scorecardresearch

अभिजात ; शिल्पात न मावणारा आगुस्त रोडाँ आणि रिल्के

डांटेच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’वर आधारित एक ‘गेट्स ऑफ हेल’ नामक शिल्पांची मालिकाच रोडाँनी केली होती.

अरुंधती देवस्थळे arundhati.deosthale@gmail.com

पारंपरिक विषयांच्या चक्रातून शिल्पकलेला मुक्त करून धाडसीपणे आधुनिकतेकडे नेणारे फ्रेंच शिल्पकार आगुस्त रोडाँ (१८४०-१९१७) यांचं कुठलं ना कुठलं शिल्प किंवा त्याच्या प्रतिकृती ज्यात नाहीत, असं एकही जाणकार कलासंग्रहालय नसावं. याला कलेच्या महत्तेची कारणं बरीच. एक सबळ कारण म्हणजे ‘दि बरघर्स ऑफ कॅले’(१८८९)! हे रोडाँचं ब्रॉन्झमधलं महाकाय शिल्प अनेक वर्ष खपून साकार केलेलं. चौदाव्या शतकात ब्रिटिश आक्रमणानंतर चढाईअखेरीस फ्रान्सचा पाडाव झाला. जेत्यांनी युद्धबंदीसाठी कॅलेचे सहा सधन, सुशिक्षित नागरिक शहराच्या किल्ल्यांसकट त्यांच्या हवाली करण्याची मागणी केली. ती पूर्ण करण्यासाठी मातृभूमी आणि देशबांधवांच्या सुरक्षेसाठी हे सहा जण आपल्या जीवाची आहुती द्यायला पुढे आल्याचं या शिल्पात दाखवलंय. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची आठवण देणारं हे शिल्प. ऐतिहासिक घटनेवर आधारित या शिल्पाने शिल्पकलेला वास्तववादी वळण दिलं.. आणि एका उदात्त कृत्याला अजरामर प्रतीकही! इथून मग घटनांच्या स्मारकांची एक परंपरा सुरू झाली. रोडाँनी स्वत: याच्या प्रतिकृती बनवून जगातल्या वेगवेगळ्या संग्रहालयांना दिल्या. पण हे घडलं त्यांच्या आयुष्याच्या मध्यावर! आता कॅलेच्या टाऊन हॉलसमोर खुल्या आकाशाखाली उभ्या असलेल्या या शिल्पाला फ्रान्समध्ये राष्ट्रगीताएवढाच मान आहे म्हणतात.             

गरिबीत जन्मलेल्या रोडाँना बरोक शैलीतल्या सौंदर्याच्या भव्यतेनं प्रभावित केलं होतं; पण तिला आधुनिक रूप देण्याची आस त्यांना लागली होती. त्यांनी विख्यात आर्ट स्कूलमध्ये प्रवेश घेतला, पण परंपरागत शिक्षणात त्यांचं मन लागेना. शेवटच्या वर्षी सगळं सोडून ते बाहेर पडले.. स्वत:ला शोधण्यासाठी. सुरुवातीला खूप अपयश झेलावं लागलं. पण त्यांना पदवीपेक्षा बायबल आणि पुराणकथांमध्ये अडकून पडलेल्या प्रस्थापित कलेला बाहेर काढायचा प्रयत्न करणं हे मोकळा श्वास घेण्याइतकंच आवश्यक वाटत होतं. कुठलीही चाकोरी भेदणाऱ्याला कस पाहणाऱ्या संघर्षांनंतरच यश मिळतं हा अनेकांचा अनुभव रोडाँच्याही नशिबी लिहिलेला असावा. मायकेलएंजेलो आणि बर्निनीच्या अभ्यासासाठी प्रतिकूलतेशी झगडत रोडॉं दीर्घ मुक्कामासाठी इटलीला गेले.

‘दि एज ऑफ ब्रॉन्झ’ (१८७७) हा त्यांनी घडवलेला सहा फुटी नग्न पुरुषाचा पुतळा. मायकेलएन्जेलो आणि ग्रीक विवस्त्र मानवी देहचित्रणाचा मिश्र प्रभाव दर्शवणारा. यासाठी मॉडेल न घेता कल्पनाशक्तीवर आधारित काढल्या जाणाऱ्या विवस्त्र मनुष्यकृतींच्या परंपरेला हादरा दिल्यासारखं झालं. त्यांनी मॉडेल म्हणून कोणाला वापरलं होतं यावर खूप चर्चा झाल्याने लोक तो पाहायला मुद्दाम येऊ लागले. बदनाम हुए, पर नाम तो हुआ.. या वादळाने रोडाँना प्रकाशझोतात खेचून घेतलं.

