जागतिक व्यापार आणि देशोदेशीच्या आंतरराष्ट्रीय संबंधांत नेहमीच कळीचा मुद्दा ठरणाऱ्या खनिज तेलावरील गिरीश कुबेर  लिखित ‘हा तेल नावाचा इतिहास आहे!’, ‘एका तेलियाने’, ‘अधर्मयुद्ध’ या पुस्तकांनंतर आता ‘तेल नावाचं वर्तमान’ हे त्यांचे या मालेतील चौथे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे. त्यातील एक प्रकरण..

‘आपलं बंड ठरल्याप्रमाणे घडेल. पुढचं पुढे पाहून घेऊ!’ हे असं ट्विट २४ जुलै २०१९ या दिवशी त्यानं केलं आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. वरवर पाहता या ट्विटमध्ये तसं काही आक्षेपार्ह आहे असं वाटणारही नाही. एरवी कोणा साध्या माणसानं ते केलं असतं तर त्याकडे कोणी ढुंकूनही पाहिलं नसतं. पण त्याला महत्त्व आलं ते ज्यानं केलं त्याच्यामुळे आणि त्यानंतर जे काही घडलं त्यामुळे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

असं ट्विट करणाऱ्या व्यक्तीचं नाव एलॉन मस्क. आणि ते ज्या देशाबाबत केलं गेलं होतं, तो देश म्हणजे बोलिव्हिया. या ट्विटमुळे नंतर इतकी हवा तापली की मस्कसारख्या वाटेल ते बोलेल, हवं ते करेल अशा माणसालाही ते नंतर काढून घ्यावं लागलं. आता ते ज्या देशाविषयी होतं, तो देश काही इतका लोकप्रिय नाही, की ज्याविषयी सर्वानाच बऱ्यापैकी सामान्यज्ञान असेल. म्हणून आधी या देशाविषयी.

दक्षिण अमेरिका खंडात बलाढय़ अमेरिकेच्या पश्चिमेला असलेला हा एक पिटुकला देश. म्हणजे आकारानं तसा मोठा म्हणता येईल असा; पण लोकसंख्या आणि जीव यादृष्टीनं तसा लहानच. लोकसंख्या दीड कोटीही नाही. स्पॅनिश-अमेरिका युद्धात व्हेनेझुएलाचं नेतृत्व विख्यात सिमॉन बोलिवर यांनी केलं. त्यानंतर त्यांच्याकडून या देशाची निर्मिती झाली, म्हणून त्याचं नाव झालं बोलिव्हिया. ‘ला पाझ’ हे या देशाचं न्यूयॉर्क आणि ‘सकरे’ (Sucre) हे त्या देशाचं वॉशिंग्टन.. म्हणजे राजधानी. महाप्रचंड अशा अ‍ॅमेझॉनच्या खोऱ्यामुळे हा देश तसा समृद्ध म्हणता येईल असा. एका बाजूला ब्राझील, दुसरीकडे अर्जेटिना, पेरू, चिली, पॅराग्वे अशा रंगीबेरंगी देशांचा शेजार असलेला हा देश अलीकडे- म्हणजे एकविसाव्या शतकात तसा चर्चेत यायला लागला.

याचं कारण म्हणजे या देशात असलेले लीथियम या मूलद्रव्याचे प्रचंड साठे. जगातले सर्वात मोठे लीथियम साठे या देशात आहेत. म्हणजे एका अंदाजानुसार, साधारण सव्वादोन कोटी टन इतके प्रचंड. बोलिव्हिया या देशाप्रमाणे लीथियम हा शब्ददेखील तसा अनेकांना परिचित नसेल. पण जेव्हा जेव्हा बॅटरी, सेल यांचा संदर्भ येतो, तेव्हा लीथियम हा शब्द अनेकांच्या कानावरून गेला असेल. म्हणजे ‘ही काही साधी बॅटरी नाही, लीथियमची आहे’ किंवा ‘आपल्या नेहमीच्या सेल्सपेक्षा लीथियमचे सेल जास्त काळ जातात’ अशी वाक्यं अनेकदा कानावरनं गेली असतील. त्यावेळी काय भानगड आहे ही लीथियम, हे पाहण्याची तसदी अनेकांनी घेतली नसेलही. पण आगामी काळातल्या ऊर्जासाधनांचा विषय निघाला की गाडी लीथियम या मूलद्रव्यापाशी येऊन थांबते आणि मग चर्चेत बोलिव्हिया या देशाचा उल्लेख अपरिहार्यपणे येतो.

