नाटकाची इतर जुळवाजुळव आता जोरात सुरू झाली होती. नेपथ्याची तपशीलवार रेखाटने मी तयार केली. नानाचे घर, माजघर, ओसरी, पार, हमरस्ता, शिंप्याचे दुकान, रेल्वेफलाट, दारूचा गुत्ता असे असंख्य देखावे सजवायचे होते. फिरता रंगमंच वापरायचा आम्ही ठरवले. नेपथ्य उभारणी आणि प्रकाशयोजना कठळ चे अनुभवी तंत्रज्ञ गौतम जोशी करणार होते. आता कलाकार निवडण्याचा बिकट प्रश्न तातडीने सोडवायचा होता.
मुंबईची मराठी नाटके वा सिनेमे माझ्या पाहण्यात आले नव्हते, त्यामुळे स्थानिक कलाकारांबद्दल मी तशी अजाण होते. तेव्हा महत्त्वाच्या भूमिकांसाठी नावे सुचवायची मी दामूभाईंना विनंती केली. प्रमुख भूमिकेसाठी श्रीकांत मोघेबद्दल आमचे पक्के एकमत झाले. श्रीकांतची आणि माझी पुणे आकाशवाणीपासून ओळख होती. पुढे तोही दिल्लीला होता. श्रीकांत ताकदीचा गायक-नट होता. शिवाय नाववाला, अनुभवी. तो अर्थातच आनंदाने तयार झाला. कोणताही हाडाचा नट आपला उजवा हात छाटून देईल अशीच ही ‘लाखों में एक’ भूमिका होती. त्याच्या बायकोसाठी रेखा कामतचे नाव पुढे येताच मी त्याच क्षणी ‘हो’ म्हटले. सात्त्विक, गोड गोबरा चेहरा, मोठाले विभोर डोळे, स्नेहपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि अकृत्रिम अभिनय यामुळे मी रेखाताईंची जबरदस्त चाहती होते. राजा परांजपेंच्या गाजलेल्या ‘लाखाची गोष्ट’मध्ये नदीच्या काठावर उभे राहून रेखाने लडिवाळपणे म्हटलेले, ‘त्या तिथे, पलीकडे, तिकडे.. माझिया प्रियेचे झोपडे’ हे गाणे कुणी विसरणार नाही. तर रेखाताईंनी पण भूमिका स्वीकारली आणि तिचे सोने केले. तिघी मुलींसाठी ज्योती दाभोळकर (पु. ल. देशपांडय़ांची भाची), आशा दंडवते आणि नीता प्रधान ठरल्या. आशा ही सुलभा देशपांडेची धाकटी बहीण असल्यामुळे घरचीच असल्यासारखी होती. थोरल्या जावयासाठी-शिंप्यासाठी सगळय़ांनी एकमुखाने दिलीप प्रभावळकरचे नाव सुचवले. मला हे नाव नवीन होते. ‘‘त्याला अभिनय बऱ्यापैकी येतो का?’’ मी काहीशा काळजीने विचारले. ‘‘येतो बऱ्यापैकी!’’ दामूभाई गालात हसत म्हणाले, ‘‘पण ते तू पाहा- आणि तूच ठरव.’’ पहिल्याच वाचनात आपल्या खास वेगळय़ा शैलीने दिलीप प्रभावळकरने मला गारद केले. आवंढा गिळत वाक्य बोलायची त्याची लकब, निरागस मुखवटय़ाआडून लुकलुकणारा मिश्कीलपणा, भूमिकेची खोल समज आणि एक उत्स्फूर्त सहजपणा.. हा अभिनेता काही खासच होता. ‘‘तुमचा हा फुलगावचा शिंपी नाव काढणार!,’’ मी दामूभाईंना म्हटलं. दिलीप प्रभावळकरने पुढे माझा हा शब्द खरा करून दाखविला. आज मराठी रंगभूमीवरचा तो एक लखलखता हिरा आहे. ‘बिकट वाट’च्या कोंदणात तो तेव्हा चमकला, ही केवढी आनंदाची गोष्ट! अविनाश खरे हा माझ्या प्रिय मैत्रिणीचा- मीराचा सख्खा भऊ. तो तेव्हा मुंबईत होता. त्याची नेमकी दिशा अद्यापि ठरली नव्हती. पण वेगवेगळे मार्ग अत्यंत मनस्वीपणाने तो चोखाळत होता. ‘मला दे ना गं तुझ्या नाटकात काम!’ असं तो एकदा गमतीने म्हणाला आणि मला तो फकिराच्या भूमिकेत दिसला. त्याला नाटकाचा सुतराम अनुभव नव्हता. पण जमेच्या बाजू होत्या : आकर्षक व्यक्तिमत्त्व, नैसर्गिक धीटपणा आणि वशिला (माझा)! लग्न जुळवणाऱ्या नानीबाई आणि विधुर खाटिक कांबळे ही दोन महत्त्वाची पात्रे सहजी ठरली. मंदाकिनी भडभडे या जाणकार अभिनेत्री आमच्या ताफ्यात सामील झाल्या. अरुणही आता मुंबईला आला होता. आम्ही दोघे तत्त्वत: विभक्त झालो असलो तरी आमच्या संबंधांत कडवटपणा किंवा दुरावा आला नव्हता. आम्हा दोघांच्या कलाजीवनात एकमेकांचं स्थान अढळ होतं. कांबळेची भूमिका तशी खलप्रवृत्तीकडे झुकणारी होती; पण अरुणला नित्यनवे प्रयोग करायला आवडत. शिवाय गाण्यांत त्याचा मोठा हिस्सा होता. एक बहारदार गुत्त्याचा प्रवेश होता. आणि एकूणच विनोदी लीलांना भरपूर वाव होता. गाणे आणि अभिनिवेश यांची उत्तम सांगड अरुणला जमली होती. तो गायला टोळीत असला की मंचावरच्या इतरांना स्फुरण चढत असे.

मोठय़ा प्रमाणावर एक चाचणीसत्र (ऑडिशन) घ्यायचे ठरले. एका जंगी हॉलमध्ये संस्थेचे दोन-तीन कर्मचारी आणि मी- आम्ही एक टेबल मांडून बसलो. टेबलावर भलेथोरले रजिस्टर. नावांच्या यादीची पाने. समोर खोली भरून होतकरू तरुण-तरुणी. काही बुजुर्गही. प्रत्येकाला नाटकातला काही भाग वाचायला लावून किंवा एखादा स्वतंत्र प्रवेश सादर करायला लावून त्याच्या कलेची पाच-सहा मिनिटांत पारख करायची असा क्रम सुरू झाला. ही पद्धती फारच सदोष होती. अशा घाऊक कला-मंडीमध्ये काय हाती लागणार? त्यातल्या त्यात १५-२० नट आम्ही निवडले आणि पुन्हा असला चाचणी प्रकार न करण्याचे मी ठरवले. या ऑडिशनमध्ये नाही म्हणायला दोन अवलिये गवसले. एक म्हणजे शंकर नाग. त्याच्या भावाला- अनंत नागला मी (आणि सगळेच) ओळखत होते. शंकरने छान वाचले. त्याच्या शब्दा-शब्दांतून आणि हालचालींमधून आत्मविश्वास ओसंडत होता. मी मनात म्हटलं- ‘तडफदार क्रांतिकारी तर सापडला!’ एक मोठी पोकळी भरली. (शंकरने पुढे नाटय़क्षेत्रात आणि कन्नड सिनेमात चांगलेच नाव गाजवले. त्याच्या नावाचे एक सिनेथिएटर कर्नाटकात आहे. दुर्दैवाने एका मोटार अपघातात त्याचे अकाली निधन झाले.) त्यानंतर एक किडकिडीत तरुण पुढे आला. त्यानं आपलं नाव-गाव सांगितलं. ‘‘गाता येतं का?,’’ मी विचारलं. क्षणाचाही विलंब न लावता तो उत्तरला, ‘‘नाचता येतं!’’ त्याच्या या काहीशा आगाऊ उत्तराने बाकी लोक चपापले; पण मला हसू आले. त्याच्या स्वतंत्र वृत्तीची आणि ‘बिनधास’पणाची गंमत वाटली. त्याच्या नावावर मी ‘हो’ची खूण केली. तो आगाऊ इसम- अरुण होर्णेकर! आजतागायत त्याची माझी दोस्ती कायम आहे. माझ्या अनेक नाटक, सिनेमा आणि टी.व्ही. मालिकांमधून त्याने काम केले आहे. नाटय़क्षेत्रात अगदी स्वत:चे असे त्याने एक वेगळेच स्थान बनवले आहे. भडक नाटकांपासून ते ‘वेटिंग फॉर गोदो,’ ‘रोशोमॉन’ अशी भारदस्त नाटके त्याने दिग्दर्शित केली आहेत. अरुण ‘त्यासम तोच’ अशी एक वल्ली आहे. ‘बिकट वाट’मध्ये त्याने नेमकी कोणती भूमिका केली, ते मला आता आठवत नाही. (त्यालाही!) पण नाचांमध्ये तो धमाल करीत असे हे आठवते. यातल्या दोन छोटय़ा मुलींपैकी एका मुलीची भूमिका आजची एक उत्तम गायिका देवकी पंडित हिने केली होती. तेव्हाही नाटकातल्या गाण्यात तिने आपल्या गोड गळ्याची चुणूक दाखविली होती. बाकीचीही पात्रे हळूहळू जमत गेली.
