अंजली चिपलकट्टी anjalichip@gmail.com

सहकार्य करण्याच्या माणसातल्या अफाट क्षमतेसाठी आपली पाठ थोपटून घेतली खरी, पण यात एक मेख आहे. प्रत्यक्षात समाजात वावरताना आपल्याला अशा दिलदार सहकार्याचा अनुभव येतो का? सहकार्य करण्याची अंगभूत प्रेरणा असली तरी अनोळखी माणसांबरोबर सहकार्य करताना माणसात (इतर प्राण्यांच्या तुलनेत) संस्कारित वृत्ती, भावनांचं प्रभुत्व यामुळे वेगळेच फाटे फुटतात. कोणत्या वृत्तींना आणि भावनांना त्या-त्या सांस्कृतिक आणि भौगोलिक पर्यावरणात कसा वाव मिळतो यावर सहकार्य झुलत राहतं. त्यामुळे याचं उत्तर समूहागणिक- खरं तर- ‘संस्कृती’नुसार बदलतं. एखाद्या समूहात वावरताना सहकार्याचा अनुभव येईल की फसवणुकीचा, हे त्या समूहाचं ‘सामाजिक भांडवल’ किती यावर अवलंबून असतं.

beed lok sabha marathi news, beed lok sabha election 2024
बीडमध्ये सामान्यांच्या प्रश्नांपेक्षा आरक्षणाचाच मुद्दा प्रचारात प्रभावी
loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
North Mumbai Lok Sabha Constituency Degradation of environment and pollution due to development activities
आमचा प्रश्न – उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ : विकासकामांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, प्रदूषणाचा विळखा

आर्थिक भांडवल माहितीय बुवा, ‘सामाजिक भांडवल’ ही काय चीज आहे? पाहू या. कोणत्याही समूहात (देश/ राज्य) आर्थिक भांडवल म्हणजे त्या देशाची मालमत्ता- नैसर्गिक संसाधने, अन्नधान्य उत्पन्न, उद्योगधंदे, सशक्त बँका, सेवा, कुशल माणसे वगैरे. तसंच ‘सामाजिक भांडवल’ हे समूहातल्या सर्वाचा परस्परविश्वास, विश्वासाची परतफेड (reciprocity) होण्याची शाश्वतता यातून उभं राहतं. जितका विश्वास जास्त, तितकं सहकार्य जास्त. म्हणून मग ‘जशास तसं’ स्ट्रॅटेजी यशस्वी होण्याची शक्यता जास्त. थोडक्यात, जगण्याच्या खेळात सर्वाना ‘फेअर प्ले’चा अनुभव येत असेल तर सामाजिक भांडवल चांगलं असणार. कोणत्या समूहात ‘सामाजिक भांडवल’ किती, हे कसं ओळखायचं? काही साधे प्रश्न स्वत:ला विचारा : सर्वसाधारणपणे व्यवहार करताना अनोळखी माणसावर आपण सहज विश्वास ठेवू शकतो का? समजा, तुम्हाला अनोळखी माणसाकडून वस्तू खरेदी करायची आहे, तर बिनधास्त अ‍ॅडव्हान्स देता का? दिला असेल तर वस्तू मिळेपर्यंत मनात धाकधूक असते का? विशेषत: तो दुसऱ्या जाती/धर्म/वर्गातला असेल तर? बाहेर पडताना घराला किती कडेकोट कुलूपबंद करावं लागतं? फसवणूक/अन्याय झाला तर न्याय मिळतो का? सामुदायिक व्याख्याने, प्रदर्शने, नाटके, संगीत महोत्सव अशा कार्यक्रमांना (निवडणूक/ धार्मिक कारणांशिवाय) समाजातील सर्व जाती/ धर्म/ वर्गातील माणसांची किती उपस्थिती असते? ते स्वत:हून सहभागी होतात का? सार्वजनिक व्यवहारांत पारदर्शकता आहे की माहिती दडवली जाते? लोकांना ‘मनातलं’ बोलण्याचं स्वातंत्र्य किती आहे? आरोग्यव्यवस्थेचे फायदे किती सर्वसामान्य गरिबांपर्यंत पोहोचतात? जाती/ धर्म/ वर्गानुसार शाळा वेगळ्या आहेत की एकाच शाळेत विविधता दिसते? सामाजिक हिंसाचाराचं प्रमाण काय? या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक असतील तर सामाजिक भांडवल चांगलं आहे असं म्हणता येईल. (सकारात्मकता ही अशी प्रत्यक्ष जगताना सर्वाना अनुभवायला मिळाली तर खरी!)

