thang vartanacha author anjali chipalkatti love sexual behavior and morality zws 70 | प्रेम, लैंगिक वर्तन आणि नैतिकता वगैरे..

अंजली चिपलकट्टी anjalichip@gmail.com

kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Tarun Tejankit initiative by Loksatta to celebrate the creative achievements of the young generation
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

समजा, तुम्हाला उत्खननात नर-मादी कवटय़ांच्या दोन जोडय़ा मिळाल्यात. त्यांच्या निरीक्षणावरून दोन्ही जोडय़ा प्रायमेट्सच्या आहेत हे तुम्हाला कळलंय. पण एका जोडीत नराची कवटी मादीच्या कवटीपेक्षा खूप मोठी आहे, तर दुसऱ्या जोडीत कवटय़ांचा आकार साधारण सारखाच आहे. केवळ या एका निरीक्षणावरून त्यांच्यातले लैंगिक अवयव, लैंगिक वर्तन, शारीरिक रचना, आक्रमकता यांविषयी तुम्ही काही अंदाज वर्तवू शकता का? हो. नक्की! उत्क्रांती व मानववंशशास्त्राचा अभ्यास आणि तर्क यांच्या साह्यनं संशोधक ते एकमेकांवर किती आणि कोणत्या प्रकारचं प्रेम करत होते हेही आता सांगू शकतात. हे कळण्यासाठी शेरलॉक होम्ससारखं निरीक्षण व तर्काचे अनेक धागे नीट तपासणाऱ्या डिटेक्टिव्हसारखा विचार करावा लागेल.

तर प्रेमाच्या धाग्यापासून सुरुवात करू. ‘प्रेम’ या भावनेच्या कोणत्या वेगवेगळ्या छटा आहेत आणि त्यांचा उगम उत्क्रांतीत कसा झाला असावा यामागचं विज्ञान समजून घेणं खूप रंजक आहे. जसं की- १) लैंगिक प्रेम (कामभावना), शारीरिक आकर्षण, २) आई-पिल्लाचं प्रेम, नातलगांवरचं प्रेम, ३) ‘अनुरागी’ प्रेम (attachment)- म्हणजे लळा लागणारं, सहवासाची ओढ वाटणारं प्रेम असे ढोबळमानाने प्रेमाचे तीन प्रकार करता येतात. यातल्या बऱ्याच छटा बहुतांशी लैंगिक प्रजनन करणाऱ्या प्राण्यांमध्ये दिसत असल्या तरी काही छटा फक्त आपल्या जवळच्या प्रायमेट्समध्ये दिसतात. मात्र काही खास छटा फक्त माणसांतच दिसतात. त्यामुळे त्याचं जीवरसायनशास्त्र समजून घेतलं तर प्रेमाच्या कवितांइतकंच त्यातल्या विज्ञान- सौंदर्याचाही रसास्वाद घेता येतो.

स्वत:ची जनुकं पुढच्या पिढीत पाठवण्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रजनन. लैंगिक प्रजनन हे नर-मादीच्या समागमापासून होतं. म्हणूनच लैंगिक प्रेम या भावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

पेशीविभाजनासारख्या अगदी आद्य अलैंगिक प्रजननपासून ते नर-मादी मिलनापर्यंतचा लैंगिक प्रजननाचा मोठा पट जीवसृष्टीत दिसतो. पण गुंतागुंतीच्या जीवांच्या उत्क्रांतीत लैंगिक प्रजननाची खूप मोठी भूमिका आहे हे खरं. तर मुद्दा असा की, समागमाच्या क्रियेसाठी नर-मादीला एकत्र आणणारी ‘एजन्सी’ म्हणजे नर-मादी आकर्षण किंवा लैंगिक प्रेमभावना.

