थांग वर्तनाचा! : प्रेम, लैंगिक वर्तन आणि नैतिकता वगैरे..

सुदृढ लैंगिक प्रशिक्षणाने बरेच प्रश्न हलके होतात असं अमेरिका व युरोपीय देशांच्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आलं आहे.

अंजली चिपलकट्टी anjalichip@gmail.com

माणसाचं लैंगिक वर्तन ‘जवळ’च्या प्राण्यांच्या तुलनेत कुठे समांतर, कुठे युनिक आहे हे समजून घेणं फार रंजक आहे. सुरुवात करू लैंगिक प्रेरणेपासून. सर्व प्राण्यांत लैंगिक प्रेरणा घट्टपणे ठराविक काळातील प्रजननाशी जोडलेल्या आहेत. अपवाद फक्त माणूस आणि बोनोबो! बराच काळ असा समज होता की फक्त चिम्पांझी हेच आपले जवळचे नातलग आहेत. पण चिम्पांझीइतकेच बोनोबो हे प्रायमेटही आपल्या जवळचे आहेत. दोघांचीही ९८.५% जनुकं माणसांशी जुळतात. या दोन प्रायमेटांचं लैंगिक वर्तन अगदीच परस्परविरोधी आहे. म्हणजे चिम्पांझी आक्रमक, इतर नरांशी स्पर्धा करत मादी मिळवणारा, पितृसत्ताक टोळ्यांत जगणारा, बहुगामी. याउलट, बोनोबो म्हणजे जगातली अत्यंत ‘प्रेमळ’ अशी जीवजाती! यांच्यात टोळ्या मातृसत्ताक असतात. मुख्य म्हणजे बहुगामी असूनही यांच्यात आक्रमकता नसते. अजून एक मोठा फरक म्हणजे चिम्पांझी प्रजननाव्यतिरिक्त लैंगिक संबंध ठेवत नाहीत. पण बोनोबो मात्र लैंगिक संबंध प्रजननासाठी कमी आणि ‘सलोख्या’साठी जास्त वापरतात! लैंगिक वर्तनातून ते अनेकांशी ‘जोडून’ घेतात, एकमेकांचे लाड करतात, नाराजी शांत करतात. विशेषत: माद्यांमध्ये समलैंगिकता जास्त दिसून येते. एकमेकांना कुरवाळत, लैंगिक अवयवांशी खेळत ते सतत परस्परांना रमवत असतात. माणसाच्या लैंगिक वर्तनात या दोन्हींची झलक दिसते. प्रजननाव्यतिरिक्त केवळ आनंदासाठी लैंगिक वर्तन करणं आणि प्रत्यक्ष समागमाच्या क्रियेइतकंच त्याआधीच्या फोरप्लेला महत्त्व असणं, ही माणसाची खासियत. आपल्या पंक्तीला फक्त बोनोबोच बसतात.

माणसं एकगामी (monogamous) असतात की बहुगामी (polygamous) एकगामीचा अर्थ ‘आयुष्यभर एकच जोडीदार’ इथपासून  ‘एका वेळी एक जोडीदार’ असा बदलत चाललेला दिसतो. बहुतांश माणसांमध्ये निसर्गत: जी प्रेरणा दिसते ती दुसऱ्या प्रकारच्या एकगामीत्वाची (एका वेळी एक, पण आयुष्यात अनेक!) असावी. पण माणसांत वैविध्याचा जो मोठा पट दिसतो त्यानुसार एका वेळी अनेक जोडीदार हवे असणारे लोकही बरेच आहेत. एक जोडीदार असताना त्याला ‘फसवून’ दुसऱ्याबरोबर मैत्री‘वजा’ संबंध ठेवणाऱ्या लोकांचं प्रमाण जगभरात २५ ते ७०% आहे! हे फसवणं म्हणजे काय?  मनात दुसऱ्याची अभिलाषा धरणं? मिठी मारणं? मनात शरीरसंबंध होतानाची ‘कल्पना’ करणं की प्रत्यक्ष संबंध ठेवणं? यांपैकी काहीही असू शकतं.

