उत्तर आणि दक्षिण ध्रुवानंतर सर्वाधिक बर्फ आणि हिमनद्या हिमालयात आढळतात. या ‘तिसर्या ध्रुवा’च्या पल्ल्यात अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान ही राष्ट्रे येतात. पर्यावरण बदलांमुळे येऊ शकणार्या नैसर्गिक आपत्ती सोडविण्याबाबत या आठ देशांत कागदी करार चार दशकांपूर्वीपासून दिसतो, पण कृती काहीच होत नाही. गेल्या आठवड्यात नेपाळमध्ये झालेल्या निसर्गकोपाने या देशांनी बदलायची गरज स्पष्ट केलीय. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास हवामान बदल सुडाच्या पवित्र्यात सज्ज आहेच…
इसवी सन २०५५. हवामान बदलामुळे पृथ्वीवरील मानवी संस्कृती नष्ट झाली आहे. लंडन पाण्यात बुडालंय. ॲमेझॉनच्या सदाहरित जंगलात आगीचे तांडव सुरू झालेय. लास वेगास वाळवंटाखाली गाडलं गेलंय. आल्प्स पर्वतावरून बर्फ पूर्णपणे गायब. वितळलेल्या ‘आ्क्टिटक’वरील ‘ग्लोबल आर्काइव्ह’ इमारतीमध्ये एक वृद्ध बसलाय. मानवजातीच्या उरलेल्या ज्ञानाचा तोच संग्राहक. जुन्या बातम्या आणि व्हिडीओ पाहताना तो स्वत:शीच पुटपुटतोय, ‘धोका दिसत असताना, वैज्ञानिक इशारे देत असताना आणि उपाय उपलब्ध असताना आम्ही कृती का केली नाही? आमच्याकडे वेळ होता तेव्हा आम्ही हवामान बदल का रोखला नाही? स्वत:चाच विनाश घडवणार्या ‘मूर्खांचा तो काळ’ होता?
फ्रॅनी आर्मस्ट्राँग यांच्या २००९ मध्ये आलेल्या या ‘द एज ऑफ स्टुपिड’मधील ही दृश्यं वेळप्रसंगी आठवत राहतात. त्याला तथ्यज (नॉन फिक्शन) आणि कल्पज (फिक्शन), फिचर आणि डॉक्युमेंटरी या मर्यादा नाहीत. त्यात वास्तविक घटना, वैज्ञानिक कल्पना, वृत्तचित्र आणि ॲनिमेशन आदी सर्व काही एकत्र गुंफलंय. आर्मस्ट्राँग हे ‘हवामान बदल’ हा विषय केवळ हिमनद्या वितळण्यापुरता मर्यादित करीत नाहीत. राजकारण, अर्थव्यवस्था, ऊर्जा, उद्योग, वाहतूक आणि युद्ध या प्रत्येक बाबतीत आपण काय निवड करतो? या सगळ्यांशी जोडलेला तो प्रश्न आहे. हवामान बदल हा अनेक दशकांत घेतलेल्या निर्णयांचा एकत्रित परिणाम आहे, याचं भान ते आणून देतात. सध्या आपण नेहमी विचारतो, ‘२०५० पर्यंत काय होईल?’ आर्मस्ट्राँग प्रश्न उलटा करतात, ‘२०५० मध्ये पृथ्वीच उद्ध्वस्त झाली तर… शिल्लक राहिलेला माणूस २००८ कडे पाहून आपल्याबद्दल काय विचार करेल? त्यांना ज्ञान होतं. निसर्गाकडून आणि शास्त्रज्ञांकडून इशारे मिळत होते. त्यांच्यासमोर पर्याय, त्यासाठीचं तंत्रज्ञान आणि निधी सर्व काही उपलब्ध होतं. पण तरीही त्यांनी कृती केली नाही. ते कोणत्या ‘विश्वात’ होते? त्यांच्यासाठी जीवनमरणाचे प्रश्न कोणते होते?’
