सतराव्या शतकातील हिंदू धर्माचे स्वरूप पाहण्यासारखे होते. इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकापासून- म्हणजेच शुंग काळापासून सनातन वैदिक धर्माच्या पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू झाली होती. या सनातन वैदिक- अर्थात ब्राह्मणी धर्माने तोवर विविध जमातींच्या देवता, पूजाविधी, आचारविचार आत्मसात करण्याचा सपाटा लावला होता. हिंदुस्थानात आजही अनेक उपासना संप्रदाय आहेत. तेव्हाही होते. ते सर्व पुरोहितशाहीच्या छत्राखाली आणण्यात आले. कितीतरी प्रकारची दैवते होती. आकाशातील ग्रहांपासून पृथ्वीवरील पर्वत, अरण्ये, नद्या, पशू, पक्षी, मनुष्यप्राणी, एवढेच नव्हे तर धड मनुष्याचे नि तोंड हत्तीचे वा सिंहाचे अशा काल्पनिक गोष्टींनाही देवत्व देण्यात आले. तुकोबा ज्यांना ‘सेंदरीहेंदरी दैवते’ म्हणतात अशा अनेक क्षुद्र देवतांची पूजा करण्यात येत होती. जनमानसावर पकड बसविण्यासाठी सनातन वैदिक धर्माने अशा सर्व लोकदेवतांना, उपासना पंथांना प्रामाण्य बहाल केले. त्या देवतांना समरसता वा समन्वयातून ब्राह्मणी धर्माचा भाग बनविण्यात आले. त्यातील अनेकांचे उन्नयन करण्यात आले. यामध्ये अनेक अवैदिक देवतांचाही समावेश होता. शैव आणि वैष्णव हे वेगळे संप्रदाय. तेही आता सनातन वैदिक धर्माचे भाग बनले होते. यात पुराणांच्या लेखकांनी मोठी भूमिका बजावली. या सर्वामुळे आधी बौद्ध, नंतर जैन, लिंगायत अशा धर्माचे तगडे आव्हानही हा वैदिक धर्म पेलू शकला. इस्लामी आक्रमण पचवू शकला. या दैवते आणि संप्रदायांच्या संमीलनीकरणाच्या प्रक्रियेतून हा ब्राह्मणी धर्म तगला, फोफावला.

पण त्याचे स्वरूप आता संघराज्यासारखे झाले होते. केंद्रीय सत्ता वैदिक सनातन धर्माची. कायदा श्रुतीस्मृतिपुराणोक्त. त्याखाली विविध पंथ, संप्रदाय, देवदेवता. साधारणत: अकराव्या शतकात विज्ञानेश्वराने याज्ञवल्क्यस्मृतीवरील ‘मिताक्षरी’ हा ग्रंथ लिहिला. आजही महाराष्ट्रात धार्मिक बाबतीत हाच ‘मिताक्षरी’चा कायदा लागू आहे. जोवर केंद्रीय कायदा झुगारून देण्याचा प्रयत्न होत नाही, तोवर मग कोणी अगदी मुस्लीम पीर आणि संतांची पूजा केली तरी हरकत नाही, असे हिंदू धर्माचे स्वरूप झाले होते. यातून वर्णाश्रमधर्म अधिक बळकट झाला. त्यातून पुन्हा पुरोहितशाहीच शक्तिशाली झाली.

Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
village maps
गाव नकाशे नसल्याने मच्छीमारांचे अस्तित्व धोक्यात, पंचवीस वर्षांपासून प्रतीक्षा

