थांग वर्तनाचा!: धर्म, कर्मकांड, श्रद्धा, आध्यात्मिकता

जैविक उत्क्रांतीत अनुकूलन होऊन जसे जनुकांमध्ये किंवा मेंदूत काही खास बदल होतात, तसे धर्मभावनेमुळं/ पश्चात झालेत असे पुरावे नाहीत

अंजली चिपलकट्टी anjalichip@gmail.com

एका मुलाखतीत कार्ल सेगनला प्रश्न विचारला की, ‘तुझा देवावर विश्वास आहे का?’ तो म्हणाला, ‘देवाची तुझी व्याख्या काय, यावर ते अवलंबून आहे!’ धर्म/ धर्मभावनेबाबत काहीसं असंच म्हणता येईल. विश्वास, श्रद्धा, प्रेम, करुणात्मकता, आध्यात्मिकता, रीतिरिवाज, कर्मकांड, देवावरची श्रद्धा, अलौकिक/ अतिमानवी भावना, वैयक्तिक धर्मश्रद्धा, कट्टर धर्मश्रद्धा, संघटित धर्म या मोठय़ा पटावर आपली धर्मभावना कुठे बसते आणि आपण शेजारच्या खुर्चीवर कोणाला बसवतो, त्यावर बरंच अवलंबून आहे. तर प्रत्येकानं आपली व्याख्या आपणच करावी.

तर ही धर्मभावना माणसात निपजली कशी आणि त्याला उत्क्रांतीचा काही आधार आहे का, हे नेहमीप्रमाणे रंजक आहेच. एक थिअरी असं सांगते की, धर्मभावना तयार होणं हे अनुकूलन आहे, म्हणजे त्याशिवाय आजचा माणूस घडलाच नसता. तर दुसरी थिअरी असं म्हणते की, मानवी भावना जशा बनत गेल्या तशा श्रद्धा ठेवणं हे बाय-प्रॉडक्ट तयार झालं. त्यानंतर त्याचा उपयोग झाला. म्हणजे आपलं नाक काही चष्मा ठेवण्यासाठी तयार झालं नाही, पण त्याचा तसा उपयोग झालाच ना? तसं काहीसं. जैविक उत्क्रांतीत अनुकूलन होऊन जसे जनुकांमध्ये किंवा मेंदूत काही खास बदल होतात, तसे धर्मभावनेमुळं/ पश्चात झालेत असे पुरावे नाहीत. त्यामुळं सांस्कृतिक उत्क्रांतीमधलीच ही घडामोड असणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

जरा खोलात जाऊ. आपले पूर्वज याबाबत कसा ‘विचार’ करत होते याच्या काही खुणा सापडतात का? तर- सापडतात. हा अभ्यास अनेक मार्गानी होतो. त्यापैकी महत्त्वाचे दोन- म्हणजे उत्खननातले अवशेष आणि सांस्कृतिक अवशेष. आपण अशा अन्नवेचे-शिकारी अवस्थेत लाखो वर्षे भटकत होतो. आत्ता शिल्लक उरलेल्या अन्नवेचे-शिकारी (hunter-gatherer) जमातींच्या अभ्यासावरून कोणत्या श्रद्धा अवशेषरूपाने टिकून आहेत हे कळू शकतं. या सर्व जमातींत सामायिक श्रद्धा दिसतात- अ‍ॅनीमिझम- म्हणजे भवतालातल्या निर्जीव गोष्टींनाही मन/ भावना आहेत ही श्रद्धा, मृत्यूनंतरच्या ‘जीवना’ची गूढता आणि आत्म्यांशी बोलणाऱ्या भगतांसारख्या लोकांचं अस्तित्व. या श्रद्धा सामायिक असण्याचं मुख्य कारण म्हणजे माणूस आफ्रिकेतून बाहेर (६० हजार वर्षपूर्व) पडला, त्याआधीच या श्रद्धा तयार झाल्या असाव्यात असं म्हणता येतं! या सर्व जमातींत देव आणि नैतिकता यांचा या धर्मभावनेशी काहीच संबंध नव्हता.

