• श्याम माधव धोंड

‘तूर्तास’ आणि ‘तत्पूर्वी’नंतरचा ‘तथापि’ हा दासू वैद्यांचा तिसरा कवितासंग्रह. भावात स्पष्ट रोख आणि रोषही असलेला. संयमित पण स्वच्छ स्वीकार वा नकार मांडणारा. भोवताल अस्वस्थ आणि खिन्न करणारा असला तरी वठलेल्या झाडावरही अजूनही हिरवी पाने डोलताना दिसण्याचा दिलासा देणारा. विद्यमान राजकारण, समाजकारण, धर्मकारण, कुटुंबकारण याने विस्कटलेल्या कळीकाळाचे दाखले देतानाच मनाच्या दगडाखाली वळवळणार्‍या हळव्या गझलेचेही आश्वासक सूचन करणारा.

मनोवेधकता हा दासूंच्या कवितेचा एक विलोभनीय विशेष. मुक्तछंदात असूनही छंदोमयी, लोकगीताच्या सुढाळ लयीत आणि अभंग-ओवीसारख्या अस्सल मराठमोळ्या ढंगात ती अवतरते. तिच्यात जिवाभावाची माणसे, प्राणी, पक्षी, वृक्ष-वेली यांविषयी कृतज्ञ ओल आहे. त्याचवेळी ते दुरावल्याची सलही आहे. स्त्रीवेदना-संवेदनांनी तिचा स्वर कातर होतो. ती द्रवते, स्रवते. अन्नदात्या कास्तकाराच्या जीवघेण्या दु:खभोगाचे ती मूक रुदन होते. त्याच्या कोरडवाहू आयुष्याचे शोकगीत होते. संग्रहातल्या अनेक कवितांतून वर्तमान दु:स्थितीबद्दल विशाद वाहता होतो. तथापि, त्या दमन-पीडनाला पुरून उरण्याची उमेदही तीतून व्यक्त होते.

नाट्यात्मकता हे दासूंच्या कवितेचे वैशिष्ट्य. हे नाट्य सहज खेळकर संवादातून साकारते. पात्र प्रसंगानुरूप शैली धारण करते. ‘सायकल’, ‘कढीभात’ या कवितांतून याचा प्रत्यय येतो. इथे कवित्वात कल्पकता मुरून येते. मग बोलाचीच कढी अन बोलाचाच फुरकाही वाचनाची लज्जत वाढवतो. आणि तेवढ्यात खर्‍या बायकोचा आवाज आला लवकर भांडी घेऊन खाली या टँकर आलंय आणि मी आणि मुलगी खेळभांड्यातला कढीभात तसाच टाकून टॅंकरमागे पळालो…

या ओळी नाट्यमय कलाटणी देत वाचकाला काल्पनिक दुनियेतून जमिनीवर आणतात. दुसरीकडे, सायकलीसाठी अडलेल्या नवरदेवाची मागणी पुरवणारा अगतिक वधुपिता वाचकाला समकालाचे भान देतो. मग त्याच सायकलची रस्त्यावरची गोंदणनक्षी, हवेचे मुके घेणारी स्वारी अन् पायात गोळे आलेली सायकल अशा नव्याच ॲनिमेटेड प्रतिमांतून वाचकही झुंईऽऽ पुढे जातो. नाट्य साक्षात उभं करणार्‍या अशा आणखीही काही कविता ‘तथापि’त आहेत. यात एकूण ५९ कविता आहेत. त्यांचे विषय भिन्न असले तरी ‘मी त्यांचा ते माझे – एकच ओघ अम्हातुनि वाहे’ हे त्यातल्या आशयाचे समान अंत:सूत्र आहे. त्यामुळे या कवितांची वर्गवारी करणं उचित नाही. तरीही, स्त्रीजीवनाला अस्तरासारखं धरून असलेल्या, दु:खाची कैफियत मांडणार्‍या दहा-बारा कवितांचा वेगळ्यानंच विचार करायला हवा. त्यातल्या ‘लोणचं’, ‘चिक्की बाई चिक्की’ यांत स्त्रीगीतांची अंगभूत लय आहे. त्यात स्त्रीदु:खाची ठणक, ठसठसही एका संथ लयीत व्यक्त होते. सारे सोसूनही संसार साजरा करणार्‍या सोशिक समंजस स्त्रीसारखीच.

