टपालकी : ‘चांदोबा चांदोबा भागलास का?’

रामराम सदाभौ. कसा हाईसा? सब कुशल मंगल हाई की न्हाई? आवं हाईच की.

|| कौस्तुभ केळकर- नगरवाला

जिगरी मतर सदाभौ यांसी,

दादासाहेब गांवकरचा दंडवत.

रामराम सदाभौ. कसा हाईसा? सब कुशल मंगल हाई की न्हाई? आवं हाईच की. कशापाई येवढा मूडाफ करून घेताव? अडीच ढांगावर तर हाये चांदोमामा आप्ला. त्येबी आंतर मिटल. आपला ईक्रम चंद्रावर पोचलाच हाई जनू. ईक्रम न्हाई ईक्रमादित्य हाई त्यो. लाख कोसावरून तिथपत्तुर पोचलाय गडी.

थोडं ऊन्नीस बीस चालतंय की वो.

सलाम ईस्रोला. सलाम तिथल्ल्या शायंटिष्टान्ना. सलाम माझ्या देसाला. बाकी सब ईसरो, आगे बढो ईस्रो!

झूठ न्हाई सांगनार सदाभौ. धा बारा दिसांपूर्वीची गोष्ट. तुमच्या वैनीसायेब आमाला घीऊन गेलत्या वाडय़ाच्या गच्चीवर. गंगेवानी निर्मळ आकाश. वावरातल्या झाडांनी फेर धरल्येला. निंबोणीच्या झाडामागून त्यो हळूच बगून ऱ्हायलाय आमा दोगास्नी.

ताारे हसीन आन् खिला-खिला चांद. आमाला काय बी सुदरना. येक डाव हिच्याकडं बगतू. येक डाव त्येच्याकडं. ‘एक लाजरा न् बुजरा च्येहरा, चंद्रावानी खुलला गं..’ तुम्च्या वैनीसायेब चंद्रावानी लाजत्यात. चांदणचुरा धरतीवर सांडतो.

‘‘धनी, तिकडं बगा की आभाळातल्या चंद्राकडं.’’

आमी दोगं तिकडं बगतो. सदाभौ, आवं त्यो परका वाटलाच न्हाई कंदी. मामा हाई त्यो समद्यांचा. चमत्कारच जाला जनू. रंग बदलला हाई त्येचा. त्यो शीतल पांडरा हुता आतापत्तुर. आमी दोगांनी डोळं भरून त्येला बगितला, तवा तिरंगी दिसला त्यो. केशरी, पांडरा आन् हिरवा. ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टीवी जाऊन कलर टीवी आनल्यावानी नवा. आपला. माज्या देसाचा. आम्चं सोडा वं. देसाच्या आभाळातला परत्येक तुकडा तिरंगी चांद दावतो आताशा. समदा देस जवा पाठीशी हुभा ठाकतो तवा अपेशाचा बी ईजय हुतो सदाभौ. चांद तो सिर्फ झाँकी है, अबी तो पूरा अवकाश बाकी है!

अवकाश, सावकाश आन् जराशा सबुरीनं. सदाभौ, समद्या ग्रहान्वर तिरंगा फडकनार. ईस्रो है तो मुमकीन है! आता फकस्त मंगल मंगल!

सदाभौ, तुम्चं बोलनं रास्त हाये. आभाळाकडं नजर लावून चालाया लाग्लं की जिमिनीवरचं खाचखळगं दिसत न्हाईत. जरा पाय घसरला की तोन्डावर आपटतू आपुन. आवं वाईच गावाकडच्या रस्त्यावरून चालून बगा. चंद्रावानी विवरं आन् गुहा हाईत रस्त्यामंदी. यष्टीत मागच्या शिटावर बसल्येलं पाशींजीर छप्पर फाडके आभाळामंदी जात्यात. खड्डय़ामंदी पानी साचतंया. गाडय़ा फसत्यात. हाडं मोडत्यात. कधीमदी जीवाचं बरं-वाईट.

चंद्राची हालत बी आशीच हाई म्हनं. तिथं बी रस्तं न्हाईत. तिकडं बी खड्डं आन् विवरं. तिथं बी पानीटंचाई.

आपला ईक्रम उतरला आसता की लगोलग कामाला जुपला आसता त्येला. घे घागर आन् शोध पानी. न्हाईतर मशालमदल्या दिलीपकुमारवानी हाळी देयाची.