इस्थर पेरेल ही सायकोथेरपिस्ट म्हणते की, अनेक जोडप्यांत जो ‘बेईमानी’ करतो, त्याला जोडीदाराशी खोटं बोलण्याविषयी खंत असते; पण प्रत्यक्ष ‘अफेअर’मध्ये मिळालेला अनुभव हवाहवासा वाटतो, नियम तोडल्यानंतर धाडसी, जिवंत वाटतं, हे ते प्रामाणिकपणे कबूल करतात! अधिक खोलात गेल्यावर असं लक्षात आलं की, बहुतांश स्त्री-पुरुष असे ‘अफेअर करतात ते नावीन्याच्या शोधात, एकाकीपणा घालवण्यासाठी, भावनिक-बौद्धिक सोबतीसाठी! लैंगिक समागम हा त्यातला एकमेव उद्देश नसतो. अगदी सहजपणे कोणी ‘आवडून’ जातं असंही घडतं. या ‘आवडून’ जाण्याचं पुढे काय करायचं, हे मात्र संस्कृतीनं बनलेल्या चौकटीनुसार ठरतं. भारतातील बरेच विवाहित स्त्री-पुरुष हे आवडणं मनात कुलुपबंद करतात. पुरुषांनी असे संबंध ठेवले तर चालतं अशी अनेक भारतीयांची धारणा आहे. स्त्रीला मात्र लगेच व्यभिचारी ठरवलं जातं. भारतासारख्या समूहवादी संस्कृतीत कुटुंबाची चौकट स्त्रियांवर जास्त लादली जाते. इतकं असूनही भारतात विवाहबा संबंध ठेवण्याचं (सर्वधर्मीय) प्रमाण ५० ते ५५% आहे!  यात जितके पुरुष, तितक्याच स्त्रियाही गुंतलेल्या आहेत हे लक्षात घेऊ. मात्र, स्त्रियांना ते जीवापाड लपवावं लागतं. याचा अर्थ एवढा मोठा धोका असूनही असे संबंध ठेवण्याची ऊर्मी उरतेच!

मेंदूतली जीवरसायनं याबाबत काय सत्य सांगतात? मेझोलिम्बिक डोपामाईन व ऑक्सिटोसिन-व्हेसोप्रेसीन या हार्मोन्सचं मेंदूतलं प्रमाण आणि सांस्कृतिक पर्यावरण एकत्रितपणे एकगामी कुटुंबवत्सलता ते बहुगामीत्व या विस्तृत पटावर आपण कुठे बसू ते ठरवतात. ‘कुलिएज इफेक्ट’ ही जैविक वृत्ती सस्तन जीवजातींमध्ये दिसून येते. उंदीरसदृश्य प्राण्यांवर केलेल्या प्रयोगातून काही ‘रसिक’ धागे मिळतात. एका पिंजऱ्यात एका नराबरोबर काही माद्यांना ठेवण्यात आलं. नराने काही काळ सर्व माद्यांबरोबर समागम केल्यावर तो ‘दमला.’ माद्यांनी कितीही लाडीगोडी लावली तरी त्यानं फार दाद दिली नाही. पण पिंजऱ्यात लगेचच पाठवण्यात आलेल्या नवीन मादीबरोबर मात्र समागम करायला तो उत्सुक होता! असाच प्रयोग माद्यांमध्येही बहुगामित्व दिसतं का, यासाठी केले गेले. एका पिंजऱ्यात मादीला ठेवून तिच्या चहुबाजूच्या पिंजऱ्यांत अनेक नरांना ठेवलं. पिंजऱ्याचे दरवाजे फक्त मादीला उघडता येतील अशी सोय केली असता मादीलाही एका नरापेक्षा अनेक नरांबरोबर समागम करायला आवडतं असं दिसून आलं. याचा अर्थ नरनिवडीचं स्वातंत्र्य तिला असतं तेव्हाच तिला त्यात आनंद मिळतो. साधारणपणे नर नवीन मादी निवडताना फार चिकित्सा न करता अनेकींबरोबर (quantity) समागम करायला उत्सुक असतात.  पण माद्या मात्र गुण पाहून ‘सिलेक्टिव्ह’ (quality) नरांना निवडतात असं चित्र दिसतं. एकाच जोडीदाराबरोबर काही काळ समागम केल्यानंतर जे ‘हॅबिच्युएशन’ होतं, त्यामुळे मेझोलिंबिक डोपामाइन स्रवणं हळूहळू कमी होतं व आनंद कमी होतो. पण तोच आनंद नवीन जोडीदारामुळे अचानक वाढतो. हे संशोधन असंच्या असं माणसांना लागू करता येईल असं नाही, पण जे अभ्यास केले गेले आहेत त्यावरून मानवी मेंदूतील स्राव साधारण हीच कहाणी सांगतात.