सामाजिक भांडवलाविषयी एक साधा, पण महत्त्वाचा प्रयोग बरंच काही सांगतो. एका विद्यापीठात वेगवेगळ्या २७ देशांतल्या २५०० तरुण विद्यार्थ्यांवर फासा (dice) खेळण्याचा एक प्रयोग केला गेला. विद्यार्थ्यांनी दिलेला फासा खेळून जो आकडा आला आहे तो सांगायचा आणि त्यानुसार त्यांना पैसे मिळणार. म्हणजे १ आकडा आला तर १००० रुपये, ६ आला तर ६०००. असं प्रत्येकानं शंभरेक वेळा फासा टाकायचा. ही झाली पहिली फेरी. आता दुसरी फेरी पहिल्यासारखीच खेळायची; पण छोटा बदल असा केला की फासा टाकल्यावर किती आकडा आहे हे कोणी तपासणार नाही. विद्यार्थ्यांनी स्वत:हून प्रामाणिकपणे तो आकडा सांगायचा आणि पैसे घ्यायचे. म्हणजे दुसऱ्या फेरीत फसवणूक करायला वाव होता. प्रोबॅबिलिटीच्या नियमानुसार, साधारण शंभर वेळा फासा टाकला तर कोणता आकडा किती वेळा येऊ शकतो याचं एक गणित असतं. त्यानुसार पहिल्या फेरीत नोंदवले गेलेले आकडे त्याच्याशी जुळणारे होते. पण दुसऱ्या फेरीतले आकडे मात्र बरेच वरचे होते. म्हणजे फसवणूक करण्याची संधी मिळाली ती त्यांनी बरोबर साधली होती. पण सर्वच विद्यार्थ्यांनी नाही! काहीच विद्यार्थ्यांनी फसवलं होतं. कोण होते ते विद्यार्थी? ज्या विद्यार्थ्यांच्या मूळ देशात अविश्वास, असुरक्षितता, भ्रष्टाचार, ‘राम भरोसे’ सामाजिक व्यवस्था (systems), विषमता यांचं प्रमाण जास्त होतं, त्याच प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये फसवण्याचं प्रमाण होतं. त्याबद्दल त्यांना नंतर विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्ही दोनदा फासा टाकला आणि त्यातला जो वरचा आकडा आला तो सांगितला. पण हे नियमानुसार नाही, हे लक्षात आणून दिल्यावरही त्यांनी त्यांची कृती ‘रॅशनलाइझ’ करायचा प्रयत्न केला. ‘फासा नीट चालतो की नाही हे बघण्यासाठी आम्ही दोनदा ट्रायल घेतली’ किंवा ‘काय फरक पडतो फासा दोनदा टाकला म्हणून? नाही तरी जो आकडा येतो तो रँडमच असतो ना?’ याचा अर्थ ते जे वागले ती फसवणूक नाहीच असं त्यांना वाटत होतं. ज्या समाजात आपण वाढतो तिथल्या संस्कृतीत ‘सहकार्य फसवणूक’ याचे काय संस्कार होतात, ‘सामाजिक भांडवल’ कसं आहे यावर बरंच काही अवलंबून आहे. अमूर्त अशा या सामाजिक भांडवलाचे परिणाम खूपच मूर्त आणि वास्तव आहेत.

