अर्चना भट
एखादी कलाकृती ज्या काळात येते, त्यावर तिचं वेगळेपण अवलंबून असतं. कालौघात तशाच प्रकारच्या अनेक कलाकृतींची निर्मिती होत गेली की ते कमी होतं. मात्र काही कलाकृती अशा असतात की, ज्यांचं विलक्षण असणं स्थळकाळाच्या पलीकडचं असतं. आँत्वान द सँत-एक्झ्यूपेरी लिखित फ्रेंच क्लासिक पुस्तक ‘द लिटिल प्रिन्स’ हे या दुसर्‍या प्रकारात मोडतं. १९४३ साली आलेलं हे पुस्तक त्याकाळी जितकं विलक्षण आणि कोणत्याही एका चौकटीत न बसणारं होतं, तितकंच ते आता एवढ्या वर्षांनंतरही आहे.

मार्च २०२६ मध्ये ‘फ्रान्स-इंडिया इयर ऑफ इनोव्हेशन २०२६’ या उपक्रमांतर्गत, ‘द लिटिल प्रिन्स’ हे पुस्तक ‘प्रथम बुक्स’ आणि ‘द फ्रेंच इ्स्टिटट्यूट इन इंडिया – एम्बसी ऑफ फ्रान्स’ यांनी इंग्रजी, तमिळ, कन्नड, हिंदी आणि मराठी अशा पाच भाषांमध्ये प्रकाशित केलं. गेल्या ऐंशी वर्षांत या पुस्तकाची सहाशेहून अधिक भाषांमध्ये भाषांतरं झाली. बायबलच्या खालोखाल जर कोणतं पुस्तक इतकं भाषांतरित झालं असेल तर ते हे! असं असताना, आत्ता आलेलं भाषांतर हे आधीच्या भाषांतरांहून निराळं कसं? तर त्याचं कारण, अनुष्का रविशंकर यांनी संक्षिप्त रूपात केलेलं हे पुस्तक ‘प्रथम बुक्स’ने आठ ते दहा या वयोगटातील भारतीय मुलांसाठी चित्रपुस्तकाच्या स्वरूपात आणलं आहे. प्रिया कुरियन यांनी प्रत्येक पानावर त्यासाठी आकर्षक चित्रं काढली आहेत. त्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केला आहे. तो वाचताना आपण एखाद्या फ्रेंच पुस्तकाच्या, इंग्रजी भाषांतराच्या रूपांतराचा अनुवाद वाचतोय असं जाणवत नाही. वाचताना ही कथा जणू काही मराठीतच लिहिली होती असं वाटतं.

बरेचदा अनुवाद करताना भाषेच्या मर्यादांमुळे मूळ लेखनातली गंमत काही प्रमाणात हरवण्याची भीती असते. वाचकाला मूळ भाषा येत नसली तरी, ही गोष्ट अनुवाद वाचताना त्याला जाणवते. ‘छोटा राजकुमार’ मात्र त्याला अपवाद आहे. मूळ पुस्तकाचा प्रवाहीपणा, साधेपणा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यातला विनोद मराठीत अगदी नीटपणे उतरला आहे. माधुरी पुरंदरे यांना फ्रेंच भाषेची आतून-बाहेरून असणारी ओळख हे त्याचं एक कारण आहेच; पण त्याहीपलीकडे जाऊन, मुलांसाठी मराठीत गोष्टी लिहिण्याचं त्यांचं कसब वादातीत आहे. त्याचं प्रतिबिंब या अनुवादात सतत जाणवतं. म्हणूनच, मूळ पुस्तकाचं हे संक्षिप्त रूप असलं, तरीही अनुवाद वाचताना कुठेही तुटकपणा जाणवत नाही. ‘द लिटिल प्रिन्स’च्या मूळ लेखकाने पुस्तकात काढलेली चित्रं ही पुस्तकाच्या गोष्टीइतकीच लोकप्रिय आहेत. या चित्रपुस्तकासाठी ती न वापरता, भारतीय संस्कृती आणि तिचं वैविध्य लक्षात घेऊन, इकडच्या मुलांना जवळची वाटतील अशी नव्या शैलीतली चित्रं प्रिया कुरियन यांनी काढली आहेत.

