बुद्धिबळाच्या पटावरील शीतयुद्ध

५० वर्षांपूर्वी- १९७२ मध्ये बुद्धिबळ जगज्जेता होता सोव्हिएत बोरिस स्पास्की.

बुद्धिबळाच्या पटावरील शीतयुद्ध

सिद्धार्थ खांडेकर
५० वर्षांपूर्वी- १९७२ मध्ये बुद्धिबळ जगज्जेता होता सोव्हिएत बोरिस स्पास्की. त्याला कडवे आव्हान दिले होते अमेरिकी बॉबी फिशरने. आणि फिशरने ही लढत जिंकली होती. ही लढत मुळात खेळवली जाणे आणि सोव्हिएत सीमेबाहेर ती प्रत्यक्षात होणे या दोन्ही लढाया फिशर आणि त्यावेळचे पाश्चिमात्य बुद्धिबळप्रेमी लढले. त्याची विलक्षण कहाणी..

त्या लढतीचे नामकरण ‘मॅच ऑफ द सेंच्युरी’ असे करण्यात आले. परंतु रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर विरुद्ध बोरिस वासिलियेविच स्पास्की यांच्यात बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठी पन्नास वर्षांपूर्वी झालेले द्वंद्व खरे तर ‘मॅच फॉर दि इटर्निटी’ म्हणण्यासारखे कालातीत आणि अद्भुत होते. अमेरिका आणि सोव्हिएत महासंघ यांच्यात त्याकाळी दोन प्रमुख परिप्रेक्ष्यांमध्ये कडवी स्पर्धा सुरू होती- क्षेपणास्त्र प्रसार आणि अंतराळ संशोधन. १९६९ मध्ये चंद्रावर मानवाला पाठवून अमेरिकेने अंतराळ स्पर्धेत आघाडी घेतली असे म्हणावे, तर चंद्रावर मानव पाठवण्यास आम्ही कधी प्राधान्यच दिले नाही, ही सोव्हिएत भूमिका. अंतराळात पहिला मानव (पुरुष व महिला) आणि पहिला पशू पाठवून सोव्हिएत मंडळींनीही या क्षेत्रातली तयारी दाखवून दिली होतीच. क्षेपणास्त्रांच्या स्पर्धेत परिस्थिती सातत्याने बदलत होती. नित्यनेमाने स्वत:च्या भात्यात दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा रतीब घालणे दोन्ही देशांनी सुरू ठेवले होते. या पार्श्वभूमीवर १९७२ मध्ये जगज्जेतेपद लढतीच्या निमित्ताने बुद्धिबळपटावर शीतयुद्धाचा आणखी एक अंक सादर होणार होता. एकच फरक होता : क्षेपणास्त्र आणि अंतराळ स्पर्धेत मामला काही प्रमाणात बरोबरीचा होता. तशात क्युबन क्षेपणास्त्र पेच (१९६० च्या सुरुवातीस) आणि व्हिएतनाम संघर्षांत (१९७२ पर्यंत आणि पुढेही) अमेरिकेला तिच्या घोषित सुसज्जतेचा आणि प्रगतीचा विचार करता नामुष्कीच पत्करावी लागली अशी धारणा असलेल्या सोव्हिएत नेतृत्व आणि समर्थकांसाठी या दोन्ही घटना वा घडामोडी अघोषित विजयापेक्षा निराळ्या नव्हत्या. याउलट बुद्धिबळ विश्वात सोव्हिएत मक्तेदारी अनभिषिक्त आणि वादातीत होती. या मक्तेदारीला पहिले थेट आणि खडतर आव्हान मिळाले होते फिशरच्या रूपात.. म्हणजे पुन्हा अमेरिकेकडून! दुसऱ्या महायुद्धानंतर बुद्धिबळ जगज्जेतेपदासाठीच्या नऊ लढती झाल्या, त्या सगळ्या मॉस्कोत. जगज्जेता आणि आव्हानवीर दोघेही सोव्हिएत महासंघातले. बुद्धिबळातील या अजेय प्रतिभेचे श्रेय सोव्हिएत आणि डावे विचारवंत आपल्या साम्राज्यातील उपजत बुद्धिमत्ता आणि शिक्षणव्यवस्थेला देत. बुद्धी आणि प्रज्ञेच्या क्षेत्रात प्रगती दाखवण्याचे बुद्धिबळपटापेक्षा वेगळे प्रतिक त्यावेळी तरी उपलब्ध नव्हते. १९७२ मध्ये त्यावेळचा जगज्जेता होता बोरिस स्पास्की. त्याचा आव्हानवीर होता बॉबी फिशर. ती लढत झाली सोव्हिएत सीमेबाहेर.. पार पश्चिम युरोपात. आइसलँडची राजधानी रायक्येविक येथे. फिशरचा त्या लढतीमधील विजय एकल (स्टँड अलोन) स्वरूपाचा नव्हता. ही लढत मुळात खेळवली जाणे आणि सोव्हिएत सीमेबाहेर ती प्रत्यक्षात घडून येणे या दोन्ही स्वतंत्र लढाया फिशर आणि त्यावेळचे पाश्चिमात्य बुद्धिबळप्रेमी लढले. त्यांची कहाणी मूळ लढतीपेक्षाही विलक्षण आहे.