‘तेल आणि हवामान बदल’ ही चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना आर्मस्ट्राँग यांना सुचली, ते साल होतं २००२ आणि तेव्हा नाव ठरलं ‘क्रूड!’ त्यासाठी त्यांनी सामूहिक निधी (क्राउडफंडिंग) उभा केला. २००६ ते २००९ इंग्लंड, नायजेरिया, जॉर्डन, अमेरिका, युरोप आणि भारतात जाऊन चित्रीकरण केलं. हवामान बदलामागील विज्ञान आणि अर्थकारण समजून घेतलं. यादरम्यान चित्रपटाचा केंद्रबिंदू ‘तेल’ जाऊन ‘मानवाने बदल का केला नाही?’ हा झाला.
यंदा ‘द एज ऑफ स्टुपिड’ला सतरावं वर्ष लागलंय. पाच वर्षांपासून जगातील आपत्तींची रोजनिशी आणि कॅलेंडर तयार झालंय. आपण आपत्तींना इतके सरावलो आहोत की, ‘माझ्या मना बन दगड’ असं म्हणण्याची गरज उरलेली नाही. स्टिव्हन स्पीलबर्ग म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रत्यक्ष हे विज्ञानकल्पनांहूनही महाभयंकर आहे.’ आताशा वैज्ञानिक आणि त्यांच्या संस्था वेळोवेळी आपलं भविष्य सांगताना वरचा स्वर लावत आहेत. ते आता स्पष्टपणे बजावत आहेत, ‘पृथ्वी अत्यवस्थ आहे!’
महासागर, विशाल अरण्यं आणि महाकाय पर्वत ही पृथ्वीवरील अमूल्य संपदा आहे. हा जागतिक ठेवा जपण्यासाठी जगातील ७० अग्रगण्य संस्थांनी २०१९ साली ‘ग्लोबल कॉमन्स अलायन्स’ची स्थापन केली. त्यांनी तातडीने आपल्या ‘गृहा’च्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी ‘अर्थ कमिशन’ हे शास्त्रज्ञांचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क तयार केलं.
‘अर्थ कमिशन’च्या ऐतिहासिक प्रकल्पात, पृथ्वीवरील बहुविध प्रणालींचे सूक्ष्म निरीक्षण आणि आंतरज्ञानशाखीय संशोधन करणारे नामवंत वैज्ञानिक सहभागी झाले आहेत. त्यांनी चार वर्षं गोड्या पाण्याचे स्रोत, जैवविविधता, जलचक्र, वायूंचं चक्र आणि बर्फाच्छादन या पृथ्वीवरील परिसंस्थांचा कसून अभ्यास केला. त्यांच्या पहिल्या अहवालात २०२३ मध्ये म्हटलंय, ‘या परिसंस्थांच्या यंत्रणा कडेलोटाला (टिपिंग पॉइंट) पोचल्या असून त्यांची अवस्था चिंताजनक आहे. पृथ्वीच्या प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. ‘सांप्रत अवघ्या जगी सगुण’ ‘भक्तीचा मळा’ फुलून गेला आहे. त्यासाठी ‘दृश्यमान’ होईल असं ‘भव्य काही जीवघेणं’ करण्याची स्पर्धाच लागलीय. हवामान हे निर्गुण- निराकार- अरूप आणि अदृश्य भासत असतं. तरी तेच हवामान त्याच्या सर्वव्यापी स्वरूपाचा आणि जगड्व्याळ आकाराचा साक्षात्कार घडवत राहतं. उष्णतेचा बॉम्बहल्ला, अरण्यहोळी, मेघपर्वतांची रुद्रवर्षा आणि भवताल गिळणारा महाप्रलय!
…मात्र क्षणिक हतबुद्ध होऊन पुढच्याच क्षणी नव्या जोमाने ‘तेच ते!’