डांटेच्या ‘डिव्हाईन कॉमेडी’वर आधारित एक ‘गेट्स ऑफ हेल’ नामक शिल्पांची मालिकाच रोडाँनी केली होती. त्यापैकी कुठल्याही दिशेतून पाहिली तरी सुंदरच दिसणारी अनेक शिल्पं नामांकित ठरली. त्यापैकी ‘दि किस’ने मात्र नंतर प्रथम अमेरिकेत सार्वजनिक झाल्यापासूनच खळबळ माजविली. या संगमरवरी शिल्पात इटालियन पुराणकथेतलं एक प्रेमी युगुल चुंबन घेताना दाखवलं आहे. चेहरे कौशल्याने लपवलेले आहेत; पण त्याने फरक पडत नाही. ही परिणामाची जादू साधण्यासाठी नग्न मॉडेलना रोडाँच्या मूडनुसार कातळावर बारा-चौदा तास अनेक कोन बदलून बसावं लागे. एवढंच नव्हे तर ते शिल्प नंतर वेगवेगळ्या माध्यमांत करायचं असल्याने आवश्यकतेनुसार प्लास्टर बनवणारे, धातू भट्टीत वितळवून घडवणारे आणि संगमरवरात कौशल्याने आकाराचं कोरीवकाम करणारे असे सगळेच कुशल साथीदार त्यांना हाताशी लागत. स्वहस्ते रोडाँ फक्त शिल्पाचे क्लेचे (चिकणमाती) साचे बनवण्याचं काम करत. त्याची प्रतिकृती धातूत, दगडात किंवा इतरही कुठल्याही माध्यमात करायला कुशल, प्रशिक्षित माणसे असत. म्हणूनच हुशारीनं कामं भराभर होत आणि पैशाचा ओघ सुरू राही. कलेइतकीच त्यांची तंत्रावर पकड होती. प्रत्येक बारकावा आपल्याला हवा तसा घडवून घेता येत होता. वेळापत्रकाचे नाव काढण्याची कोणाची हिंमत नसे. रोडाँच्या प्रत्येक शिल्पात मनुष्यदेह खडकावर बसून/ उभा राहून वेडेवाकडे वळसे घेणारा असे. त्यामुळे मॉडेल्सना देहाला वळणं देऊन तासन् तास बसावं लागे. या झपाटलेल्या प्रयत्नांत माणसं रोडॉंच्या लेखी देहधर्म असलेली माणसं नसतच. ती त्यांच्या गतिमान रेखाटनाचा फक्त विषय असत. पुरुषाचा एक हात प्रेमिकेला जवळ घेणारा, पण दुसऱ्या हातात पुस्तक आहे- तात्पुरतं बाजूला केल्यासारखं- हे लक्षात घेण्याजोगंच. सेन्शुअलिटीचं चित्रण करणारं हे शिल्प अल्पकाळ व्यभिचारी अश्लिलतेचं वादळ उठवणारं ठरलं. पण लवकरच ते जगातील एक श्रेष्ठ शिल्प म्हणूनही गणलं जाऊ लागलं. रोडाँनीच याच्या टेराकोटा, प्लास्टर आणि ब्रॉन्झमध्ये प्रतिकृती बनवल्या  होत्या.   

पुढे त्यांनी लेखक व्हिक्टर ह्यूगो आणि बालझॅक यांचे ब्राँझमध्ये मोठे पुतळे केले. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकृतींमध्ये गणना होणारं ‘दि थिंकर’(१९०२) हे रोडाँचं ब्रॉन्झमधलं सहाफुटी शिल्प. एक पिळदार शरीराचा माणूस विचारात गढलेला.. कोपर मांडीत खुपसून हाताच्या मागल्या बाजूला हनुवटी टेकून.. अधोमुखी हरवलेली नजर.. त्याच्या अशा बसण्यातून मनातली खळबळ जाणवणारी. या कलाकृतीबद्दल रोडाँ म्हणतात, ‘‘तो फक्त डोक्याने विचार करत नाहीये, त्याच्या आक्रसलेल्या भुवया, किंचित फुगलेल्या नाकपुडय़ा, घट्ट  बंद ओठ, हात-पाय आणि  पाठीचे ताठरलेले स्नायू, वळलेली मूठ आणि कातळावर रोवलेली पावलं.. सगळेच..’’ हे शिल्प म्हणजे ‘दि डिव्हाइन कॉमेडी’च्या रचनेत हरवून गेलेला तत्त्वज्ञ कवी डांटे असल्याचं म्हटलं जातं. समोर स्वर्ग-नरक, पाप-पुण्य आणि मानवजात या सर्वाचा कल्लोळ आणि तो सर्व मानसिक शक्ती एकवटून हा गुंता सोडवायचा प्रयत्न करत असावा. ही अवस्था खरं तर सगळ्याच संवेदनशील रचनाकारांची. आणि म्हणूनच तिच्या अनेक प्रतिकृती जगभरात पाहायला मिळतात. मूळ शिल्प पॅरिसमधील रोडाँ संग्रहालयाच्या बागेत मांडलेलं आहे. रोडॉंनी स्वत: बनवून दिलेल्या प्रतिकृतींपैकी एक न्यू यॉर्कच्या ‘मेट’मध्येही आहे. आपल्या देशातही सँडस्टोन आणि ब्रॉन्झ या दोन्हीत ते उपलब्ध आहे- संग्रहणीय प्रतीत. रोडाँना माणसाचं एकलेपण आणि उदासीची कविता लिहिणारा अंतर्मुख कवी रॉबर्ट ब्लेक खूप आवडायचा. या शिल्पातील व्यक्तीचं त्या कवितेशी नातं असेल का? एकलेपण तर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रोडाँच्याही वाटय़ाला आलेलं. हे स्वत:चंही लाडकं शिल्प असावं, की ही त्यांना स्वत:ची प्रतिमा वाटत असावी? म्यूदोंच्या घराजवळ त्यांच्या कबरीशेजारीही याची प्रतिकृती ठेवली गेली आहे.

