बुद्धभूषण साळवे
पुस्तक प्रकाशनाची संस्था उभी करताना साधारणत: भांडवल, मुद्रणालय, कार्यालय आणि वितरण व्यवस्था या व्यावसायिक बाबी विचारात घ्याव्या लागतात. ‘ठसा प्रकाशन गृहा’चा आरंभ अट्टल वाचनापासून सुरू झाला. इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका तरुणाने गेल्या सहा वर्षांत नाशिक आणि पुणे या दोन शहरांत आपला ग्रंथनिर्मितीचा व्यवसाय साकारला. हिंदी-इंग्रजीतही पुस्तके काढली. आर्थिक स्थैर्याबरोबर तो वैचारिक आनंदाचा प्रवासदेखील बनला. तो कसा?

घोटी येथील जनता विद्यालयात २००५ ते २०१० या काळात मी शिक्षण घेत होतो. तेथील छोटेखानी ग्रंथालयातील विविध पुस्तकांशी माझा परिचय झाला. सुरुवातीला गोष्टीरूप पुस्तकं हातात आली. पुढे कुतूहलातून वाचन वाढत गेलं. समजेच्या वयात हे वाचन पुस्तकांची भूक आणखी वाढविणारं ठरलं.

मी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना संत कबीर, बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर हे महापुरुष वाचनातून थोडेफार समजून घेतले. शिक्षकांसह थोरामोठ्यांनी सुचविलेली प्र. के. अत्रे, पुलं आणि अण्णा भाऊ साठे यांचीही पुस्तके वाचनात आली. त्यानंतर नारायण सुर्वे यांचे ‘माझे विद्यापीठ’, नामदेव ढसाळ यांचा ‘गोलपिठा’, आणि अरुण काळे यांचा ‘नंतर आलेले लोक’ या कवितासंग्रहातील कवितांनी वास्तववादी लेखन समजून घेण्याची दृष्टी मिळाली. महाविद्यालयीन जीवनात मेरी वॉल्स्टन क्राफ्ट, अँजेला डेव्हिस, सिमोन द बोव्हा, फ्रांत्झ फॅनॉन यांच्या विचारांचा परिचय झाला. स्त्री, जात, वर्ग, वंश, सत्ता, विषमता, स्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा यांसारख्या प्रश्नांकडे चिकित्सक नजरेनं पाहण्याचं शिक्षण या वाचनातून घडू लागलं.

नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीमध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना मनातील अस्वस्थता कवितेतून व्यक्त होऊ लागली. परिणामी २०२० मध्ये ‘बाजार’ हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. समाजातील काठावरच्या माणसांकडे केवळ ‘व्यवस्थेचे बळी’ म्हणून न पाहता त्यांचे दु:ख, संघर्ष आणि त्यांच्यातील माणूसपण समजून घेतलं पाहिजे ही समजही मला वाचनातूनच आली. त्यामुळे माझ्यासाठी कविता ही केवळ भावनांना शब्द देणं नव्हतं, तर माणूस आणि समाज व्यवस्था समजून घेण्याचा प्रयत्न होता. कवितेच्या ओढीतूनच पुढे महाराष्ट्रातील गाजलेल्या कवींचा ‘भीमक्रांतीचे पडघम’ हा प्रातिनिधिक कवितासंग्रह संपादन करून प्रकाशित केला. लेखक लिहितो; पण त्या लेखनाला पुस्तकाचं रूप देण्यासाठी संपादन, मांडणी, मुखपृष्ठनिर्मिती, मुद्रण आणि वितरण अशा अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. प्रत्येक टप्प्यामागे अनेक व्यक्तींचे कौशल्य, श्रम आणि सर्जनशीलता कार्यरत असते. पुस्तक म्हणजे केवळ लेखकाच्या लेखनाचा परिणाम नसून, अनेक हातांनी आणि प्रक्रियांनी साकारलेली निर्मिती आहे, याची मला प्रकाशनात उतरल्यानंतर जाणीव झाली. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीची पारंपरिक वाट टाळून मी प्रकाशनाच्या व्यवसायात येण्याचं ठरविलं.

