– सुचिता खल्लाळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मृग नक्षत्र लागायच्या काही दिवस आधी अचानकच कुठूनतरी एक भूरकट-काळपट रंगाचा किडा अवतरतो. लहानपणी असा किडा घरात दिसला आणि त्याला छेडत असलो तर घरातली मोठी वयस्क मंडळी त्याला डिवचू नका, मारू नका म्हणून रागवायची आणि त्यावर थोडं कुंकू वाहून त्याला त्याच्या वाटेने निमूट जाऊ देण्याची तंबी द्यायची. ‘मिरगाचा किडा है तो, पावसाचा निरोप घेऊन आलाय, त्याच्या मागोमाग आता येईलच पाऊस…’ असा ओतप्रोत आशावाद त्यांच्या समाधानी चेहऱ्यावर ओसंडून वाहायचा आणि नकळत आभाळाकडं बघत नाकाकपाळाशी नमस्काराचा हात जोडला जायचा.

मिरगाच्या किड्याचं पावसाचा दूत होऊन आकस्मिक अवतरणं आणि लगोलग येऊ घातलेल्या मृगाच्या सरींची भविष्यवाणी करणं न चुकता खरंही ठरायचं. वर्षानुवर्षे नित्यनेमाने.

कळत गेलं तसं आपल्याही मनात या करड्या रंगाच्या मिरगाच्या किड्याबद्दल आपार कुतूहल आणि नितांत श्रद्धा वाढत गेली. वर्षामागून वर्षे जात राहिली, करडा किडा मृगाच्या आधी अवचित उगवायचा, तो आपल्यासाठी पावसाचा निरोप घेऊन आला आहे या भावनेनं आपणही त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागायचो, पाऊस येईलच आता लवकर अशी खात्रीलायक बतावणी करायलाही धजावायचो.

हेही वाचा – तवायफनामा एक गाथा

अलीकडे मृग येतो, पण मिरगाचा करडा किडा फारसा दिसत नाही. तो दिसला तरी लगोलग पाऊस येईलच अशी भविष्यवाणी आपण करत नाही, केली तरी ती खरी ठरत नाही. कारण मागच्या काही वर्षांपासून मिरगाचा करडा किडा दगाबाज ठरल्याचा अनुभव गाठीशी जमा झालेला. मृगाआधी तो कधी दिसतो, तर कधी न दिसताच मृग उगवतो. तो दिसला तरी मृग उगवतो पण बरसत नाही. अख्खाच्या अख्खा कोरडाच जातो. करडा किडा मग दगाबाज ठरतो. त्याच्यावरची अपार श्रद्धा, कुतूहल आणि कृतज्ञता हळूहळू कोरडी होऊ लागते. आणि कधीकाळी पावसाचा दूत असलेल्या करड्या किड्याचा राग येऊ लागतो. तो घातकी अविश्वासार्ह, दगाबाज निघाला म्हणून. पण नंतर जास्त विचार केल्यावर कळतं की मिरगाच्या करड्या किड्याचा काय दोष? खरा दगाबाज तर पाऊस निघाला!

चातकाच्या तृषार्त तहानेचा खरा दोषी कोण असेल तर तो दगाबाज पाऊस आहे. एका थेंबासाठी अवघ्या जगण्याची निष्ठा पणाला लावून सरीची वाट पाहण्याची तितिक्षा असणं हा अपराध ठरावा, असा बेईमान तर पाऊस! तो अधिकच बेईमान होत चाललाय वरचेवर.

मिरगाचा किडा जसा भुरटा ठरला तशी आता खोटी ठरू लागली आहे भेंडवळची भविष्यवाणीही. अक्षय्यतृतीयेची घटमांडणी आणि पावसाचा अंदाज जुळताजुळत नाहीय. अवकाशातील उपग्रहांच्या वैज्ञानिक गणितावरून काढलेले हवामान विभागाचे शास्त्रीय कयास सपशेल खोटे ठरतायत. शेवटचा हुकमी एक्का म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचा हमखास विश्वास ठरलेले पंजाबराव डखही आता हुलकावणी देऊ लागलेत. ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणून कमरेला लिंबाचा पाला गुंडाळून काठीला उलटी बेडकं लटकवत पाण्याचा जोगवा मारणारी गल्लीबोळातली भाबडी पोरं अधिकच भकास, केविलवाणी भासू लागलीयत.

हमखास नेमेची दडी मारून बसतोय पाऊस आणि आलाच तर एवढा आडमुठासारखा धिंगाणा घालत येतोय की सगळा प्रलय होऊन त्राही त्राही व्हावी. खरं तर पावसा, माझ्या कधीकाळच्या प्रिय प्रिय अतिप्रिय पावसा… तू आता राहिलाच नाहीस काळीजघडीतल्या मखमली अस्तरातला ऐवज. डोळ्यांच्या पापणीवर अलगद जपावा तुझा एकच तुषार असा अलवार-हळुवार होतास ना रे कधीकाळी. एवढा आतल्या गाठीचा, बेमौसमी, धोकेबाज आणि बेईमान कसा होऊन बसलास…

ऐन आषाढाच्या तोंडावरही कोरड्याच राहिलेल्या उन्हाळ नदीचे उघडेबोडखे वाळवंटी अस्तर जागोजागी खचलंय. नदीचा प्रवास विचारावा तो पावसानं आणि नदीनं पावसाला साक्षी ठेऊन अवखळ अव्याहत वाहत राहावं… वाहत राहावं… युगानुयुगे हीच तर कहाणी होती साठा उत्तराच्या सुफळ संपूर्णाची. पण नदीचं वाहणंच थांबलंय. उघडी पडलेली कोरडीठाक गुळगुळीत गोट्याची वाळू नदीचा समृद्ध इतिहास सांगायला पुरेशी साक्षीदार नाहीय हे कळायला हवं होतं पावसाला. पण तिचं वाहणंच गोठवून-आटवून टाकणारा पाऊस आता किती अप्रिय होऊन बसलाय नदीसाठी आणि आपल्यासाठीही. त्याच्या अशा लहरीपणामुळे त्याचं काळजातलं स्थान हरवलंय हे एकदातरी त्याला कळायला हवं ना…!