खरं हा एक नैसर्गिक योगायोगाचा विषय. जेव्हा १९३०च्या आसपास पश्चिम आशियात तेलसाठे सापडायला सुरुवात झाली, तेव्हाही ते अत्यंत दुर्लक्षित म्हणता येतील अशा देशांत आढळले. अर्थात तेव्हा सौदी अरेबिया हा देशच नव्हता म्हणा. पण तेलाच्या उगमापाठोपाठ सौदीचा जन्म झाला. ऑटोमन साम्राज्य लयाला गेल्यानंतर ते फुटून पश्चिम आशियातले अनेक देश जन्माला आले. कुवेत, इराक वगैरे. या सर्व देशांत तेलाचे अमाप झरे आहेत. पण ते तितक्या प्रमाणात त्या परिसरातल्या इस्रायल वा जॉर्डन वगैरे देशांत नाहीत. का? निसर्ग या प्रश्नाचं कधी उत्तर देत नसतो. या तेलानंतर पुढे जेव्हा नैसर्गिक वायू हा पर्याय पुढे यायला लागला तेव्हा हे वायुसाठे ओमान, व्हेनेझुएला, रशिया वगैरे देशांत मोठय़ा प्रमाणावर आढळले. बडय़ा लोकशाही व्यवस्था असलेल्या प्रांतांत हे असं काही आढळत नाही. आताही हे तसंच. उद्याच्या ऊर्जेची गरज- विशेषत: इलेक्ट्रिक वाहनं वगैरे येत असताना- लीथियम भागवेल असं मानलं जातं. म्हणून या मूलद्रव्याला अचानक असा भाव. आणि हे साठे मात्र बोलिव्हिया, चिली वगैरे अशा देशांत. जगातल्या एकूण लीथियम साठय़ांपैकी निम्म्याहून अधिक साठे हे या परिसरात आहेत. सौदी आणि परिसरातील वाळवंटात जगातलं निम्म्याहून अधिक तेल दडलंय, तसंच हे.

हे साम्य इथेच संपत नाही. यातून आणखी एक समान धागा दिसून येतो. तो म्हणजे अशी काही नैसर्गिक ऊर्जासाधनं आढळून आली की अशा परिसरांत बडय़ा देशांचा वाढणारा हस्तक्षेप. जगाला वाढायला ऊर्जा लागते. म्हणून ज्याला ज्याला वाढीची आस आहे असा देश पहिल्यांदा काय करतो? तर ऊर्जासाधनांवर मालकी तरी मिळवतो किंवा कंत्राटांनी त्यांना बांधून तरी घेतो. अमेरिकेला पश्चिम आशियातल्या वाळवंटात रस आहे तो तिथल्या तेलामुळे. आणि चीन गेल्या काही दशकांत आफ्रिकी देशांत घुसखोरी करतोय तीदेखील तिथं आढळू लागलेल्या तेलामुळेच. ‘कुवेतमध्ये गाजरं पिकत असती तर आम्ही त्या देशाच्या मदतीला धावलो नसतो,’ हे अमेरिकी लष्कराधिकारी जनरल श्वार्झकॉफ यांचे कुवेत-इराक युद्धानंतरचे उद्गार विख्यात आहेत. यातून बडय़ा देशांची तेलाविषयीची असोशी आणि ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी दिसून येते. तेल स्थिरस्थावर झाल्यानंतर नैसर्गिक वायुस्रोतांवर मालकी मिळवण्यासाठी असाच संघर्ष झाला. त्यातूनच एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी ‘गॅस ओपेक’सारखी तेल-निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’सारखी (Organisation Of Oil Exporting Countries- OPEC) संघटना बांधण्याचा घाट रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन यांनी घातला. तो तितकासा यशस्वी झाला नाही, हा मुद्दा वेगळा. पण यातून ऊर्जाबाजारावर नियंत्रण मिळवण्याचा बडय़ा देशांचा प्रयत्न अधोरेखित होतो. बोलिव्हियामध्ये जे काही झालं वा होऊ घातलं होतं, ते याच प्रयत्नांचा भाग. एकेकाळी तेलासाठी, नंतर नैसर्गिक वायूसाठी संघर्ष करणाऱ्या जगात पुढचा संघर्षबिंदू असणार आहे तो लीथियम.

