की, कोणतीही समज नसलेल्या व्यक्तीने माझ्या शिल्पाचे परीक्षण करता कामा नये. सरकारने ते मान्य केले व महात्मा फुले यांचे एक सुंदर शिल्प विधान भवनासमोर साकारले. मात्र सोनावडेकरांच्या दृष्टीने ते शिल्प अजूनही अपूर्ण होते. कारण शिल्पाच्या चौथऱ्यावर महात्मा फुले यांच्या जीवनावरील काही खास प्रसंग त्यांनी उठावशिल्पात साकारले होते; पण निधीअभावी त्यावेळी ते राहिले ते राहिलेच!

गोव्यातील फार्माकुडी येथील डोंगरावर बसवलेले छत्रपती शिवरायांचे अश्वारूढ शिल्पही त्यांच्याच हातातून अवतरले आहे. व्यक्तिशिल्पासोबतच त्यांनी उठावशिल्पे तितक्याच तोडीची बनवली. त्यापैकी आठवणीत राहावे असे ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या दर्शनी भागावर बसवलेले अण्णासाहेब किर्लोस्कर, बालगंधर्व, राम गणेश गडकरी यांचे उठावशिल्प अशा तऱ्हेने साकारले आहे की त्यांच्या कल्पकतेला दाद दिल्यावाचून राहवत नाही. भारतात त्यांनी निर्माण केलेली अनेक स्मारकशिल्पे व व्यक्तिशिल्पे आज विविध ठिकाणी उभी आहेत. कर्नाटकातील फिल्ड मार्शल करीअप्पा, उद्योगपती बजाज, धनबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जमशेटपूरचे जमशेटजी टाटा, रांची येथील डॉ. राजेंद्र प्रसाद अशी अनेक अप्रतिम शिल्पे त्यांच्या हातून घडली आहेत. अनेक संतमहात्म्यांची व्यक्तिशिल्पेही त्यांनी साकारली. त्यात स्वामी वासुदेवानंद सरस्वती, स्वामी नित्यानंद महाराज, बसवेश्वरांच्या शिल्पांचा समावेश आहे.

मधल्या काळात मी जेव्हा जे. जे. उपयोजित कला महाविद्यालयाचा अधिष्ठाता होतो त्याकाळी मी राहत असे त्या डीन बंगल्यामध्ये ब्रिटिश कवी व नोबेल विजेते रुडयार्ड किपिलग यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील लॉकवूड किपिलग हे जे. जे. स्कूलचे वास्तुविशारद शिल्पकार होते. अनेक ब्रिटिश नागरिक या रुडयार्डच्या जन्मस्थळाला भेट देण्यासाठी येत असत. असाच एकदा आमच्या मनात विचार आला, की ब्रिटिशांच्या काळात बाहेरील व्हरांडय़ात जी रुडयार्डच्या जन्माची प्लाक बसवली आहे, त्याच्या खाली रुडयार्डचा जर अर्धपुतळा बसवला तर या बंगल्याला महत्त्व येईल. आता हा पुतळा बनवायचा तर तो सोनावडेकरांनीच- ही आमची भावना पक्की होती. पण त्यांच्या व्यावसायिक कामांत हे काम कसे होईल याची खात्री होईना. आम्ही त्यांच्या स्टुडिओत गेलो. आमचा हेतू सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘अरे, तुझ्यासाठी आणि आर्ट स्कूलसाठी मी कधीही नाही म्हणणार नाही. माझ्याही त्या संस्था आहेत. पण त्याआधी एक गोष्ट करा- तो बंगला सरकारी आहे. तेथे काहीही करायचे असले तर प्रथम शासनाची परवानगी हवी. ती आधी घ्या. नंतर काही शुक्लकाष्ठ मागे लागायला नको. दुसरे म्हणजे मला रुडयार्डचे काही फोटो लागतील. समोरून, बाजूने असे. आणि महत्त्वाचे म्हणजे या पुतळ्याला जो चौथरा कराल त्याचे डिझाईन प्रथम मला दाखवा. नाही तर पी. डब्ल्यू. डी.कडून काहीतरी करून घ्याल तर मी पुतळा देणार नाही.’’ त्यांच्या सर्व अटी मान्य करूनच आम्ही निघालो. निघताना हळूच त्यांच्या कानावर घातले, ‘‘सर, तुमचे शिल्प बनवण्याचे मूल्य आम्हाला माहीत आहे. आम्हाला तेवढे देणे शक्य होणार नाही. पण आपण जो ब्रॉन्झ धातू त्यासाठी वापरणार आहात त्याची किंमत आम्ही देऊ.’’ त्यांनी एकवार रोखून माझ्याकडे पाहिले व म्हणाले, ‘‘आता निघ. क्ले मॉडेल झाले की पाहायला बोलावतो.’’ आम्ही लंडनच्या किपिलग सोसायटीशी पत्रव्यवहार करून फोटो मागवले. आणि एक दिवस त्यांचा फोन आला, ‘‘राजा, मॉडेल तयार आहे. उद्या पाहायला तू आणि नागवेकर या!’’ दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या स्टुडिओत गेलो. क्ले मॉडेल तयार होते. हुबेहूब रुडयार्ड साकारला होता. आणि एक दिवस सरांचा निरोप आला- बस्ट तयार आहे. घेऊन जायला या. या अर्धपुतळ्याचे अनावरण आम्ही सोनावडेकर यांनीच सुचवल्याप्रमाणे सर जमशेटजी जीजीभॉय यांचे पणतू रुस्तम जीजीभॉय यांच्या हस्ते करण्याचे ठरवले. ते वर्ष होते नवे सहस्रक उगवण्याचे. त्यामुळे तोच मुहूर्त आम्ही साधायचा ठरवले. सरांनी सांगितल्याप्रमाणे पुतळ्याचा चौथरा माझे सहकारी प्रा. नरेंद्र विचारे यांनी विनामूल्य बनवून दिला होता. त्या सायंकाळी मोठा समारंभ करून आम्ही रुडयार्डच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्या सायंकाळी आम्ही सोनावडेकर पती-पत्नीचा संस्थेतर्फे सत्कार करून त्यांना मानचिन्ह दिले. आम्ही जाताना सोनावडेकरांना त्या पुतळ्याचे मूल्य म्हणून छोटीशी रक्कम देऊ केली. तेथेच त्यांनी एक कागद मागवून घेतला व ती रक्कम आमच्या विद्यार्थी संसदेला दिल्याचे लिहून देऊन पुन्हा आमच्या हवाली केली. असा उमदा कलावंत मी दुसरा पाहिला नाही.