‘अर्थ कमिशन’ने पृथ्वीच्या प्रकृतीचं निदान केलं, त्या २०२३च्या सप्टेंबर महिन्यात सबंध पृथ्वीवर सलग नऊ दिवस दोन ते चार रिश्टर तीव्रतेच्या भूकंपलहरी जाणवत राहिल्या. जागतिक स्तरावर एवढ्या दीर्घकाळ चालणार्या भूकंपलहरींची नोंद पाहून वैज्ञानिक चक्रावून गेले. बराच काळ भूकंपाचं ना कारण सापडलं, ना केंद्र! त्या घटनेला ‘अज्ञात भूकंपीय वस्तू’ (अनआयडेंटिफाइड सेस्मिक ऑब्जेक्ट) असं ठरवलं. संपूर्ण पृथ्वीचा तो थरथराट पाहून जगभरातील पंधरा राष्ट्रांतील ४० नामवंत वैज्ञानिक संस्था आणि ६८ शास्त्रज्ञ यांनी ते गूढ उकलण्यासाठी आंतरज्ञानशाखीय शोधमोहीम सुरू केली. प्रदीर्घ शोध घेतल्यावर त्या घटनेचं रहस्य उत्तर ध्रुवावर उलगडलं. उत्तर ध्रुव (आ्क्टिटक) हा कॅनडा, डेन्मार्क किंगडम (ग्रीनलँड आणि द फॅरो बेटे), फिनलंड, आइसलँड, नॉर्वे, स्वीडन, रशिया आणि अमेरिका अशा आठ देशांमध्ये पसरलेला आहे. तिथे जगातील एकंदरीत बर्फापैकी ८ टक्के बर्फ तगून आहे. त्यात बहुतांशी बर्फ हा शतकानुशतकांपासूनचा कायमस्वरूपी बर्फ (पर्माफ्रॉस्ट) आहे.
त्या शोधमोहिमेत वैज्ञानिकांना समजलं की, आ्क्टिटकवरील ‘ग्रीनलँड फजॉर्ड’ या भागात १,२०० मीटर उंचीचा महाप्रचंड हिमकडा तुटला आणि आ्क्टिटक महासागरात कोसळला. आठ दिवसांनंतर महासागरात महात्सुनामी आली. समुद्रात २०० मीटर फूट उंचीच्या लाटा निर्माण झाल्या आणि पुढील नऊ दिवसांपर्यंत प्रत्येकी नऊ सेकंदाला सबंध पृथ्वी हादरत राहिली. त्या घटनेमुळे आ्क्टिटक महासागराच्या तीस किलोमीटर परिसरातील पाणी पातळीत दहा मीटरने वाढ झाली.
त्या वेळी त्यांनी आणि ‘जागतिक हवामानशास्त्रज्ञ संघटने’ने सांगितलं, ‘तिन्ही ध्रुवांवर (तिसरा : हिमालय) दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानवाढ झालीय. तिन्ही ध्रुवांच्या वितळण्याचं प्रमाण वाढतेय. पृथ्वीवरून दरवर्षी दीड लाख टन बर्फ वितळतेय. ही वाटचाल २०५० साली उत्तर ध्रुव बर्फमुक्त होण्याकडे निघालीय. बर्फ वितळताना मिथेन वायू बाहेर पडेल. जो कार्बन डाय ऑक्साईडपेक्षा दहा पटीने घातक असेल.’
या घटनेला तीन वर्षे होत आली. तूर्तास नवा गडी नेपाळ चीन. आणि मिर्झा गालिब यांची क्षमा मागून हवामानाचा ‘शब -ओ- रोज तमाशा’ (रात्रंदिवस) ही नवा.
नेपाळ-चीन सीमेवरील लांगटांग लिरुंग परिसरात २६ ऑगस्टला ४.४ रिश्टरच्या भूकंपाने पर्वत हादरला. काही क्षणांतच बर्फ, खडक, मातीचा ढिगारा आणि पाण्याची भिंत खोर्यातून वेगाने खाली आली. त्याचं कारण नंतर लक्षात आलं. हिमनदीचा ६०० मीटरचा उंचीचा भाग अचानक तुटून १,२०० मीटर खाली आला. प्रचंड उंचीवरून कोट्यवधी घनमीटर बर्फ आणि दगड खाली वेगाने येताना घर्षणातून प्रचंड उष्णता निर्माण झाली. बर्फ क्षणात वितळून पाण्याचा मोठा लोट तयार झाला. त्यात डोंगरावरील माती, मोठे दगड-धोंडे मिसळून ताशी १८० कि.मी. वेगाने वाहणारा हा प्रवाह भोटेकोशी नदीत आणि नंतर त्रिशुली नदीत मिसळला. त्रिशुली नदीची पाणी पातळी अवघ्या ३० मिनिटांत सुमारे नऊ मीटरने वाढली. या अक्राळविक्राळ लाटेत ११ जलविद्युत प्रकल्प, काँक्रीटचे पूल, मोठमोठ्या इमारती आणि रस्ते (विकास) क्षणात वाहून गेले. नेपाळ सीमेवरील अत्यंत महत्त्वाचे गिरॉन्ग पोर्ट हे सीमाशुल्क केंद्र आणि वस्ती पूर्णपणे चिखलाखाली गाडली गेली. पाण्याच्या वेगामुळे लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास अजिबात वेळ मिळाला नाही. आता सर्वत्र भग्नावशेष आणि चिखलच चिखल!