नुकतीच एकमेकांच्या प्रेमात पडलेली आणि आकंठ बुडालेली अशी काही जोडपी बोलावून प्रत्येकाला त्यांच्या ओळखीच्या माणसांचे फोटो सेकंदभर ‘फ्लॅश’ करण्यात आले. त्यात मध्येच प्रत्येकाच्या प्रेमिकांचाही फोटो होता. तो बघताच मेंदूतलं डोपामाइन एकदम आकाशाला भिडलं! याच जोडप्यांना काही काळानंतर पुन्हा पुन्हा हा प्रयोग करायला बोलावण्यात आलं. साधारण चार-पाच वर्षांनंतर प्रेमात अजूनही एकत्र राहणाऱ्या त्यांच्यापैकी काही जोडप्यांचं तसंच ब्रेन स्कॅन करण्यात आलं. तेव्हा मात्र प्रेमिकाचा फोटो पाहून मेंदूतलं डोपामाइन वाढलं नाही, पण ‘इंटेरियर सिंग्युलेट’ हा भाग मात्र उद्दीपित झाला. हे समाधान आणि सहानुभूतीचं केंद्र आहे! सॅपोलस्की या वैज्ञानिकाच्या शब्दांत सांगायचं तर ‘ताजं प्रेम/आकर्षण हे लैंगिक आनंदाची परमावधी देणारं असतं. पण नंतर ‘ओळखी’मुळे प्रेमातलं नावीन्य हरवतं आणि ते ‘आरामखुर्ची’सारखं बनतं!’

अजून एक महत्त्वाचं वैशिष्टय़ म्हणजे माणसांमधली लैंगिकता इतर प्राण्यांसारखी पूर्ण शारीरिक नसून त्यात ‘मना’चा वाटा खूप मोठा आहे. कल्पनेत रमण्यासाठी त्याला हेही क्षेत्र वर्ज्य नाही. लैंगिक वर्तनाच्या कल्पनाविश्वात रमून उद्दीपन मिळवायला माणसांना आवडतं. आभासी जगात रमण्यासाठी त्याला ‘इरॉटिक’ कथा, फोनवरचं संभाषण, चॅटही उद्दिपना देऊ शकतं. त्याच्याही पुढचं पाऊल म्हणजे ‘व्हर्च्युअल-रिअ‍ॅलिटी सेक्स’द्वारा जोडीदाराशिवाय अतिशय उत्कट असा अनुभव माणसाला घेता येतो. लैंगिक अवयवांचं उद्दिपन तो मेंदूतल्या संवेदनकेंद्रात अनुभवू शकतो. इतर प्राण्यांच्या मानाने माणसाला ‘रोमान्स’ जास्त काळ टिकावा असं वाटतं. त्यासाठी नावीन्याचे अनेक उपाय तो योजतो. विविध प्रणयक्रीडा, समागमाच्या आसनांतलं वैविध्य, प्रत्यक्ष जोडीदारच नवीन मिळवणं, मनात नवीन जोडीदाराची कल्पना करणं, पॉर्न, विविध उपकरणं या सगळ्यातून तो नावीन्य शोधत असतो. आणि इथेच माणसाची खरी ससेहोलपट सुरू होते. बहुतांश मानवी संस्कृतींनी सामाजिक स्वास्थ्यासाठी एकपती-पत्नीत्वाचा कायदा केला आहे खरा; पण विरोधाभास हा, की तेच समाज स्वत:मध्ये एकगामीत्व रुजवू शकले नाहीत.