मुद्दा १- भौतिक गरजा, दर्जेदार राहणीमान यासाठी फक्त आर्थिक भांडवल लागतं, हा मोठा गैरसमज आहे. उलट, ‘सामाजिक भांडवल’ कळीची भूमिका निभावतं. एकमेकांच्या विश्वास व सहकार्यातून तयार होणारं ‘गुडविल’ असेल तिथे व्यवहार विश्वासावर होऊ शकतात, व्यवसाय वाढीला लागतात. त्यामुळे आर्थिक भांडवल शहाणपणानं गुंतवलं जाऊन सर्व समाजाचं राहणीमान उंचावतं. समाजात वावरताना सुरक्षित वाटतं. वैयक्तिक मन:स्वास्थ्य चांगलं राहतं. त्यामुळे समाज ‘स्वस्थ’ असतात.  याउलट, ‘सामाजिक भांडवल’ खालावलेलं असेल तर बेरोजगारीत भर पडते. उदा. बुडीत र्कज  वाढू लागली की छोटय़ा व्यावसायिकांना कर्ज देताना बँका हात आखडता घेतात; ज्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांनाही भांडवल मिळवताना खूप झगडावं लागतं.(जिथे सामाजिक भांडवल कमी असतं, तिथे कर्ज ‘बुडीत’ काढणं फायद्याचंच ठरतं!) थोडक्यात, आर्थिक प्रगतीसाठी सामाजिक भांडवल चांगलं असणं, ही पूर्वअटच आहे.

मुद्दा २- विश्वास हा सामाजिक भांडवलाचा पाया आहे. सहकार्याला विश्वासाचं कोंदण लागतं. ते आपण धर्म/ जात/ वर्ग या चौकटीत शोधायला जातो. खरं तर स्वत:च्या धर्म/ जातीच्या माणसांनी- अगदी आपल्या खुद्द नातलगांनीही आपल्याला फसवलं नसतं असं नाही, तरीही विश्वास ठेवताना मात्र समोरचा ‘आपल्यातला’ आहे का, हे आपण बघतो. ज्यांच्याशी कोणत्याही नियमांशिवाय आपण सहकार्य करतो ते शक्यतो ‘आपल्या’ टोळीतले असतात. ‘आमचं असं काही नाही..’ असं मनात येत असेल तर आपले किती शेजारी, मित्र-मैत्रिणी- ज्यांच्यात आपण रमतो, ते दुसऱ्या जात/ धर्म/ वर्गातले आहेत याचा जरूर शोध घ्यावा. मुद्दा हा की, सामाजिक भांडवल महत्त्वाचं आहे असं वाटत असेल तर समूहाअंतर्गत सहकार्य करण्याच्या या मर्यादा ओलांडून ‘दुसऱ्या’ समूहांबरोबर पूल कसे बांधायचे असा दूर पल्लय़ाचा विचार करावा लागेल.

मुद्दा ३- ‘जशास तसं सहकार्य’ स्ट्रॅटेजी यशस्वी व्हायची तर खेळाडू ‘तोलामोला’चे हवेत. वाटाघाटी करण्याचं स्वातंत्र्य सर्वाना समान हवं. मात्र, जगण्याच्या खेळात काही मानवी समूह नेहमी हरताना दिसतात. सतत फसवणूक होत असूनही सहकार्य करताना दिसतात. कारण? सांस्कृतिक शिकवण, रूढी, परंपरांमुळे आलेलं ‘सबॉर्डिनेशन’ म्हणजे ‘दुय्यमत्व’! सतत अपमान करणाऱ्या नवऱ्यांना स्त्रिया आयुष्यभर सांभाळतात. (यात प्रेमाचा काही संबंध नसतो!) घरातली दुय्यम दर्जाची कामं त्या विनातक्रार करत राहतात. पुरुषांपेक्षा दुय्यम भूमिका घेतली पाहिजे असं त्यांना ‘आपणहून’च वाटावं असे संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झालेले असतात. निमगोरी माणसं गौरवर्णीय माणसांपेक्षा स्वत:ला हीन समजतात. काही जाती स्वत:ला उच्च जातींपेक्षा कमी प्रतीचं मानतात. आपल्याला मिळणारी वागणूक हा अन्याय नाहीच, इतकी अगतिकता त्यांच्यात भिनलेली असते. शहरं ज्यांच्यामुळे स्वच्छ राहतात त्या सफाई कामगारांचं कामाचं स्वरूप आणि दैन्य पाहिलं तर ते काम सोडून ते दुसरं काही का करत नाहीत, असा प्रश्न कोणालाही पडेल. (हे सफाई कामगार काही विशिष्ट जातींचे असतात.) याउलट, त्यांना या कामासाठी आरक्षण पाहिजे आहे! आपल्या मुलांनी इतकं किळसवाणं काम करत राहावं असं त्यांना का वाटत असेल? याचं उत्तर त्यांच्या अगतिकतेत आहे. जे मिळालं आहे तेही मिळालं नाही तर? या अटीतटीच्या अस्तित्वाच्या लढाईतून सुटका करून घेता येईल असा प्रगतीचा मार्ग समाजरचना त्यांना मिळू देत नाही. शिक्षण परवडत नाही. शिकली तरी बाहेर उच्चवर्णीयांशी स्पर्धेत ती टिकू शकत नाहीत. त्यामुळे या मुलांच्या स्वप्नाचं क्षितीजही आक्रसलेलं असतं.