लेखनाशी ओळख असली तरी संपादन आणि पुस्तक निर्मिती या प्रक्रियेचा प्रत्यक्ष परिचय प्राध्यापक गंगाधर अहिरे यांच्या सहवासातून झाला. त्यांच्या त्रैमासिकाच्या छपाईिनमित्त त्यांच्याबरोबर नाशिकच्या प्रेसमध्ये माझं जाणं होत असे. तिथे पुस्तकनिर्मितीची प्रक्रिया पाहताना डीटीपी, लेआऊट, मुखपृष्ठरचना, छपाईपूर्वीची तयारी या गोष्टी पाहता आणि शिकता आल्या. पुस्तक स्वत: करून पाहण्याची ओढ त्या अनुभवातूनच उत्पन्न झाली. चित्रकला आणि सुलेखनाची आवड पुस्तकनिर्मितीच्या कामाशी जोडली गेली. याच काळात अहिरे सरांच्या माध्यमातून रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांची ओळख झाली. त्यांच्याकडून चित्र आणि लेआउटचे अनेक बारकावे शिकून घेतले. पुस्तकनिर्मिती अधिक दर्जेदार करण्यासाठी नावाजलेल्या प्रकाशनांची पुस्तके अभ्यासत असे. कागद, मांडणी, आकार यांचा तपशील नोंदवून घेई. अगदी फुटपट्टीनं मोजमाप घेत स्वत: लेआउट तयार करत असे. दरम्यानच्या काळात लोकवादी चळवळीतील काही साहित्यिकांशीही जवळून परिचय झाला. त्यांचं मार्गदर्शनही लाभलं. साहित्य हे केवळ मनोरंजन किंवा अभिरुचीचा विषय नसून, समाजातील अनुभव, प्रश्न आणि विचारांना अभिव्यक्त करणारं ते एक सशक्त माध्यम आहे, हे पक्कं व्हायला लागलं. मग ज्यांच्याकडे सांगण्यासारखे भरपूर चांगले आहे; परंतु प्रस्थापित प्रकाशन व्यवस्थेपर्यंत ते पोहचू शकत नाहीत त्यांच्यासाठी ‘ठसा’ प्रकाशन उभारण्याची कल्पना पुढे आली.

संत एकनाथांच्या ‘एकनाथी भागवत’चे आणि संत तुकारामांच्या अभंगांचे वाचन करताना त्यात ‘ठसा’ हा शब्द वारंवार वेगवेगळ्या अर्थाने आढळला. त्या शब्दामध्ये दीर्घकाळ परिणाम घडवून आणणारा प्रभाव दिसला. नवोदित साहित्यानं वाचकाच्या मनावर, विचारांवर आणि पर्यायाने समाजावर ठसा उमटवावा, या जाणिवेतूनच प्रकाशनाचं ‘ठसा’ हे नाव ठेवण्याचं निश्चित केलं.

सुरुवातीला या व्यवसायातील अनुभवी आणि नवख्या असलेल्या अनेकांशी चर्चा केली. २०२० मध्ये नाशिक येथे प्रकाशन संस्थेची सुरुवात केली. २०२४ मध्ये ‘ठसा’ प्रकाशनाचं दुसरं युनिट प्रकाशनात अग्रेसर असलेल्या पुण्यात उभारलं.

महानगरी प्रकाशन व्यवस्थांच्या केंद्रांपासून दूर आणि मोठ्या भांडवलाच्या पाठबळाशिवाय, विवेकवादी चळवळीच्या वातावरणातून प्रकाशन सुरू केले. त्यामुळे तिच्या कामाचे केंद्र बाजारपेठेपेक्षा लेखक आणि त्याचे लेखन राहिलं. पारंपरिक प्रकाशन व्यवस्था प्रामुख्याने आपल्या ठरावीक लेखक आणि चोखंदळ वाचकवर्गाभोवती केंद्रित आहे. समाजमनावर परिणाम घडवून आणणारे, प्रागतिक आणि परिवर्तनशील विचार अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी नव्या लिहित्या हातांना प्रोत्साहन देणं मला स्वत:ला मी ज्या प्रकारचं वाचन करीत होतो, त्यातून गरजेचं वाटू लागलं. माझं स्वत:चं पुस्तक प्रकाशित करताना झालेली फरपट इतर नव्या लेखकांची होऊ नये, हीदेखील भूमिका यामध्ये होती. मुंबई-पुण्यात आपल्या लेखनासाठी प्रकाशक शोधणार्‍या राज्यातील विविध भागांतील लेखकांना योग्य मार्गदर्शन मिळावं आणि आर्थिक अडचणींमुळे चांगलं लेखन पुस्तकाच्या रूपात येण्यापासून थांबू नये हे मी सुरुवातीपासून कटाक्षानं पाळलं. लेखकाचं साहित्य सन्मानानं वाचकांपर्यंत पोहोचावं यासाठी पाठपुरावा केला.

