भूषण कोरगांवकर bhushank23@gmail.com

मार्च महिन्याचा तिसरा आठवडा. बोरीवलीवरून रात्रीची ट्रेन पकडून सकाळी अहमदाबादला पोहोचलो. खेडा जिल्ह्य़ातल्या महिसा गावी हर्ष वाळंद या मित्राच्या घरी काही दिवस राहायचा बेत होता. पण त्याआधी दिवसभर जिवाचं अहमदाबाद करायचं होतं. हर्षच्या बाईकवर बसून एके ठिकाणी नाश्ता करायला गेलो.

nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
controversy over bjp candidate from north mumbai piyush goyal statement on rehabilitation of slum on salt pan lands
झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनावरून वादंग; गरीब हटाव हेच भाजपचे धोरण -विरोधकांची टीका, त्याच ठिकाणी घर देण्यासाठी कटिबद्ध -गोयल यांचे प्रत्युत्तर
Rejuvenation of water bodies Uran
वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी पाणवठे पुनर्जीवित

मला फाफडा, जलेबी, गाठीया हे प्रकार फारसे पसंत नाहीत. लहानपणी खरं तर गुजराती भाषा आणि समाजही आवडत नव्हते. त्यांच्याबद्दल मनात एक प्रकारचा आकस होता. पण पुढे माझ्या आसपास, मित्रमंडळींत, अगदी कुटुंबातच पुष्कळ गुजराती व्यक्ती आल्या. त्यांना बघता बघता, त्यांच्या हातचं खाता खाता ही अढी हळूहळू निवळत गेली.

आमची लाडकी कमलकाकी गुजरातेत वाढलेली. त्यामुळे मूळची गोव्याची असूनही तिच्यावरचा गुजराती प्रभाव जास्त प्रबळ होता. तो तिच्या भाषेत, राहणीत आणि स्वयंपाकात पुरेपूर डोकावत असे. इतका, की ती जन्माने गुजरातीच आहे असं बऱ्याच जणांना वाटायचं. त्यांच्या घरी कधीही राहायला गेलं की आपल्या पदार्थाच्या बरोबरीने ठेपले, छुंदा, कढी, खिचडी, गुजराती डाळ, ढोकळा, खमण खायला मिळायचं.. तिने स्वत: बनवलेलं किंवा त्यांच्या गुजराती शेजाऱ्यांच्या घरून आलेलं.

पुढे माझ्या कराटे चॅम्पियन चुलतभावाने पळून जाऊन लग्न केलं ते चेतना शहा या बडोद्यात वाढलेल्या गुजराती मुलीशी. तीही चॅम्पियन होती. बडोद्यातल्या मंगलोरी शेजारामुळे तिला लहानपणापासून मासे खायची चटक लागलेली. घरी येऊन आईला ती ‘आंखवालू शाक’ म्हणजे ‘डोळे असलेल्या भाज्या जास्त टेस्टी असतात, तू त्या का नाही करत?’ असं विचारायची. सासरची भाषा आणि खाद्यसंस्कृती आत्मसात करायला त्यामुळेच तिला अजिबात वेळ लागला नाही. आजही चेंबूरला त्यांच्या घरी जेवायला गेलं की प्रामुख्याने सगळं आमच्या पद्धतीचंच असतं. पण कधीतरी एखादा गुजराती पदार्थ डोकावतो. त्यात मला सगळ्यात प्रिय आहेत ती भाज्यांची झटपट लोणची!

‘ही लोणची इतकी हेल्दी असतात की खाताना अजिबात गिल्टी वाटत नाही..’ चेतना सांगते.

तोंडलीचं लोणचं

कोवळी तोंडली घ्यायची. ती चांगली धुऊन, पुसून पातळ उभी चिरायची. त्यात चवीनुसार मेथी कुरिया (मेथीच्या डाळीची भरड), लाल तिखट, मीठ, तेल, लिंबू, साखर घालायची आणि ते काचेच्या भांडय़ात चार-पाच तास मुरू द्यायचं.

‘म्हणजे ही तोंडली कच्चीच असतात?’

‘हो. आणि कच्चं तेल. ते नाही घातलं तरी चालतं. हे लोणचं फ्रिजमध्ये चार-पाच दिवस टिकतं.’

गाजर-फरसबीचं लोणचं

गाजराचे छोटे चौकोनी तुकडे आणि बारीक चिरलेल्या फरसबीला हळद, राई कुरिया (मोहरीची डाळ), मीठ, तेल, लिंबू, साखर चोळायची. हे लोणचं चार-पाच तासांनी खायचं. लाल तिखट नसल्याने आजारी माणसांनाही ते देता येतं.