कमाल अर्थवत्तेने भारलेली भाषा ही कवितेची व्याख्या अशा वेळी पटते. ‘अंधाराचा रावा’, ‘बाई’, ‘हट्टी डाग’, ‘वरातीसमोरच्या बायका’ या कवितांतूनही या हतभागिनी गुदमरताना, कुस्करल्या जाताना, उजेडाची विष्ठा वाहताना भेटत राहतात. स्वत: पिचताना-टिचताना, झिजताना-विझतानाही आपलं घर-अंगण सारवत आणि सावरत राहतात.

कवी मराठवाड्यातला आहे. अवर्षणाने ग्रासलेल्या. तिथलं पाण्याचं दुर्भिक्ष्यही मग अनेक कवितांतून आपसूक भेटीला येतं. सततची नापिकी, त्यामुळे आलेली हवालदिली व शेवटी कास्तकाराची आत्महत्या हे दुष्चक्र अनेक कवितांतून गळू फुटल्यासारखं वाहातं झालं आहे. पाण्याच्या अशा दुर्भिक्ष्यामुळे गावोगाव, गल्लोगल्ली फिरणारे टँकर अनेक कवितांतून घरघरतात. ‘मेल्या आईचं लेकरू’, ‘तहान’, ‘रंगपंचमी’, ‘जागर’, ‘श्रावणी सुतक’, ‘गवत’, ‘अहोरात्र’ या कवितांतलं कास्तकाराचं जीवघेणं दु:ख वाचताना, कवीचं त्या मातीशी असलेलं नाळनातं जाणवत राहतं. अस्मानी आपत्तीशी लढताना हारलेला शेतकरी अवकाळीनी तर पारच मोडून पडतो. मग नुकसानीचे अंदाज, पंचनामे आणि मदतीच्या घोषणांचे सोपस्कार पार पडतात. आणि त्याच्या पदरी – सरकारी पिवळट कागदांवर ‘उमटवलेले असहाय हातांचे घट्ट जांभळट अंगठे’ असं विदारक आणि विषण्ण दान पडतं. ‘दोस्ता’, ‘अवेळी’ आणि ‘व्यसन करणारा माणूस’ या कविता तीन प्रिय व्यक्तींच्या ताटातुटीने झालेल्या गहिर्‍या शोकातून उतरलेल्या आहेत.

दासूंची कविता बरेचदा एक गोष्ट सांगत येते. मग ती एक ‘कविथा’ होऊन जाते. या कवीत एक मिस्कील आणि खट्याळ कथानिवेदक दडला आहे. अशी अनेक कथा-नाट्य या संग्रहात आहेत. ‘सेल्फी विथ फोर्ट’, ‘झुलझुल झेंडा झुल’, ‘सायकल’, ‘बावीस वर्षं निघून गेली’, ‘टरबूज’ इत्यादी कविता अशा आहेत. असंच काहीसं नाट्य उलगडणारी गावगोष्ट सांगताना कवी एका ग्लोबल गावालाच गवसणी घालतो. ‘वेलू गेला उकंड्यावरी’ या कवितेतून. त्यात काय नाही? राजकारण आहे, धर्मकारण आहे, पर्यावरण आहे, टेक्नॉलॉजी आहे आणि अर्थकारणही आहे. पण जरा खोलात जाऊन ती वाचली की लक्षात येतं की, कवी अधर्म, अनर्थ, अराजकसदृश अनिर्बंध अशा अनागोंदीकडे निर्देश करतो आहे. विकासाच्या नावाखाली चाललेल्या भकासाकडे. कवितेतल्या पुढील ओळी आजचं हे सार्वत्रिक वास्तव सांगायला पुरेशा आहेत-

‘गांधीछाप जादुई नोटांमुळे मतदानात काळी झालेली बोटं लोकांनी पुसली लोकशाहीच्या पदराला…’ यातले झेंडे, झाडं, खांब आपल्याला वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या कवितांतून भेटत राहतात. भगव्या, हिरव्या, निळ्या काळ्या झेंड्यांच्या ओझ्याने झुकलेले ‘स्ट्रीट पोल’ मग विवशपणे आपली कथाव्यथा सांगत राहतात. ‘झुलझुल झेंडा झुल’मध्ये तीच कथा आपल्या बोकांडी बसलेल्या जातीची जन्मकहाणी होत डोळ्यांत अंजन घालते. दासूंच्या कवितेचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कवितेतला सकारात्मक प्रसन्न भाव. प्रगमनशील वृत्ती, त्यामुळे या कविता वाचून ताण न येता हुरूप वाढतो.

‘तथापि’, दासू वैद्य,
पॉप्युलर प्रकाशन,
पाने-१२६, किंमत- ३५० रुपये.