उत्खननातले अवशेष काय पुरावे देतात? रायझिंग स्टार या दक्षिण आफ्रिकेतील गुहेत सापडलेल्या सांगाडय़ांवरून असा अंदाज करता येतो की, ते अंदाजे दोन-चार लाख वर्षांपूर्वी ‘ठरवून’ पुरलेले काही मृतावशेष होते. हे एक प्रकारचं कर्मकांड असावं असा वैज्ञानिकांचा कयास आहे. ‘आपला माणूस आता नाही’ याचा शोक आणि त्यातून उगवलेली मृत्यूबद्दलची भीती किंवा शरीर राखून ठेवण्याची वृत्ती यामागे दिसते. अशाच प्रकारची अनेक थडगी अलीकडेही सापडली आहेत. रशियात संगीर इथली थडगी ३२००० वर्षांपूर्वीची आहेत. तिथे सापडलेल्या सांगाडय़ांबरोबर सजावटीच्या वस्तूही सापडल्या. (गंमत म्हणजे आपला लुप्त झालेला सख्खा नातेवाईक निअँडर्थल याचीही थडगी सापडतात. आणि तोही गुहेत रेखाटनं करत होता म्हणे!) अनेक गुहांमधली अर्धपशू-अर्धमानवी (शीर-धड) असलेली  रेखाचित्रे शामनिझमच्या खुणा असाव्यात असा अंदाज आहे. गोबेक्ली टेपे या तुर्कस्तानात सापडलेल्या कोरीव दगडांची वैशिष्टय़पूर्ण वलयाकार रचना म्हणजे जगातलं सर्वात जुनं (ज्ञात) देऊळ असावं असा अंदाज आहे. (अजूनही अनेक पुरावे आहेत, ते जिज्ञासूंनी जरूर शोधावेत.)

याबद्दल मेंदू-विज्ञान काय सांगतं?

पॅटर्न शोधत राहणं आणि भवतालातल्या घडामोडींसाठी ‘कर्ता’ शोधणं या वृत्तीकडे बहुतेक मेंदू-वैज्ञानिक बोट दाखवतात. ढगात चेहरे दिसणं, दगडात आकार दिसणं, डोंगरात हत्ती, पक्ष्यांचे आकार दिसणं, वाहत्या नदीला पाहून जिवंत वाटणं हे आपण आजही करतो. विशेषत: भावनिक लोकांना हे जास्त पटकन् दिसतं. निर्जीव गोष्टींनाही मन/ भावना आहेत असं वाटणं (Theory of Mind) यातून निर्जीव गोष्टींवर मनाचं रोपण होतं. जंगलातून जाताना एखादी काटकी सापासारखी दिसते, पाचोळ्यांचा आवाज आला तर तो वाऱ्यामुळे आला असं म्हणत आपण निवांत असत नाही; उलट जास्त सावध असतो. वाऱ्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा कोणत्यातरी प्राण्यामुळे आवाज आला असेल म्हणून पळ काढणं हे आदि-आदिमानवाला जगण्यासाठी जास्त योग्य (false positive) ठरलं असावं. म्हणून संवेदनशील असणं कदाचित फायद्याचं ठरलं असणार. याच संवेदशील मनानं जेव्हा तो मृत शरीराकडे पाहतो, आत्ता सचेतन असणाऱ्या या शरीरात नेमका काय बदल झाला असं विचारतो तेव्हा कल्पना फार ताणाव्या लागल्या नसणार. झोपेत पडणारी स्वप्नं म्हणजे शरीर एका जागी ठेवून जसं मन फिरून येतं तसं या अचेतन शरीरातून मन (चैतन्य/ आत्मा) बाहेर गेलं आहे अशी कल्पना केलेली असू शकते. (लासकॉक्स या गुहेतल्या चित्रांतून असे अर्थ ‘काढले’ जाऊ शकतात.)  

माणसाच्या मेंदू-उत्क्रांतीत त्याला गवसलेली एक क्षमता म्हणजे कल्पना करणे. आत्मा आणि शरीर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, या कल्पनेची भुरळ खूप जोरकस आहे. एकदा ते मान्य केलं की मग आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांची आठवण/ प्रार्थना, त्यांच्याशी बोलणं आणि त्यासाठी मध्यस्थ  म्हणून भगत अशी जोडणी करता येते. मृतात्मा काय म्हणतो हे सांगायला या मध्यस्थानं चांगली कल्पनाशक्ती वापरली असली पाहिजे! पण महत्त्वाचं म्हणजे यामुळं माणसांचं दु:ख हलकं नक्कीच झालं असणार आणि दु:खहारक (healer) म्हणून समूहात भगत यशस्वी ठरले असणार.