भेगाळलेल्या काळ्या भुईवर चवड्या उंचावत डोळ्यांवर कृश हाताची झापडी धरून, आग ओकणाऱ्या सूर्याकडे आणि तुझ्या वाटेकडे बघत जिवाची घालमेल करणारे ते समस्त कृषिवल तरीही किती आशावादी आहेत दर मृगाआधी. त्यांच्या आशेला फुटू दे ना पालवी, चाड्यावर मूठ धरून पेरा करू की नको या संभ्रमाला दे ना आश्वासक विश्वास. एकदा मनमानी धिंगाणा घालून गेलास आणि नंतर प्रदीर्घ ओढ दिलीस तर जमिनीआतल्या धगीत आतला दाणा आतच करपून जाताना किती हळहळत असेल काळ्या आईचं अस्तरी गर्भाशय… कधीतरी कळू दे तुला तिची वेणा…

कळू दे कधीतरी नदीआधीचा रेघभर झरा, झाडाआधीचा बोटभर अंकुर, तहानेआधीची उष्ण धग आणि पावसाआधीचा पापणीतला पाऊस… नदी नदी आटून जाताना, झाड झाड करपून जाताना, भुई खोल खोल भेगाळताना, फांदी फांदीशी दरनव्या दिवशी एक नव्या नावाचा कुणबी गळफास घेताना, मायमावल्यांचे पांढरेबोडके कपाळं, करंटे संसार, उघड्यावर पडलेली अनाथ लेकरं बघताना… सांग ना माझ्या कधीकाळच्या प्रियतम पावसा, मी कशी लिहू तुझ्यावर रोमॅण्टिक प्रेमकविता?

कसा सुचेल माझ्या लेखणीला तुझ्यासाठी ओलाकंच रंजनप्रधान ललितलेख? भिरभिर वृत्तीच्या बेईमान प्रियकरा, तू असा बेमौसमी… आणि ते करतायत कोट्टीच्या कोटींची आकड्यांची उड्डाणं. देऊ पाहतायत सिंमेटच्या जंगलांच्या बदल्यात गुळगुळीत अतिवेगवान समृद्धीचे राजरस्ते. एकरच्या एकर जमिनी अकृषक करून, जंगलं तोडून, रस्त्यांचे प्रशस्तीकरण आणि लाखोंच्या बागायतींचे अधिग्रहण करून नेऊ पाहतायत नव्या शतकातल्या नव्या जगात. मिसरूड फुटलेल्या हौशी पिढ्या बापजाद्यांच्या समृद्ध पुण्याईवर वारसाहक्काने लाखोंचा मोबदला पदरात पाडून घेत ठरतायत नशीबवान औलादी. खुश्श आहेत महानगरात गाडी-घोडी प्लॉट आणि फ्लॅट खरेदी करून, अधिग्रहित सातबाऱ्याच्या बदल्यात. पण वहितीतल्या जमिनी बुडाल्या त्याचं काय, पाखरांचे आसरे तुटले त्याचं काय, वन्यजीवांचे सुंदरबनी अधिवास क्राँक्रिटचे उष्ण प्रदूषित महानगरं बनले त्याच्या बदल्यात त्यांना कुठला अधिवास?

हेही वाचा – विखंड भारत, अखंड लोक

सारेच गुडघ्याला बाशिंग बांधून उतावीळ आहेत आधुनिक जगातल्या नव्या सुखसुविधा उपभोगायला. एक असं जग, जिथं पाऊसच नसेल. पण तरीही आम्ही समृद्धीच्या राजमार्गावर चालत असू. एक असं जग जिथं नद्या वाहत्या नसतील असेल फक्त कधीकाळच्या नदीचं वाळूची रेघ होऊन उरलेलं उघडंबोडखं वाळवंटी अस्तर. झाडं नसतील, जंगलं, बागा, पाखरं, हरणं आणि मोर नसतील. फुलं आणि पहिल्या पावसानंतरचा मातीचा सुगंधही नसेल. तरी आम्ही असू विकसित जगातले अतिविकसित नागरिक.

अशा अत्याधुनिक युगाच्या उंबरठ्यावरून सांग ना माझ्या कधीकाळच्या प्रिय प्रिय अतिप्रिय पावसा, कशी लिहू मी तुझ्यावर रोमॅण्टिक ओळी?
खरं तर माझं मला हसू येतंय कधीकाळी मीच लिहिलेली पावसाची ही कविता आठवून.

जेव्हा घन बरसतो
लयींविनाच
अन् गर्जतो
सुरांविनाच
तेव्हा एकच टपोरा थेंब हळवा
अलवार झेलतो माझा तळवा
इतकी तरल नि संवेदी मी
…अजूनही!

(नांदेड येथे शिक्षण विस्तार आधिकारी म्हणून कार्यरत. तीन काव्यसंग्रह प्रकाशित. ‘डिळी’ या पहिल्याच कादंबरीस राज्य पुरस्कार.)

suchitakhallal@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The writers displeasure at the delayed arrival of rain ssb
Show comments