लैंगिकता तज्ज्ञ म्हणतात, ‘सांस्कृतिक नैतिकतेची चौकट ‘कडेकोट’ असली तरी माणसाच्या मूळ नैसर्गिक वृत्ती त्याला धडका देत राहतात. चौकट लवचिक असेल तर ती न तुटता समस्थिती राखता येणं शक्य असतं. मात्र, कडक असेल तर समाज दांभिक बनतात. लैंगिक वृत्ती व कृती दबलेल्या स्वरूपात फटाक्यासारख्या स्फोटक बनून सर्वत्र वावरत राहतात. त्यात स्त्रियांचं समाजातलं स्थान दुय्यम दर्जाचं असेल तर ती शारीरिक आणि मानसिक अत्याचारांना बळी पडत राहते.. घरातही आणि बाहेरही.  लैंगिक अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी विवाहाव्यतिरिक्त ऐच्छिक संबंध ठेवण्याची काही वाट संस्कृतीनं ठेवली नसेल तर विकृती वाढत जातात.

तर माणूस नावीन्यानं भारलेला लैंगिक आनंद आणि ‘ओळखीची आरामखुर्ची’ असं दोन्ही हवं असणारा प्राणी आहे. लांब पल्ल्याच्या नात्यातली गोडी त्याला हवी असते, पण वाटेतले नावीन्याचे अनुभवही त्याला आकर्षित करतात. प्राचीन भारतात स्त्री-पुरुषांमधील लैंगिक प्रेरणांचा नीट अभ्यास करूनच ‘कामसूत्र’सारखे ग्रंथ लिहिले गेले. यात पुरुषांबरोबरच स्त्रीच्या कामतृप्तीचे महत्त्वही सांगून त्यानुसार लैंगिक आनंद कसा मिळवता येतो याची वर्णने त्यात आहेत. खजुराहोमधली कामशिल्पं ही आपल्या मध्ययुगीन प्रगल्भ जाणिवेची साक्ष आहेत. यजुर्वेदात यज्ञ आणि त्याला साक्षी ठेवून केलेल्या कामक्रीडा याची नेटकी वर्णनं कथांमध्ये सापडतात. हाही आपला एक समृद्ध वारसा आहे. अतिप्राचीन काळी समूहात राहताना कामसंबंध बरेच मुक्त होते असं जगभरात दिसतं, तसंच भारतातही ते होतं. भारतीय पुराणकथांमध्ये याचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. उदाहरणार्थ यम-यमी संबंध, दक्ष-दक्षी संबंध, महाभारतातील पुरुषांप्रमाणेच कुंती आणि द्रौपदी या स्त्रियांमध्येही दिसणारं बहुपतित्व. आजही पूर्व-ईशान्य भारतात अनेक भावांशी लग्न करणारी एक स्त्री अशी कुटुंबं दिसतात. आपली संस्कृती लैंगिक संबंध ठेवण्याबाबत मुक्त होती. नंतर मात्र अभिजनांच्या सत्ताकारणातून वारसा आणि पावित्र्याच्या कल्पना तयार झाल्या आणि नैतिकतेच्या चौकटी संकुचित झाल्या.

लैंगिकतेबद्दल भारतात एवढा टॅबू आहे की त्याचं शिक्षण, संशोधन राहिलं बाजूला, त्याबद्दल उघडपणे बोलणंही अश्लील समजलं जातं. त्यामुळे पुढे अनेक सामाजिक समस्या उभ्या ठाकतात. सुदृढ लैंगिक प्रशिक्षणाने बरेच प्रश्न हलके होतात असं अमेरिका व युरोपीय देशांच्या तुलनात्मक अभ्यासातून दिसून आलं आहे.

