अंजली चिपलकट्टी
इलियट हा एकदम हुशार, उमदा व्यवसायिक. डोकं दुखायचं निमित्त झालं आणि ब्रेनस्कॅनमध्ये मेंदूत टय़ुमर निघाला. शस्त्रक्रिया करून तो काढला खरा; पण त्यानंतर इलियटमध्ये असे काही बदल झाले, ज्यामुळे त्याला निर्णय घ्यायला खूप वेळ लागायला लागला. बरेच निर्णय चुकायला लागले. त्याचा कद, तार्किक बुद्धी, स्मृती, भाषा वगैरे सगळं एकदम नीट होत्या; पण त्याला भावनाच जाणवत नव्हत्या! त्याच्या फ्रँकोतल्या भावनात्मक मेंदूला (vmPFC)  धक्का पोहोचला होता. आपण ‘निर्णय घेताना भावना बाजूला ठेवून बुद्धीचा वापर करा,’ वगैरे म्हणतो आणि भावनेला दुय्यमत्व देतो. पण अनेक मेंदू-पीडित माणसांच्या उदाहरणांवरून सिद्ध झालंय की, भावनांशिवाय ‘बोधन’ (cognition) शक्यच नाही. भावनांना दुय्यम समजल्यामुळे बराच काळ बुद्धिप्रामाण्याचा खूप जोर होता. वैज्ञानिकांनी भावनेच्या अभ्यासाला बाजूला सारलं होतं. नंतर (१९६०) मात्र त्यांनी काटेकोर बुद्धीने, वैज्ञानिक पद्धतीने थेट भावनेला हात घातलाच!

आपण जी भाषा वापरतो त्याचं केंद्र डाव्या भागात असलं तरी संभाषणातले चढउतार,  उपहास, विनोद, देहबोली यातून पाझरणाऱ्या भावना त्यात भरण्याचं काम मात्र भावनात्मक मेंदू करतो. कल्पक गोष्टी रचणं, काव्य, भाषण, नॅरेटिव्ह रचणं हे रंग भाषेत उजव्या मेंदूमुळे भरले जातात. डाव्या मेंदूतल्या भाषेच्या केंद्राला स्ट्रोकमुळे इजा झाल्यावर काही जण बोलू शकत नाहीत, पण गाऊ शकतात, ते याचमुळे.  म्हणूनच रिचर्ड डेव्हिड्सन हा वैज्ञानिक भावनांना ‘जीवनाचा रस’ असं म्हणतो.

plot developer killed by chopping his private parts in nagpur over illicit affairs
खळबळजनक! विवाहित प्रियकराचा गुप्तांग ठेचून खून? अनैतिक संबंधाची किनार…
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

बॅक्टेरियापासून माणसापर्यंत सर्व जीवांना ‘भावना’ असतात. बॅक्टरियासारख्या एकपेशीय जीवांमध्ये दिसणाऱ्या ‘आनंद’ (reward)‘दु:ख’ (punishment) आणि  भीती या मूलभूत जाणिवा माणसांपर्यंत प्रगत भावनांच्या रूपात पोहोचल्यात. जशी जीवांच्या शरीराची जटिलता वाढत गेली त्यानुसार मूलभूत भावनांमध्ये राग आणि किळस यांची भर पडली. दमासिओ या वैज्ञानिकानं याविषयी सखोल अभ्यास केला आहे. तो म्हणतो की, भावना (emotions) आणि  भाव (feelings) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भावना म्हणजे कोणत्याही बा उत्तेजनाला/ घटनेला शरीरानं दिलेला अ‍ॅटोमॅटिक प्रतिसाद असतो- जो सुप्त असतो. भावना म्हणजे शारीरीय कृती (मोशन) — जसं की वेगवेगळे स्त्राव, हृदयाची धडधड, घाम, पोटातली मळमळ. भावनेचा उगम झाल्यानंतर मग जाणिवेच्या पातळीवर आपल्याला जे जाणवतं (पर्सेप्शन) त्याला ‘भाव’ म्हणता येईल. पण तूर्तास आपण अधिक खोलात न जाता भाव-भावना एकच समजू.

