ओंकार सविता फंड

मुकुंद वझे यांची ‘गुलामगिरीतून गौरवाकडे’, ‘राजमोहनची बायको’, ‘बिहाइंड दि सीन्स’ ही अनुवादित पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आणि आता एडी जाकु यांच्या ‘द हॅप्पीएस्ट मॅन ऑन अर्थ’ या चरित्राचा ‘जगातील सर्वात आनंदी माणूस’ या नावाने त्यांनी अनुवाद केला आहे. ते या पुस्तकाच्या रूपाने प्रेम, करुणा आणि आशा या शक्तींची आठवण करून देणारी आश्वासक कथा मराठी वाचकांसाठी घेऊन आले आहेत. जे लोक निराशावादी आहेत, जे लोक छोटय़ा छोटय़ा संकटांनाही घाबरतात अशांसाठी ‘पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस’ हे पुस्तक आहे.

Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Shiv Sena Shinde campaign song
Video: ‘बाळासाहेबांच्या प्रसिद्ध डायलॉगने सुरुवात, उबाठावर टीका, मोदींचे आवाहन’, शिंदे गटाचे प्रचार गीत प्रसिद्ध
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

जर्मनीतील लिपझिग शहरात १९२० साली अब्राहम सालोमन जाकुबोविक्झ (एडी जाकु) याचा जन्म झाला. एडीचे वडील इसिडोर, आई लीना आणि बहीण हेन्नी. एडीचं प्राथमिक शिक्षण व्हॉक्षुल या शाळेत झालं. त्याचं प्राथमिक शिक्षण १९३३ ला संपलं. याच दरम्यान १९३३ मध्ये हिटलर सत्तेवर आला आणि त्याने जर्मनीत ज्यूद्वेषाची लाट आणली. अॅडॉल्फ हिटलर हा या कथेचा खलनायक. नव्हे, नव्हे, हा संपूर्ण ज्यू समाजासाठी आणि जर्मनीचाही खलनायक. हिटलरने पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम केलं होतं. पुढे जाऊन त्याच हिटलरने जर्मनीची सत्ता हस्तगत केली. येथूनच पुढे खऱ्या विध्वंसाला सुरुवात झाली. एडीचं माध्यमिक शिक्षण लिबनीझ जिम्नॅशियम शाळेत सुरू झालं. साधारणपणे एडी तिथं पुढची पाच वर्ष शिकला असता. पण एक दिवस तो शाळेत गेला असता त्याला दारातच सांगितलं गेलं की, ‘तू ज्यू आहेस. म्हणून तुला शाळेतून हाकलून दिलं आहे.’ पुढे ‘वॉल्टर शेलिफ’ या नव्या नावानिशी एडी जाकु पुढच्या शिक्षणासाठी संस्थेत दाखल झाला. वॉल्टर शेलिफ हे नाव वास्तवात एका अनाथ मुलाचं होतं. एडीच्या वडिलांनी त्याचं ओळखपत्र मिळवलं. नव्या ओळखपत्रामुळे एडीच नवं आयुष्य सुरू झालं.

एडीला तिथं अनेक प्रकारच्या अडचणी आल्या. पण त्यातली सर्वात महत्त्वाची अडचण म्हणजे स्वत:चं गुपित सांभाळायचं. कारण एडी तेव्हा अवघ्या १३ वर्षांचा होता. त्याने तिथं कशा प्रकारे शिक्षण घेतलं हे या पुस्तकात वाचायला मिळतं. तारुण्याच्या काळात एडीने एक चूक केली. ९ नोव्हेंबर १९३८ रोजी आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्याने त्याच्या जन्मस्थळी जाण्याचं ठरवलं. पण देशभरात ज्यूद्वेषाची सावली किती व्यापक आणि दाट पसरली होती याची एडीला अजिबात कल्पना नव्हती. एडी त्याच्या घरी पोहोचला आणि तो आराम करत असताना ss सैनिक (schutzstaffel’ – अॅडॉल्फ हिटलरच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेलं निमलष्करी दल) दरवाजा तोडून घरात शिरले आणि त्यांनी एडीला खूप मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी त्याला तुडवलं. एडीला काही कळण्याच्या आत त्याला पकडून नेण्यात आलं. एडीला एक गोष्ट उमगत नव्हती, ती म्हणजे ज्यू लोकांचा एका रात्रीत द्वेष कसा काय होऊ लागला? तेही त्यांच्या स्नेह्यंकडून, शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून, सामान्य नागरिकांकडून. फक्त आणि फक्त द्वेषच केला जाऊ लागला त्यांचा. येथून पुढे एडीचं आयुष्य वादळात सापडलेल्या जहाजासारखं झालं. एडी आणि त्याच्या आई-वडिलांची ताटातूट झाली. मात्र याच दरम्यान बुखेनवाल्ड इथं एडीची मैत्री कुर्ट हर्षफिल्डसोबत झाली. बुखेनवाल्डच्या छळछावणीतून सहा महिन्यांनी एडीने स्वत:ची सुटका करून घेतली. एडी व त्याचे आई-वडील ब्रुसेल्समध्ये एकत्र भेटले आणि तिथंच ते लपूनछपून राहू लागले. १९४४ च्या फेब्रुवारी महिन्यात एडी व त्याच्या कुटुंबीयांना पकडून आउश्वित्झमध्ये नेण्यात आलं. तिथं पुन्हा एडी व त्याच्या कुटुंबीयांची ताटातूट झाली. नंतर तेथे त्याला सैनिकांकडून कळलं, की जे वृद्ध व कमजोर होते, त्यांना मारण्यात आलं आहे. एडीला कळून चुकलं की तो आता पोरका झाला आहे. त्याच्या आई-वडिलांना मारण्यात आलं होतं.

आउश्वित्झ ही एक मृत्यूची छावणी होती. एकाएकी एडीचं सर्वच हिरावलं गेलं होतं. एडीचे आई-वडील मेले होते. बहिणीचं काय झालं ते माहीत नव्हतं. पण तिथं त्याच्यासोबत एक आशेचा किरण होता. तो किरण म्हणजे कुर्ट. रर चे सैनिक कधी कधी केवळ करमणूक म्हणून लोकांना मारहाण करायचे. त्या सैनिकांचा एकच हेतू होता- मानवी प्राण्यांना शारीरिक छळ करण्यातला आसुरी आनंद उपभोगायचा. छावणीत असेही काही कैदी होते, की जे इतर कैद्यांच्या विरोधात जाऊन नाझींना सामील व्हायचे. त्यांना ‘कोपा’ असं नाव होतं. पण दडपशाही करणारी माणसंसुद्धा दडपल्या जाणाऱ्या माणसांइतकीच भयभीत असतात. यालाच ‘फॅसिझम’ म्हणतात. एक अशी समाजरचना, की जिथं प्रत्येक माणसाची शिकार होते. नाझींचा क्रूरपणा कधी उफाळून येईल हे सांगता येत नसे.

नाझी सैनिक कैद्यांच्या कॉफीमध्ये ब्रोमाइड हे रसायन घालत. या रसायनामुळे तरुण माणसांची लैंगिक वासना कमी होते व त्यांचं पुनरुत्पादन इंद्रिय निरुपयोगी होतं. पण एडी व कुर्टला हे माहीत झाल्यामुळे ते यातून बचावले. युद्धात नाझींची अवस्था बिकट होत चालली होती. मग सर्वाना आउश्वित्झमधून इतर छावण्यांत हलवण्याचं ठरलं. तेव्हा छळछावण्यांतील कैद्यांची जी मिरवणूक निघाली, तिला ‘मृत्युयात्रा’ संबोधलं गेलं. एडीने एक शक्कल लढवून या मृत्युयात्रेतून आपली सुटका करून घेतली. त्याची खूप वाईट अवस्था झाली होती. त्याला चालताही येत नव्हतं. तो सरपटत सरपटत हायवेला कसातरी पोहोचला. तेव्हा त्याला अमेरिकन सैनिक आणि अमेरिकन रणगाडे दिसले. एडी म्हणतो की, तो ते दृश्य कधीच विसरू शकत नाही. एडीला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा त्याचं वजन २८ किलो होतं आणि त्याची जगण्याची शक्यता फक्त ३५% इतकीच उरली होती. इतक्या बिकट परिस्थितीतूनही एडी अखेरीस जिवंत राहिला.

एडी बरा होऊन ब्रुसेल्सला गेला. तिथं त्याला त्याचा सर्वात जिवलग मित्र कुर्ट भेटला. थोडय़ाच दिवसांनी एडीची बहीणदेखील सापडली. एडी प्रफुल्लित झाला. कारण त्याला प्रिय अशा दोन व्यक्ती कुर्ट आणि हेन्नी युद्धातून वाचले होते. एडी म्हणतो की, ‘आम्ही जे छळछावणीत अनुभवलं, ते कोणीच समजू शकत नाही.’ रोज त्यांना मृत्यूची प्रचीती येत होती. कधी कधी तर तेथील लोकांना स्वत:चं आयुष्यच संपवून टाकावंसं वाटायचं. कारण मानसिक छळाबरोबरच शारीरिक छळदेखील केला जात होता. नुसताच छळ नाही, तर जीवघेणा छळ सैनिक करत असत.एडीला युद्धकाळात जे अनुभवावं लागलं होतं ते हृदयद्रावक आणि भयानक प्रसंग त्याने कोणालाच सांगितले नव्हते. अगदी स्वत:च्या मुलांनादेखील. पण एडी एक दिवस कॅथॉलिक चर्चमध्ये याबद्दल जाहीररीत्या बोलला. पुढे एडीला लोकांना आपली जीवनकहाणी सांगणं हे आपलं कर्तव्य आहे असं वाटू लागलं.एडीला ऑस्ट्रेलियन सरकारकडून ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ हा किताब मिळाला. हा फारच मोठा गौरव होता. २४ मे २०१९ रोजी एडीने आतापर्यंतच्या सर्वात मोठय़ा श्रोतृवृंदासमोर (पाच हजार लोक.. ऑनलाइन माध्यमातले वेगळे!) भाषण केले.

या पुस्तकात आपल्याला कळतं की, जर्मनीसारख्या प्रगत देशात १९३३ साली वांशिक विद्वेष किती मोठय़ा प्रमाणावर होता. त्याकाळी जर्मन राष्ट्र औद्योगिकदृष्टय़ा जगामध्ये सर्वात श्रेष्ठ राष्ट्र होते. पण एका माणसाच्या वांशिक द्वेषबुद्धीमुळे कोटय़वधी लोकांचं मानसिक-शारीरिक खच्चीकरण झालं. अगणित लोकांना गोळ्या घालून ठार केले गेले. हिटलर आणि नाझी सैनिकांची ज्यूंबद्दलची क्रूरता इतकी वाढली होती की ते लहान मुलांनादेखील जिवंत सोडत नसत.

या पुस्तकात आपल्याला ‘बार मिट्झवाह’ या प्राचीन धार्मिक विधीची माहिती मिळते. ‘बार मिट्झवाह’ म्हणजे ‘ईश्वराज्ञा पाळणारा मुलगा.’ यातून जर्मनीतील लिपझिगमधील परंपरेची प्रचीती येते. या पुस्तकात १५ प्रकरणं आहेत व प्रत्येक प्रकरणापूर्वी सुविचार दिलेले आहेत. मुकुंद वझे यांनी मूळ पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे. पुस्तक वाचताना एकेक गोष्ट क्रमाने उलगडत जाईल अशी साधी व सरळ कथानक मांडणी आहे. जे लोक म्हणतात की, आमच्या आयुष्यात खूप संकटे आहेत, त्यांनी तर हे पुस्तक आवर्जून वाचलं पाहिजे. सभोवती अथांग काळोख दाटला असला तरी आनंद शोधता व मिळवता येतो, हा या प्रेरणादायी जीवनकथेचा संदेश आहे.

‘पृथ्वीवरील सर्वात आनंदी माणूस’- मूळ लेखक- एडी जाकु, अनु- मुकुंद वझे, मंजुल पब्लििशग हाऊस,
पाने- १६५, किंमत-२९९ रुपये.