‘आरं कोई है? कोई है क्या ईदर?’ कुनी गडीमानूस पयल्यापासून तिथं हाई का न्हाई येचा माग काडायचा. आवं पृथीव्वीवरचं पाप्युलेशन झेपना. भरीस भर नवीन कशाला? तेबी चालतंय की. तिथवर जाऊन आलं तर निदान तिथल्ला सातबारा तरी देसाच्या नावावर करून घेया पायजेल की न्हाई? तिथं दोन-चार देस आदीच रुमाल टाकून बसलेलं. मंग कशापाई ईतका तरास? कशापाई ईतकं रक्त आटवायचं?

डेवलपींग कन्ट्री हाई आपली. मंदी, महागाईच्या टायमाला पसा जपून वापराया पायजेल. येडय़ावानी आभाळावर पसा वोवाळून काय उप्येग? यापरीस तो पसा शिक्षनावर खर्च होवू द्या, मजबूत रस्तं बांधा, सिंचनासाटी उप्येग होवू दे तेचा. जिमिनीवरचा पसा जिमिनीवरच खर्च जाला पायजेल. हे चांद-तारे आपल्यासारक्या गरीब देसाला परवडनार न्हाईत. वाईच ‘चांदोबा’तल्या सिंहासन बत्तिशीवानी झालंया. ‘चंद्राचा हट्ट कशापाई?’सवालाचा येताळ आपल्या ईक्रम लँडोरेच्या पाठीवर बसलेला हाई. तेला पाठीवर घेवून ईक्रम पुडं पुडं चालतूया. सदाभौ, ‘चंद्राचा हट्ट कशापाई’ येचा जवाब ईक्रमच देनार बगा.

बोल्ला. ईक्रम तेच्या मनातलं बोल्ला.

आमाला, तुमाला, समद्या देसाला ऐकू आलं. ऐका वाईच. चांदोबा आपल्याला समद्यात नजदीक. तिथल्ली ट्रीप म्हंजी रंगीत तालीमच जनू. त्या अनुभवाच्या जोरावर आप्ला मंगलप्रवास सोप्पा हुनार. चंद्रावर आपला ईक्रम उतरनार हुता दक्षिन ध्रुवावर. तिथल्ली माती, तिथल्ल्या जिमिनीतली मूलद्रव्यांसंगट घेवून येनार हुता. तिथं कुटं पानी गावतंय का याचा शोध घेनार हुता. शार्टकटमंदी सांगायचं जालं तर पुडंमागं तिथं राहाया, वस्ती कराया स्कोप हाई की न्हाई? याचा अंदाज घेनार हुता. सदाभौ, आवं धरतीवरचं ऊर्जाभंडार हळूहळू आक्रसत चाललंय. नवनवीन ऊर्जास्रोत शोधाया पायजेल. तवा अवकाशाचा धुंडाळा घ्येतलाच पायजेल. श्रीगणेशा चंद्रापासून जाला की वं. येवढी मोटी मोहीम. येश-अपेश चालायचंच. हार के जीतने वालेकोच बाजीगर कहते है! आम्चा ईक्रम बाजीगरच हाई. आज न्हाई तर उद्याच्याला त्यो चंद्रावर तिरंगा फडकावनारच. वाईच जरा ट्रम्पतात्यास्नी फून लावा. चांदसफरीचं तेन्च्या नासाचं बजेट ईचारा. आरारारा! आवं ईतक्या कमी पशात चंद्रापत्तुर पोच्लं आमी. आम्च्या चांद्रयानाचं अ‍ॅव्हरीज लई भारी असनार बगा. बाहुबलीच्या प्रोडूसरला बी जादा पकं लागत्यात म्हनं पिकचर काडाया. आता बोला सदाभौ? ईक्रमचं म्हननं पटलं की न्हाई?

चंद्रावर जायलाच पायजेल. या टायमाला न्हाई जमलं तर पुन्यांदा. एखादी चंद्रकांता न्हाई तर चंद्रकला धाडा चंद्राच्या धरतीवर. भारीमंदी प्लाट बगून येष्टी-स्टॅन्ड बी बांधून ठिवा आधीच. क्यान्टीनचं टेन्डर आमीच भरनार बगा. तुमच्या ममईतून धाडा यान चंद्रावर. अवकाशसफर. मुम्बई चंद्रलोक शटल सर्वसि. नानष्टाप. आवं रीग लागंल. देश ईदेशातून लोकं येतील ममईला.