भावना किती आंतरांगी (visceral) म्हणजे शरीराशी घट्ट  जोडलेल्या असतात हे समजण्यासाठी ‘गेम ऑफ लाइफ’ असा प्रयोग दमासिओनं केला. दोन लाल आणि दोन निळे असे पत्त्यांचे संच पसरून ठेवले. प्रत्येक पत्त्यासोबत काही फायदा आणि काही नुकसान जोडलेलं आहे, एवढंच सहभागींना सांगण्यात आलं. प्रत्येक सहभाग्यानं एक पत्ता उचलायचा. प्रत्येकाला १०० संधी.. ज्यात ज्यानं-त्यानं जास्तीत जास्त फायदा मिळवायचा. आपल्या प्रत्यक्ष जगण्यात असतं तसंच. नेमके कुठले पत्ते जास्त फायदा/ नुकसान देतील, हे मात्र ज्याचं त्यानंच शोधायचं. अंदाजे ४०-५० पत्ते उचलल्यानंतर बऱ्याच जणांच्या लक्षात आलं की, लाल पत्ते नुकसान करताहेत. गंमत म्हणजे सहभागींच्या शरीराला जोडलेल्या अनेक सेन्सर्समधून निरीक्षकांना आधीच लक्षात आलं की, लाल पत्ता उचलताना त्यांचा हात सूक्ष्मसा थरथरत होता, त्यांना घाम येत होता. त्यांच्या शरीराला नेणिवेच्या पातळीवर जे कळलं होतं ते जाणिवेच्या पातळीवर कळायला थोडा उशीर लागला होता. यालाच बहुधा आपण ‘गट फीलिंग’ असं म्हणतो. कुठे आनंद/ फायदा आहे आणि कुठे दु:ख/ नुकसान किंवा धोका आहे हे ओळखण्याच्या मेंदूच्या जोडण्या खूप आदिम आहेत. भय आणि धोका याबाबत अमिग्डला कसं काम करतो हे आपण आधीच्या लेखात पाहिलंच आहे.

हा प्रयोग आणि इतर काही पुराव्यांच्या आधारे दमासिओनं एक अफलातून थिअरी मांडली. एकपेशीय जीव स्वत:च्या शरीरनियमनासाठी काही कृती करतो- अन्न मिळवणं, पचवणं, पुनरुत्पादन वगैरे. बाहेरच्या पर्यावरणाची दखल घेत धोक्यापासून लांब जात स्वत:ला सुरक्षित ठेवणं हेही आवश्यक. यासाठीच्या प्रेरणा (रिवॉर्ड/ पनिशमेंट) त्याच्यात नैसर्गिकपणेच असतात, म्हणूनच तो जीव जगतो. याला ‘जैविक समस्थिती’ (homeostasis) असं म्हणतात. जेव्हा एकपेशीय जीवांपासून बहुपेशीय जीव तयार झाले तेव्हा अनेक पेशींचं एकमेकांबरोबर सहजीवन नीट पार पाडायचं तर विविध पेशींमध्ये संवाद हवा, जोडलेपण हवं. त्यासाठी मग मज्जारज्जू (न्यूरल सिस्टिम), उतीसंस्था (३्र२२४ी) यासारख्या काही रचना अस्तित्वात आल्या. वेगवेगळ्या भागांतल्या पेशींना जोडून घेऊन त्यांच्या गरजांचं नियमन करणं हे त्यांचं मुख्य काम. ऑक्टोपससारख्या बुद्धिमान प्राण्यात एकच केंद्रीय मेंदू नसतो तर तो शरीरभर पसरलेला असतो. माणसासारख्या सस्तन प्राण्यात शरीरातील वेगवेगळ्या संस्थामध्यें (पचनसंस्था, श्वसनसंस्था, प्रतिकारसंस्था वगैरे) समस्थिती राखण्याची उदाहरणं म्हणजे तहान/ भुकेची जाणीव, रक्तदाब, साखर मर्यादेत ठेवणं, वायूंचं आदानप्रदान, प्रोटिन्स, हार्मोन्स तयार करणं, एका भागातल्या पेशींना इजा झाली तर जीवाला भीती ‘वाटून’ लांब पळणं वगैरे.. यासाठी मेंदूतले काही भाग सतत कार्यरत असतात.

मुद्दा हा की, पेशींनी एकमेकांशी जोडून घेत शरीराला समस्थितीत राखणं याभोवती जैविक प्रक्रिया आणि त्यातून भावना तयार झाल्या. आता पुढचा टप्पा म्हणजे असे अनेक सजातीय जीव स्वहितासाठी समूह करून जगू लागले तेव्हा या जीवांमध्ये देवाणघेवाणीची, जोडून घेण्याची जैविक प्रक्रिया घडण्यासाठी काही ‘सामाजिक’ भावना तयार झाल्या असाव्यात. त्या कोणत्या? तर- स्वाभिमान, कृतज्ञता, शरम, प्रेम, करुणा, परोपकार. अशा सामाजिक भावनांशिवाय माणसासारख्या अति-सामाजिक प्राण्याचं जगणं कठीणच. समूहजीवन, सहकार्य आणि समूहात राहून स्वहित साधायला उपयोगी ठरतील अशा  ‘सामाजिक’ भावना एकाच काळात सहउत्क्रांत झाल्या असाव्यात.

