अपूर्व आफ्रिकन सफारी

ऑक्टोबरातली एक रम्य सकाळ. पहाटे पाचचा सुमार. पर्यटकांना जंगल सफारीवर घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शक तसेच वाटाडय़ांची नि:शब्द धावपळ सुरू होती. बरोब्बर अध्र्या तासाने निघालो तर सफारीची मजा काही औरच असेल असे सर्वाना त्यांनी

ऑक्टोबरातली एक रम्य सकाळ. पहाटे पाचचा सुमार. पर्यटकांना जंगल सफारीवर घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शक तसेच वाटाडय़ांची नि:शब्द धावपळ सुरू होती. बरोब्बर अध्र्या तासाने निघालो तर सफारीची मजा काही औरच असेल असे सर्वाना त्यांनी रात्रीच सांगितलेले. त्यामुळे काहीही न बोलता सगळे मुकाट गाडीत जाऊन बसले. आणि सुरू झाला आफ्रिकन जंगल सफारीचा रोमांच! अतिशय विरळ स्वरूपातील तब्बल १४०० हेक्टरमध्ये पसरलेल्या या जंगलात कच्च्या रस्त्यावरून फिरताना एकेक प्राणी दर्शन देऊ लागले. झाडाच्या उंचीशी स्पर्धा करणारा जिराफ, रानगवे, रानम्हशींचे कळप, म्हशींच्या पाठीवर बसून आपले खाद्य शोधणारे निरनिराळे पक्षी असा वन्यप्राणीदर्शनाचा सिलसिला चढत्या रंगतीने सुरू झाला. सकाळी सातच्या सुमारास खास प्राण्यांसाठी तयार केलेल्या एका लहानशा पाणवठय़ावर बऱ्याचदा चित्ते पहुडलेले पाहायला मिळतात. त्या अदमासानुसार अतिशय चपळ व वेगवान म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी अगदी शांतपणे सकाळचे ऊन खात पहुडलेला आम्हाला दिसला. आमची गाडी त्याच्या अगदी जवळ जाऊन उभी राहिली. तिची चाहूल अर्थातच त्याला लागली. त्यामुळे त्याने आमच्याकडे वळूनही पाहिले. पण पुन्हा तो आपल्या मस्तीत गुंग झाला. माझ्यासोबतचे सहकारी भराभर त्याची छायाचित्रे काढू लागले. त्याकरता आपल्याला जणू पोझ द्यायची आहे अशा थाटात त्याचे रुबाबदार वावरणे सुरू होते. जगभरातून खास त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या आम्हा पर्यटकांकडे साफ दुर्लक्ष करत त्या दोन चित्त्यांचे मस्तीत लोळणे सुरू होते. एकाने हालचाल केली की लगेचच दुसराही तशीच हालचाल करणार.. एवढी ही जोडी तादात्म्य पावली होती. चित्त्यांचे दर्शन होताच आमच्या गाडीच्या समोरच्या टपावर खास खुर्चीत बसलेला मार्गदर्शक लगेच मागे येऊन पर्यटकांच्या आसनावर बसला. तिथून वॉकीटॉकीवरून त्याने आपल्या इतर सहकाऱ्यांना ‘इथे चित्ते आहेत..’ ही बातमी कळविली. मग इतरही वाहने हळूहळू त्या ठिकाणी गर्दी करू लागली.
सर्वात आधी तिथे पोहोचलेले आम्ही मग गर्दी टाळत दुसरीकडे निघालो. अर्धा तास अजस्त्र हत्तींचे कळप आणि हरणांच्या झुंडी न्याहाळत आम्ही सकाळी आठच्या सुमारास एका टेकडीच्या पायथ्याशी आलो तेव्हा आम्हाला सिंह आणि सिंहिणीचे दर्शन घडले. भारतात दुर्मीळ मानण्यात येणारा जंगलातील हा अतिशय रुबाबदार प्राणी शांतपणे आमच्याकडे पाहत होता. काही क्षण आमच्याकडे बघायचे आणि नंतर सिंहिणीकडे नजर वळवायची असे त्याचे अर्धा तास सुरू होते. प्राण्यांना चहुबाजूने न्याहाळता यावे, आम्हाला त्यांची नीट छायाचित्रे घेता यावीत यासाठी आमचा गाडीचालक यॉक वेगवेगळय़ा दिशेने गाडी वळवून सिंहांच्या जवळ कसे जाता येईल, याच्या प्रयत्नांत होता.