तालमी धडाधड सुरू झाल्या. बाबुलनाथ मंदिराच्या परिसरात कठळ चा मोठा हॉल होता. तिथे तालमी चालत. तो हॉल गाठायला शेकडो पायऱ्या चढाव्या लागत. त्याशिवाय मी राहत असलेल्या ‘गंगाविहार’चे पाच मजले सर करायचे असत. तिथली लिफ्ट कायमस्वरूपी बंदच असे. तर या सगळय़ा दुष्ट पायऱ्यांचा समाचार घेऊन तालीम करणं, हे सोपं काम नव्हतं. पण सगळय़ांनाच- विशेषत: मला या नाटकाचा कैफ चढला होता. त्यामुळे जोश कधी उणा पडला नाही.
नाटकात खूप पात्रे असल्यामुळे सगळीच्या सगळी तालमीला हजर आहेत असे क्वचितच घडायचे. खुद्द श्रीकांत त्याच्या अनेक व्यवधानांमुळे अनेकदा गैरहजर असायचा. अवघ्या नाटकाचा डोलारा त्याच्या खांद्यावर असल्यामुळे मग अशा तालमी लंगडय़ा व्हायच्या. मात्र, तो हजर असला की संपूर्णपणे भूमिकेत शिरायचा.
माझ्या दिग्दर्शनाच्या पद्धतीमध्ये मी ‘दृश्य’ परिणामाला फार महत्त्व देते. आपल्याकडे अनेक नाटकांत आपण पाहतो, की पात्रे रांगेने उभी राहून जोरजोरात संवाद झाडतात. हालचाली, संघरचना, आकृतिबंध (composition) यांना महत्त्व दिले जात नाही. माझ्या मते, नाटक हे श्राव्य तर हवेच; पण ते सतत हलते राहिले पाहिजे. माझे लहानपण ऑस्ट्रेलियात गेले. तिथे आणि पुढे पॅरिस व लंडनमध्ये मी अनेक नाटके, Musicals पाहिली. त्यांचा माझ्यावर निश्चितच परिणाम झाला होता. ‘बिकट वाट’मधल्या पात्रांच्या समूहरचनेचे नित्यनवे आविष्कार घडवून मी माझी हौस भागवून घेतली. एखादे शोभायंत्र (कॅलिडोस्कोप) फिरवत राहावे तशी ही दृश्ये उलगडत राहत. आमचा गुत्त्याचा प्रवेश छान बसला होता. ‘काठोकाठ भरू द्या प्याला’ या गाण्यात कांबळे खाटिक टेबलावरून सूर मारतो. तो जमिनीवर तोंडघशी पडायच्या आत बाकीचे त्याला अलगद वरचेवर झेलतात. स्वप्नदृश्यही बहारदार बसले होते. त्यात येणाऱ्या सर्व गावकऱ्यांच्या चेहऱ्यावरून आम्ही स्टॉकिंग्स (मोजे) चढवले होते. त्यामुळे चेहरे सारवल्यासारखे झाले. नाक, कान, डोळे, तोंड गायब! धूसर प्रकाशात त्या स्वप्नदृश्यात ही बिनचेहऱ्याची माणसं वावरू लागली की प्रेक्षागृह थरारत असे. श्रीकांत आणि रेखाताईंचे प्रवेश हळुवार भावनांनी ओथंबलेले होत असत. हे दोघे कसलेले कलाकार कुठल्या कुठे उंचीवर पोचत असत. तिन्ही तरुण जोडप्यांनी मन लावून भूमिका वठवल्या. पुतळा आणि फकिरा यांनी तर खरोखरच आपलं लग्न ठरवलं. जुहू बीचवर आमची एक पार्टी झाली तेव्हा दोघांनी ते जाहीर केलं.