गेम थिअरीमधली ‘जशास तसं’ ही सहकार्याची स्ट्रॅटेजी आठवते का? समूहात नांदायचं तर टिकून राहण्यासाठी एकमेकांशी खेळाव्या लागणाऱ्या असंख्य  खेळांचे, देवाणघेवाणीचे नियम उत्क्रांत झाले असणार. हे नियम म्हणजेच सामाजिक नियमनासाठी तयार झालेल्या भावना! त्यातूनच पुढचा टप्पा म्हणजे ‘सामाजिक समस्थिती’कडे वाटचाल होते असं दमासिओ म्हणतो.

या भावना कशा उत्क्रांत झाल्या असतील याची झलक पाहू या.

१. जगण्यासाठी अनुकूल स्थिती- अन्न, सुरक्षित वास्तव्य, प्रजननाच्या संधी मिळाल्या तर आनंदाची भावना. नाही मिळाल्या तर दु:ख.

२. प्रजनन आणि अपत्य लहान असेपर्यंत पालकांनी काळजी घेणं आवश्यक म्हणून प्रेम.

३. नातलगांमध्ये सामायिक जनुकांमुळे मदतीला सुरुवात. पण नातलगांव्यतिरिक्त  मदतीची देवाणघेवाण व्हायची तर कोणी मदत केली ते लक्षात ठेवून परतफेड करणं आवश्यक झालं.. म्हणजेच कृतज्ञता.

४. मदत करून परतफेड झाली नाही तर परत अशी फसवणूक होऊ नये म्हणून नाराजी पोहोचवणं.. म्हणून राग.

५. अशी फसवणूक होऊ नये, इजा होऊ नये म्हणून सावध असणं.. भीती.

६. आपण स्वत: फसवणूक केल्याचं समूहातल्या इतरांच्या लक्षात आलंय.. शरम.

७. पूर्वी कधीतरी कोणी फसवणूक केलीये, पण अलीकडे बरा वागतोय म्हणून पुन्हा मदत करणं.. क्षमा.

८. दुसऱ्या कोणाची फसवणूक (इजा) झालीय हे कळल्यावर दु:ख होणं.. सहअनुभूती.

९. पर्यावरणात सहकार्य करणारे जास्त असतील तर मदत करणं इतकं अंगवळणी पडतं की तातडीच्या परतफेडीची अपेक्षा राहत नाही.. परोपकार.

१०. आपलं अस्तित्व सन्माननीय आहे याची समाजानं घेतलेली दखल.. अभिमान. ही तशी अगदी अलीकडे प्रगत झालेली भावना.

एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल की, हा अगदी मूलभूत भावनांपासून ते उन्नत अशा मानवी भावनांपर्यंतचा चढता क्रम आहे. यातल्या पहिल्या काही भावना बऱ्याच प्राण्यांमध्ये दिसतात. पण शेवटच्या काही भावना या खास मानवी. प्राण्यांमध्ये जाणिवेच्या पातळीवर क्षमेची भावना नसली तरी ते नैसर्गिकपणे डूख न धरता मदत करत राहतात. आणि प्रेमाबाबत म्हणायचं झालं तर प्रजनन आणि अपत्यप्रेमाच्या बरीच पुढची पातळी निदान काही मानवांनी गाठलेली आहे. सूड, द्वेष या नैसर्गिक भावना नसून, वारंवार जुन्या नकारात्मक आठवणींना चेतवून घडवलेले बनावट दु:खद ‘भाव’ (फीलिंग) असं विज्ञान सांगतं. (‘आपण-ते’ची फॉल्ट लाइन आणि अ‍ॅफेक्ट याबद्दल आधी चर्चा केलेली आहेच.)

तर पेशी असो की जटिल जीव- एकमेकांशी ‘जोडून’ घेऊन समाजात समस्थिती येण्यासाठी या सर्व भावना तयार झालेल्या आहेत, ही मांडणी खूपच वेधक आणि शहाणिवेची आहे. बोधन हे बुद्धी आणि भावना यांच्या योग्य मिलाफातून तयार होते व तिथेच विवेकाचा जन्म होतो. तो माणसाच्या भावनांसकट मानवी कल्याणाची कल्पना करतो.

असं असेल तर अजूनही आपण या अशा सामाजिक समस्थितीपर्यंत पोहोचलेलो नाही, हे खरं. ते का? कारण ठराविक भावनांचं उद्दीपन व्हावं आणि होऊ नये म्हणून केलेली सांस्कृतिक-राजकीय व्यवस्था!