ईस्रोची यष्टी समद्यात कमी भाडय़ामंदी लोकान्ला चंद्रावर घेवून जाईल. देशाला मोप ईदेशी चलन गावंल. पायजेल तर हनीमून पेशल बी आरेंज करा. मधुचंद्र की काय ते! पुडंमागं मुम्बई मंगलवेढा न्हाई तर मुम्बई गुरूकुल. जाऊ दे जोरात! माफ करा सदाभौ. आमी जरा ईमोशनल जाल्तो. आमास्नी येवढंच सांगायचं हाई. आभाळामंदी परत्येक चांदताऱ्यावर भारताची ‘ईजयपताका’ फडकनार मंजी फडकनारच. ईस्रोच्या कंच्या बी यष्टीला ब्रेक लागाया नगं. येखाद टायमाला सक्सेश न्हाई गावला तरी बी चालतंय की! समदा देस पाठीशी हुभा हाई. पुन्यांदा स्वारी करायची. ईस्रोला मंगळाच्या ट्रीपसाटी ब्येष्ट लक. आमच्या कानाच्या पेन ड्राइव्हमंदी आतापासूनच-मंगल मंगल- ऐकू यायला लाग्लं बगा.

तुमी येकदम बराबर बोलून ऱ्हायलाय सदाभौ. धरतीवर मानूस उपराच हाई. त्यो ईथल्ला आसता तर तेचा या धरतीवर, मातीवर, सौताच्या हिमतीवर पूरा ईश्वास आसायला हवा की न्हाई? न्हाई म्हनायला येशस्वी मानूस फकस्त सौताच्या हिमतीवर आन् परयत्नांवर भरूसा ठेवतु. पर कामन मॅनचं काय? तेचा पेशन्स कमी पडतु. अपेश पचत न्हाई ईझीमंदी. मंग त्यो पत्रिकेतल्या ग्रहान्च्या मागं लागतु. त्येची शांत करतु. आमचं ईस्रोकडं येकच मागनं हाई. तुम्च्याकडं ती आण्टीमिशाईल टेक्नालाजी हाई न्हवं? येक मिशाईल धाडा आन् नशीब नावाचा ग्रह कुटं आसंल तो पाडून टाका. आपल्या समद्यांच्या राशीला लागल्येला तो योकच ग्रह हाई. त्याचा ईस्कोट व्हायला पायजेल. ‘नशिबात आसंल त्ये गावंल.’ कट्टाळा आला हाई हे ऐकून. परयत्न केलं की येश मिळनारच, ो फारम्युलाच देसाला पुडं नेणार हाई सदाभौ.

आजून येक. ईस्रोकडं भारी दुर्बीन आसनारच गडय़ाहो. नव्ये नव्ये ग्रह तारे शोधून काडनारी. आमाला बी येक नवीन ग्रह शोधायचा हाई. समाधान नावाचा. त्योच हरवलाय जनू.

टेक्नालाजी पुडं जायलाच पायजेल. एजी, ओजी, फोरजी, फाईव्हजी समदं चालंल. पर समाधान पायजेलच. या ग्रहाकडं बगून मनाला शांती मिळंल. आनंदाचं चांदणं पसरंल. हरवल्येलं आपलं मानूस जवळ येईल. आम्च्यासाटी तेवढा म्येसेज धाडाच सिवनसायेबाकडं. तेस्नी म्हनावं, नशीब नावाचा ग्रह पाडून टाका आन् समाधान नावाचा ग्रह शोधून काडा.

सदाभौ, आभाळाला हात लागलं तरी पाय जिमिनीवरच ऱ्हायला पायजेल गडय़ाहो. या देसावर, धरतीवरचं आप्लं प्रीम आटता कामा न्हाई. देसासाटीची समदी कर्तव्यं, जिम्मेदारी आपुन अदा कराया पायजेल. ‘मी सौताशी प्रामानिक ऱ्हाईन’ अशी कस्म खाया पायजेल परत्येकानं. सच्चाईनं वागीन, पर्यावरनाला जीवापाड सांभाळीन. परत्येक जन असा वागला ना सदाभौ, तर धरतीलाच सुखाचे चारचाँद लागतील. तवा आता टंगळमंगळ नगं. ईस्वेस्वराकडे येकच मागनं हाई. आभाळातला चंद्र आन् मंगल आमी जिकनारच. तेसाटी ईस्रो समर्थ हाई. मंगलयान बुंगाट पोचंल तिथं. प्राब्लीम जिमिनीवर यायला नगं.

भाकरीचा चंद्र परत्येकाला दिसायलाच पायजेल. हातान्ला काम आन् ताटामंदी वाटोळा भाकरीचा चंद्र जमलं की देव पावला.

ते हुनारच.

चांदोबा चांदोबा भागलास का? आता पासीबल न्हाई. कुटं पळशीला? आभाळातला आन् भाकरीचा. दोनी बी चंद्र आमी पकडनारच.

जय हो!

तुम्चा जीवाभावाचा दोस्त,- दादासाहेब गांवकर.   

kaukenagarwala@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Tapalki article chandrayaan 2 abn