स्वत: चित्रकार असल्यानं सुरुवातीला बर्‍याच पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली. मात्र प्रकाशक आणि चित्रकार म्हणून स्वत:ची कलाभाषा प्रत्येक पुस्तकावर लादण्याऐवजी, पुस्तकाच्या आशयाला अनुरूप स्वतंत्र दृश्यभाषा असावी, या भूमिकेतून मिलिंद कडणे, दिनकर मनवर, सरदार जाधव यांच्याकडून चित्रे, तर श्रीधर अंभोरे आणि जितेंद्र साळुंखे यांच्याकडून ठराविक पुस्तकांसाठी रेखाचित्रे करून घेतली.

गल्लीबोळात सध्या वाढत्या लेखक-प्रकाशकसंस्था आणि लेखकांची आर्थिक फसवणूक या सगळ्या गदारोळात पारदर्शक व्यवहाराद्वारे केवळ लिखाणाच्या गुणवत्तेवर पुस्तकांची निवड होत गेली. महापुरूषांच्या सहचारिणीचं चरित्र महापुरूषांच्या कर्तृत्वाच्या ओझ्याखाली झाकोळलेलं असतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई यादेखील त्यास अपवाद नाहीत. रमाईंची आजवर अनेक चरित्रं लिहिली गेलीत. अशोक केरू गोरे यांनी लिहिलेलं ‘रमाई आंबेडकर’ ठसातर्फे आलं. सर्व वयोगटातील वाचकांसाठी ‘रमाई’ समजून घेण्यासाठी असं त्याचं स्वरूप. पेशाने शिक्षक असलेल्या गोरे यांचं हे पहिलं पुस्तक. ओघवती, अलंकृत भाषा आणि तत्त्वज्ञानाची बैठक, संशोधन यांमुळे पुस्तकरूपात आणणं गरजेचं वाटलं.
विवेकानंदांवर लिहिलेल्या दहा पुस्तकांमधील माहिती आणि त्यांच्या नावावर छापलेले ता्त्विवक उपदेश हे संशयास्पद असल्याचे स-संदर्भ दाखवून देणारा ‘स्वामी विवेकानंद यांचे चिंतन : वास्तव आणि विपर्यास’ हा ग्रंथ त्यातील तपशीलांमुळे निवडला. लेखक डी. आर. पवार यांचे हे वाङ्मयीन शोधकार्य जिज्ञासूंसाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकेल.

‘लोकसंवादक सेंट कबीर : द व्हॉइस ऑफ पीपल’ हे संशोधनात्मक इंग्रजी पुस्तक ‘ठसा’ने मुद्दाम काढले. संत कबीरांच्या विचारांचा आणि कार्याचा अधिक व्यापक स्तरावर प्रचार-प्रसार व्हावा, तसंच त्यांचे विचार विद्यापीठीय स्तरावरील विद्यार्थी आणि अभ्यासकांपर्यंत पोहोचावेत असं वाटायला लागलं. विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना कबीरांच्या विचारांकडे नेण्याची आज खरी गरज आहे. त्यातून हा खटाटोप. याशिवाय कथा-कादंबर्‍यांची तसंच कविता संग्रहांची पुस्तके ठसातर्फे येत राहिली. कवितांची पुस्तकं खपत नाहीत, या समजाला खोटं ठरवणारी बरीच पुस्तकं ‘ठसा’तर्फे आलीत.

मध्यमवर्गीय, निमशहरी, झोपडपट्टीतील निराधार माणसं, शोषित स्त्रिया, उज्ज्वल भविष्याची स्वप्नं रंगवणारे अयशस्वी तरूण, आयुष्याच्या संध्याकाळी हताश झालेले निराधार वृद्ध अशा माणसांच्या समस्यांचा आढावा घेतानाच स्त्री-पुरूषांचे उच्छृंखल वर्तन, हव्यास, ईषा, अहंकार या समाजातील वाढलेल्या अपप्रवृत्तीवर भाष्य करणारे तसेच मानवी जीवनव्यवहाराचे सत्यदर्शन घडविणारे विषय ‘ठसा’च्या लेखकांनी हाताळले.