ज्या प्रदेशात विषमता खूप आहे तिथे सामाजिक भांडवल खालावलेलं असतंच, पण विश्वासाअभावी आर्थिक प्रगतीही खुंटलेली राहते. नैसर्गिक साधनसंपत्ती अमाप असूनही आपला देश गरीब का आहे याची काही उत्तरं इथे दडलेली आहे. याउलट, सामाजिक भांडवल उच्च दर्जाचं असलेले देश पाहा- स्कॅन्डेनेव्हियन देश, कॅनडा, न्यूझीलंड, जर्मनी, बरेच युरोपीय देश. ‘आपण- ते’च्या दऱ्या बुजवण्यावर त्यांचा भर असतो. पायाभूत सुविधा वाढवण्यावर त्यांचा भर असतो. सार्वजनिक शिक्षणासाठी सर्वाधिक खर्च करणारे हे देश आहेत. यांच्यात ‘प्रातिनिधिक, प्रमाणशीर’ ही निवडणूक पद्धत वापरतात. म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना त्यांच्या मतांच्या प्रमाणात सत्तेत सहभाग मिळतो. त्यामुळे दोन गटांमध्ये भांडणं लावून नेते मंडळी फायदा मिळवू शकत नाहीत. (भारतात ‘फर्स्ट पास्ट दि पोस्ट’ ही पद्धत आहे; जी खूप सदोष आहे.) इथल्या जनतेचा देशातील व्यवस्थांवर विश्वास असतो. इथले पंतप्रधानही कोविडकाळात नियम मोडला म्हणून दंड भरतात. लस आणि औषधे यांत पैसे गुंतवून त्यांची सरकारे जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देतात. तिथे कोविड आपत्तीकाळात लोकांना औषधे आणि ऑक्सिजनसाठी सैरावैरा पळायला लागले नाही. याचं कारण तिथल्या लोकांचा त्यांच्या ‘सिस्टिम्स’वरचा विश्वास सार्थ ठरला.

तर मुद्दा हा की, माणसाच्या वृत्ती सामाजिक भांडवल घडवतात; आणि सामाजिक भांडवल मानवी वर्तनावर परिणाम करतं असा हा फेरा आहे.

सहज माहिती असावं म्हणून.. सामाजिक भांडवल मोजण्यासाठी अनेक पद्धती विकसित होत आहेत. तरी जे काही प्रयत्न झाले त्यांत आपल्या भारताचं रँकिंग खूप खाली आहे. १२ टन धान्य भारताला कोविडकाळात मदत दिली म्हणून ज्या केनिया देशाची आपण थट्टा केली, त्याचंही स्थान भारताच्या वर आहे! काही ताजे अभ्यास असंही सांगताहेत की, सामाजिक भांडवल आणि कोविडने झालेले मृत्यू यांचा थेटच संबंध आहे! बघा बुवा!!