सदानंद मोरे
‘लोकरंग’मधील (२८ डिसेंबर) संजीव खांडेकर यांचा ‘तिसरा हेलिक्स’ हा लेख वाचला. खरं सांगायचं तर सुखद धक्का बसला. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेच्या शताब्दीच्या काळात त्यावर झालेले आणि होत असलेले लेखन अपुरे तसेच असमाधानकारक असल्याची जाणीव अंतरंगात तरळत असताना असा लेख वाचायला मिळाला हा एक सुयोगच मानावा लागतो. त्यासाठी संजीव खांडेकर यांचे अभिनंदन.
प्रस्तुत लेख कम्युनिस्ट पक्षाच्या एकूण व्यवहारांमधील सौंदर्यशास्त्र हा घटक केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला आहे; आणि लेखकालाही तो तसाच संकल्पित असणार हे स्पष्ट आहे. त्यात वावगे काहीच नाही. तथापि कम्युनिस्ट पक्षाच्या एकूण राजकारणापासून आणि राज्यव्यवहारापासून असा एखादा घटक अलग करून त्याचा विचार करता येतो का, हा पद्धतीशास्त्रीय प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. गेल्या शे-सव्वाशे वर्षांमधील डाव्या विचारसरणीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव असणाऱ्या कलावंतांची यादी खांडेकरांनी लेखात दिली. ते सर्व कलावंत आदरणीय आहेतच, पण प्रश्न असा पडतो की यातील किती कलावंत विशेषत: रशिया आणि चीन या नुसत्याच वास्तविक नव्हे तर जगभरातील इतरही राष्ट्रांमधील कम्युनिस्टांना आदर्श वाटणाऱ्या कम्युनिस्ट देशांमधील आहेत. जर पुरेसे नसतील तर त्याचे कारण काय? तेथील राजकीय व्यवस्था तर साम्यवादीच होती. मग तेथे कलानिर्मितीचे भरते यायला हवे होते.
कम्युनिस्ट राष्ट्रांना कलेची गरजच नसते, असे कोणी म्हटल्याचे ऐकिवात नाही. उलट तेथे माणसातल्या सर्वच क्षमतांना आणि शक्यतांना उमलण्या, फुलण्याचा पूर्ण वाव असेल असे (निदान पूर्व) मार्क्स तरी म्हणतो. मात्र तेथे कलांचे दुर्भिक्ष्य आणि कम्युनिस्टेतर राष्ट्रांमध्ये कलांचा सुकाळ असे का व्हावे? एकतर मूलत: मार्क्सच्या विचारात काही तरी गफलत असावी किंवा जी राष्ट्रेमार्क्सवादी – कम्युनिस्ट राष्ट्रे म्हणून वावरली त्यांनी मार्क्सला अभिप्रेत नसलेल्या पद्धतीने राज्यव्यवहार चालवले असेच निष्पन्न होते. यातील दुसरा पर्याय मान्य करणे कदाचित आता सोपे जाईल, पण त्याचा काय उपयोग?
खांडेकरांनी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांना न्याय दिला यासाठीही ते अभिनंदनास पात्र आहेत. तथापि याच ‘डीं’ना पक्षाने (दोन्ही गट) डांग्यांची काय कदर केली हा इतिहास कसा विसरता येईल? खांडेकरांनी झिझेकच्या विचारांची दखल घ्यावी ही बाब तर अधिकच सुखावणारी होती. पण झिझेक डाव्यांमधील एलिटांच्या माहितीपुरता मर्यादित म्हणजे परत अॅकॅडेमिक्समध्ये अडकणे. तो तळागाळापर्यंत का जात नाही?
खांडेकरांनी काही मुद्दे मोठे करून मांडले आहेत. ‘जग बदल घालूनी घाव’ हा बाबासाहेबांचा नारा म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाची कलाकृती होऊ पाहत होती. हे विधान तसेच आहे. वस्तुत: हे स्वत: बाबासाहेबांचे उद्धृत नसून अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेल्या कृतीतील आंबेडकरवादी कार्यकर्त्याच्या तोंडचे आहे. त्याला अण्णाभाऊंनी आंबेडकरी विचारांचा अर्थ दिला असे फार तर म्हणता येईल. खरे तर बाबासाहेबांना अशा उच्चस्थानी बसवणे कम्युनिस्टांना परवडले नसते. १९५२ च्या निवडणुकीची आठवण त्यासाठी पुरेशी आहे. रिचर्ड लेवॉन्टीन यांच्या ‘तिरसा हेलिक्स’ या संकल्पनेचा आधार खांडेकर घेतात त्यातही काही वावगे नाही.
जात, पात, वंश, रंग यांनी युक्त असा लावलेला डबल हेलिक्सचा नियतीवाद त्यांना मंजूर नाही हे ठीकच आहे. मात्र त्याच्याऐवजी विशिष्ट प्रकारचा राजकीय, सामाजिक नियतीवाद प्रस्थापित करून प्रश्न कसे सुटतील? नैसर्गिक किंवा वैज्ञानिक नियतीवादी निदान आम्हाला (नैसर्गिक) वस्तुस्थितीचा आधार आहे असे म्हणू शकतात. पण सामाजिक, राजकीय वास्तवांना संरचनात्मक (construction) मानणाऱ्या डाव्यांना आमची (construction) वास्तव (आणि इतरांची भ्रामक आयडिऑलॉजिकल) असे म्हणता येईल काय? ‘आमचे ते विज्ञान आणि इतरांच्या प्रणाल्या’ (Ideologies) ही ‘पूर्वीच्या कम्युनिस्टांची भूमिका’ आणि ‘ही नवी भूमिका’ यातील भेद स्पष्ट करायला हवा. नाही तर ‘आपला तो बाब्या आणि इतरांची कार्टी’ अशा पारंपरिक मराठी म्हणीसारखी गत व्हायची.
अर्थात स्वत: लेवॉन्टीन यांची भूमिका तशी नाही याची मला कल्पना आहे औत्क्रांतिक जीवशास्त्रातील ( evolutionary biology) जीनकेंद्रित ( gene’s eye view) स्पष्टीकरणे आणि जीव ( organism) केंद्रित स्पष्टीकरणे (पक्षी डॉकिन्स आणि हॅमिल्टन उदाहरणादाखल) पुरेशी नाहीत, त्यासाठी परिस्थिती हा घटक विचारात घ्यायला हवा. नैसर्गिक आणि सामाजिक सांस्कृतिक असेच त्याचे म्हणणे असावे आणि त्याचा स्वीकार करायला काहीच हरकत नाही.
तात्त्विक मुद्दा हा आहे की, जीनकेंद्रित विचार काय, किंवा समाज / वर्ग केंद्रित विचार काय, दोघे जीवाची (या संदर्भात मानवी व्यक्तीची) कोंडी करतात. त्याचे कर्तृत्व ( agency) हिरावून घेतात. कम्युनिस्ट राजवटी दुसऱ्या प्रकारच्या होत्या, सुदैवाने पहिल्या प्रकारच्या राजवटींचा अद्याप उदय झाला नाही. जैवतंत्रविज्ञान ( biotechnology) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ( AI) यांच्या मीलनातून तो होणार नाहीच असे नाही. तो प्रकार हक्स्लेच्याही कल्पनेच्या पुढचा असेल.
