अविनाश उषा वसंत महानगरातल्या चिंचोळय़ा अवकाशात लैंगिक निचरा होत नाही, त्यामुळे चोरटे लैंगिक व्यवहार वाढीस लागतात. यांचेच वर्णन चंद्रकांत खोतांनी ‘उभयान्वयी अव्यय’ कादंबरीत केले. खोतांच्या ठायी असणारी समाजाविषयीची तिरकस चिंतनात्मक वाक्ये, परंपरागत मराठीला मोडू पाहणारी ‘खुल्लम खुल्ला’ गिरणगावी भाषा हे या कादंबरीचे वेगळेपण. तीनेक दशके अश्लीलतेचा ठपका वगैरे बसून गडप झालेली ही कादंबरी काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार होऊन परतली. त्याविषयी.. १.साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. स्थानिक ग्रंथालयात मी चंद्रकांत खोतांची ‘उभयान्वयी अव्यय’ ही कादंबरी ग्रंथपालाकडे मागितली. आधी ग्रंथपालाने ती देण्यास नकारघंटा वाजवली. मी त्यांना कारण विचारले, तर त्यांनी सांगितले की, ‘‘लग्न झाल्यानंतर वाचायची ही कादंबरी आहे. घाण आहे त्या कादंबरीत.’’ विरोधानंतरही मी त्यांच्याकडून हट्टाने ‘उभयान्वयी अव्यय’ मिळवलीच आणि त्या वेळी मी सलग पाच तास बसून ती वाचून काढली. त्या ग्रंथपालाच्या म्हणण्यानुसार, मला त्यात अजिबात ‘घाण’ किंवा ‘अश्लील’ असे काही सापडले नाही. जरी खोतांच्या भाषेत ते ‘खुल्लम खुल्ला’ व्यक्त होत असले तरी त्यातली भाषा मला गिरणगावात वाढलो असल्याने, सहज परिचयाची होती. या कादंबरीत ‘पिवळय़ा’ पुस्तकांत असणारी लैंगिकतेची उत्तान वर्णने नाहीत. उलट त्यात विविध लैंगिक पदरांचे मराठी ललित साहित्यात केलेले पहिले दस्तऐवजीकरण दिसून येते. आजच्या काळात या लैंगिकतेच्या आशयाबद्दलही विशेष वाटणार नाही, पण पन्नास वर्षांपूर्वीच्या मध्यमवर्गीय नैतिकतेच्या जोखडात अडकलेल्या वाचकाला चंद्रकांत खोतांनी ‘उभयान्वयी अव्यय’द्वारे जोरदार धक्का दिला होता. मुळात लैंगिकता एवढीच काय कादंबरीची ओळख नाही, पण अश्लीलतेच्या चर्चेने कादंबरी त्या वेळी मुख्य वाचक प्रवाहापासून दूरच राहिल्याचे दिसते. २.सध्याच्या वाचकविश्वात आणि समीक्षा व्यवहारात ललित साहित्यातील वास्तव व कल्पितता (फिक्शन) यावर बरीच खडाजंगी झडते; पण या चर्चा हटवादी आणि एकेरीच असल्याचे दिसते. ‘उभयान्वयी..’ची सुरुवात ‘स्वप्न आणि वास्तव’ या एका दृष्टांतानुसार झाली आहे. स्वप्न म्हणजे कल्पितता आणि वास्तव या दोन्ही गोष्टी वेगळेपणात साहित्यातील यथार्थ चित्रण करण्यासाठी अपुऱ्या असतात, तर त्या दोघांचं श्रेष्ठत्व हे एकमेकांना पूरक राहण्यात आहे, एकटे राहण्यात नव्हे. यानुसार खोतांनी ‘उभयान्वयी..’