१९४८ मध्ये सोव्हिएत महासंघाचा मिखाइल बॉटविनिक बुद्धिबळ जगज्जेता बनल्यापासून सलग २४ वर्षे जेतेपद सोव्हिएत खेळाडूंकडेच होते. इतर कोणत्याही देशापेक्षा सोव्हिएत व्यवस्थेने या मूळच्या भारतीय खेळाला आपलेसे केले होते आणि तेथील शाळांमधूनही बुद्धिबळाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाऊ लागले होते. ‘सोव्हिएत स्कूल ऑफ चेस’ हा शब्दप्रयोग साधारण १९५० च्या दशकात रूढ झाला होता. बुद्धिबळात पाश्चिमात्य जगत विरुद्ध सोव्हिएत अशी काही स्पर्धा दुसऱ्या महायुद्धापर्यंत तरी नव्हती. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात परस्परांविषयी संशय आणि कुरघोडीच्या दुष्टचक्रातून बुद्धिबळातील वर्चस्वासाठीही संघर्ष सुरू झाला. त्यावेळी पद्धतशीर धोरणे आणि सरकारी पाठबळाच्या आधारावर सोव्हिएत महासंघ आणि काही प्रमाणात पूर्व युरोपातील देशांमध्ये उत्तमोत्तम बुद्धिबळपटू निर्माण झाले. यांतील बहुतेकांपुढे (किमान उच्च स्तरावरील) चरितार्थाची भ्रांत फारशी नसायची. पश्चिम युरोप, अमेरिकेत तशी परिस्थिती नव्हती. बुद्धिबळ हा मुख्य प्रवाहातील क्रीडाप्रकार नव्हताच. एकेकाळी अनेक पश्चिम युरोपिय देश आणि अमेरिकेत बुद्धिबळातली अनेक ओपिनग्ज आणि थिअरी विकसित करण्याचे प्रयत्न झाले, परंतु तेथील बहुतेक बुद्धिबळपटू अभावानेच व्यावसायिक होते. युद्धोत्तर काळात तर ही संख्या अधिकच घटली. त्या काळात पाश्चिमात्य जगतातील मोजके बुद्धिबळपटू अधूनमधून चमकायचे. परंतु त्यांची मजल जगज्जेतेपद लढतीच्या उंबरठय़ापर्यंतही गेली नाही. १९४८ पासून आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना अर्थात ‘फिडे’कडे जगज्जेतेपदाच्या लढतीचे पालकत्व गेले. यानंतरच्या काळात सोव्हिएत बुद्धिबळपटू सातत्याने जगज्जेते बनत गेले. त्याचप्रमाणे सामने आणि स्पर्धाच्या आयोजनातील सोव्हिएत हस्तक्षेपही जाणवू लागला होता.