तालमी चालू असतानाच सगळय़ा गाण्यांचे संगीत ध्वनिमुद्रित करून ठेवले होते. तेव्हा त्याच्या साथीने नटमंडळी गात असत. सारेच कलाकार अभिषेकींच्या प्रतिभेला न्याय देत असत असं म्हणता येणार नाही. पण एखाद्याचा सूर हुकला, तरी वातावरण बेसूर होणार नाही याची पंडितजी खबरदारी घेत.
‘बिकट वाट..’साठी सगळय़ांनी अलोट परिश्रम घेतले. एक बलाढय़ संस्था आणि कार्यप्रेरित माणसे पाठीशी असली की काम करणे केवढे सुकर होते, याचा घडोघडी प्रत्यय आला. आयएनटीचे सुरेश चिखले यांची तालमीमध्ये खूप मदत व्हायची. ते स्वत: यात एक छोटीशी भूमिका करायचे. ‘काय, कुठली, ते आता नेमकं आठवत नाही. पण पारावर माझी दाढी करण्याचा एक प्रवेश होता, हे नक्की,’ असं अलीकडेच त्यांनी मला सांगितलं. पुढे अनेक वर्षांनी मी चिखल्यांचं ‘जांभूळआख्यान’ पाहिलं तेव्हा त्यांच्या लोकनाटय़ावरच्या कलात्मक पकडीचा साक्षात्कार घडला. संस्थेमध्ये एक-दोन अशांत आत्मेदेखील होते. (ते असतातच.) त्यांचा आमच्या प्रकल्पाला असलेला दबा विरोध अधूनमधून जाणवत असे. पण तिकडे लक्ष द्यायला वेळ होता कुठे?
रवींद्र नाटय़मंदिरमध्ये १९ ऑगस्ट १९७६ रोजी ‘बिकट वाट वहिवाट’चा पहिला प्रयोग झाला. एखादा जोरदार भुईनळा उडावा, तद्वत तेजस्वी स्फुल्लिंग उडवत उडवत प्रयोग वरवर चढत गेला. आतषबाजीचीच उपमा चालू ठेवायची तर प्रत्येक प्रवेशच फुलझडीच्या फुलोऱ्याप्रमाणे उजळत गेला असे म्हणता येईल. या रोषणाईने अवघे नाटय़गृह उजळून गेले. खुद्द व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकाची तारीफ केली. नटांचे कौतुक केले.
दामुभाई म्हणाले, ‘‘सईबेन, तुम्ही लढाई जिंकली.’’
‘‘चूक. दामूभाई!’’ मी म्हटलं, ‘‘‘आपण’ लढाई जिंकली.. आपण सगळय़ांनी!’’
नाटकाचं भरभरून कौतुक झालं. प्रेक्षक, जाणकार, समीक्षक- सगळय़ांकडून. पण नाटकाचा फार मोठा प्रपंच असल्यामुळे धडाधड प्रयोग होऊ शकले नाहीत. ४० नटांच्या आणि थिएटर्सच्या तारखा यांचा मेळ बसेना. त्यातून काही विघ्ने आली. (ती येतातच!) आमच्या भामाला ती स्कूटरच्या मागे बसली असता एका नतद्रष्ट गाईने शिंग मारून उडवलं. थोडक्यात गंभीर संकट टळलं. पण डोक्याला जबर मार बसल्यामुळे आशा बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होती. अशांत आत्म्यांचं फावलं. नाटकाला तारखा (न) मिळवण्याचं काम अधिकच थंडावलं. मला वाटतं, एकूण नऊ- फार तर दहा प्रयोग काय ते झाले असतील.