आपलं आपल्या नजीकच्या नातलगांपासून (चिम्पांझी आणि बोनोबोचे पूर्वज) वेगळेपण म्हणजे समूहातल्या सदस्यांची संख्या. चिम्पांझींचे समूह अंदाजे ४५-५० जणांचे, तर आपले १५० जणांपर्यंत होते. कळपातल्या सर्वाना प्रेम किंवा धाकानं एकत्र ठेवणं तितकीशी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं प्रत्येकाशी थेट संपर्क ठेवूनही मोठा समूह एकत्र ठेवण्यासाठी आपल्या पूर्वजांना काही सामूहिक रीती, नृत्य, श्रद्धा, काल्पनिक गोष्टी, गॉसिप यांची मदत झाली असणार असा एक अंदाज आहे.  

आपले मेंदू आणि समूह हातात हात घालून मोठे झाले, हा योगायोग नाही. मेंदू मोठा होताना मोठय़ा झालेल्या निओकॉर्टेक्समुळे परिसरातल्या घडामोडींना पाहून ‘का आणि कसं’ असे प्रश्न पडू लागले. पण त्याची वैज्ञानिक उत्तरं मिळण्याची उणीव काही काल्पनिक आत्म्यांनी आणि कथांनी भरून काढली असावी. पण त्याचवेळी भावनिक मेंदूचाही (subcortical regions) विकास झाला. भय, इजा (दु:ख) आणि आनंद या भावनांचं नियमन ज्यांना नीट करायला जमलं ते टिकले आणि प्रजनन करू शकले. गडगडाटी पावसाला पाहून भ्यालेल्या माणसानं पर्जन्याच्या आत्म्याची कल्पना करून त्याला ‘शांत’ केलं तेव्हा त्याला सुकून मिळाला असणार. निसर्गातील विविध शक्तींचा आविष्कार त्याच्या मनातही उमटला आणि त्या शक्तींपुढे नम्र होत त्यांची प्रार्थना केल्यानेही त्याला आनंद मिळू लागला असावा. शिवाय अनिश्चितता, योगायोगानं घडणाऱ्या गोष्टीमागची कारणं शोधता न आल्यामुळं जी असुरक्षितता, अस्वस्थता वाटते, ताण येतो त्यापासून मुक्तता मिळवून देण्याचं काम या अतिमानवी/ अलौकिक शक्तींशी समझोता केल्यानं झालेलं असण्याची शक्यता आहे.

याला जीवशास्त्रीय स्पष्टीकरणं देता येतात. 

प्रत्येक सजीवाची सिस्टिम ही रिवॉर्ड (आनंद) आणि पनिशमेंट (इजा/ दु:ख) यांच्या तोलण्यातून ठरते. मनाचं आणि शरीराचं नियमन करण्यासाठी प्रत्येक शरीराचं एक ‘बजेट’ असतं. किती अन्न मिळतंय आणि ऊर्जा कुठे खर्च करायची, याचं मेंदू सतत नियमन करत असतो. अनिश्चिततेमुळे येणारा ताण आणि भीती बजेटमधली जास्त ऊर्जा खर्च करू लागली तर मेंदूला ते परवडत नाही. त्यामुळं कोणतेही ताण येणारे प्रोजेक्ट तो बंद करतो आणि सोपी स्पष्टीकरणं निवडतो. (संकटात असताना आपण प्रार्थना करतो. ताणात असताना खाण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, ते याचमुळं.)

सामूहिक रीतिभाती, नृत्य, अन्न वाटून खाण्यासाठी काही विधी, भगताने आखून दिल्याप्रमाणे कृती करणं, अग्नीभोवती करायच्या विधी अशा सामूहिकपणे केल्या जाणाऱ्या कर्मकांडामध्येही ताण नाहीसे करण्याचं सामर्थ्य असतं. यामुळं समूहाचा एकोपा वाढून समूह घट्ट बांधला गेला असावा. याचा अर्थ समूह मोठे होताना मन/ शरीराची समस्थिती राखण्यासाठी दु:ख हलकं करण्याची महत्त्वाची भूमिका धर्मभावनेनं बजावली असल्यानं समूह तगून राहिले असावेत.

