जगप्रसिद्ध संगीतरचनाकार मोझार्ट यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी बघायची म्हणून ऑस्ट्रियामधल्या व्हिएन्ना आणि साल्झबर्गची ट्रिप ठरवली. ‘साऊंड ऑफ म्युझिक’ या आवडत्या चित्रपटाच्या निर्मितीशी साल्झबर्गचं असलेलं जिव्हाळ्याचं नातं हेही भेटीचं आणखी एक प्रयोजन होतंच. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे तसं बहुरंगी सांस्कृतिक शहर! तिथला तीन दिवसांचा मुक्काम आटोपून साल्झबर्गला पोहोचलो आणि या थंड हवेच्या, निसर्गरम्य शहराने अक्षरश: मोहिनी घातली. व्हिएन्नापेक्षा काहीसं शांत अन् हिरव्यागार टेकडय़ांना कवेत घेऊन वसलेलं टुमदार साल्झबर्ग एखाद्या सुंदर निसर्गचित्रात शोभावं असं देखणं शहर आहे. थंड, शुद्ध हवा, मे महिन्यात कोसळणारी एखादी पावसाची सर, शहराच्या मध्यभागातून खळाळत वाहणारी साल्झ नदी, उद्यानं, वृक्षराजी यांनी वेढलेल्या साल्झबर्गला ‘स्वर्गीय शहर’ का म्हणतात, हे तिथं पोहोचल्यावर कळलं. इथल्या मुक्कामात बरंच काही पाहायचं ठरवलं होतं. मोझार्ट म्युझियम, मोझार्टचं जन्मस्थान, साऊंड ऑफ म्युझिक टूर, मीराबेल गार्डन या अजेंडय़ावरच्या पहिल्या गोष्टी लगोलग पाहिल्या. साल्झबर्गजवळ असलेल्या ऑस्ट्रियातल्या इन्सब्रुक शहराची एक दिवसाची ट्रिपही झाली.
पुण्याहून निघताना ‘ईगल्स नेस्ट’ हे हिटलरचं आल्पस् पर्वतराजीत दडलेलं विश्रांतिगृह साल्झबर्गपासून जवळ आहे असं कळलं होतं. एक दिवस हाताशी होता. हॉटेलमध्ये चौकशी केली. दुसऱ्या दिवशी सकाळीच टॅक्सी ठरवली आणि बाहेर पडलो. ‘ईगल्स नेस्ट’ हे ऑस्ट्रिया-जर्मनीच्या सीमेवरील बव्हेरिया प्रांतातल्या बर्चेस गार्डन भागात येतं. बर्चेस गार्डन साल्झबर्गपासून ३० कि.मी.वर आहे. पण ते येतं पश्चिम जर्मनीत! बर्चेस गार्डनजवळ पोहोचल्यावर गाडी घाटमार्गाला लागली. गर्द झाडी, शीतल हवा, दूरवर दिसणाऱ्या आल्पस् पर्वतरांगा पाहत डोंगरमाथ्यावरच्या ऑबरसाल्झबर्ग या टुमदार गावानजीक पोहोचलो.
बर्चेस गार्डन, ऑबरसाल्झबर्ग हा सगळा भाग दुसऱ्या महायुद्धात थर्ड राईश प्रमुखांचा गुप्त तळ होता, असं कुठंतरी वाचलं होतं. अ‍ॅडॉल्फ हिटलर, गोअरिंग, बोरमन यांची बर्चेस गार्डनला फार्महाऊसेस होती, हे वि. ग. कानिटकरांच्या ‘नाझी भस्मासुराचा उदय’ या पुस्तकात वाचलंही होतं. पण या साऱ्या अप्रिय आठवणी व खुणा जर्मनीने आता पुसून टाकल्या आहेत. नाझी अधिकाऱ्यांची घरं, सैनिकी बॅरॅक्स, बंकर्स यांचे केवळ अवशेषच आता तिथं असावेत असं म्हटलं जातं. पण तिथेच केहलस्टेन पर्वताच्या शिखरावर निमुळत्या थोडक्या जागेवर बांधलेलं गरुडाचं घरटं अर्थात ‘ईगल्स नेस्ट’ मात्र अजूनही होतं तसंच आहे. अ‍ॅडॉल्फ हिटलरचं हे समर रिट्रीट आजही तिथे पोहोचेपर्यंत धडकी भरवतं.