महाराष्ट्रात हिंदू धर्माच्या या स्वरूपाविरोधात पहिल्यांदा आवाज उठविला तो तेराव्या शतकात चक्रधरस्वामींनी. त्यांनी वर्णविषमतेला आव्हान दिले. त्या काळात हेमाद्री वा हेमाडपंत हा यादवांचा मुख्य मंत्री होता. ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा त्याचा ग्रंथ. वर्षांतील ३६५ दिवस कोणती व्रते, उद्यापने, विधी करायचे याची जंत्रीच त्याने त्यात दिलेली आहे. चक्रधरांचा लढा त्याच्याशी होता. त्यासाठी त्यांनी कृष्णपूजेला महत्त्व दिले. तत्पूर्वी नाथ संप्रदायाने वेदांना झुगारून शिव या दैवताची आराधना सुरू केली होती. याच काळात वीरशैव हा एकेश्वरवादी पंथ समाजप्रिय झाला होता. एकंदर सर्वच हिंदू पंथप्रवर्तकांपुढे देवतांचा गलबला हे एक मोठे आव्हान होते. एक नाथपंथाचा अपवाद वगळता हे सर्व भक्तिमार्गी होते, हे विशेष. हा मार्ग विद्रोहाचा होता. बहुदैवतवादास विरोध हे त्या विद्रोहाचे एक महत्त्वाचे अंग होते. सतराव्या शतकात तुकोबांनी याच विद्रोहाची मशाल तेवती ठेवली होती. नाना प्रकारची दैवते आणि त्यांची कर्मकांडे या विळख्यातून सामान्यजनांची सुटका करण्यासाठी ते झटत होते. आजच्या काळातही क्रांतिकारी वाटावेत असे विचार ते मांडत होते-

‘नव्हे जाखाई जोखाई। मायराणी मेसाबाई।।

बळिया माझा पंढरीराव। जो ह्य़ा देवांचाही देव।।

रंडी चंडी शक्ती। मद्यमांस भक्षिती।।

बहिरव खंडेराव। रोटी सुटीसाठी देव।।

गणोबा विक्राळ। लाडुमोदकांचा काळ।।

मुंजा म्हैसासुरें। हें तों कोण लेखी पोरें।।

वेताळें फेताळें। जळो त्यांचे तोंड काळे।।

तुका म्हणे चित्तीं। धरा रखुमाईचा पती।।’

तुकोबांनी येथे क्षुद्र दैवतांचा, मुंजा महिषासुरांचा धिक्कार केला आहे. पण गणपती, भैरोबा, खंडोबा यांनाही सोडलेले नाही. गणपती हे महाराष्ट्राचे लाडके दैवत. एकोणिसाव्या शतकात प्रबोधनकार ठाकरे, राजारामशास्त्री भागवत यांसारख्या सुधारकांनी गणेशोत्सवाच्या सार्वजनिकीकरणास विरोध केला होता. त्याच्या सुमारे दोनशे वर्षांपूर्वी तुकोबांनी या दैवताची ‘लाडूमोदकांचा काळ’ अशी संभावना केली होती. त्याच्या भक्तांवर ‘पूजिती विकट दोंद। पशु सोंड गजाची।।’ असे म्हणत कडक टीका केली होती. त्यांचे म्हणणे होते-

‘हरिहर सांडूनि देव। धरिती भाव क्षुल्लकीं।।

ऐका त्याची विटंबना। देवपणा भक्तांची।।

अंगीं कवडे घाली गळां। परडी कळाहीन हातीं।।

गळा गाठा हिंडे द्वारीं। मनुष्य परी कुतरीं तीं।।

माथां सेंदुर दांत खाती। जेंगट हातीं सटवीचे।।

पूजिती विकट दोंद। पशु सोंड गजाची।।

ऐशा छंदे चुकलीं वाटा। भाव खोटा भजन।।

तुका म्हणे विष्णु शिवा। वांचूनि देवा भजती तें।।’

हरि आणि हर, विष्णू आणि शिव हे एकच. विठ्ठल म्हणजे तेच. भक्ती करावी ती त्याचीच. कारण-

‘बहुत गेलीं वायां। न भजतां पंढरीराया।।

करिती कामिकांची सेवा। लागोन मागोन खात्या देवा।।’