या ‘विनाशवेळा’चं निदान जाणून घेण्यासाठी ‘नेपाळ टाइम्स’चे माजी संपादक आणि लेखक कुंदा दीक्षित यांना विचारलं. ते म्हणाले, ‘भूकंपप्रवण भागात रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि धरणे बांधल्यामुळे काय होऊ शकतं, हे पुन्हा एकदा दिसत आहे. ‘विकासा’मुळे येत असलेल्या आपत्तींचा धोका विचारात कधी घेणार?’
दीक्षित यांच्या विश्लेषणात ‘द एज ऑफ स्टुपिड’ हे ध्रुपद वाटू लागलं. ते नेपाळ सरकारला वारंवार ‘हा विकास किती तकलादू आहे?’ हे पुराव्यांसह सांगत असतात. त्याची पुरेपूर उपेक्षा आणि नालस्ती केली जाते.
तुकोबांनी सांगून ठेवलं आहेच, ‘मूढ सभेआंत, इच्छी पंडिताचा घात’ (सभेतल्या पंडिताचा नाश व्हावा अशी मूर्खांची इच्छा असते)
पृथ्वीवरील मानवजात आणि जीवसृष्टी समूळ नष्ट होऊ शकेल असं संभाव्य भविष्य. आपण? ‘पाच वर्षांच्या’ नियोजनात सदासर्वकाळ अडकलेले. अधूनमधून म्हणतो, ‘आम्ही पृथ्वी वाचवू!’ तेव्हा ती फक्त ‘रिटर्न गिफ्ट’ पाठवून सांगते, ‘विचार, शतकांचा करावा लागतो.’ अशा काळी लागतं, सर्व सीमांच्या मर्यादा उल्लंघून जाणारी दृष्टी आणि खंबीर नेतृत्व. गुलामगिरी नष्ट करताना लिंकन लाभले, तसं.
सध्या शिक्षणासाठी जागरूक झालेली पुढची पिढी हवामान बदलाच्या खोलात जाईल, तो सुदिन! त्यांना आजवरच्या काही पराकाष्ठा पुढे न्याव्या लागतील.
काठमांडू येथे १९८३ साली ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (इसिमोड)’ या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात आली. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चीन, भारत, म्यानमार, नेपाळ आणि पाकिस्तान हे आठ देश या संस्थेचे सदस्य आहेत. ही संस्था ‘तिसर्या ध्रुवा’च्या संवर्धनासाठी या आठ देशांना एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. हिमालय आणि हिंदुकुश पर्वतरांगा या नेपाळ, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान व पाकिस्तानपर्यंत पसरल्या आहेत. या ३,५०० किमी हिमशिखरांतून जगातील प्रमुख दहा नद्या उगम पावतात. अमु दर्या, ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, इरावती, मेकाँग, साल्विन, यांग्त्झे, तारिम आणि पीत या नद्या आणि ताज्या पाण्याचा सदैव साठा करणार्या ५४,२५२ हिमनद्या इथूनच निघतात. सुमारे १६५ कोटी लोकांची गुजराण हिमालयावर अवलंबून आहे. उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवानंतर सर्वाधिक बर्फ आणि हिमनद्या याच प्रदेशात आढळतात. म्हणूनच हा आहे ‘तिसरा ध्रुव!’