जणू पर्यटकांसाठीच आपण उभे आहोत अशा थाटात सुमारे पंधरा मिनिटे वावरणारे हे सिंहजोडपे आमचे समाधान झाले असावे असे समजून नंतर जंगलात अदृश्य झाले. सिंह दाम्पत्य निघून गेल्यानंतर आम्हीही पुढे निघालो. तोवर जंगलात कुठेतरी थांबून गरम पेय घेण्याची वेळ झाली होती. यॉकने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. सर्वाना खाली उतरवले. आम्ही सर्वानी गरम चॉकलेट, चहा-कॉफीचा आस्वाद घेतला. पंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा जंगल सफारी सुरू झाली.
सकाळच्या भटकंतीसारखीच सायंकाळचीही सफारी असते. अंधार पडायला सुरुवात झाली की सर्चलाइटच्या उजेडात प्राणी बघायचे, एवढाच फरक. सातच्या सुमारास गाडी जंगलात एके ठिकाणी थांबली. पर्यटकांनी मद्य तसेच शीतपेयांचा आस्वाद घेतला. त्यानंतर अर्धा तास जंगलात फिरून रात्रीच्या बुश डिनरसाठी (जंगलातले जेवण) एका निर्जन स्थळी आम्हाला आणले गेले. इथे पर्यटकांच्या सेवेकरता कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा सज्ज असतो. चारही बाजूंना मशाली पेटवल्या होत्या. मध्यभागी जेवणाचे टेबल. एका बाजूला लागलेल्या भट्टीत विविध मांसाहारी पदार्थ भाजले जात होते. शाकाहारी पदार्थासाठी वेगळी सोय होती. आम्ही आपल्या जागेवर विराजमान झाल्यावर झुलू या आफ्रिकन आदिवासी जमातीतील स्त्रियांचा एक समूह समोरच्या मोकळ्या पटांगणात आला. पारंपरिक वेषातल्या या स्त्रियांनी समूहनृत्य करत झुलू भाषेत पारंपरिक गाणी गायला सुरुवात केली. त्यांची भाषा समजत नसली तरी गाण्याची चाल मात्र प्रत्येकाला ठेका धरायला लावणारी होती. आम्हीही पुरुषांपेक्षा जराही कमी नाही, अशा आशयाची ही गाणी होती. अध्र्या तासाचा हा झुलूनृत्याचा कार्यक्रम संपल्यावर साग्रसंगीत जेवण झाले आणि रात्री नऊच्या सुमारास आम्हा सर्वाना आमच्या निवासस्थानी सोडण्यात आले. अशा तऱ्हेने आमच्या जंगल सफारीचा पहिला दिवस मावळला.
हे सारे अनुभवताना भारतात असे चित्र कधी बघायला मिळेल का, असा सवाल मनात उभा राहिला. दुर्दैवाने त्याचे उत्तर ‘नाही’ असेच येते. दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच भारतातही समृद्ध जंगले आहेत व त्यात अधिवास करणारे विपुल वन्यजीवनही आहे. मुख्य म्हणजे आफ्रिकेत अजिबात न आढळणारा वाघ आपल्याकडे आहे. भारतातील या जंगलसंपत्तीचे जतन करणारा  आदिवासी समाज आपल्याकडे आहे. तरीही सरकार नावाची यंत्रणा व तिने केलेले कायदे यांतच गेली साठ वष्रे भारत अडकून पडल्याने ‘जंगलावर आधारीत पर्यटन’ ही संकल्पनाच आपल्याकडे मूळ धरू शकलेली नाही. भारतात व्याघ्रप्रकल्प आहेत. तिथे नियमित जाणारे पर्यटकही आहेत. मात्र, देशातल्या अशा प्रकल्पांच्या ठिकाणी भर जंगलात थांबून कॉफी पिण्याची संधी आपण कधीच उपलब्ध करून देणार नाही, इतके आपण कायद्याच्या कचाटय़ात अडकलो आहोत. आपल्याकडे काय करावे, यापेक्षा काय करू नये, याचीच यादी नेहमी लांबलचक असते. देशातले जंगल व वन्यजीव आजवर ज्यांनी सांभाळले तो आदिवासीच जंगल व प्राण्यांचा शत्रू आहे अशीच आपल्या प्रशासकीय यंत्रणेची धारणा आहे. आजवर राखलेले जंगल व वन्यजीव हे केवळ सरकारी यंत्रणेनेच सांभाळले अशी त्यांची समजूत आहे. शासकीय यंत्रणेची हीच झापडबंद मानसिकता आपल्याला मागे नेत आहे. तर जग याबाबतीत आपल्या कितीतरी पुढे गेले आहे, हे आफ्रिकन सफारीचा अनुभव घेताना जाणवते.