पॅरिसमध्ये काम करायला हॉटेल बायरोंमध्ये रोडाँनी घर आणि स्टुडिओ अशी प्रशस्त बाग असलेली जागा घेतली होती. अखेरच्या काही वर्षांत ते इथेच जास्त राहत असत. एक सुंदरसं घर आणि मुख्यत: प्रतिकृती बनवण्यासाठी कार्यशाळा म्यूदोंतही होती. आयुष्याच्या शेवटच्या दशकांत कलाइतिहासातला एक टप्पा म्हणून रोडाँचं महत्त्व स्थापित झालं होतं. फ्रेंच सरकारने या घराच्या डागडुजी आणि सांभाळासाठी दांडग्या देणग्या दिल्या. अर्थात त्यांच्या माघारी इथे त्यांचं संग्रहालय बनवलं जाणार आणि त्यांच्या सर्व कलाकृती आणि कलेशी संबंधित सर्व काही- विशेषत: लेखन, पत्रव्यवहार, अधुरी रेखाटने संग्रहालयाकडे असणार, ही अट रोडॉंना मान्य होती.

रोडाँना आयुष्यात भरभरून यश मिळालं खरं; पण दुर्दैवही अनेक वळणांवर भेटत राहिलं. अनेक वर्ष वयोवृद्ध आईवडिलांची आजारपणं आणि शुश्रुषा फार कष्टप्रद ठरणारी होती. आयुष्याअखेरीस त्यांनी अनेक वर्ष प्रेयसी असलेल्या मेरी रोझशी लग्न केलं. पण लग्नानंतर काही महिन्यांतच ते दोघेही वारले. आधी त्यांच्याकडेच शिकत काम करणाऱ्या शिल्पकार कामिल क्लॉडेलशी त्यांचे गहिरे संबंध होते. पण कामिलने केलेल्या एका शिल्पामधून स्वत:चं दु:ख मांडल्याने, ती आपली बदनामी मानून ते इतके संतापले की तिला काम मिळू नये असे प्रयत्न त्यांनी सुरू केले. या सर्वाची परिणती कामिलला मनोरुग्ण बनवणारी ठरली. इतकी, की तिने स्वत:ची अनेक शिल्पं तोडून, फोडून टाकली. अर्ध आयुष्य ती मनोरुग्णालयात राहिली. तिथेच संपलीही. पण इच्छापत्रात आपल्या संग्रहालयात तिच्या शिल्पांचं  एक दालन असावं, हे त्यांनी लिहून ठेवलं होतं. पण तसं घडलं नाही. आणखी एक मजेदार गोष्ट : चेक कवी, लेखक रिल्के याने जर्मन भाषेत रोडाँवर एक मोनोग्राफ लिहिला आहे. नंतर त्याचा चेकमध्ये आणि आता इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झालाय. त्यासंदर्भात विशीतला रिल्के रोडाँना भेटायला म्यूदोंला गेला आणि दोघांच्या तारा अशा काही जुळल्या की त्यांनी त्याला आपला सचिव म्हणून नोकरी दिली(१९०२-०८). स्वत:चा  शोध घेणाऱ्या रिल्केला हे सान्निध्य पुस्तकासाठी उपयुक्त वाटलं. कलेकडे बघण्याची एक दृष्टी मिळाली. त्यामुळे हा मोनोग्राफ खराखुरा उतरला. त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल रिल्के म्हणतो, ‘‘दारातून अंधाऱ्या, धूळभरल्या खोलीत क्लेचे डबे आणि एक चबुतरा दिसत होता. त्याच्यासमोर बारीक कापलेल्या केसांचा राखाडी दाढीवाला हाताला लागलेली माती खरवडत उभा  होता. कपडय़ांवर ठिकठिकाणी क्लेचे डाग, तुकडे चिकटलेले. समोरच्या निर्वस्त्र मॉडेलकडे त्याचं लक्षच नव्हतं. तो उंचापुरा नव्हता, पण त्याच्या व्यक्तिमत्त्वात काहीतरी राजसी होतं..’’ हा जरा महागडाच मोनोग्राफ म्हणजेही रोडाँचं एक शब्दशिल्पच म्हणावं इतका सुंदर आहे. एका ज्येष्ठ कलाकाराला दुसरा नवतरुण कलाकार- दोघांची माध्यमे व सांस्कृतिक पार्श्वभूमी भिन्न असूनही किती छान समजू शकतो याचं हे लोभस उदाहरण!

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The burghers of calais french sculptor auguste rodin poet rainer maria rilke zws

ताज्या बातम्या