पंढरीरायाऐवजी लोकांना पीडा करून, त्यांच्याकडून (नैवेद्य) मागून खाणारे असे जे देव आहेत त्यांची पूजा करून अनेक लोक वाया गेले आहेत. तेव्हा ‘न पूजीं आणिकां देवा न करी त्यांची सेवा।’ आणि कोणाचे नाम घ्यायचेच असेल, तर- ‘गासी तरी एक विठ्ठलचि गाईं। नाहीं तरी ठायीं राहें उगा।।’ असे त्यांचे सांगणे होते. वारंवार ते हेच बजावत होते. लोकांना आणि स्वत:लाही. माझी कोणी मान जरी कापली, तरी माझ्या जिभेने अन्य कोणाचे नाव घेऊ  नये, अशी भावना त्यांनी एके ठिकाणी व्यक्त केली आहे.

‘जरी माझी कोणी कांपितील मान।

तरी नको आन वदों जिव्हें।।

सकळां इंद्रियां हें माझी विनंती।

नका होऊं  परतीं पांडुरंगा।।

आणिकांची मात नाईकावीं कानीं। आणिकां नयनीं न पहावें।।’

कारण- ‘सकल धर्म मज विठोबाचें नाम। आणिक तें वर्म नेणें कांहीं।।’ विठ्ठल नामातच सर्व धर्म आहे. म्हणून- ‘एक गावें आम्ही विठोबाचें नाम।

आणिकांपें काम नाहीं आतां।।’

तुकोबा येथे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. ती म्हणजे विठ्ठल नामातच सकल धर्म आहे. आणि त्यात अध्याहृत असलेली दुसरी बाब म्हणजे नामस्मरण महत्त्वाचे. तोच भक्तिमार्ग आहे. तेथे बाकीच्या कर्मकांडांची काही गरजच नाही. याहून वेगळे जे सांगतात त्यांचे म्हणणे ऐकूच नये. ते दुष्टांचे वचन मानावे. ‘नाम म्हणतां मोक्ष नाहीं। ऐसा उपदेश करितील कांहीं। बधिर व्हावें त्याचे ठायीं। दुष्ट वचन वाक्य तें।।’

अन्य एका अभंगातही त्यांनी हीच भावना व्यक्त केली आहे.. ‘नाइकावे कानीं तयाचें ते बोल। भक्तीविण फोल ज्ञान सांगे।।’

साधा-सरळ, प्रपंचात राहून करता येण्यासारखा, कोणत्याही कर्मकांडांना थारा न देणारा हा भक्तिमार्ग सांगून तुकोबा पुरोहितशाहीच्या आर्थिक आणि सामाजिक वर्चस्वालाच चूड लावत होते. समाजातील स्त्री, शूद्रांपासून सर्वाना आध्यात्मिक समतेच्या वाटेवर आणून उभे करीत होते. ते सांगत होते-

‘ऐक रे जना। तुझ्या स्वहिताच्या खुणा। पंढरीचा राणा मनामाजीं स्मरावा।।’

त्याच्या स्मरणानेच सारी बंधने तुटतात आणि हा अधिकार ‘ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र। चांडाळाही अधिकार। बाळें नारीनर। आदिकरोनि वेश्याही।।’ असा सर्वाना आहे.

याकरिता तुकोबा केवळ विठ्ठलभक्तीचा मार्ग लोकांना दाखवीत होते. अगदी कोणा संताने जरी सांगितले, तरी विठ्ठलाशिवाय मनात अन्य काही ठेवू नका- ‘तुका म्हणे संत म्हणोत भलतें। विठ्ठलापरतें न मनीं कांही।।’ असे सांगत होते.

हा विचार तसा धार्मिकच. पण मध्ययुगीन काळात कोणताही सामाजिक विचार धर्माच्या पोटातूनच येणार होता. ते तेव्हाच्या धर्माच्या ठेकेदारांना बरोबर समजले होते. तुकोबांना कर्मठ सनातनी जोरदार विरोध करीत होते, ते त्यामुळेच. तुकोबाही त्यांचा छळ सोसत लढत होते.

खेदाची बाब हीच, की त्यांचे हे सोसणे या महाराष्ट्राने वायाच घालविले.

तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com