‘इसिमोड’ने २०१२ मध्ये दक्षिण आशियातील पर्यावरण पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. त्यात ‘इसिमोड’साठी दोनशे वैज्ञानिकांनी ‘हवामान बदलाच्या संभाव्य परिणामांविषयी’ केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगितले. तेव्हा या संस्थेचे वैज्ञानिक फिलिप्स वेस्टर म्हणाले होते, ‘जगाने कर्ब उत्सर्जन रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून तापमानवाढ १.५ अंश सेल्सियसवरच रोखली तर २१०० पर्यंत हिमालय पर्वत रांगांवरील ३६ टक्के बर्फ नाहीसा होईल. कर्ब उत्सर्जन मोकाटच राहिले तर २१०० साली सुमारे ७५ टक्के हिमालय रांगा बर्फमुक्त होतील.’
‘याचा भारतावर काय परिणाम होईल?’ असं विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘२०५० पर्यंत हिमालयातून निघणार्या सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्या बारमाहीऐवजी हंगामी होत जातील. अनेक झरे आटत जातील, भूजल पातळी खालावत जाईल.’’
मागील १४ वर्षांत हिमालयाची काहिली वाढतच चालली आहे. हिमनदी म्हणजे गोठलेल्या पाण्याचं अमोघ भांडार असतं. हिमनद्यांवर भुसभुशीत आणि कठीण असे दोन्ही प्रकारचे बर्फ असतात. नवा बर्फ साचत जातो, काही वितळतो. तरीही किमान तीस मीटर जाडीचा बर्फ शिल्लक राहतोच. त्यामुळे हिमनदी कधीही आटत नाही. भूवैज्ञानिक ॲंड्यु्र कॅब यांनी सांगितलं, ‘दरवर्षी दोन ते अडीच फुटांनी हिमनद्या आकसत आहेत.’ आजमितीला हिमनद्या वितळून ५,००० सरोवरं निर्माण झाली आहेत. ‘त्यांपैकी ५०० ‘अतिशय घातक किंवा स्फोटक श्रेणीत’ आहेत.’ ही सरोवरं फुटून पूर येत आहेत. (ग्लेशियल लेक आउटबर्स्ट फ्लड)
आपल्याकडे २०१३ साली केदारनाथला ढगफुटी आणि सरोवरफुटी एकत्र होऊन पूर आले. चमोलीमध्ये २०२१ला सरोवरफुटीच्या विनाशकारी पुरात १३.२ मेगावॅटचा ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. तर सिक्कीममधील १२०० मेगावॅटचा तिस्ता जलविद्युत प्रकल्प २०२३ साली नष्ट झाला. ढगफुटी आणि दक्षिण ल्होनाक तलाव फुटल्यामुळे तो पूर आला होता.
अशा अनुभवानंतर आपलं नियोजन आणि प्रशासन बदलेल?
त्याच वेळी भूकंपशास्त्रज्ञांनी ‘एका अजस्र टाइम बॉम्ब’ची जाणीव करून दिली. ‘हिमालयाच्या विशाल भूगर्भात गेली अनेक शतकं साचलेला भूगर्भीय ताण (टेक्टॉनिक स्ट्रेस) आणि ‘इंडियन प्लेट’ची सातत्यपूर्ण हालचाल यामुळे ९ रिश्टर स्केल किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या ‘ग्रेट हिमालयन अर्थक्वेक’ची शक्यता आहे. तसं झाल्यास दरडी कोसळतील, सरोवरं फुटतील, नद्यांना महापूर येतील. ‘हिमालयीन त्सुनामी’सारख्या महाभयंकर आपत्तींनी दक्षिण आशिया मेटाकुटीला येईल.
२०५५ च्या दिशेने… हे वास्तव असलं तरीही… ‘हिमालय वाचवण्यासाठी’ आठ देशांची पावलं पुढे सरकत नाहीत. २०२० मध्ये आठही देशांच्या मंत्र्यांनी ‘हिंदुकुश हिमालय मॉनिटरिंग अँड असेसमेंट प्रोग्राम’च्या सामायिक प्राधान्यांना मान्यता दिली. परंतु …प्रत्येकाच्या
भू-राजकीय आकांक्षा, राजकीय मतभेदांमुळे वैज्ञानिक सहकार्यात अडथळे येतात. ते सुरक्षेचे कारण सांगून हवामान आणि भौगोलिक माहिती देण्यास टाळाटाळ करतात. बैठकांना उच्चपदस्थ अधिकार्यांना पाठवत नाहीत. परिणामी संयुक्त संशोधन आणि धोरणात्मक काम ठप्प पडलं आहे.