दुसरा प्रकार म्हणजे आई-पिल्लातलं प्रेम. आपली जनुकं पुढच्या पिढीत सोपवण्यासाठी प्रजनन केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तो नवीन जीव जगवणं. पिल्लाचं पोषण नीट व्हायचं असेल तर आईला नुसतं प्रेम वाटून उपयोग नाही, तर पिल्लाजवळ राहणं, त्याचं संगोपन करणं यात तिला ‘आनंद’ (pleasure & reward) वाटला पाहिजे; यासाठी निसर्ग नाना प्रकारचे उपाय योजतो. मादीच्या शरीरात आनंदाची हार्मोन्स तयार व्हावी याची सोय करतो. मादीला अपत्याचा वास ओळखता येऊन आवडला पाहिजे म्हणून तिच्या शरीरात ‘वासाच्या सिस्टीम’चं (olfaction) गर्भारपणी रिनोव्हेशन केलं जातं. (याचमुळे माणसांतही गरोदरपणी अन्नावरची वासना उडते.) प्रसूतीच्या काळात स्नायूंचं आकुंचन-प्रसरण नीट व्हावं म्हणून स्रवणारं एक हार्मोन म्हणजे ऑक्सिटोसिन. यालाच निसर्गानं दुसरं काम लावून दिलं- मादीला पिल्लाबद्दल प्रेम वाटण्याचं. पिल्लाला स्तनपान करताना, त्याला गोंजारताना, चाटताना आईच्या मेंदूत डोपामाईनमुळे आनंदाची वर्तुळं पूर्ण होतील याची काळजी निसर्ग घेतो! (असे हार्मोन्स स्रवणारे बदल ज्या माद्यांच्या शरीरात सक्रिय झाले त्यांनी पिल्लांची नीट काळजी घेतली आणि ती जीवजाती अधिक टिकली. याला आपण ‘निसर्ग-निवड’ म्हणतो, हे तुम्हाला आठवत असेलच.) म्हणूनच ज्या जीवजातींमध्ये- विशेषत: सस्तन प्राण्यांत- पिल्लांचं संगोपन जास्त काळ करावं लागतं अशांमध्ये ऑक्सिटोसिन जास्त स्रवतं आणि मातृप्रेमाची भावना जास्त आढळते.

जितकं ऑक्सिटोसिन अधिक, तितका पिल्लाबद्दलचा जिव्हाळा वाटण्यातला आनंद अधिक. अतिप्रेमामुळे पिल्लाला थोडा जरी धोका वाटला तर मादी आक्रमक होते. (काही जणांमध्ये ते ओसीडीच्या पातळीवर जाऊ शकतं.) अशा माद्या जास्त ‘प्रोटेक्टिव्ह’ असतात. तर ऑक्सिटोसिन हे प्रेमाचं रसायन आणि डोपामाईन हे आनंदाचं रसायन यांच्या एकत्रित परिणामामुळे मादीला पिल्लं आणि नातलग प्रेमाचे वाटतात.

मग बापाचं काय? यांच्यात दोन प्रकार दिसतात. पहिला प्रकार म्हणजे काही जीवजातींत समागम झाल्यावर ‘मागे’ वळून न बघता दुसऱ्या मादीच्या शोधात फिरणारे ‘भिरभिरे’ नर. हे नर नवीन मादी मिळवण्यासाठी सतत धडपडत व इतर नरांशी स्पर्धा, मारामाऱ्या करत फिरतात. अर्थातच आक्रमक नरांची त्यात सरशी होणार हे सांगायला नकोच. प्रजननाच्या नवीन संधी आक्रमक नरांना मिळाल्यानं पुढील पिढीत आक्रमकता अजूनच सोकावते. तर दुसऱ्या प्रकारातले नर मादीवर समागमानंतरही प्रेम करत राहतात. अशा नरांमध्ये ऑक्सिटोसिनचा सख्खा भाऊ असलेलं व्हेझोप्रेसिन हे हार्मोन स्रवतं. पहिल्या समागमानंतर ते मादीला ‘हुक’ होतात आणि नंतर व्हेझोप्रेसिनमुळे पिल्लाबद्दलच्या, मादीबद्दलच्या प्रेमात त्यांना जास्त आनंद मिळतो. इतका, की दुसऱ्या मादीच्या शोधार्थ जाण्यापेक्षा ते एकाच मादीबरोबर राहणं पसंत करतात. नर-मादी दीर्घ काळ चक्क एकमेकांशी एकनिष्ठ राहतात. हेच ते तिसऱ्या प्रकारात मोडणारं ‘अनुरागी’ (attachment), लळा लागणारं प्रेम. समागमाच्या आणखी संधी शोधत इतर माद्यांना वश करायचं नसल्यानं इतर नरांशी यांची भांडणंही कमी होतात. त्यामुळे यांच्यात आक्रमकपणाही कमी दिसतो. नातलगांशी जवळीक आनंदाची वाटल्याने अशा प्राण्यांत समूहात एकत्र राहण्याची ऊर्मी (prosociality) उत्पन्न होते. आपण हे लक्षात घेऊ, की हे दोन्ही प्रकार नैसर्गिक आहेत.