फिशरचा उदय याच काळातला- म्हणजे ५० च्या दशकातला. त्याच्या असीम गुणवत्तेविषयी आणि विक्षिप्तपणाविषयीच्या खऱ्या-खोटय़ा कथांचे मिथक ६० च्या दशकापर्यंत उजळले होते. तो खऱ्या अर्थाने माणूस नावाचे बेट होता. (पान ४ वर) (पान १ वरून) कोणावरही विश्वास ठेवायचा नाही. त्यामुळे कोणाचीच फारशी मदतही घ्यायचा नाही. सोव्हिएत बुद्धिबळपटूंच्या यशात महत्त्वाचा वाटा परस्पर सहकार्याचा होता. फिशर त्या फंदात कधी पडला नाही आणि सोव्हिएत सहकार्याचे मॉडेल त्याला नेहमीच संशयास्पद वाटत आले. ही मंडळी संगनमताने बुद्धिबळ स्पर्धामध्ये एकमेकांशी बरोबरी करतात आणि बिगर-सोव्हिएत बुद्धिबळपटूंना जिंकू देत नाहीत, हे फिशरचे सुरुवातीपासूनचे निरीक्षण. त्या काळातले मॅच फििक्सगच जणू. फिशरचे बालपण अस्थैर्यात गेले. त्याची आई कम्युनिस्ट विचारसरणीच्या जवळ जाणारी होती. त्यामुळे अमेरिकेत तिच्याविषयी नेहमीच संशय व्यक्त केला जायचा. फिशरचे वडील नेमके कोण होते याविषयी मतांतरे आहेत. आईनेच फिशर आणि त्याच्या बहिणीला बुद्धिबळ खेळाशी परिचय करून दिला. लहानगा बॉबी एकलकोंडा होता. बुद्धिबळाची गोडी लागल्यानंतर तो अधिकच एकलकोंडा होत गेला. कारण बुद्धिबळ वगळता इतर कोणत्याही गोष्टीत बुद्धी वा जीव गुंतवण्याची गरजच त्याला भासेनाशी झाली. स्थानिक क्लब, स्थानिक स्पर्धामध्ये चमक दाखवू लागल्यानंतर बॉबी फिशर हे नाव अमेरिकेच्या बुद्धिबळ वर्तुळात गाजू लागले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी अमेरिकन विजेता, पंधराव्या वर्षी त्यावेळचा जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर ही त्याची कामगिरी थक्क करणारी होती. त्याच्या आईच्या सोव्हिएत महासंघातील ओळखींचा वापर करून फिशर आणि त्याची बहीण मॉस्कोला गेले. त्यावेळी तो मॉस्को चेस क्लबमध्ये गेला. तेथील काही चांगल्या बुद्धिबळपटूंशी खेळला नि जिंकला. ते सगळे अनौपचारिक आणि जलद प्रकारातील डाव होते. फिशरने तिथल्या तिथे त्यावेळचा जगज्जेता मिखाईल बॉटविनिकशी खेळण्याची मागणी केली, जी मान्य होणे शक्य नव्हते. मग ‘हो- नाही’ करता करता टायग्रिन पेट्रोशियान (हाही पुढे जगज्जेता बनला.) या आणखी एका कसलेल्या बुद्धिबळपटूशी खेळण्याची संधी त्याला मिळाली. सोव्हिएत खेळाडूंशी अधिकृत सामने खेळायला मिळणार नाही, केवळ पाहुणचार मिळेल, हे कळताच त्याने खूप खळखळाट केला. त्यावेळीच हे पाणी वेगळे असल्याची कुणकुण सोव्हिएत व्यवस्थेला लागली.

बॉबी फिशर विलक्षण प्रतिभेचा बुद्धिबळपटू होता. मॉस्कोला जाण्यापूर्वीच एका स्पर्धेत वयाच्या १३ व्या वर्षी त्याने डेव्हिड बायरनविरुद्ध खेळलेला डाव आजही अविस्मरणीय आणि बुद्धिबळातील गणनक्षमतेचा अचाट नमुना ठरतो. त्या डावाला ‘गेम ऑफ द सेंच्युरी’ असे बुद्धिबळ विश्वात आजही संबोधले जाते. अमेरिकन अजिंक्यपद पटकावल्यानंतर बॉबीला जगज्जेतेपदाचे वेध लागले. परंतु थेट जगज्जेत्याला आव्हान देण्यासाठी बहुस्तरीय लढतींमधून जावे लागते. इंटरझोनल, कँडिडेट्स अशा टप्प्यांमध्ये सातत्य दाखवत पुढे जावे लागते. या सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये सोव्हिएत बुद्धिबळपटू संगनमताने कारस्थान रचतात आणि आपल्याला अडथळे आणतात अशी तक्रार बॉबी फिशर साठच्या दशकात वारंवार करू लागला. १९६२ मध्ये स्टॉकहोम इंटरझोनल स्पर्धेत फिशर विजयी ठरला. पण कुरासाओ येथे झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत त्याची कामगिरी सुमार होती. मात्र, त्या स्पर्धेत पेट्रोशियान, एफिम गेलेर, पॉल केरेस अशा तीन प्रतिभावान बुद्धिबळपटूंनी परस्परांचे डाव बरोबरीत सोडवले, हा