गडद रंगांमध्ये काढलेल्या या ठाशीव चित्रांबद्दल प्रौढांमध्ये मतांतरं असली, तरी मुलांना मात्र ही चित्रं एकमताने आवडली आहेत. पुण्याच्या अक्षरनंदन शाळेत माधुरी पुरंदरे यांनी ही नुकतीच गोष्ट वाचून दाखवली, तेव्हा याचा प्रत्यय आला. काही मुलांनी द लिटिल प्रिन्स हे पुस्तक आधी इंग्रजीत वाचले होते. मात्र मराठी भाषा, भरपूर चित्र आणि माधुरीताईंचे वाचन यामुळे गोष्ट आता नीट कळली आणि खूप आवडली असं मुलांनी सांगितलं. पुस्तकात लेखक म्हणतो त्याप्रमाणे, बहुधा मुलांना या चित्रांत मोठ्यांसारखी ‘हॅट’ न दिसता ‘अजगराच्या पोटातला हत्ती’ दिसलाय!

पुस्तकाच्या कथानकाबद्दल सांगायचं, तर ही विमानाच्या इंजिनात बिघाड झाल्यामुळे सहारा वाळवंटात क्रॅश लॅंडिंग कराव्या लागलेल्या वैमानिकाची आणि त्याला तिथे भेटलेल्या एका छोट्या राजकुमाराची गोष्ट आहे. हा छोटा राजकुमार वैमानिकाला आपल्या छोट्याशा ग्रहावरच्या तीन ज्वालामुखींची, त्याच्या लाडक्या गुलाबाच्या फुलाची, पृथ्वीवर येण्याआधी इतर ग्रहांवर त्याला भेटलेल्या मोठ्या माणसांची गोष्ट सांगतो. वरवर अद्भुत आणि रंजक कथा वाटली तरी लेखक यातून आयुष्याचं अटळ सत्य, मैत्री, मोठ्यांच्या आयुष्यातले विरोधाभास अशा गोष्टी अतिशय साधेपणानं वाचकांसमोर ठेवतो. काही पुस्तकांकडे देण्यासारखं इतकं असतं, की एका वाचनात सगळंच्या सगळं वाचणार्‍याला घेता येणं शक्य नसतं. त्यामुळे कदाचित हे पुस्तक एकदा वाचून मुलांना त्यातले बारकावे, त्यात लेखकाला जे सांगायचं आहे ते पूर्णपणे कळणार नाहीत. बहुधा साध्या, सरळ गोष्टीसारखी मुलं ही गोष्ट वाचतील. पण हेच पुस्तक ती जेव्हा परत परत वाचतील, तेव्हा कधीतरी त्यांच्या मनाचा एखादा बंद कप्पा अलगद उघडेल आणि गोष्टीपलीकडची गोष्ट त्यांना दिसेल.

पुस्तकात एके ठिकाणी छोट्या राजकुमाराला एक कोल्हा आपलं गुपित सांगतो, ‘आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी अदृश्य असतात. त्या आपल्या हृदयाने बघाव्या लागतात, डोळ्यांनी नव्हे.’

सध्याच्या अनिश्चित काळात डोळ्यांना जे दिसतंय ते इतकं भीतीदायक आहे की, असं पुस्तक मुलांना मिळणं ही काळाची गरज आहे. कोणी सांगावं, कदाचित अशी पुस्तकंच त्यांना हृदयाने बघायच्या गोष्टी दाखवतील.

‘छोटा राजकुमार’,
रूपांतर – अनुष्का रविशंकर,
चित्रांकन – प्रिया कुरिअन,
अनुवाद – माधुरी पुरंदरे, प्रथम बुक्स
पाने – ४४, किंमत- १२५ रुपये.

archana0309@gmail.com