ऑबरसाल्झबर्गजवळच्या हिंटेरेकवरून ‘ईगल्स नेस्ट’ला जाण्यासाठी खास छोटय़ा बस आहेत. तिकीट काढून आम्ही बसमध्ये चढलो. या बसचंही काटेकोर नियोजन असं, की वर येणारी-जाणारी कुठलीही बस एकमेकीला क्रॉस होत नाही. अर्थात तिथे जागाच नाही.
बस केहलस्टेन पर्वत चढू लागली. सहा कि.मी.चा तो रस्ता जणू धुक्यात तरंगत होता. बाहेरची गर्द झाडी धुक्यात लपेटलेली होती. तेवढय़ा रस्त्यात तब्बल पाच बोगदे मी मोजले. हे बोगदे बॉम्बफेकीतून वाचण्यासाठी हाइडआऊट म्हणून बांधले गेले होते, ही माहिती नंतर कळली. बस थांबली. खाली उतरलो तर धुक्यामुळे पुढय़ातलं काही दिसतच नव्हतं. उन्हाळ्यातले केवळ चार महिने प्रवाशांसाठी उघडणाऱ्या ‘ईगल्स नेस्ट’ची पुढची चढाई समोर आली. काही पावलांवरच पिवळ्या-मरून ग्रॅनाइटस्नी मढवलेला मोठा बोगदा समोर आला. थंडी आणि दाट धुक्यातून स्वत:ला सावरत त्या बोगद्यामध्ये शिरलो. बोगदा थोडा पाणथळ होता; पण आत दिवे व पथदर्शक होते. केहलस्टेन पर्वतावर आम्ही साडेपाच हजार फुटांवर आलो होतो हे तिथं गेल्यावरच कळलं.
बोगद्याच्या पलीकडच्या टोकावर छोटी लॉबी आणि त्याला लागूनच लिफ्ट होती. आतून चकचकीत ब्रास पॉलिशची ती लिफ्ट १९३८ सालापासून आजतागायत वापरात आहे, हे कळताच काही काळ मतीच कुंठित झाली. पुढच्या ४० सेकंदांत ती लिफ्ट डोंगराच्या पोटातून आम्हाला आणखीनन ४०६ फुटांवरील ‘ईगल्स नेस्ट’मध्ये सरळ घेऊन गेली. लिफ्टमधून बाहेर पडलो आणि कॉरिडॉरमधून गॅलरीकडे आलो. बाहेर धुक्याची दाट चादर होती. स्वच्छ सूर्यप्रकाशित वेळेला इथून आल्पस् पर्वताच्या ३६० डिग्री कोनातला नयनरम्य नजारा दिसतो असं तिथं लिहिलेलं होतं. पण त्या दिवशी तो योग नव्हता. गॅलरीतल्या चार पायऱ्या चढून ‘ईगल्स नेस्ट’मध्ये शिरलो.
इथे येण्यापूर्वी या वास्तूची थोडी माहितीही मिळविली होती. गरुडाच्या घरटय़ासारखी डोंगरकपारीत दडलेली ही छोटेखानी बिल्डिंग अ‍ॅडॉल्फ हिटलर या हुकूमशहाला वाढदिवसाची भेट म्हणून त्याचा महत्त्वाकांक्षी सहकारी मार्टिन बोरमन याने बांधून घेतली. १९३८ साली या अवघड रस्त्यासकट हे बांधकाम पूर्ण झालं आणि २० एप्रिल १९३९ या दिवशी हिटलरच्या पन्नासाव्या वाढदिवसाला ‘ईगल्स नेस्ट’ त्याच्या नॅशनल सोशालिस्ट पार्टीतर्फे त्याला भेट देण्यात आलं.
ऑस्ट्रियामध्ये जन्मलेल्या हिटलरला बर्चेस गार्डन आणि ऑबरसाल्झबर्गचा परिसर अत्यंत प्रिय होता. पुढे सत्तेत आल्यावर हिटलर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी इथे घरं बांधली. या परिसरात त्यांचा सतत राबताही असे.