प्रारंभी वर्णन केलेला वृत्तान्त हा दक्षिण आफ्रिकेतील क्वावा झुलू नाताळ प्रांतात असलेल्या थांडा राष्ट्रीय प्रकल्पामधील आहे. झुलू आदिवासींची वस्ती असलेल्या या प्रांतात एकूण पाच प्रकल्प आहेत व ते सर्व खासगी आहेत. केवळ याच प्रांतात नाही, तर संपूर्ण आफ्रिकेत क्रूगेर नॅशनल पार्कचा अपवाद वगळता सर्व प्रकल्प खासगी मालकीचे आहेत. इथेही क्रूगेरला भेट देणारे पर्यटक कमी आणि खासगी प्रकल्पांत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आढळते. भारतातील एक उद्योगपती विजय मल्ल्या यांचाही आफ्रिकेत एक पार्क आहे. भारतात जंगलांचे खासगीकरण करायचे म्हटले तर केवढा गदारोळ होईल याची कल्पनाही करवत नाही. आफ्रिकेत मात्र ते विनासायास झाले आहे. डरबनहून २९० कि.मी. अंतरावर हे थांडा नॅशनल पार्क आहे. ‘थांडा’ हा झुलू भाषेतील शब्द. त्याचा अर्थ ‘प्रेम’! १४०० हेक्टरच्या या जंगलात ठिकठिकाणी पर्यटकांसाठी तंबू उभारले आहेत. हे तंबू पंचतारांकित सोयींनी सुसज्ज असले तरी भारतीय रुपयांत त्याचे दिवसाचे भाडे पाच हजारापेक्षा जास्त नाही. सिमेंट व विटांचा अजिबात वापर न करता केवळ लाकूड व काचांचा वापर करून उभारलेले हे तंबू पर्यटकांना प्रेमात पाडतात. प्रत्येक तंबूभोवती असलेल्या तारांच्या कुंपणात रात्रीच्या वेळी वीजप्रवाह सोडला जातो. तंबूच्या आजूबाजूला पाणवठा असतो. मदतनीसाशिवाय पर्यटकांना तंबूतून बाहेर पडता येत नाही. मात्र दुपारी तंबूच्या बाहेर आलो की पाणवठय़ावर पाणी प्यायला आलेल्या प्राण्यांचे मनसोक्त दर्शन घडते.
या प्रकल्पांमध्ये केवळ तंबूच नाहीत, तर ठिकठिकाणी मोठे आलिशान महालही (व्हिला)आहेत. त्यातही पर्यटकांना राहता येते. पर्यटकांच्या दिमतीला असणारा सगळा कर्मचारीवर्ग झुलू या आदिवासी जमातीतील आहे. त्यांची गावेही याच जंगलात आहेत. आफ्रिकेतील जंगलांच्या खासगीकरणामुळे आदिवासी युवकांना रोजगार मिळाला आहे. तेथील सरकारने झुलू जमातीच्या संस्कृतीला थेट पर्यटनाशी जोडले आहे. भारतात सरकारी प्रकल्पांत काही मार्गदर्शकांचा (गाइड)अपवाद वगळता असा प्रयोग अजूनही बाल्यावस्थेतच आहे. भारतातील व्याघ्रप्रकल्प व अभयारण्यात आढळणारा कोअर आणि बफर झोन हा प्रकार आफ्रिकेत अजिबात नाही. पर्यटकांना अगदी दूरवर घेऊन जाण्यासाठी तयार करण्यात आलेले रस्ते, त्यावर वाहनांची गर्दी होणार नाही अशा पद्धतीने तयार केलेले वळणरस्ते, प्रत्येक पाणवठय़ाभोवती वाहने फिरवता येतील अशी करण्यात आलेली त्यांची रचना, त्याचप्रमाणे मार्गदर्शक व गाडीचालकांना वन्यप्राण्यांविषयी देण्यात आलेले शास्त्रशुद्ध प्रशिक्षण यामुळे ही सफारी अगदी आगळीवेगळी ठरते. याच्या उलट अनुभव भारतात येतो. कोअरच्या नावावर पर्यटकांना करण्यात येणारी नाकेबंदी, पर्यटकांशी उद्धट व तुसडेपणाने वागणारे वनकर्मचारी, प्रत्येक गोष्टींत (कॅमेरा, परदेशी पर्यटक) वेगवेगळय़ा शुल्करूपाने पैसे-वसुली, वनाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारानुसार पर्यटकांना रस्ते मोकळे करणे- या गोष्टी आपल्याकडे सर्रास आढळतात.