हिंदी आणि इंग्रजी अनुवादित साहित्यही पुस्तकरूपात आले. ‘युद्धपंछी’ (हिंदी-डॉ. युवराज सोनटक्के) आणि वर उल्लेख झालेले कबीरावरील इंग्रजी पुस्तक. दोन्हींची बर्‍यापैकी विक्री ऑनलाइन-ऑफलाइन स्वरूपात सुरू आहे.

आजवर ५० पेक्षा अधिक पुस्तके काढणार्‍या ‘ठसा’चा प्रवास केवळ आकड्यांचा नाही. कविता, कथा, समीक्षा, वैचारिक लेखन, चरित्र, नाटक, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांना सजगपणे प्रकाशित करणारी संस्था अशी ओळख गेल्या सहा वर्षांत आम्ही कमावली.

सध्या ‘प्रिंट ऑन डिमांड’ तत्त्वावर दिवसागणिक हजारो पुस्तके प्रकाशित होतायत. परंतु ती वाचकांपर्यंत पोहचविणं मोठं आव्हान आहे. लिहिणारे हात वाढले आहेत; मात्र दर्दी आणि निष्ठावंत वाचकांची संख्या तुलनेने मर्यादित होत चाललीय. काही वितरकांकडे पुस्तकं देऊनही अपेक्षित वितरण होत नाही. पैशांसाठी पाठपुरावा करणं आणि विक्रेत्यांकडून होणारी टाळाटाळ यामुळे छोट्या प्रकाशन संस्थांना आर्थिक तोटाही सहन करावा लागतो. करोना सर्वांसाठी अडचणीचा असला, तरी त्यातून ऑनलाइन पुस्तक यंत्रणेचा व्यवहार वाढला. लहान आकाराच्या प्रकाशनसंस्थांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शहरांतील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय दुकानांचा एकमेव पर्याय पूर्वी होता. तो नंतर राहिला नाही. नैतिकतेशी तडजोड न करता, काही वेळा आर्थिक नुकसान सहन करून पुस्तकं प्रकाशित केली. हा प्रचंड नफ्यात चालणारा उद्योग नाही, तरी तोटादेखील तितका म्हणावा असा नाही. चार वर्षांत नाशिकमध्ये जम बसविल्यानंतर पुण्यात स्वतंत्र युनिट असावं इतपत ग्रंथांचा व्याप वाढला. केवळ विस्ताराचा किंवा हौसेचा तो विषय नव्हता. पुणे हे महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिक चळवळींचं महत्त्वाचं केंद्र असल्यामुळे आणि विक्रीच्या दृष्टीने या शहरात आपली पुस्तकं दाखल करावी वाटली. मर्यादित आर्थिक साधनांमध्ये प्रकाशनाचं काम इथे सुरू केलं. इथल्या प्रकाशकांपासून ते प्रेसपर्यंत कामाच्या अनेक बाबींचे बारकावे अभ्यासता आले.

पुस्तक केवळ वाचनीय नसावं, तर ते पाहताना आणि हातात घेतानाही एक स्वतंत्र कलानुभव देणारं असावं, या भूमिकेतून पुस्तकाच्या डीटीपी, अक्षरजुळवणी आणि मांडणीकडे स्वत: लक्ष घालतो. त्यामुळे मांडणी एकसाची न राहता प्रत्येक पुस्तकाच्या आशय आणि विषयानुसार स्वतंत्र स्वरूपाची होते.

माध्यमिक शाळेतील ग्रंथालयात सुरू झालेला माझा वाचनाचा प्रवास पुढे लेखन करण्यापर्यंत पोहचला. लेखनातूनच पुस्तकनिर्मितीची ओढ निर्माण झाली आणि त्यातून प्रकाशक म्हणून मी गेली सहा वर्षे काम करतोय. महानगरी प्रकाशनविश्वाच्या बाहेर उभं राहिल्यानंतर टिकून राहण्यासाठी संघर्ष बराच करावा लागतो. पण चांगली पुस्तकं आणण्याचा आनंददेखील खूप असतो. गेल्या काही वर्षांत आर्थिक स्थैर्यासह तोदेखील मिळतोय. आज ओळख मर्यादित असली तरी पुढल्या काळात अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचत त्यांच्या मनावर ‘ठसा’ उमटवणारी पुस्तकं देण्यासाठी लढाई सुरू राहील.

budhabhushansalve94@gmail.com