भारतात मात्र लैंगिक शिक्षणाचे पहिले धडे मुलं (विशेषत: मुलगे) पॉर्नमार्फत गिरवतात! ते किती घातक आहे याचे पुरावे अल्पवयीन मुलांच्या लैंगिक गुन्ह्यंमधून समोर येतात. म्हणूनच लहान वयापासून निकोप प्रेमभावना, लैंगिक वृत्ती/ वर्तनासाठी शाळेत आणि नंतर वयानुरूप टप्प्याटप्प्यानं योग्य त्या शिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. अनेकदा जे लैंगिक शिक्षण दिलं जातं त्यात लैंगिकतेचा अर्थ मुलग्यांसाठी आनंद, तर मुलींसाठी भीती, जबाबदारी असा पोचवला जातो. मुलग्यांना शिश्न-ताठरता, हस्तमैथुन, वीर्यस्खलन, उत्कर्षबिंदू (orgasm) याविषयी सांगितलं जातं; पण मुलींच्या होकाराची, आनंदाची, हळुवार प्रेमाची, फोरप्लेची गरज अधोरेखित केली जात नाही. मुलींना पाळी, गर्भधारणा, स्तनपान याविषयी सांगताना शिश्निका, हस्तमैथुन, उत्कर्षबिंदू हे सांगायचं राहूनच जातं. जणू काही लैंगिक क्रियेत आनंद मिळण्याची अपेक्षा तिनं करूच नये. पुरुषाचा आनंद तोच तिचा आनंद असंच तिला वाटावं. (intimate justice) स्त्रियांचा उत्कर्षबिंदू प्रजननाच्या क्रियेसाठी आवश्यक नसतो म्हणून उत्क्रांतीत त्याचं महत्त्व कमी होत गेलं, असं आग्र्युमेंट काही जण करतात. पण ते खरं नसावं. कारण पुरुषही प्रजननापेक्षा वैयक्तिक आनंदासाठीच समागम करतात. तर मग दोघांचाही आनंद महत्त्वाचा मानला पाहिजे अशी भूमिका लैंगिकता मानसशास्त्रज्ञ मांडतात.

स्त्रियांना ‘सेक्स-ड्राइव्ह’ कमी असतो असा एक गैरसमज आहे. फक्त जैविकदृष्टय़ा पाहता शारीरीय उद्दीपन व उत्कर्षबिंदू मिळताना स्त्री-पुरुषांच्या शरीरात ज्या घटना घडतात त्या जवळपास सारख्याच असतात. पण मानसिक कामप्रेरणेत सांस्कृतिक घटक परिणाम करतात. मानसिक ताणामुळे कामउद्दीपन न होण्याची समस्या पुरुषांमध्ये दिसते. सांस्कृतिक शिकवण/ दबावामुळे स्त्रियांनी लैंगिक आनंदाची मागणी करणं किंवा प्रत्यक्ष कामक्रीडेत सक्रिय पुढाकार हे  ‘कुलीन’ मानलं जात नाही. उलट, तिच्याबद्दल शंका घेतल्या जातात. त्यामुळं स्त्रियांची कामप्रेरणा विझून जाते. पुरुष ‘आवडण्या’च्या कामभावनेतल्या आनंदाव्यतिरिक्त लग्नाआधी/ नंतर उत्कर्षबिंदू न अनुभवलेल्या स्त्रियांचं प्रमाण अगदी एलिट समाजातही बरंच असावं. खरं तर स्त्रीच्या सहभागामुळे जी उच्च कामतृप्ती मिळू शकते त्यापासून पुरुषही वंचित राहतात.