मध्ये कल्पितता आणि वास्तव हे एकमेकांना पूरक ठेवण्यात कसोशीने प्रयत्न केलाय. तो यशस्वी झालाय म्हणायलाही पुरेसा वाव आहे. वास्तववादी तसेच अस्तित्ववादी कथनांचे खूप साहित्य सत्तरच्या दशकात प्रकाशित झाले होते. ते एक तर वास्तवाला झुकते माप देत होते, तर कलावाद्यांनी कल्पिततेचा मार्ग स्वीकारला होता; पण त्यात वाचकाला गृहीत धरून केवळ क्लृप्त्यांचा समावेश होता, तसेच कल्पिततेला आवश्यक असणारी कोणतीच नवी वर्णनपरिसंस्था उभी केलेली नसायची. त्या अर्थाने खोतांची ही भूमिका उल्लेखनीय म्हणावी लागेल. ३.‘उभयान्वयी..’च्या कथानक सूत्राचा विचार केला तर त्याचे तीन टप्पे पडतात. पहिल्या टप्प्यात निवेदकाचे बालपण चितारलेले आहे. त्यात बालपणाचे विविध किस्से आहेत. निवेदकाचे बालपण गिरणगावातील असल्यामुळे तिथले वर्णन, तिथल्या चालीरीती-संस्कृती यांचे दस्ताऐवजीकरण, निम्न मध्यमवर्गीय- कामगार वस्तीत घडणाऱ्या ढोबळ ‘सामायिक’ घटनांचे चित्रण याचा त्यात समावेश होतो. यातला बराचसा भाग हा निवेदकाच्या स्व-कौतुकाचा आहे; पण निवेदक ‘प्रदीप’ यांच्या मानहानीचे, शोषणाचे, विशेषत: लैंगिक शोषणाचे प्रसंग या टप्प्यात दिसून येतात. दुसऱ्या टप्प्यात निवेदक प्रदीपसोबत इतर तीन मुख्य पात्रांची ओळख व त्या पात्रांचा विस्तार दिसून येतो. या चार पात्रांच्या लैंगिकतेच्या चार वेगवेगळय़ा छटांची ओळख या भागात दिसून येते. चारही पात्रांच्या लैंगिकतेच्या चर्चेबरोबर समाजातील इतरांच्या लैंगिकतेची चर्चाही निवेदकाने कथनातून केली आहे. या चर्चेत समाजातील लैंगिक वास्तव, लैंगिक चोरटा व्यवहार यांच्या वर्णनातून ‘समाजस्वास्थ्य’च खोतांनी वाचकांसमोर ठेवले होते. कादंबरीचा तिसरा टप्पा हा कादंबरीचा मूळ गाभा आहे. अफलातून आयुष्य जगलेल्या चारही पात्रांच्या वाताहततेचा आणि एकटेपणाचा हा काळ आहे. हा एकटेपणा पात्रांना कुठल्याच कुटुंबव्यवस्थेच्या रचनेत बसवता न आल्याचे सूचन निवेदकाने केले आहे. हेच कादंबरीच्या शीर्षकसूत्रातूनही व्यक्त केले आहे. प्रदीप, दिनकर, शकुताई आणि सलमा हे चार लोक हे वाक्यांना जोडणाऱ्या ‘व’, ‘आणि’, ‘पण’, ‘परंतु’ या ‘उभयान्वयी अव्यया’प्रमाणेच मानवी ‘वाक्यां’च्या शृंखला जोडत जगले. ४.‘उभयान्वयी..’चे निवेदन हे प्रथमपुरुषी निवेदन आहे. सत्तरच्या दशकात ‘बीट जनरेशन’च्या प्रभावातून बऱ्याच अस्तित्ववादी कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यातल्या बहुसंख्य लेखकांनी प्रथमपुरुषी निवेदन स्वीकारले. त्यामुळे निवेदक वर्णन कौतुकाचा सोस इतर कादंबऱ्यांप्रमाणे ‘उभयान्वयी..’