एलॉन मस्क याचं ट्विट आणि बोलिव्हिया यांच्यातील ताणलेले संबंध हे या पार्श्वभूमीवर सहज समजून घेता येतील. आता हे सर्वानाच माहितीये की, मस्क आणि त्याच्या टेस्ला या विजेवर चालणाऱ्या मोटारी हे आता वाहन उद्योगाचं भविष्य आहे. मस्क याच्या या पुढाकारानंतर आणि मुख्य म्हणजे या क्षेत्रातील त्याच्या या अचाट प्रगतीनंतर जगात सर्वानाच विजेवर चालणाऱ्या मोटारींची स्वप्नं पडायला लागली. इतकी, की या मस्क यानं त्याचा टेस्लाचा कारखाना- ते नाही जमलं तर निदान किमानपक्षी टेस्ला विक्री केंद्र तरी आपल्याकडे सुरू करावं म्हणून २०२१ साली महाराष्ट्र, कर्नाटक वगैरे राज्यांत चांगलीच चुरस होती. आता या विजेवर चालणाऱ्या मोटारींसाठी चांगल्या बॅटऱ्या लागतात, हे उघड आहे. चांगल्या म्हणजे दीर्घकाळ आपल्यातील वीज साठवून ठेवतील अशा. ही अशी क्षमता हा बॅटऱ्यांच्या प्रगतीतील मोठा अडथळा आहे. म्हणजे सौरऊर्जा, पवनऊर्जा वगैरे पर्याय महत्त्वाचेच; पण त्यातून तयार होणाऱ्या विजेचं करायचं काय, हा प्रश्न. म्हणजे ती तयार होत असतानाच वापरायला हवी. उदाहरणार्थ, सौरऊर्जा. ती ऊन किंवा प्रकाश असतानाच मिळणार. रात्री नाही. म्हणजे दिवसा उन्हातनं तयार झालेली ही वीज रात्रीसाठी साठवायला हवी. ही साठवणूक करायला बॅटरी हवी. (आता यातही एक तांत्रिक गुंता आहेच. तो म्हणजे बॅटरीत साठवली जाणारी वीज ही ‘डीसी’ (डायरेक्ट करंट) अशी असणार आणि घरगुती उपकरणं तर ‘एसी’ (अल्टरनेट करंट) विजेवर चालतात. म्हणजे ‘डीसी’चं रूपांतर ‘एसी’त करणं आलं. जितकी शक्तिशाली बॅटरी, तितकी तिची ऊर्जाधारण क्षमता जास्त. एकेकाळी यातल्या शक्तिशाली याचा अर्थ आकारानंही मोठय़ा असा होता. त्यामुळे एका घरात सर्वकाळ सौरऊर्जा वापरायची, तर एक खोलीभर बॅटऱ्याच हव्यात. हा असा आकार हाच सौरऊर्जेच्या, विजेवर चालणाऱ्या मोटारींच्या प्रगतीतील मोठा अडथळा होता. तो सोडवायला मदत केली ती लीथियम या मूलद्रव्यानं. लीथियमच्या बॅटऱ्या आल्या आणि विजेवर चालणाऱ्या मोटारी, अन्य उपकरणं यांना चांगले दिवस आले. याचं कारण असं की, हे लीथियम आपल्यात वीज मोठय़ा प्रमाणावर ‘साठवून’ किंवा ‘धरून’ ठेवतं. त्यामुळे लीथियमच्या बॅटऱ्यांचं आयुष्य हे अन्य बॅटऱ्यांपेक्षा जास्त असतं. इतर बॅटऱ्या या अल्कलाईन घटकांच्या असतात आणि त्यातल्या बहुतांश एकदाच वापरता येतात. त्यांचा जीव खूपच मर्यादित असतो. आणि मुख्य म्हणजे अल्कलाईन बॅटऱ्यांच्या तुलनेत लीथियम हलकंही असतं. त्यामुळे त्या आकारानं लहान असतात आणि तरीही त्यातली ऊर्जा अधिक असते. वाहन उद्योगाच्या क्षितिजावर मस्क या नव्या ग्रहाचा उदय व्हायला आणि लीथियमचं महत्त्व वाढायला बोलाफुलासारखी एकच गाठ पडली. वास्तविक ‘मस्क’ की ‘मस्करी’ असा प्रश्न पडावा इतकी अशी ही वल्ली आहे. जन्म म्हणाल तर दक्षिण आफ्रिकेतला. आई कॅनडियन. मॉडेल होत्या त्या. आणि वडील दक्षिण आफ्रिकेचे. म्हणून जन्म त्या देशातला. प्राथमिक शिक्षणही दक्षिण आफ्रिकेतलं. सतराव्या वर्षी आला कॅनडात. मग दोन वर्षांनी पदवी घ्यायला अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया विद्यापीठात. अर्थशास्त्र आणि भौतिकशास्त्र हे पदवीचे विषय. या काळात सिलिकॉन व्हॅलीतल्या कंपनीत त्याची उमेदवारी झाली. ही कंपनी वीज साठवू शकेल अशा उपकरणांत संशोधन करत होती. इथेच पुढच्या आयुष्यात याच क्षेत्रात काही करण्याची प्रेरणा त्याला मिळाली असणार. नंतर तो पुढच्या शिक्षणासाठी स्टॅनफोर्डला गेला खरा, पण व्यवसायाची खुमखुमी स्वस्थ बसू देईना. सख्खा भाऊ किंबल याच्या साथीनंत्यानं ‘झिप २’ अशा नावाची माहिती क्षेत्रातली कंपनी काढली. ती अल्पावधीतच इतकी यशस्वी झाली की ३० कोटी डॉलर्सला त्यावेळी ‘काँपॅक’ या कंपनीनं ती विकत घेतली. त्यापाठोपाठ लगेच त्यानं ‘एक्स. कॉम’ नावाची ऑनलाईन बँक काढली आणि तीही यशस्वी होऊन ‘पे-पाल’ नावाची बलाढय़ कंपनी जन्माला येण्यासाठी विकत घेतली गेली. यातून एलॉनला प्रचंड पैसा मिळाला.