उत्क्रांतीचा एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे निसर्ग-निवड. जे गुणधर्म (जनुकं) त्या पर्यावरणानुसार त्या जीवाला पुढच्या पिढीत नेण्यासाठी उपयोगी ठरतात, ते गुणधर्म टिकतात हे आपल्याला माहीत आहे. असाच निवडीचा अजून एक निकष म्हणजे लैंगिक-निवड. नर-मादी समागमासाठी जोडीदार निवडताना जे गुणधर्म त्यांना आवडतात तेच पुढच्या पिढीत जातात. हे फार चमत्कारिक वाटतं. ते का? कारण बऱ्याचदा ही लैंगिक निवड त्या पर्यावरणात जगण्यासाठी अनुकूल असेलच असं नाही. उदाहरणार्थ, लांडोर ही मोराच्या पिसाऱ्यावर फिदा असते. पण मोराला त्या घनदाट पिसाऱ्यामुळे खरं तर नीट उडताही येत नाही. तगून राहण्यासाठी त्याला पिसाऱ्याचा त्रासच होतो. तरी पिसारा टिकला असावा याचं एकमेव कारण म्हणजे लांडोरीला तो आवडतो! समागमाच्या क्रियेमध्ये पिसारा कोणतीच भूमिका बजावत नाही. मग लांडोरीचा एवढा अट्टहास का? ती विचार करत असावी की, जो मोर आपल्या रंगीत पिसाऱ्यावर एवढी ऊर्जा खर्च करू शकतो, त्याचे आरोग्य ठणठणीतच असणार. तथ्य तर आहे! हीच कथा सिंहाच्या आयाळाची, काळवीटाच्या शिंगांची आणि उगीचच ताकदवान नरांची. अशा लैंगिक निवडीमुळे नर आणि मादीच्या शरीररचनेत फरक पडत जातो आणि नर-मादी लक्षणीयरीत्या वेगळे दिसतात. यालाच लैंगिक द्विरूपता (sexual dimorphism) म्हणतात. चिम्पाझी नर मादीपेक्षा आकाराने दीड- दोनपट मोठा असतो. अनेक नर-पक्षी माद्यांच्या तुलनेत खूप सुंदर दिसतात. रंगांची उधळण करत, नाचत प्रियाराधन करतात. या गुणांना दुय्यम लैंगिक गुणधर्म असं म्हणतात- ज्यामुळे माद्या आपल्या जोडीदाराचं आरोग्य जोखतात. 