मूलभूत भावना सर्व संस्कृतींत असल्या तरी कोणत्या सामाजिक घटनांमुळे कोणत्या भावना उद्दीपित होतात/ केल्या जातात, हे मात्र मुलं सांस्कृतिक पर्यावरणानुसार शिकतात. उदा. प्रेम कसं व्यक्त करावं, राग आक्रमकपणे कोणावर काढावा की संयमित असावं, लोक इतरांना सहजपणे मदत करतात का, एकंदर व्यवहार विश्वासाचे असतात की फसवणुकीचे, यावर मुलांचं भावनिक विश्व घडत जातं. सांस्कृतिक पर्यावरणानुसार भावना कशा निबर होतात याचं उदाहरण देताना ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा डेव्हिड ब्रुक्स म्हणतो- ‘समजा, आर्थिक विषमता १००:१ आहे असं टेक्सासच्या माणसाला समजलं तर त्याच्या भावना अजिबात दुखावत नाहीत. पण स्वीडिश माणसाच्या मात्र दुखावल्या जातात!’

आणि आपलं काय? जगातल्या अतिश्रीमंत माणसांच्या यादीत भारतीय नावं आलेली पाहून आपल्या लोकांना अभिमान वाटतो. परंतु कोविडकाळात करोडो भारतीय दारिद्य्ररेषेखाली ढकलले गेले तरी आम्ही स्थितप्रज्ञ राहू शकतो.

अन्याय, फसवणूक याविषयी चीड येणं ही भावना इतकी नैसर्गिक असेल तर त्याविरुद्ध लढून आपण समस्थिती का आणत नाही? भावना अशा नको त्या कृतीत (मोशन) रूपांतरित होऊ नयेत म्हणून सत्ताधारी खूप सावध असतात. मग ते काय करतात? देव/धर्म/जात/राष्ट्र यांचा (कल्पितांचा) अपमान झाला तरच अन्याय अशी गणितं पक्की केली तर भावना ‘वळवल्या’ जाऊन बनावट समस्यांवर लढल्यासारखं वाटून भावनांचं विरेचन होतं. वास्तवातले खरे प्रश्न- अन्यायी सामाजिक-राजकीय धोरणं वगैरेसाठी भावना उरतच नाहीत. एखादा महत्त्वाचा राष्ट्रीय प्रश्न ऐरणीवर आला असेल तर त्यावर चर्चा होऊ नये म्हणून सिनेतारकांची वादावादी, खून, शत्रुदेश अशा बातम्यांकडे जास्त लक्ष जाईल अशी सोय केली जाते. सामाजिक विसंगतींबाबत मांडणी करणाऱ्या नाटक-सिनेमांपेक्षा दंगाधोपा करत आक्रमकपणे नायिकेवर प्रेम लादणारे, भयकथा, युद्धकथा यांतून घरबसल्या भावनांचा निचरा होणं किती सोयीचं आहे! फेसबुक, ट्विटरसारखी माध्यमं व्यक्तीला व्यक्त व्हायला अवकाश देतात हे खरं, पण त्यामुळे समस्थितीसाठीच्या प्रत्यक्ष कृतीऐवजी निव्वळ भावनांचं विरेचनच होतं.

गेल्या काही शतकांपासून पाश्चात्त्य प्रगत देशांत बुद्धिप्रामाण्यवाद, रेशनॅलिटी यांनी झपाटलेले अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले. विज्ञान-तत्त्वज्ञानानं भरारी घेतली. व्यक्तिवादी समाजरचना आणि बुद्धिप्रामाण्य यांतून समाज अधिक सजग होत गेले, प्रगत झाले हे खरं; पण ते कोरडे, स्वार्थी झाले. त्यांना आता एक सामाजिक तुटलेपणा, एकाकीपणा जाणवतो आहे. त्यामुळे सुखोपभोगाच्या पलीकडे सामाजिक भावनांना महत्त्व द्यायला हवं असं वैज्ञानिक सांगत आहेत.

आपलं काय? आपला समाज अजून रेशनॅलिटीपासून कोसो दूर आहे. भावनाप्रधान आहे. सामाजिक भावनांचा इतका कल्लोळ आहे की कोणाच्याही भावना कधीही दुखावतात.

प्रेम, करुणा, (अन्यायाची) चीड, अभिमान या भावना खरं तर आपल्याला नैतिक मूल्यं देतात. अशा भावनांना मार्गस्थ करत सामाजिक समस्थिती आणण्याचं काम संस्कृतीनं करणं अपेक्षित असतं. पण भावनांचं तारतम्य हरवलेल्या संस्कृती आजारी पडतात. अशावेळी जाणत्यांनी विवेकाच्या मशाली पेटत्या ठेवून भावी पिढीचं सकस भावविश्व घडवणं खूप महत्त्वाचं आहे.

anjalichip@gmail.com