(गंमत म्हणजे हे कर्मकांडमाहात्म्य इतकं भारी आहे की कबुतरांमध्येही अनिश्चिततेमुळे कर्मकांडं तयार होतात असं एका प्रयोगातून दिसून आलं! पिंजऱ्यात ठेवून त्यांना रँडमपणे दाणे दिले तरी आपल्या कोणत्या तरी खास कृतीमुळं (गिरक्या घेणं, मान वळवणं, पंखात चोच खुपसणं वगैरे) आपल्याला रिवॉर्ड मिळालंय असं वाटून ते तीच कृती सतत करत राहतात.)

याच्या पुढच्या टप्प्यात माणूस शेतीमुळं एका जागी स्थिर झाला, तसे हे समुदाय विशाल होत गेले आणि अनेक समूहांच्या एकत्रिकरणातून देवांचीही देवाणघेवाण झाली असावी. पण अशा समूहांची काही व्यवस्था लावण्यासाठी नैतिक देवांच्या कल्पनांचा उद्भव झाला असावा. या नैतिक देवांची कल्पना त्यांच्यातल्याच एखाद्या कल्पक म्होरक्यानं भगताला सोबत घेऊन केली असावी. (सत्ता व धर्म यांची आळीमिळी इतकी जुनी आहे तर!) अशा समूहाचं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे लिखित स्वरूपात काही नीतिनियम. दगडांवर, देवालयांवर कोरलेले आकार आणि मूर्तीची चिन्हकं यातून अशा नैतिक नियमांचं दर्शन लोकांना सतत घडेल हाही उद्देश असणार. एकाच पातळीवर असणाऱ्या अनेकानेक देवांची मात्र यामुळे उतरंड तयार झाली. कोणीतरी देवांचा देव झाला आणि त्यामुळं एखाद् दोन देवांना साकडं घालणं, त्यांना आवाहन करणं, अनेक घटनांचं स्पष्टीकरण देणं कदाचित सोपं गेलं असावं. अशा प्रकारे देवांचं एकत्रिकरण झाल्याची, नंतर राजालाच ईश्वरी अंश मानून पुजण्याची पद्धत सुरू झाल्याची उदाहरणं बऱ्याच संस्कृतींत आढळतात. उदा. ग्रीकांचा झेउस, इजिप्तमध्ये फेरो, इंद्र वगैरे. धनधान्याचा ‘संचय’ करण्याची सवय जडलेल्या या लोकांनी पाप-पुण्याचा संचय आणि मग पापक्षालनाच्या पद्धतींची कल्पना करणं तसं अवघड नाही. अनेक समूहांच्या विलयनातून झालेल्या समाजात असमानता तयार झाली असणार हे उघडच आहे. पण त्याकाळच्या पद्धतींनी त्यांना एकत्र बांधून घालण्याची सोय मात्र केलेली दिसते. नातलग नसतानाही आपण समूहातल्या सर्वाशी नात्यानं बांधले आहोत, या भावनेनं सुरक्षित वाटतं. मेंदूत सुखद संवेदना तयार होतात (एंडोर्फिन). अशी आभासी नाती (स्युडोकिनशिप) तयार होण्याची प्रक्रिया फक्त माणसांत घडली म्हणून माणसं मोठय़ा समूहांत एकत्र राहू शकली.

धर्मश्रद्धा ही काही खास भावना आहे की ती इतर श्रद्धांसारखीच आहे यासाठी एक प्रयोग करण्यात आला. श्रद्धा असणारे आणि नसणारे दोन्ही प्रकारच्या लोकांना सहभागी करून त्यांना वेगवेगळ्या विधानांवर त्यांचा विश्वास आहे की नाही, हे सांगायचं होतं. (उदा- २+२ = ४, Eagles really exist, Angels really exist, virgin birth वगैरे.) विश्वास धार्मिक असो वा नसो, मेंदूस्कॅनमध्ये असं दिसलं की विश्वास व्यक्त होत असेल तेव्हा फ्रँको उद्दीपित होत होता. पण धार्मिक विधानं वाचताना श्रद्धा असलेल्या लोकांच्या अँटेरिअर इन्सुला आणि व्हेंट्रल स्ट्रायटम या भागांचं उद्दीपन तीव्र होतं. अँटेरिअर इन्सुला हे वेदना, तिटकारा अशा नकारात्मक भावनांशी, तर व्हेंट्रल स्ट्रायटम हे आनंद भावनेशी जोडलेलं आहे. संवेदना तीव्र असणं हे कदाचित वेदनेची सहनशीलता आणि म्हणून धार्मिक भावनांशी जोडलेलं असू शकतं असं यातून दिसतं.