मध्येसुद्धा आहे; पण या कादंबरीत निवेदकाची कठोर स्वचिकित्सासुद्धा आहे. कादंबरी हे कथनात्मक साहित्य असते; पण कोणतेच कथन गणितीय सूत्रात बांधले जाऊ शकत नाही. ‘उभयान्वयी..’त येणारे कथन हे भारतीय परंपरेच्या ‘मौखिक’ कथनासारखे आहे. त्यात सरळ रेषेतील सलगता आणि संगतता नाही. त्यामुळे हा कथनाचा वेगळा प्रयोग ठरतो. त्या कथनात कथकाकडून आठवणींचे किस्से, दृष्टांत आणि इतर नीतिकथा, कविता वगैरे येतात. त्यामुळे या निवेदनाला एक प्रकारचा असंगतपणा किंवा विस्कळीतपणा वाटत असला, आशयाशी दूर दिसत असले तरी ‘बृहदतेने’ मानवांच्या नीती-नियमांना धक्के देण्याचे कार्य या निवेदनातून झाले आहे. कादंबरीच्या निवेदनातून खोत वाचकाला नेहमी टपली मारतात असे वाटत राहते. कारण त्या काळातील लेखक आदर्शवाद आणि नैतिकता यांत डुबून गेले होते. त्यामुळे अशा खोटय़ा स्वप्नाळूपणाला छेद देणे हा खोतांचा ‘बृहद्’ हेतू असावा असे दिसते. त्यासाठीच अशा निवेदनाचा त्यांनी कादंबरीत पुरस्कार केलेला दिसतो. कप्पेबाज वर्णनांना फाटा देत, तपशिलांचा सोसही लांब ठेवत खोत वाचकाला कादंबरीच्या बृहद् (मॅक्रो) आशयाशी जोडून ठेवतात. ५.‘उभयान्वयी..’मध्ये वाचकाला येणारा अनुभव हा तुटक-तुटक येतो, त्या अनुभवात सलगता नाही. कादंबरीत सांगितलेल्या गोष्टीचे आणि आशयाचे या वेगळय़ा निवेदनशैलीमुळे तुटलेपण अजून प्रखर होते. बघायला गेले तर महानगरातील जीवनामुळे अनुभव ग्रहण करण्यातही सलगता नसते. वास्तवातील गर्दीत जगताना एकाच वेळी अनेक अनुभव, घटना या लगोलग, पण तुटकपणे माणसांवर आदळत असतात. या सगळय़ातून सुसंगतता साध्य करता येत नाही, हे बऱ्याचशा महानगरी कादंबऱ्यांतही दिसून येते. यातील चित्तवेधक निवेदनामुळे ज्या वृत्तीगंभीर आशयाचा खोत प्रसार करू इच्छितात तो आशय मागे पडतो की काय, असेही वाटून जाते. चाळीतील एक बुटका मुलगा मेल्यानंतर सापडलेल्या चिठ्ठीत एक वाक्य असे होते ‘लीलू आपल्याला जो मुलगा होईल, त्याचं लग्न आपण धूमधडाक्यात करू’, सारखी लघवी लागणाऱ्या मुलाने असे सांगितलेले ‘मी मेल्यानंतर जागोजाग माझ्या स्मरणार्थ मुताऱ्या बांधा असं मी माझ्या मृत्युपत्रातच लिहून ठेवणार आहे.’ निवेदक स्वत:बद्दल बोलताना असे बोलतो ‘जो स्वत:च्या प्रेमात पडतो त्याला विरोधकांचं फारसे भय नसते.’ अशी निवेदनातील वाक्ये आशयाशी संबंध दाखवत नाहीत, पण त्यातून औद्योगिक शहराने लादलेल्या परिस्थितीची तिरकस गंभीरताच ‘खोत’ दाखवत असतात. ६.‘उभयान्वयी..’चा निवेदक सुरुवातीलाच बोलतो की, ‘माझ्या अफलातून आयुष्यातील एकेक आठवण धुण्यासारखी वाळत घातलीय.’ तसेच निवेदक दिनकर, शकुताई आणि सलमा यांच्याबद्दल बोलतो, ‘आम्ही ही चार माणसं. काय भयंकर माणसं. सगळी अफलातून आयुष्य जगलो.’ हे अफलातून आयुष्य म्हणजे कसं हे मात्र खोतांकडून नीट स्पष्ट होत नाही. शोषणालाच अफलातून म्हणायचे की, तत्कालीन नीती अनुभवांना छेद देत निराळय़ा अनुभवांना आपलेसे केले याला अफलातून म्हणायचे. चारही पात्रांचे लैंगिक अनुभवही वेगळे आहेत. त्यातून लैंगिकतेचे वेगवेगळे पदर दिसून येतात. यात लैंगिक शोषणही आहे, लैंगिक चवही आहे, लैंगिक अगतिकतासुद्धा आहे. निवेदक प्रदीप हा लहानपणापासून लैंगिक शोषणाचा बळी ठरला आहे. प्रदीपचे ‘मारू’ दिसणे म्हणजे सुंदर दिसणेच याला कारणीभूत ठरल्याचे निवेदक सांगतो. तसेच त्याचा मित्र दिनकरही त्याचा अनैसर्गिक उपभोग घेतो. त्यामुळे नाइलाजाने का होईना तो ‘द्विलिंगी’ होतो. पुढे जाऊन प्रदीप स्वेच्छेने ‘पुरुष देहविक्री’चेही कामही करतो. दिनकर हा लैंगिकतेनुसार अनैसर्गिक आहे. तीच त्याची लैंगिक चवही बनली आहे. सलमा ही उभयिलगी असली तरी नवऱ्याकडून होणाऱ्या लैंगिक जाचाला कंटाळून मुक्ततेसाठी घराबाहेर पडते; पण पुढे देहविक्री करणाऱ्या परिसंस्थेतच अडकून पडते. शकुताई ही निवेदक प्रदीपला भाऊ मानते. ते नाते निखळ आहे, असे दोघांकडून बोलले गेले. मात्र शकुताईचा नवरा शकुताईला मूल देण्यास असमर्थ ठरतो, तेव्हा मात्र प्रदीपबद्दल शकुताईला सुप्त आकर्षण वाटू लागते; पण हे आकर्षण मात्र लैंगिक नाही. निवेदकाकडून अगदी योगायोगाने घडलेल्या प्रसंगानुसार शकुताईला प्रदीपकडून गर्भधारणाही होते. तसेच या पात्रांसह समाजातील लैंगिक व्यवहारांचेही खोतांनी वर्णन केले आहे. अशा विविध लैंगिकतेच्या घटकांना तत्कालीन समीक्षकांनी विकृत ठरवून संपूर्ण कादंबरीवरच विकृततेचा शिक्का मारला; पण आजच्या काळात या लैंगिकतेबद्दल बहुसंख्याकांना विशेष वाटणार नाही. तत्कालीन इतर लेखकांनीसुद्धा लैंगिक उच्चार लेखनातून केला होता; पण खोतांनी लैंगिकतेचा अवकाश हा एकत्रितपणे आणि इंद्रियसंवेज्ञ अनुभवातून ‘उभयान्वयी..’मध्ये मांडला हे त्यांचे विशेष होते. त्यामुळे खोत काळाच्या पुढे बघणारे लेखक होते, हेही स्पष्ट होते. ७.‘उभयान्वयी..’तील पात्रं ही हीनता, मानहानी आणि लैंगिक शोषणाचे बळी आहेत, तरी त्यांच्या ठायी असणारी करुणा उच्च दर्जाची आहे. ती तत्कालीन ढोंगी जगातल्या माणसांचेही भले व्हावे हेच चिंतते. एकमेकांना कोणत्याही अपेक्षाविना ही पात्रं आधार देतात. त्यातल्या कोणत्याच पात्राला कौटुंबिक सुख प्राप्त होत नाही. निवेदक प्रदीप कुटुंबसंस्थेपासून लांबच राहिलेला आहे. कुटुंबव्यवस्थेच्या झगडय़ातूनही शेवटी सगळेच एकटे राहतात वा संपून जातात. निवेदक प्रदीपला पौगंडावस्थेतच अनाथ असल्याचे कळल्यामुळे ज्या कुटुंबाने त्याला वाढवले त्यांच्यापासूनही तो दूर जातो, एकटा राहतो. त्या कुटुंबातही त्याला वेगळेपणाची जाणीव, मानहानी, हीनता मिळालेली असते; पण शेवटी शकुताईला प्रदीपकडून झालेले मूल हेही अनाथ वा पोरके राहणार का? या प्रश्नावर कादंबरीतील सर्वच पात्रांचा एकाकीपणा त्या शकुताईच्या मुलात एकवटलेला दिसून येतो. कादंबरीतील शेवटचे घटनाक्रम हे अत्यंत उत्कट व कारुण्याने भरलेले आहेत. ८.‘उभयान्वयी..’मध्ये चितारलेले अनुभव पूर्णत: काल्पनिक नाहीत. तत्कालीन समाजात अशा घटना दिसून येत होत्या, तशा त्या आजही दिसून येतात. महानगरी वेगामुळे पोटासाठीची भयावस्था, त्यातून सतत अस्थिर वाटण्याची भावना, त्यामुळे जगण्याची प्रेरणा नष्ट होऊन गर्दीतही एकटेपणा वाढत जातो. महानगरातल्या चिंचोळय़ा अवकाशात लैंगिक निचरा होत नाही, त्यामुळे चोरटे लैंगिक व्यवहार वाढीस लागतात. यांचेच वर्णन खोतांनी कादंबरीत केलेले आहे. महानगरी जीवनात माणसांना मुखवटे घेऊन जगावे लागते, त्या मुखवटय़ांना तोडायचा प्रयत्न खोतांनी केला, मात्र त्याच महानगरी व्यवस्थेने त्यांना परत मुखवटय़ाकडेच नेले, असे सूचन त्यांनी कादंबरीतील या पुढच्या वाक्यात केले आहे. ‘विचार करून करून माझ्या मेंदूची अक्षरश: पावडर झाली. ती पावडर तोंडाला फासून मी शिमग्यातल्या सोंगासारखा ‘ऐना का बैना’ करीत फिरायला लागलो.’ या कादंबरीने मानवी जीवनाचे उघडेनागडे वास्तव प्रकट केले आहे, हे वास्तव अनेकांच्या जगण्याचा आणि आजूबाजूच्या अवकाशाचा भाग असतो. परिस्थितीने सूड उगवलेल्या पतित माणसांचा एकमेकांवर जिवापाड प्रेम करीत असताना आणि कारुण्यपूर्ण नजरेने इतरांना बघणे घडत असताना वाचकाचे मन गलबलून जाते. खोतांच्या ठायी असणारी समाजाविषयीची तिरकस चिंतनात्मक वाक्ये, परंपरागत मराठीला मोडू पाहणारी ‘खुल्लम खुल्ला’ गिरणगावी भाषा हे या कादंबरीचे नक्कीच वेगळेपण आहे. या सगळय़ाचा विचार करता ‘उभयान्वयी अव्यय’ ही मराठी साहित्यातील एक महत्त्वाची कादंबरी आहे. गिरणगावात वाढलेला आणि घडलेला आजचा तरुण लेखक. कथा, कविता, अ-कथनात्मक साहित्य आदी माध्यमांमध्ये लेखन. स्ट्रीट फोटोग्राफर. सामाजिक क्षेत्रातही सक्रिय. ‘पटेली’ ही गिरणगावावरील कादंबरी ऐन करोनाकाळात येऊनही लोकप्रिय. ‘कविता ह्या हिणवलेल्या’ या काव्यसंग्रहाचेही वाचकांकडून स्वागत. पर्यावरण आणि भाषाविषयक रिपोर्ताज अनेक नियतकालिकांतून प्रसिद्ध. avikinkar@gmail.com