पुढे कॉलेजनंतर प्रियंका वेगड या मैत्रिणीच्या घरी अनेकदा तिच्या आईच्या हातचं अस्सल गुजराती जेवण जेवलो. त्यांच्या घरचा ‘हांडवो’ म्हणजे माझा जीव की प्राण. शिवाय थंडीच्या दिवसांत वारंवार बनणारा, सढळ हस्ते मेथीचे मुठिये आणि आदु-मर्चा-लसण (आलं-मिरची-लसूण) घातलेला उंधियु आणि उडीद डाळीचं पीठ, गूळ व डिंक घातलेली, सुंठीच्या स्वादाची प्रोटिनयुक्त पौष्टिक मिठाई ‘अडदिया पाक’ यासाठी मी जीव टाकतो.

‘तू सुरतला जा..’ दुसरी एक गुजराती मैत्रीण अर्चना देसाई एकदा म्हणाली, ‘आम्ही सगळेच फूडी असतो, पण ते लोकं एवढे एक्स्ट्रिम आहेत की माणूस मेल्यावरही त्यांना चहा-नाश्ता महत्त्वाचा. स्मशानात एकीकडे चिता पेटलीय आणि दुसऱ्या बाजूला मेलेल्याचे नातेवाईक आल्या-गेल्याला पोटभर खाण्याचा आग्रह करतायत.’ हिंदू धर्मात ही प्रथा मी याआधी कधीच ऐकली नव्हती. ‘हा अतिरेक सोड, पण त्यांचं जेवण खरंच चविष्ट असतं. बोटं चाटत राहावं असं.’

अशीच बोटं चाटण्यासाठी मी आता गुजरातला येऊन ठेपलो होतो. हर्ष मला नाश्त्यासाठी ज्या जागी घेऊन गेला तिथलं दृश्य मोहक होतं. दुकानातला बल्लव बेसन पिठाला हातानेच नक्षीदार आकार देऊन ते तापलेल्या तेलात सोडत होता. गरम गरम गाठीया कागदी बशीतून समोर आल्या. एकदम झकास. विशेषत: सोबत दिलेल्या चटण्या आणि मिरच्या तर फारच बहारदार. आपल्याकडच्या कडक, कोरडय़ा गाठीया कंटाळत खाल्लेल्या. मला यांचा नरम, ओलसर स्वाद पसंत पडला. ‘हे कायम असंच नरम राहतं?’ मी विचारलं. ‘नाही. थंड झालं की थोडं कडक होतं. पण आमच्याकडचा माल इतका वेळ टिकतच नाही. तळला की अर्ध्या तासात खतम.’ त्यांचं ‘खिचु’ही ‘बहु सरस’ होतं. हा ‘उकड’ आणि ‘लाटय़ा’ याच्या अधलामधला प्रकार. ‘चोराफळी’ही तितकीच अप्रतिम. बेसन आणि उडदाचं पीठ मिक्स करून, त्याच्या मोठय़ा मोठय़ा पट्टय़ा तळून त्यावर लाल तिखट भुरभुरून खायचं. मधल्या वेळेस खायला उत्तम. थोडा बांधून घेतला आणि शहरभर भटकंती सुरू  केली.

प्रचंड उन्हाळा होता. एक-दोन ठिकाणी उसाचा रस प्यायलो, पण मजा नाही आली. आपल्या तुलनेत इथला रस पार सपक वाटला. त्याचं कारण समजलं नाही. पण लवकरच एक दैवी ड्रिंक सापडलं. जागोजागी असणाऱ्या शिकंजी सरबताच्या गाडय़ा. दहा रुपयात एक ग्लास. संध्याकाळपर्यंत दोघांत मिळून पंधरा ग्लास झाले. आणि खरंच या सरबताने तारून नेलं. उन्हाचा जराही त्रास झाला नाही. बऱ्याच लोकांशी बोलून त्याची रेसिपी शोधून काढली आणि घरी येऊन करून पाहिली. अगदी सेम चव येते. फक्त एक फरक राहतो, तो पाण्याच्या टेक्श्चरचा. त्यांच्याकडे मशीनवर केलेलं बर्फाच्या चुऱ्याचं पाणी असतं. धड पाणी नाही आणि धड बर्फ नाही अशा मधल्याच अवस्थेतला अगदी बारीक चुरा. त्याने तोंडात आणि पोटात जी जादू होते ती खरंच अद्भुत असते.

शिकंजी सरबत

दोन चमचे हलकं भाजलेलं जिरं, एक चमचा कच्चं जिरं, एक चमचा मिरी, अर्धा चमचा धणे व बडीशेप, एक चमचा आमचूर हे सगळं मिक्सरला लावून त्याची वस्त्रगाळ पूड करायची. चवीनुसार लिंबाचा रस, सैंधव मीठ, साखर घालून सरबत करायचं. एका ग्लाससाठी एक चमचा शिकंजी मसाला आणि एक चमचा भिजवलेले सब्जा बी घालायचं. वरून बर्फाचे क्यूब्स घालण्याऐवजी हे तयार सरबत थोडा वेळ फ्रीजरमध्ये ठेवायचं. बाहेर काढून ढवळून घेतलं की गारेगार अमृत तयार!