एकदा असेच सायंकाळी सोनावडेकर सर माझ्याकडे आले. थोडेसे गंभीर दिसत होते. मला म्हणाले, ‘‘आज मी हक्काने तुला काही काम सांगायला आलो आहे. तू उपयोजित कलासंस्थेत अनेक उपक्रम केलेस. यासाठीच तुला सांगतो आहे. स्कूल ऑफ आर्टने माझ्या गुरूची-साबण्णवार सरांची काहीच कदर केली नाही. त्यांनी एवढे विद्यार्थी घडवले. अद्वितीय अशी व्यावसायिक कामे केली. त्यांच्या तोडीचे धातुकाम करणारी आज दुसरी व्यक्ती नाही. पण जे. जे. स्कूलने ना कधी त्यांना गौरवले, ना त्यांच्या कलेचा कधी सन्मान केला. माझ्या हयातीत मला सरांचा मोठय़ा प्रमाणात सत्कार करून त्यांचा गौरव करायचा आहे. पण तो स्कूल ऑफ आर्टमध्ये नाही, तर या उपयोजित कला- संस्थेत. आणि याची जबाबदारी तू घ्यायची.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘अहो सर, तुम्ही दोघेही मला गुरूच्या ठिकाणी आहात. तुम्ही फक्त हुकूम करा. आमची संस्था तुमच्यासारख्या कलाकारांसाठी सदैव तयार आहे.’’ ते म्हणाले, ‘‘कितीही पैसे लागले तरी हरकत नाही, त्यांचे एक छानसे सोव्हेनियरही काढायला हवे. म्हणजे त्यांचे एक रेकॉर्ड राहते.’’ मी त्यांना सांगितले की, मी स्वत: ते डिझाईन करेन. आणि आम्ही एक सुंदरसे सोव्हेनियर बनवले. आता राहिले समारंभाचे अध्यक्ष. त्यासाठी सोनावडेकरांनी चित्रकार माधवराव सातवळेकर ठरवलेच होते. साब्बण्णवार मास्तरांनी बनवलेल्या अनेक कलात्मक वस्तू आम्ही संस्थेत आणून त्यांचे प्रदर्शन मांडले. तो समारंभ सोनावडेकरांना जसा हवा होता तसा मोठय़ा थाटामाटात पार पडला. साबण्णवार सर भारावून गेले होते. त्या दिवशी सोनावडेकरांच्या चेहऱ्यावर एक तृप्ततेचे समाधान मी पाहिले.

सोनावडेकरांनी अनेक स्मारकशिल्पे केली, असंख्य व्यक्तिशिल्पे साकारली. प्रत्येक शिल्पात त्यांनी जीव ओतून काम केले आहे. अनेक मानसन्मान त्यांच्या वाटय़ाला आले. हे सारे होत असतानाच त्यांना कर्करोगाने ग्रासले. पण तरीही त्यांचे काम थांबले नाही. पुढे त्यांचा आजार बळावतच गेला. मी गोवा विद्यापीठाच्या कामासाठी गोव्याला गेलो होतो. नेमका मी तेव्हा फार्माकुडीला होतो. ९ एप्रिल २००२ ची तारीख होती ती. आणि माझ्या पत्नीचा फोन आला, ‘सोनावडेकर गेले.’ समोरील डोंगरावर किल्ल्याची तटबंदी दिसत होती. त्यामध्ये घोडय़ावरून दौडत जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सोनावडेकरांनी केलेले भव्य असे शल्प लक्ष वेधून घेत होते. भरल्या डोळ्यांनी मी ते पाहत होतो. शब्द गोठले होते..
rajapost@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पोटलीबाबा: यांचा पॅटर्नच वेगळा

संबंधित बातम्या

मानवतावाद जपणारा कृतिशील लेखक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
मुंबई: ‘त्यांना’ मिळणार कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने; कुणाला, का आणि कशासाठी मिळणार ही वाहने वाचा…
पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?
‘बिग बॉस मराठी’च्या घरात सिद्धार्थ जाधवची एन्ट्री; आता कोणता नवा ट्वीस्ट येणार?
Vijay Hazare Trophy 2022 Final: ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर महाराष्ट्राने सौराष्ट्रला दिले २४९ धावांचे लक्ष्य
Akshaya Deodhar-Hardeek Joshi Wedding : हळदीचा सोहळा ते लग्नाच्या विधी, खास मैत्रिणीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिलात का?