आमच्या मित्रवर्यापैकी काही साहसींनी लडाखची ट्रीप आखली.  १८,५०० फुटांपर्यंत जायचे म्हणजे उंचीवरील विरळ हवेचा त्रास होणार. पण आम्ही जायचेच असे ठरवले. आमच्या टूर ऑपरेटरनी गोळ्या, औषधे आणि ऑक्सिजन सिलेंडर्सचीही जय्यत तयारी असल्याची खात्री दिली. आम्ही एकूण २४ झालो. वय वर्षे ७ ते ६८. वायुवेगे श्रीनगरला पोहोचायचे ठरले. मग मुंबई ते दिल्ली व तिथून श्रीनगर असे प्रस्थान केले.
दिल्ली सोडल्यावर थोडय़ा वेळातच डोळ्यांचे पारणे फिटावे असे हिमालयाचे विहंगम दृश्य दिसले. त्या हिमाच्छादित शिखरांना बघून एक सहजसाधी उपमा मनात आली. त्या सर्व शिखरांना पांढरे शुभ्र ‘आइसिंग’ केले आहे असे वाटत होते. ही उपमा मनात येताच एकदम लक्षात आले की, केकवरील लेपाला ‘आइसिंग’ का म्हणतात.
श्रीनगरहून सकाळी सोनामार्गकडे जाण्यास निघालो. बाहेर पडताच एक खळाळती नदी ओलांडली. ही कोणती नदी असे विचारता, सिंधू नदी असे उत्तर मिळाले, तेव्हा सुखद धक्का मिळाला. शाळेत सिंधू नदी भूगोलात भेटली होती. तीच आम्हाला सोबत करत होती. मध्ये मध्ये सिंधूऐवजी तिच्या उपनद्या सोबत करत होत्या.
दुसऱ्या दिवशी द्रासमार्गे कारगील गाठायचे होते. खरे तर सोनामार्गला राहण्याचे ठरले होते, पण मिलिटरीच्या नियमानुसार कारगील मार्गावरील एकतर्फी वाहतुकीचे दिवस ठरलेले असतात. त्यानुसार दुसऱ्या दिवशी आम्हाला प्रवेश होता. म्हणून आम्ही लडाखच्या प्रवेशद्वाराकडे- जोझिलाकडे प्रस्थान केले. लडाखच्या सृष्टिसौंदर्यातील विविधता थक्क करून टाकते. पर्वतरांगातील रंगप्रकार, आकार यातील वैविध्य अविश्वसनीय वाटते. पर्वतात पिवळ्या रंगाच्या विविध छटा दिसतात. एक करडा तर दुसरा मातकट, तिसरा काळा चकचकीत, चौथा निव्वळ कातळ, पुढचा अचानक वाळूचा! दगड हिरवे, निळे तर डोंगर पांढरा, संगमरवरी रंगाचा. एका क्षणी आपण नयनरम्य अशा प्रचंड दरीकडे बघत असतो, तेथे लालसर माती, खडकांचे सौंदर्य असते.  याउलट शेजारी प्रसन्न हिरवेगार सृष्टीसौंदर्य. घाट लांबलचक व सतत नागमोडी. मोटार प्रवासातला हा निसर्गानुभव आगळाच!
तिसऱ्या दिवशी जसजसे कारगील जवळ पोहोचू लागलो तसतसे कारगीलने भोगलेल्या यातनांचे अवशेष दिसू लागले. चेकपोस्टच्या बाजूलाच एक प्रचंड मोठी स्लॅब उद्ध्वस्त होऊन पडलेली दिसली. त्यावर बंदुकांच्या गोळ्यांचा वर्षांव झाल्याच्या खुणा होत्या.
कारगीलचा निरोप घेतला तेव्हा नऊ वाजले होते. वाटेत लामायुरू हा सर्वात जुना भिक्खू मठ बघून अल्पीमार्गे लेह गाठायचे होते. तेथे पद्मसंभवाचा सुंदर पुतळा आहे. पुढे अल्पीला हजार हातांचा व अकरा डोक्यांचा अवलोकितेश्वर बुद्ध आहे. त्याला बुद्धाच्या कनवाळूपणाचे प्रतीक म्हणतात. शरीरावर तीन डोकी. त्यावर तीन, त्यावर तीन, त्यावर एक व त्यावर एक अशी एकूण ११ डोकी आहेत. प्रत्येकावर दया दाखवणारा, हजारो हातांनी मदत देणारा, असे प्रतिकात्मक रूप आहे.
रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्य, पर्वतरांगांतील विविधता बघताबघता लक्षात आले की, गाडय़ांचा वेग कमी झाला आहे. कारण विचारले तेव्हा सारथी म्हणाला, येथे चुंबकीय दगडांचे डोंगर आहेत. तेथून पुढे १०० मी. जाताच चुंबकीय क्षेत्र संपले.
लेहच्या आधी राजघराण्याची राजधानी (ल्हा चेन व नामग्याल घराणे) ‘स्टोक’ लागली. तेथे राजकुटुंब राहत होते. त्यांच्या राजवाडय़ाची दुसरी बाजू पर्यटकांसाठी खुली केली आहे. नंतर नऊ मजली शी मोनास्ट्री बघितली. पुढे शांतीस्तूप आणि डोंगरावर  आणखी उंचावर बांधलेले मंदिर पाहिले. गेल्या १५-२० वर्षांत बांधली गेलेली ही वास्तू. तेथून उंचावरून पूर्ण लेह शहर, स्टोक शहर, विमानतळ, सिंधूचे खोरे अशा विस्तीर्ण प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसत होतं. चारी बाजूला हिमालय पहारा देत होता. तेथून पुढे  अध्र्या तासाच्या प्रवासानंतर स्टोक पॅलेसला पोहोचलो. तेथे राजघराण्यातील दागदागिने, नाणी, फोटो ठेवले होते.
संध्याकाळी हॉल ऑफ फेम या संग्रहालयास भेट दिली. भारतीय हवाईदल व फौजांनी त्या भागात कसकशी सुधारणा केली, कारगीलमध्ये कशी मर्दुमकी गाजवली याबद्दलचा संपूर्ण ताजा इतिहास डोळ्यासमोर उभा केला गेला आहे. आपल्या जवानांबद्दल अभिमानाने, व्यथेने ऊर भरून आला. त्यांचे खडतर आयुष्य, निष्ठा जाणवली आणि नाही म्हटले तरी आपल्या ऐषोरामाची लाज वाटली.
पुढील दिवशी खार्दुल्ला पासद्वारे नुब्रा व्हॅलीला जायला निघालो. ही पास १६,३८० फुटांवर होती. हा जगातील सर्वात उंच जाणारा मोटार रस्ता आहे. त्या सर्वोच्च उंचीवर आपले सैन्य सीमेचे रक्षण करते. या पूर्ण प्रवासानंतर परत नुब्रा व्हॅली हॉटेलमध्ये रात्रीची विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी रस्त्यावरील खेडी बघत लेहला रात्री मुक्कामाला पोहोचलो.
आता दहावा दिवस होता. पुन्हा गाडय़ांत बसून प्रवास करण्यास आमच्या थोडेसे जिवावर आले होते, पण पाच-सहा तासांच्या प्रवासानंतर एक अविस्मरणीय दृश्य दिसले. तेथील पँगाँग लेक बघून आयुष्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. चांगला पास या १८,००० फुटांवरील खिंडीतून हे सरोवर बघावयास गेलो. हे सरोवर १५,००० फूट उंचीवर खाऱ्या पाण्याने बनलेले आहे. हे एक निसर्गाचे आश्चर्यच आहे. त्याचा अथांगपणा, बदलणारे रंग अवाक करतात. त्याची मालकी ३५ किलोमीटर भारताची आणि पुढची ७० कि.मी. चीनची आहे. असे हे प्रचंड मोठे व नयनरम्य सरोवर नंतर आमीर खानच्या ‘थ्री इडियट्स’मध्ये दाखवले गेले, तेव्हा ती पुनर्भेटही सुखावून गेली.
लक्षावधी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात उलथापालथ होऊन हिमालय समुद्रातून वर आला आणि तेव्हा हा समुद्री पाण्याचा अंश येथे आला. पँगाँगसमोरून हलावेसे वाटत नव्हते. तेथे राहण्याची सोय होती; पण, कष्टी मनाने त्याचा निरोप घेऊन पुन:श्च लेहकडे प्रयाण केले.
या सर्व प्रवासात जेथे जेथे आम्हाला स्थानिक लोक भेटत, ते ‘ज्यूले’ म्हणून अभिवादन करत. त्यांचं हे ‘हॅलो’ म्हणणं फारच गोड वाटत असे, कारण या खडतर प्रदेशात राहूनही त्यांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचं हसू पसरलेलं दिसे, ते आपण शहरी धकाधकीत हरवून बसलो आहोत! म्हणून अधूनमधून असं ‘ज्यूले ज्यूले’ अनुभवून ताजंतवानं होणं आवश्यक ठरतं!