‘आठ शेजार्यांचा असहकार’पाहून ‘इसिमोड’ने नुकताच ३ ऑगस्ट २०२६ रोजी ‘हिमावरण धोरण (रिजनल क्रायोस्फिअर स्ट्रॅटेजी) सादर केलं होतं. त्यात घेतलेले निर्णय असे, ‘हिंदूकुश-हिमालय प्रदेशात हिमनद्या, कायमचा बर्फ आणि रॉक ग्लेशियर्समधील (खडक व बर्फ मिश्रित हिमनद्या) साठवलेल्या बर्फाचा नकाशा तयार करणे. आपत्तीची पूर्वसूचना यंत्रणा उभी करून प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा बळकट करणे. स्थानिक समुदायांचे जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत उपजीविकेचे मार्ग विकसित करणे.’ परस्परावलंबन, सहकार्य आणि समन्वय याला कोणताही पर्याय नाही. केवळ २३ दिवसानंतर, अष्टराष्ट्रांना याची अनिवार्यता नक्कीच जाणवली असेल.
‘तुम्ही बदला अन्यथा हवामान ‘बदला’घेत राहील.’ हाच या आंतरराष्ट्रीय आपत्तीचा धडा आहे. आज नेपाळ आणि चीन हे जात्यात तर उरलेले सहा सुपात आहेत. याविषयी काठमांडू येथील लेखक आणि पर्यावरणीय पत्रकार रमेश भूशाल यांना विचारल्यावर ते म्हणाले, ‘पर्यावरणाला कोणत्याही सीमा नसतात, हे आता आपत्ती दाखवून देत आहे. आपत्तीचे भोग पाहून आता आठही देशांना विचार करावाच लागेल. सामान्य लोकांचा दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.’ याची प्रचीती काही तासांत आली.
नेपाळकडे वस्तू आणि आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. १,१२७ बळी, ५,००० बेपत्ता, तीन जिल्हे उजाड, सुमारे ८०० अब्ज नेपाळी रुपयांची हानी. आठ दिवसांनी हा अंदाज आल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान बलेन शहा संसदेमध्ये येऊन म्हणाले, ‘चीन, अमेरिका आणि भारत यांच्या हरितगृह वायू उत्सर्जनामुळे ही आपत्ती आली असून त्यांनी नुकसानभरपाई दिली पाहिजे. आम्ही संयुक्त राष्ट्रांकडे नुकसान व हानीपोटी (लॉस अँड डॅमेज) मोठ्या निधीची मागणी करणार आहोत. आम्हाला आंतरराष्ट्रीय समुदायाकडून न्याय मिळाला पाहिजे.’
‘दुबळ्या देशांनो, धनाढ्य देशांविरुद्ध एकत्र या’ असा या आवाहनाचा अर्थ आहे. ‘वीज आणि पाण्याचा लाभ तुमचा आणि नुकसान केवळ आमचं? हा कुठला शेजारधर्म?’ हा सहा राष्ट्रांना दिलेला संकेत आहे.
‘तीन पैशाचा तमाशा’ची अखेर रवींद्र साठे यांच्या धीरगंभीर आवाजातील गीताने व्हायची.
‘अमुच्या भाळी उन्मत्तांच्या
लाथा खात राहणे,
लाथा देणार्याहुन
लाथा खाणारेच शहाणे
देता देता एक बात पण
मनात घट्ट धरावी
लाथा खाता आपणही
एखादी ठेवून द्यावी
पाहिलेत इथे तुम्ही ते
इथेच विसरुनी जाणे
हे होते आमच्या खेळातील
एक पैशाचे गाणे’
तिसर्या ध्रुवाच्या कुशीतून आलेल्या हुंकाराचा अर्थ हाच आहे.
uatul.deulgaonkar@gmail.com