गुजरातमध्ये दारूबंदी आहे आणि जवळपास ८०% जनता शुद्ध शाकाहारी. ब्राह्मणच नाहीत, तर इथला हिंदू बहुजन समाजही पूर्वीपासून शाकाहारी आहे. फक्त मुसलमान, ख्रिश्चन, आदिवासी, दलित आणि ठाकोर यांसारख्या काही ठरावीक जमातीच मांसाहार करतात. ‘पण ते फक्त दाखवायला. चोरून खाणारे-पिणारे भरपूर लोक आहेत.’ हर्ष म्हणाला. आणि अर्थातच ‘जिथे बंदी, तिथे दुप्पट संधी’ हा न्याय तर असतोच. पुढचे काही दिवस मला उघडपणे मांसाहार करता येणार नाही, तर जे राजरोस मिळतं त्या अंडय़ाचा आस्वाद घेऊ या, असं त्याचं म्हणणं होतं. मला शाकाहार कांकणभर जास्तच आवडत असल्यामुळे अंडी खाल्लीच पाहिजेत असं काही नव्हतं. केदार चाफेकर नावाच्या पुणेकर मित्राने इथल्या अंडय़ाच्या पदार्थाची खूप तारीफ केल्याचं आठवलं. म्हटलं जाऊन तर पाहू या.  ‘सोनूज् एग वर्ल्ड’ नावाच्या एका छोटय़ाशा जागेत शिरलो. ‘१००% अंडाहारी’ असं अभिमानाने मिरवणारी सोनू या १९ वर्षांच्या मुसलमान मुलाची ही खाणावळ.

‘हमारे यहा अंडे के ६०० आयटम्स है, आप क्या खाएंगे?’

‘आप की फेवरिट डिश..’ मी म्हटलं. ‘मुझे हाफ फ्राय जादा पसंद है.’ हर्ष म्हणाला. पंधरा मिनिटांत खाणं हजर झालं. हाफ फ्राय अंडय़ावर कांदा-कोथिंबिरीची दाट हिरवी ग्रेव्ही हा एक आयटम होता. गाजर, मिरची, बटाटय़ाचे बारीक तुकडे घातलेलं लुसलुशीत ऑम्लेट हा दुसरा. आणि उकडलेल्या अंडय़ाच्या काजू-बदाम-चीज-टोमॅटो घालून केलेल्या लालसर भाजीचा तिसरा. तिन्ही पदार्थ चव, रंग, रूप सगळ्या बाबतीत खूप वेगळे आणि एकदम बढिया. मी तसं बोलून दाखवताच तो म्हणाला, ‘आप रोज आके सब ६०० आयटम खाके देखो. मैं चॅलेंज देता हूं की एक भी टेश्ट रिपीट नहीं होगा.’ त्याला मनोमन सलाम करून आम्ही बाईकवरून पुढे निघालो.

अहमदाबादपासून ६० कि.मी. अंतरावर महिसा गाव आहे. वाटेत दर वीस मिनिटांनी शिकंजी किंवा बर्फाचे गोळे वगैरे अमृतपान सुरूच होतं. कवठाच्या सरबताचा अप्रतिम गोळा खाल्ला आणि दिवेलागणीच्या आधीच हर्षच्या गावाजवळ पोहोचलो. हिरव्यागार झाडांनी सजलेली, मातीच्या घरांची स्वच्छ सारवलेली वस्ती लागली. ‘ही भिल्ल समाजाची वस्ती. त्यांची भाषा, चालीरीती सगळं वेगळं असतं.’ हर्ष म्हणाला. ‘आपल्याला जाता येईल का एखाद्या घरी?’ मला तो परिसर फार रम्य वाटत होता. पण ते शक्य नव्हतं. गावकरी आणि भिल्ल समाजात येणं-जाणं नसतं. भारतातल्या अनेक गावांप्रमाणेच कसोशीने गावगाडा पाळणारं हे महिसा गाव. ही वस्ती ओलांडून, मधला निर्मनुष्य भाग पार करून आम्ही गावात शिरलो आणि एक ओळखीचा तीव्र, कडवट, नशीला वास आला. ‘तमाकु की खेती है..’ हर्ष म्हणाला आणि मला खूण पटली. पुढचे काही दिवस या वासासोबत काढायचे होते. घरी पोचलो, फ्रेश झालो. हर्षची आई सीमाबेन वाळंद यांच्या हातचा सुंठ-पुदिनायुक्त फर्मास चहा प्यायलो. मुंबईहून आलोय म्हणून मला बघायला, भेटायला गावची बरीच मंडळी जमा झाली होती. सगळ्यांशी गप्पा मारण्यात आणि प्रत्येकाची ‘आमारा घरे पण जमवा आवजो..’ ही आमंत्रणं स्वीकारण्यात वेळ झरझर निघून गेला. स्वयंपाकघरातून फोडण्यांचे खमंग वास, भांडय़ांचे आवाज, बांगडय़ांची किणकिण सुरू झाली. आणि पोटात पुन्हा एकदा भूक खवळली.

(छायाचित्रे : हर्ष वाळंद)