फिशरचा आरोप होता. पुढे अशा इंटरझोनल, कँडिडेट्स टप्प्यांच्या फंदातच पडायचे नाही असे फिशरने ठरवले. त्याने दोन वेळा थेट जगज्जेत्याशी सामने खेळण्याचे प्रस्ताव मांडले, जे अर्थातच मंजूर झाले नाहीत. १९७० पर्यंत फिशरने बुद्धिबळातून जवळपास अघोषित निवृत्ती पत्करली होती. परंतु तो पराभवाला घाबरून कँडिडेट्स खेळत नाही, अशी टिप्पणी तोपर्यंत माजी जगज्जेता बनलेल्या पेट्रोशियानने केली. फिशरसाठी बहुधा ते विधान वेगळ्या अर्थाने स्फूर्तिदायक ठरले आणि त्याने पुन्हा एकदा जगज्जेतेपदासाठी गांभीर्याने प्रयत्न सुरू केले. प्रथम इंटरझोनल स्पर्धेत सफाईदार विजय मिळवून त्याने कँडिडेट्स लढतींमध्ये मार्क तैमानोव आणि बेन्ट लार्सन यांचाही प्रत्येकी ६-० असा धुव्वा उडवला. त्यावेळचा जगज्जेता होता बोरिस स्पास्की. त्याच्याशी भिडण्याआधी फिशरसमोर आणखी एक आव्हान होते- टायग्रिन पेट्रोशियान.. त्याचा जुना प्रतिस्पर्धी. पेट्रोशियानलाही त्याने ६.५-२.५ असे सहज हरवले. जगज्जेतेपद आता फिशरच्या दृष्टिपथात होते. समोर होता बोरिस स्पास्की.

फिशरच्या प्रगतीची दखल त्यावेळी बहुतांनी घेतली होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी त्याला दोन वेळा पत्र लिहून पाठिंबा दर्शवला होता. मुख्य प्रवाहातली नियतकालिके आणि वृत्तपत्रेही फिशर आणि त्याच्या संभाव्य जगज्जेतेपदाच्या लढतीविषयी भरभरून लिहू लागली होती. त्याच्या नावाला विलक्षण वलय असल्यामुळे फिशर-स्पास्की लढतीसाठी १५ शहरांनी यजमानपदासाठी अर्ज दाखल केले. ही संख्या विक्रमी होती. शिवाय यादीत मॉस्कोचे नाव नव्हते! अखेरीस बेलग्रेड, सारायेव्हो आणि रायक्येविक या तीन शहरांनी सर्वाधिक बोली दाखल केल्या. बेलग्रेडने एकूण पारितोषिकाची रक्कम १.५२ लाख डॉलर देऊ केली. त्यांच्या खालोखाल रायक्येविक (१.२५ लाख डॉलर) आणि सारायेव्हो (१.२० लाख डॉलर) असे क्रमांक होते. त्याआधीच्या जगज्जेतेपदांच्या लढतींपेक्षा ही रक्कम त्यावेळी जवळपास दहापट होती. पण रायक्येविकच्या बोलीमध्ये बुद्धिबळपटूंसाठी दूरचित्रवाणी, चित्रपट हक्कांच्या रकमेपैकी ३० टक्के राखीव ठेवली जाणार होती. अखेरीस बऱ्याच वाटाघाटींनंतर रायक्येविक या शहराबाबत सर्वसंमती झाली. फिशरला हे शहर अजिबात आवडले नव्हते, तर स्पास्कीसाठी ते पहिल्या पसंतीचे होते. हे शहर अमेरिका आणि सोव्हिएत महासंघातील रेषीय अंतराच्या बरेचसे मधल्या बिंदूवर होते! सारे काही सुरळीत होणार असे वाटत असताना फिशरने नवीनच मागणी उपस्थित केली. तो लढतीच्या उद्घाटनप्रसंगी आइसलँडमध्ये दाखल झालाच नाही. सव्वा लाख डॉलर्स (सध्याच्या हिशेबात जवळपास आठ लाख डॉलर्स) ही एकूण पारितोषिक रक्कम. यातील विजेत्याकडे ६२.५ टक्के आणि उपविजेत्याकडे ३७.५ टक्के रक्कम जाणार. याशिवाय दूरचित्रवाणी आणि चित्रपट हक्कांतील ३० टक्के रक्कम दोन्ही बुद्धिबळपटूंना मिळणार असे ठरले होते. त्यात आता फिशरने तिकीट विक्रीतील ३० टक्के हिस्साही मागितला! सोव्हिएत मंडळींच्या मते, हे फिशरचे वेळकाढू नखरे होते आणि त्याला सामना खेळायचाच नव्हता. फिशर समर्थकांच्या मते, या मागण्या रास्त होत्या आणि त्या पूर्ण होईपर्यंत न खेळण्याची फिशरची भूमिका योग्यच होती. अखेरीस जेम्स डेरिक स्लेटर हा ब्रिटिश बँकर मदतीला धावून आला. त्याने थेट आणखी सव्वा लाख डॉलर लढतीसाठी देऊ केले. यातून पारितोषिकाची एकूण रक्कम अडीच लाख डॉलर्सवर गेली. याशिवाय अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांनीही फिशरशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि किमान आता तरी खेळावेस अशी विनंती केली- जी मान्य झाली.