एकंदर असं दिसतं की, अनेक प्राण्यांमध्ये समागमासाठी योग्य नराची निवड करण्याचे पत्ते मादीकडे असतात. (वॉव! खरं की काय?) माद्याही हुशारीनं निवड करतात ती दोन प्रकारे- १) ज्या जीवजातीत नर ‘भिरभिरा’ असतो, पिल्लाच्या संगोपनात काहीच हातभार लावत नाही, तिथे माद्या गुणांचं नाणं खणखणीत वाजवून, सर्व बाजूंनी नराची परीक्षा करतात. त्या- त्या जीवजातीनुसार ज्यात ‘उत्तम गुण’ असतील असा नर त्यांना आवडतो. दिसायला आकर्षक किंवा मंजूळ गाणारा, रंगीत पिसारा असलेला किंवा ताकदवान, आक्रमक अशा सर्व बा खुणा असतील तर जनुकं गुणवान असणार असा तिचा होरा असतो. असे लैंगिक गुणधर्म असणाऱ्यांना ‘टुर्नामेंट जीवजाती’ म्हणतात. याउलट, २) दुसऱ्या प्रकारात मादी ‘वेगळ्या’ गुणांची  निवड करते. तिला कुटुंबावर प्रेम करणारा, रमणारा नर जास्त आवडतो. समागमाआधी कोण चांगलं घरटं बांधतो, कोण अधिक चांगलं अन्न आणतो, भरवतो याची ती परीक्षा करते. पिल्लांची काळजी घेणाऱ्या नराला ती पुन्हा संधीही देते. यात नर-मादी एकमेकांबरोबर काही काळ एकनिष्ठ राहतात. असे लैंगिक गुणधर्म असणाऱ्यांना ‘पेअर बॉण्डिंग’ जीवजाती म्हणतात.

इतकं सारं निरूपण झाल्यावर आता मूळ कवटय़ांच्या कोडय़ाकडे वळू. जर नराच्या कवटीचा आकार मोठा असेल तर शरीराचा आकारही मोठाच असणार. कारण लैंगिक निवडीत माद्याच आकारानं मोठा नर निवडत असणार. हे असं ‘आ बैल, मुझे मार!’ असं का? मादी ज्या समूहात राहते त्या समूहातलं पर्यावरण काय आहे त्यानुसारच तिला निवड करावी लागणार. समूहात शारीरिक ताकदीला महत्त्व आहे, याचाच अर्थ पर्यावरण आक्रमक आहे. मग मोठे नरच टिकाव धरणार! स्वत:ची जनुकं पुढे रेटायची असतील तर आपलं पिल्लू तगेल असेच गुणधर्म मादीला निवडावे लागतात. अशा आक्रमक नराकडून समागमादरम्यान मिळणाऱ्या जनुकांशिवाय ती अजून काय अपेक्षा करणार? जे नर आक्रमक- त्यांनाच प्रजननाची संधी मिळणार. त्यामुळे अशा टोळ्यांत जेमतेम पाच टक्के नरच प्रजापती असतात! अशा माद्यांना एकच पिल्लू होणार. कारण जुळी झाली तरी जुळ्यांना सांभाळण्यासाठीची मदत तिला नराकडून मिळणारच नसते. मग ती जगवणं तिला जमलं नसणार. टुर्नामेंट जीवजातीत नर काही वेळा इतके आक्रमक असतात, की ते दुसऱ्या नरांवर हल्ला करतातच, पण दुसऱ्यांच्या पिल्लांनाही ठार मारतात. चिंपांझी हे त्याचं एक चालतं-बोलतं उदाहरण. 

याच्या बरोबर उलट म्हणजे पेअर बॉण्डिंग जीवजातींमध्ये नर-मादी साधारण एकाच आकाराचे असतात. आक्रमकपणा कमी असतो. टोळीतल्या सर्व नरांना प्रजननाची संधी मिळते. माद्या बऱ्याच वेळा जुळी जन्माला घालतात. कारण नराचं साहाय्य तिला मिळतं. (किंवा काही प्रजातींत संगोपनाचा काळच कमी असतो.) गंमत अशी की टुर्नामेंट जीवजातींमध्ये, विशेषत: प्रायमेट्समध्ये, नराचं आयुष्यमान माद्यांपेक्षा कमी असतं. जणू सर्व ऊर्जा लैंगिक गुणांवर उधळून प्रजा तयार करणं हे जीवितकार्य झालं की नर चालते होतात! (समागमाच्या दिवशीच शहीद होणारे ‘परवाने’ कीटक आपल्याला माहीत आहेतच.) याउलट, पेअर बॉण्डिंग जीवजातींत नर-मादीच्या आयुष्यमानात फार फरक नसतो. लक्षात घ्यायची गोष्ट अशी की, दोन्ही प्रकारांत सामाजिक समस्थिती (homeostasis) राखण्याची नैसर्गिकता दिसून येते.