थर्ड राईशचे महत्त्वाचे निर्णय व खलबते इथे झडत. त्यामुळे तिथून जवळच असलेल्या केहलस्टेन पर्वतावर ‘ईगल्स नेस्ट’ बांधलं गेलं. बर्चेस गार्डन आणि ऑबरसाल्झबर्गमधल्या थर्ड राईशशी संबंधित सगळ्या मोठय़ा इमारती, हिटलरचं प्रिय ‘बर्गहॉफ’ हे इथलं घर, गोबेल्स, बोरमन यांची घरं.. हे सारं १९४५ साली युद्धसमाप्तीच्या वेळी रॉयल एअरफोर्सच्या बॉम्बहल्ल्यात उद्ध्वस्त झालं. तो कालखंड विसरू पाहणाऱ्या नंतरच्या जर्मन शासकांनी या घरांचे उरलेसुरले अवशेषही उखडून टाकले. पण ‘ईगल्स नेस्ट’ मात्र त्यातून वाचलं.
बव्हेरियाचे तेव्हाचे प्रांत अधिकारी जॅकोब यांनी पर्वतराजीत दडलेली ही वास्तु आणि तिथे जाणारा रस्ता स्थापत्याचा अनोखा नमुना म्हणून प्रयत्नपूर्वक बॉम्बहल्ल्यातून आणि नंतरच्या पाडापाडीतून वाचवला. हिटलर आणि थर्ड राईशच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचा वावर असलेलं ‘ईगल्स नेस्ट’ त्यामुळेच पूर्वी जसं होतं तसंच आजही पाहायला मिळतं.
गॅलरीतून चार पायऱ्या चढून वर गेलं की एक मोठा कॉन्फरन्स हॉल, तीन पायऱ्या खाली उतरून परत छोटा हॉल आणि तीन बाजूंच्या गॅलरीज् एवढाच या वास्तूचा महत्त्वाचा भाग!
एकेकाळचा प्रशस्त कॉन्फरन्स हॉल आता रेस्तराँमध्ये रूपांतरित झालेला आहे. आत अजूनही जुनं ग्रॅनाइटनी मढवलेलं बांधकाम जसंच्या तसं बघायला मिळतं. हॉलच्या तिरप्या कोपऱ्यात एक लाल मार्बलची फायरप्लेस आहे. जवळून पाहिलं तर त्यावर १९३९ हे सालही कोरलेलं दिसतं. इटलीचा सत्ताधीश मुसोलिनीने ‘ईगल्स नेस्ट’च्या भेटीत फ्युररसाठी ही खास इटलीहून आणलेली वस्तू आहे. तीन पायऱ्या उतरल्यावर खालच्या छोटय़ा हॉलमध्येही रेस्तराँचा वाढीव भाग आहे. सिलिंग, भिंती, फरशा सगळं नीट जपून ठेवल्यामुळे या छोटय़ा हॉलमध्ये जणू काळच थबकला आहे असं वाटतं.
त्या छोटय़ा रेस्तराँमध्ये बसून आम्ही कॉफी व सॅन्डविचचा आस्वाद घेतला. जगाच्या इतिहासात कुप्रसिद्ध ठरलेले शासक व अधिकारी कधीकाळी इथे बसले होते, या कल्पनेने मनाला काहीशी अस्वस्थताही आली.
इतिहासातल्या नोंदीनुसार हिटलरने ‘ईगल्स नेस्ट’ला मोजक्याच भेटी दिल्या. त्याची सहचरी इव्हा ब्राऊन मात्र इथे वारंवार येत असे. इव्हा ब्राऊनची बहीण ग्रेटी आणि नाझी सैन्याधिकारी इरमन फेगेली यांच्या विवाहानिमित्त इथे ३ जून १९४४ रोजी पार्टी आणि नृत्याचा कार्यक्रम झाला होता. परंतु हिटलर त्याला अनुपस्थित होता. पुढे १९४५ साली युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात हिटलरने बर्लिनच्या चॅन्सेलरीमधल्या बंकरमध्ये तळ ठोकला आणि ३० एप्रिल १९४५ रोजी इव्हा ब्राऊनसहित तिथेच आत्महत्या केली, हा इतिहास सर्वश्रुत आहे.
हिटलरचं काही काळ वास्तव्य असलेलं बर्चेस गार्डन, ऑबरसाल्झबर्ग आणि ‘ईगल्स नेस्ट’ ही स्थानं आता जर्मनीत पर्यटनस्थळं म्हणून विकसित झाली आहेत. पण हा देखणा, निसर्गरम्य परिसर नकोशा इतिहासाचं ओझं वागवतो आहे, हे तिथं गेल्यावर कळतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trip to vienna and salzburg in austria
First published on: 12-05-2013 at 01:02 IST