लैंगिक नावीन्य मिळवण्याचे कोणते प्रकार योग्य/ अयोग्य याबाबत लैंगिकता तज्ज्ञ असं म्हणतात की, प्रणयक्रीडेतील नावीन्य, इरॉटिका, फोरप्लेतली विविधता, समागमाच्या आसनांतलं वैविध्य यांचा वापर तारतम्यानं करावा. पण पॉर्नचं व्यसन लागू शकतं आणि त्यातून  मानसिक/ सामाजिक अस्वास्थ्य येऊ शकतं. पॉर्नमध्ये दाखविल्याप्रमाणे लैंगिक वर्तन करायला हवं, आपले/ आपल्या जोडीदाराचे अवयव तसे असायला हवेत अशा अवाजवी अपेक्षा तयार होतात. प्रत्यक्षात तसं न घडल्यास कामतृप्तीतला आनंद घटतो. ‘सेक्स परफॉर्मन्स’विषयी ताण येतात. पॉर्न बघतच उत्कर्षबिंदू गाठता येतो, तर जोडीदाराला रमवण्याची कटकट कशाला? यातून प्रत्यक्ष कामक्रीडेतला रस कमी होतो. स्त्रियांकडे माणूस म्हणून बघण्याऐवजी आनंद मिळवून देणारी ती एक वस्तू आहे असा दृष्टिकोन बळावतो.

पुरुषांमध्ये लैंगिक आक्रमकता आणि बलात्कार करण्याची वृत्ती कुठून येते आणि त्याला काही जैविक उत्क्रांतीचा आधार आहे का, या मुद्दय़ाची चर्चा विवाद्य आहे. काही प्राण्यांमध्ये बलात्कारसदृश वर्तन दिसतं. सील, ओरँगउटांग या सस्तन प्राण्यांत ज्या (दुय्यम) नरांना माद्यांबरोबर समागमाची संधी सहजी मिळत नाही, ते माद्यांच्या इच्छेविरुद्ध समागम करताना दिसतात. या जीवजातींत नरांमधली आक्रमकता खूप जास्त असते. लैंगिक आनंद मिळताना अमिग्डला हा मेंदूचा भाग उद्दीपित होतो. खरं तर अमिग्डला हे भीती आणि भीतीमुळे आक्रमक (fight/ flight) होण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळं काही वैज्ञानिकांचा असा कयास आहे की, लैंगिक उद्दीपन मिळणं आणि आक्रमकता यांचं क्रॉस-कनेक्शन अमिग्डलामध्ये होऊन त्याची परिणीती अशा वर्तनात होत असावी. पण याबद्दल काही ठोस अजून सापडलेलं नाही. थॉर्नहील या वैज्ञानिकानं पुरुषांमधली बलात्कारी वृत्ती हे एक प्रकारचं अनुकूलन (adaptation) आहे अशी मांडणी केली आहे. कारण या ‘गुणा’मुळे असे पुरुष प्रजननाच्या जास्त संधी मिळवतो, म्हणूनच हा ‘अवगुण’ टिकला! या थिअरीला ठोस असे पुरावे नाहीत. ज्या समाजात समता व लैंगिकतेचं निकोप पोषण होतं तिथे अशा वृत्ती कमी दिसतात. त्यामुळे यामागे सत्ताकारण आणि  सामाजिक शिक्षण अशी कारणं असावीत असं समाजशास्त्रीय अभ्यास सांगतात. एक मात्र नक्की, की बलात्काराच्या वृत्तीमागे जैविक कारण असो वा नसो, मानवी समाजात बलात्काराची वृत्ती हद्दपार करण्यासाठी कायद्याव्यतिरिक्त गंभीरपणे काम करायला हवं. पॉर्न आणि इतर यांत्रिक उपकरणांचा बाजार आपल्या लैंगिक भावनांवर कब्जा मिळवत असताना आपण काय भूमिका घ्यावी? लैंगिकतेवर दोषपत्र ठेवावं की त्यातल्या नावीन्याच्या मागणीवर? की सामाजिक जबाबदारीचं भान व मानसिक संतुलन राखूनही नावीन्याची गरज भागवता येईल? नैतिकतेच्या चौकटी लवचिक करता येतील का? मानवी लैंगिक ऊर्मीची गुंतागुंत समजून घेऊन, बाजाराच्या आहारी न जाणारी, सकस लैंगिक भावना असणारी माणसं घडवण्याचं आव्हान आपल्याला पेलणार का?   (उत्तरार्ध)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thang vartanacha author anjali chipalkatty love sexual behavior and morality zws

ताज्या बातम्या