अनेक माणसांना आध्यात्मिक अनुभव घ्यावेसे वाटतात. अथांग समुद्र, विश्वाबद्दलचं कुतूहल, निसर्गाच्या अद्भुत किमया पाहिल्यावर आपलं मन भारावतं, विस्मयचकित होतं. ‘स्व’ गळून पडतो. आपण आणि हे विश्व एक आहोत अशी तीव्र भावना दाटते. ही भावावस्था उत्कट आणि अतिशय प्रामाणिक अशीच असते. मेंदूतील करुणेचं, एकत्वाचं केंद्र अशावेळी उद्दीपित झालेलं दिसतं. पण त्याचा संबंध अतिमानवी व्यवस्थेशी जोडणं वैज्ञानिक नाही.

मेक्सिकोतल्या अ‍ॅझटेक जमातीत एक विशिष्ट मश्रुम खाल्ली जाते, ज्याला चक्क ‘देवाचं मांस’ असंच नाव आहे. ते खाल्ल्यावर त्यांना अतिशय आध्यात्मिक, धार्मिक वाटतं असं तिथले लोक सांगतात. वेगवेगळ्या जमातींत, संस्कृतींत असे काही अमली पदार्थ सेवन करण्याची प्रथा सार्वत्रिक दिसते. ईश्वराशी तादात्म्य पावण्याचा अनुभव त्यातून ‘लवकर’ मिळतो असं ते मानतात. बऱ्याच गुरूंच्या आश्रमात असे अमली पदार्थ वापरले जातात हे उघड गुपित आहे. बोस्टनमधल्या एका चर्चमध्ये (!) मास्लो नावाच्या एका वैज्ञानिकानं एक प्रयोग केला. सहभागींचे दोन गट करून एका गटाला सिलोसायबीन हा अमली पदार्थ असलेली एक गोळी दिली, तर दुसऱ्या गटाला साधी नायसिन गोळी दिली. कोणाला काय दिलं हे अर्थातच त्यांना माहीत नव्हतं. ज्यांनी सिलोसायबीन घेतली होती त्यांनी नंतर त्यांचे अनुभव असे सांगितले. १. स्वभान विसरून खोल अशी एकत्वाची जाणीव. २. अवकाश आणि काळाच्या पलीकडचा अलौकिक अनुभव. ३. खूप सकारात्मक आणि पवित्र भावना जागृत होणं. ४. काहीतरी गूढ, पण क्षणभंगुरतेचा अनुभव. ५. अनंतात विलीन झालो अशी भावना. २५ वर्षांनंतरही गूढतेचा हा अनुभव ज्यांनी घेतला ते लोक त्या अनुभवाला महत्त्वाचं मानत होते.

दु:ख आणि वेदनांपासून माणसाला मुक्तता हवी असते हे खरंच. विपश्यना, ध्यानधारणा, योग आणि इतर काही शांततामय मार्गानेही उच्च आध्यात्मिक अनुभूती घेता येते. बा संवेदना आणि आंतरिक संवेदनांचा वेदना, दु:खाशी असणारा संबंध कर्मकांडाच्या आहारी न जाता पहिल्यांदाच गौतम बुद्धानं सर्वसामान्यांना उलगडून सांगितला.. तेही अडीच हजार वर्षांपूर्वी. म्हणून ते लक्षणीय.      (पूर्वार्ध)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thang vartanacha author anjali chipalkatti religion rituals faith spirituality zws

Next Story
साहित्यभूमी प्रांतोप्रांतीची : मातीचे डाग पायावर घेऊन वावरणारा साहित्यिक
ताज्या बातम्या