दोन पराभवांनी सुरुवात करूनही फिशरने या लढतीत १२.५- ८.५ अशी बाजी मारली. फिशर अत्यंत तऱ्हेवाईकपणे वागला तरी त्या टप्प्यावर तो जगातला क्रमांक एकचा बुद्धिबळपटू होता, तर स्पास्की जगज्जेता असूनही दुसऱ्या क्रमांकावर होता. लढतीबाबत सततच्या अनिश्चिततेमुळे स्पास्कीचे लक्ष विचलित झाले असे सांगितले जाते. पण त्यात तथ्य नव्हते. फिशरचा दर्जा आणि तयारी खूपच अव्वल होती. फिशरच्या डावांचा अभ्यास करून डावपेच निश्चित करण्यासाठी आणि स्पास्कीला ते खाद्य पुरवण्यासाठी काही निष्णात बुद्धिबळपटूंची टीमच सोव्हिएत बुद्धिबळ संघटनेने बनवली होती. परंतु त्यांच्या एकत्रित प्रतिभेला फिशरची प्रज्ञा भारी पडली. खरे तर विचित्र आणि विक्षिप्त वागणुकीबद्दल सोव्हिएत बुद्धिबळपटू ओळखले जायचे. पण सोव्हिएत जगज्जेता बोरिस स्पास्की फिशरपेक्षा कितीतरी अधिक दिलदार निघाला. बहुधा तो जगज्जेता असल्यामुळे नवीन काही कमावण्याची ईर्षां त्याच्यात उरली नव्हती. याउलट, जवळपास दहा वर्षे आपल्याला सोव्हिएत व्यवस्थेने जगज्जेता होण्यापासून रोखले या भावनेने फिशर पछाडलेला होता. ‘बुद्धिबळ म्हणजे पटावरील युद्धच..’ हे त्याचे जगप्रसिद्ध वाक्य. विक्षिप्तपणातूनच अवाजवी मागण्या मांडल्यामुळे आणि त्या मंजूर न झाल्यामुळे १९७५ मध्ये अनातोली कारपॉव या आणखी एका गुणवान सोव्हिएत ग्रँडमास्टरविरुद्ध फिशर खेळलाच नाही. पण स्वत:चे नाणे खणखणीत वाजवून घेण्याची शिकवण त्याने बुद्धिबळपटूंना दिली. अमेरिकेच्या यंत्रणेने त्याला पाठिंबा दिला, तो सोव्हिएत यंत्रणेला धडा शिकवण्यासाठीच. खुद्द फिशरला या मदतीची गरज कधीही भासली नाही. पन्नास वर्षांपूर्वीची (११ जुलै ते ३१ ऑगस्ट १९७२) ही लढत अमेरिका-सोव्हिएत शीतयुद्धातील एक लखलखता अध्याय मानली गेली. पण त्या लढतीमध्ये भावनिक गुंतवणूक न करण्याचा कोरडा अलिप्तपणा फिशरसारखा अत्यंत हुशार, तरी विक्षिप्त बुद्धिबळपटूच दाखवू जाणे. सोव्हिएत बुद्धिबळ महासंघाचे साम्राज्य औट घटकेपुरते जेथे खालसा केले, त्याच ‘नावडत्या’ रायक्येविक शहरात बॉबी फिशर अखेरीस जमिनीखाली सहा फूट चिरंतन विसावला.. एक अमीट वारसा मागे ठेवून!
siddharth.khandekar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकरंग ( Lokrang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
साच्याबाहेरचा किशोर!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी