– सुजाता राऊत

‘‘वैचारिक आणि बौद्धिक प्रक्रिया मनात घडल्याशिवाय आत्मभान आणि आत्मसमीक्षा शक्य होणार नाही,’’ अशी भूमिका टी. एस. इलियटनं १९२१ मध्ये ‘The Metaphysical Poets’ या निबंधात मांडली. साहित्याचे वाचन करत असतानाही वैचारिक व बौद्धिक प्रक्रिया सुरुच राहतात. साहित्याची सर्जनप्रक्रिया ही केवळ भावनिक पातळीवरची नसते, तर तिच्यामध्ये वैचारिक बौद्धिक अंगे मूलभूत पातळीवर असतातच या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव करून देणार्‍या लेखक सुरेंद्र दरेकर यांच्या ‘द वुड्स आर लव्हली’ या कथासंग्रहात चार दीर्घकथा आहेत. दरेकरांच्या यापूर्वीच्या कथांमध्येही नवीन प्रयोग, प्रवाह तयार केलेले दिसतात. तसाच प्रयोग या सर्व कथांमध्ये दिसतो.

आपल्या भोवतालच्या घटना, घटिते व त्याभोवती बांधले गेलेले मानवी भावनांचे जग हा या सर्व कथांचा गाभा आहे. लेखकाने वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये काम केल्याने त्यांचा व्यासंग गाढा आहे. आंतरविद्याशाखीय लेखन, चिंतन याचा प्रत्यय या कथालेखनातून अनेकदा येतो. चारही कथांमध्ये उच्चविद्याविभूषित पात्रे आहेत. त्यांच्या अवतीभवती घडणार्‍या घटना व पात्रे म्हटले तर सामान्य आहेत. ती आपल्याही आजूबाजूला दिसू शकतात. घटना व त्यामागील कार्यकारणभाव, त्यातील अतर्क्यता, अगम्यभाव यांचे विश्लेषण करणार्‍या या कथा असल्या तरी त्यातील पात्रे त्यांचे संवाद, एकामागोमाग येणार्‍या घटनांचा क्रम आणि त्यांचा परिणाम हे कथासूत्रात अतिशय सुसूत्रपणे गुंफले आहे. ‘एहसास’ या कथेमधील उत्कृष्ट खेळाडू असणारी नायिका वैशाली एकटीने मुलाला वाढवत आहे. तिच्या विभक्त होण्याची, एकटीने संसार करण्याची ही कथावस्तू असली तरी ती फक्त तेवढ्यापुरती सीमित नाही. अनेक पात्रे, त्यांची पूर्वपीठिका व त्यामागील मीमांसा कथेत येते. लेखकाचा पिंड तत्त्वाधिष्ठित कारणमीमांसा करणारा आहे. ‘पुनश्च’ ही यातील एक उत्कृष्ट कथा. कथानायक विधुर. प्रथमपुरुषी निवेदनातून ही कथा उलगडते. नायकाची पत्नी गायत्री तिची आध्यात्मिक ओढ, तिचा व्यासंग, तिच्या जाण्यानंतर मालुताईंचे नायकाच्या आयुष्यात झालेले आगमन हा ठळक कथाभाग असला तरी कथा यापलीकडे विश्लेषणात्मक पातळीवर जाऊन पोहोचते. यातील घटना कथासूत्रामध्ये ताकदीने गुंफल्या गेल्या आहेत. यातील संवाद, घटनांमधून निर्माण होणारे अर्थ, नायकाच्या मनातील आंदोलने यथार्थपणे टिपली गेली आहेत.

शीर्षककथा ‘द वूडस आर लव्हली’ या रॉबर्ट फ्रॉस्टच्या कवितेच्या ओळींचा संदर्भ घेऊन येते. या कथेतील मालशे उच्चमध्यमवर्गीय, सुशिक्षित, विचारी व तारतम्य बाळगणारे आहेत. खरं तर सर्वच कथांमधील पात्रांकडे त्यांची स्वत:ची अशी जीवनसृष्टी आहे. मालशेंच्या कथेत काही भूतकाळातील ठळक घटना आहेत- ज्या त्यांच्या मनाच्या कक्षेत अधूनमधून वर येतात व वर्तमानात घडणार्‍या घटनांशी त्यांचा कुठेतरी अनुबंध आहे असे त्यांना वाटत राहते. यातून एक गूढ निर्माण होते, तसेच उत्कंठाही निर्माण होते. चिंतनाच्या अनेक मीती या कथेतही तयार होतात. मालशेंच्या पत्नी मालिनी, त्यांची मुलगी, जावई नरेश तसेच विकलांग सरोजा, पूर्वायुष्यातील अनेक पात्रे यांचा एक पट समोर येतो. सर्वच कथांची बांधणी नेटकी आहे. संवाद सहजसाधे आहेत व त्यातील चिंतन वाचकाला स्वत:ला तपासून पाडण्यास भाग पाडते.

मानवी मेंदूचे दोन भाग असतात, सृजनात्मक व विश्लेषणात्मक. या दोन्ही गोष्टींचे प्रत्ययकारी दर्शन हा कथासंग्रह देतो. कथा चिंतनशील असल्या तरी त्यात एक निश्चित कथानक आहे, त्याला वेग आहे, पात्रांच्या भावनांचे आरोह-अवरोह आहेत. त्यामुळे या कथा वाचकाला बांधून ठेवतात.

पुस्तकाचे बाह्यरूपही अकर्षक, देखणे आहे. शीर्षककथेचा संदर्भ असलेले सुंदर हिरव्या रंगातील मुखपृष्ठ सरदार जाधव यांचे आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला व शेवटी असणारी रेखाचित्रे तर खासच आहेत.

‘द वूडस आर लव्हली’,
सुरेंद्र दरेकर, सृजनसंवाद प्रकाशन,
पाने- १९२, किंमत- ४०० रुपये.