इथे अजून एक गंमत सांगायला हवी : जास्तीत जास्त जनुकं पुढच्या पिढीत पाठवायची तर समागमाच्या जास्त संधी मिळवायला हव्यात अशी ऊर्मी नरांसारखी माद्यांमध्येही असतेच. पण ज्या जीवजातींत पिल्लांच्या संगोपनाकडे नर पाठ फिरवतो तिथे मादी अडकते. पण नर संगोपनाची जबाबदारी घेणारा असेल तर माद्या दुसऱ्या नरांबरोबर समागमाच्या संधी घेतात. निसर्गात एकूणच पिल्लांच्या संगोपनासाठी कोणी वेळ द्यायचा याबाबत नर-मादीत सतत पाठशिवणीचा खेळ चालू असतो.

नर-मादीमधला लैंगिक शारीरिय-भावनिक भेद हा मुख्यत: नियमित होतो तो टेस्टोस्टेरॉन (नर) आणि इस्ट्रोजेन (मादी) या हार्मोन्समुळे. एकमेकांविषयी आकर्षण वाटण्याचं, कामभावनेची प्रेरणा आणि तीव्रता (libido)  ठरवण्याचं काम हेच हार्मोन्स करतात. ही हार्मोन्स शरीरातल्या लैंगिक अवयवात स्रवतात. पण मेंदूतल्या काही भागांचं त्यावर नियंत्रण असतं. त्यामुळे काही पेच तयार होतात. ही हार्मोन्स गर्भाच्या लिंगानुसार योग्य प्रमाणात स्रवली तर शरीरात ‘योग्य’ जननेंद्रिय तयार होतात आणि भिन्नलिंगी आकर्षण तयार होतं. पण काही वेळा आईच्या गर्भात असताना काही कारणाने या हार्मोन्समध्ये असमतोल तयार झाला तर गर्भाचं जननेंद्रिय (शारीरिक लिंग) आणि मेंदूतील लिंगभाव यात भेद तयार होतो.  उदा. शरीरातील जननेंद्रिय पुरुषाची, परंतु मेंदूत लिंगभाव मात्र स्त्रीचा. (किंवा त्याउलट!) त्यामुळे समलैंगिक आकर्षण तयार होतं. भिन्नलैंगिक किंवा समलैंगिक आकर्षण दोन्हीही नैसर्गिक ऊर्मीनुसारच असतात, ते संस्कारित नसतात असं आत्तापर्यंतच्या संशोधनात दिसून आलंय. या दोन्ही प्रकारचे लैंगिक संबंध निसर्गात अनेक प्राण्यांमध्ये दिसतात. अगदी कबुतर, गिधाड, बदकांच्या जाती, मेंढी, पेंग्विन, कुत्री, जिराफ, सिंह यांतही समलिंगी वर्तन आढळून आलंय. बऱ्याच प्रायमेट्समध्ये- गोरिला, ओरांगउटांग, मकाक आणि बोनोबो यांच्यात  उभयलैंगिकता सर्रासपणे आढळते. हे सर्व वाचत असताना अनेक गोष्टी ओळखीच्या वाटल्या असतील. माणूस कोण? टुर्नामेंट की पेअर बॉण्डिंग? असाही प्रश्न पडला असेल. हे इतकं विस्तारानं सांगायचं कारण हेच की, माणूस या दोन प्रकारांच्या साधारण ‘मध्ये’ बसतो. माणसात काही इकडचे, तर काही तिकडचे गुण आलेले दिसतात. याहीपलीकडे जाऊन माणसानं कामभावनेतली काही पुढची ठाणी काबीज केली आहेत. ते पुढील लेखात पाहू.                                              (पूर्वार्ध)