आफ्रिकेत मात्र पर्यटकांप्रती सर्वत्र सौजन्यशील वृत्ती दिसून येते. विदेशी म्हणून भारतीयांकडून जास्तीचे पैसे आकारले जात नाहीत. आफ्रिकेत जंगलांचे खासगीकरण झालेले असले तरी वृक्षतोड, वन्यप्राण्यांची शिकार याबाबतचे नियम तिथेही अतिशय कडक आहेत. प्रकल्पाच्या मालकालाही इथे शिकार करता येत नाही. वन्यजीव संवर्धनाच्या बाबतीत इथेही भारतासारखेच नियम व कायदे आहेत. तथापि आपल्या तुलनेत आफ्रिकेत वन्यजीवांची काळजी अधिक संवेदनशीलतेने घेतली जाते.
आम्ही सफारी केलेल्या थांडा प्रकल्पात नव्याने दाखल होणाऱ्या प्राण्यांसाठी स्वतंत्र झोन तयार केला आहे. या झोनमध्ये जंगलाचा एक भाग वेगळा करण्यात आला आहे. आम्ही तिथे गेलो असताना दुसऱ्या प्रकल्पातून आणलेल्या एका सिंहाच्या छाव्याला तिथे ठेवण्यात आले होते. त्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी असतात. तो छावा नव्या जंगलात रूळेपर्यंत त्याला वेगळे ठेवले जाईल, असे तिथले कर्मचारी सांगत होते. या पिलाचे खाणेपिणे, त्याच्या तब्येतीची काळजी तत्परतेने घेतली जात होती. भारतात प्राण्यांच्या अशा स्थलांतरणाचे प्रयोग झाले आहेत खरे; पण त्याचे प्रमाण फार नाही. या खासगी प्रकल्पांतील प्राण्यांचीसुद्धा नियमितपणे गणना होते. त्याची सरकारदरबारी नोंद ठेवली जाते.
दरवर्षी पर्यटन व वनविभागाचे अधिकारी प्रत्येक प्रकल्पाची पाहणी करून त्या प्रकल्पांना रेटिंग देतात. या रेटिंगवरून पर्यटक कुठे जायचे, ते ठरवतात. नाताळ प्रांतामधली झुलू जमात कलाकुसरीच्या वस्तू तयार करणारी म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या प्रत्येक प्रकल्पात अशा वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात. ज्यांना या प्रकल्पांत थेट रोजगार मिळालेला नाही त्यांच्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे. नाताळ प्रांतातील या भागाला अजूनही ‘झुलू राष्ट्र’ असेच संबोधले जाते. १८ व्या शतकात येथे वसलेल्या या जमातीने दोनदा इंग्रज वसाहतवाद्यांचा पराभव केला व त्यांना या भागातून पिटाळून लावले. हा पराभव करणारा झुलूंचा राजा शाका याच्यावर आजही इथल्या लोकांची श्रद्धा आहे.
डरबनपासून निघालो की प्रत्येक पेट्रोल पंपावर व हॉटेल्समध्ये झुलूंची माहिती देणारी पत्रके मोफत वितरणासाठी ठेवलेली असतात. पर्यटकांसाठी वर्षभर कोणत्या सफारी होणार, कुठे होणार, याचीही माहिती त्यात असते. प्रत्येक प्रकल्पात काय सोयी आहेत, हेही दिलेले असते. जास्तीत जास्त पर्यटकांना कसे आकर्षित करता येईल, यासाठी प्रयत्न होताना दिसतात.
याच्या अगदी उलट परिस्थिती भारतात आढळते. नागपुरात उतरल्यावर ताडोबा व पेंच कुठे आहे, असे कुणाला विचारले तर ‘माहिती नाही’ असे उत्तर मिळते. आफ्रिकेतील प्रत्येक विमानतळावर या सफारींची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष आहेत. त्या तुलनेत भारतातले पर्यटन खाते अतिशय मागासलेले आहे. विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या दक्षिण आफ्रिकेत ऑक्टोबरमध्ये हवामान उबदार असते. त्यामुळे या काळात तेथील विमाने जगभरातील पर्यटकांनी भरलेली असतात. दुर्दैवाने भारतात पावसाळा वगळता इतर मोसमांत उत्तम हवामान असूनसुद्धा परदेशी पर्यटक कमी संख्येने येताना दिसतात. आफ्रिकन जंगल सफारीचा अनुभव घेतल्यावर भारताचा विचार करताना मात्र आपण याबाबतीत किती मागास आहोत याचा प्रत्यय येतो. हे चित्र कधीतरी बदलेल का, असा प्रश्न मनात उभा ठाकतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tour african safari

ताज्या बातम्या