मी केलेल्या नाटय़कामगिरीमध्ये मी ‘बिकट वाट वहिवाट’चा क्रमांक खूप वरचा लावीन. प्रयोगाचे वर्णन करताना थोडी आत्मस्तुती झाली आहे याची मला नम्र जाणीव आहे. पण खोटय़ा विनयाला बळी पडून उगीचच ‘कसचं? कसचं?’ म्हणणंही मला प्रशस्त वाटत नाही. ‘मी करीन ती पूर्व दिशा!’ अशी माझी कधीच भूमिका नसते. मला वाटतं, दिशाभूल झाली तर तसे कबूल करायला मी कचरत नाही. (‘हॅम्लेट,’ ‘गिद्ध’ इ). तेव्हा हातून चांगली कामगिरी झाल्यावर तसे प्रामाणिकपणे नमूद करायला हरकत नसावी. असो. (का ‘नसो’?)
हा लेख लिहिताना अनेक आप्त आणि परस्थांची मदत झाली. मालतीबेननं (जव्हेरी) नेहमीच्या प्रेमानं मला माहिती पुरवली. INT चे अधिकारी रामचंद्र वरक यांनी जुन्या अल्बममधून सुंदर फोटो काढून दिले. या लेखाच्या निमित्ताने खूप वर्षांनी आशा आणि वृंदावन दंडवते या मित्रांशी भेट झाली. गप्पा झाल्या. आशाच्या अपघाताबद्दल बोलताना वृंदा म्हणाला, ‘गाईने का उडवलं देव जाणे. आशाचं काम इतकं काही वाईट झालं नव्हतं!’
गंमत म्हणजे वृंदावनने आपल्या पुस्तक-खजिन्यामधून एक जुनाट पातळसे पुस्तक बाहेर काढले आणि माझ्या हातात ठेवले. ‘बिकट वाट वहिवाट : लेखक- व्यंकटेश माडगूळकर.’ नाटक छापल्याचे माझ्या गावीही नव्हते. मी नैसर्गिक कुतूहलाने पुस्तक उघडले. सुरुवातीला अगदी छोटी- म्हणजे पानभर प्रस्तावना होती. तिच्यात रवींद्रला प्रयोग झाल्याची तारीखवार नोंद होती. पात्रांची वा तंत्रज्ञांची नावे मात्र अजिबात नव्हती. खरे तर नाटककार पहिल्या प्रयोगाचा तपशील मोठय़ा हौसेने पुस्तकात छापतात. इथे तर कुणीही हेवा करावा अशी तारांकित नावे प्रयोगाशी निगडित होती. पं. जितेंद्र अभिषेकी, श्रीकांत मोघे, अरुण जोगळेकर, दिलीप प्रभावळकर, रेखा कामत, शंकर नाग, सुरेश चिखले, अरुण होर्णेकर, मंदाकिनी भडभडे.. या सगळय़ा नावांमुळे पुस्तकाची शोभा आणि वजन निश्चितच वाढले असते. मला आश्चर्य वाटले. वाईटही वाटले. शेवटपर्यंत त्यांचा राग गेला नव्हता तर! माझ्यावरच्या रागामुळे माझ्याबरोबरच माझ्या अवघ्या संचाला अनुल्लेखाने मारलं गेलं. दुर्दैव!
हां, प्रस्तावनेत माडगूळकरांनी लिहिलं आहे.. ‘INT’ ने ‘बिकट वाट’ उत्तमरीतीने रंगभूमीवर आणले याचा मला आनंद वाटतो.’
चला, हेही नसे थोडके!                                             

garvit and nandini suicide instagram
‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या युट्यूबर जोडप्याची अवघ्या पंचवीशीतच आत्महत्या
second wife of an invalid marriage may not complain of harassment but of dowry
अवैध लग्नाची दुसरी पत्नी छ्ळाची नाही, पण हुंड्याची तक्रार करू शकते
navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
Ten people were poisoned by eating shingada shev
नागपुरात शिंगाड्याचे शेव खाताच मळमळ, उलट्या, पोटदुखी! झाले असे की…