तो काळ मोठा धामधुमीचा होता.

शिवरायांचे स्वराज्यकारण जोमाने सुरू झाले होते. तोरण्यावरील ताबा, १६४५ मध्ये जावळीत केलेली चंद्ररावाची स्थापना, त्याच्या पुढच्याच वर्षी बाबाजी बिन भिकाजी गुजरास दिलेली शिक्षा..

chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
three workers died due to electric shock
अंबरनाथ: विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू, जांभूळ जल शुद्धीकरण केंद्रातील घटना
Nandurbar district bus conductors murder solved son-in-law killed father-in-law due to a family dispute
सासऱ्यासाठी जावईच काळ, नंदुरबार जिल्ह्यातील बस वाहकाच्या हत्येची उकल

हा खेडेबारे तरफेतील रांजे गावचा मुकादम. कोण्या महिलेवर त्याने हात टाकला. या गुन्ह्य़ासाठी शिवरायांनी त्याचे हात-पाय कलम केले. असा न्याय मावळ मुलखात बहुधा कधी झालाच नव्हता. त्या एका घटनेने अवघ्या मावळी मनांवरील काळोखाचा पडदा झिरझिरीत झाला होता.

मावळ खोऱ्यात हवापालट होत होता. मनोवृत्ती बदलत होत्या. आता मावळेगडी कोणा आदिलशाही वा निजामशाही जहागीरदाराच्या लष्करात पोटासाठी चाकरी करीत नव्हते. ते शहाजीपुत्र शिवरायांच्या सन्यात पाईक म्हणून भरती होत होते. त्यांच्या ओठांवर पाईकीचे अभंग होते आणि डोळ्यांत आपल्या राज्याचे स्वप्न..

या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता पुणे आणि सुपे परगणा. देहू याच सुपे परगण्यातले. हवेली तरफेतले. हा मुलुख आदिलशाहीतला. १६४४ मध्ये आदिलशाहीने तो शहाजीराजांकडून काढून घेऊन खंडोजी आणि बाजी घोरपडय़ांकडे सोपविला. पुढे दोन वर्षांत तो पुन्हा शहाजींकडे आला. राजांच्या वतीने तेथील कारभार शिवरायांकडे आला होता.

आता देहूवर सत्ता शिवरायांची होती.

तुकोबांचे जीवन म्हणजे रात्रंदिन युद्धाचा प्रसंग. पण या काळात त्यांच्या लौकिक जगण्याला निचितीचा किंचित स्पर्श झाला असावा.

पत्नी जिजाई, महादेव आणि विठोबा ही मुले, काशी, भागीरथी आणि गंगा या मुली, बंधू कान्होबा, त्याची पत्नी.. तुकोबांचा संसारगाडा तसा व्यवस्थित सुरू होता. तुकोबांनी तिन्ही मुलींचे विवाह लावून दिले होते. त्यांचे व्याही होते मोझे, गाडे, जांभोलीकर. यातील मोझे लोहगावचे शेटेमहाजन. गाडे येलवाडीचे शेटेपाटील. जांभोलीकरांकडेही विपुल शेतजमीन. सगळी सुस्थळे. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या तुकोबा उत्तमरीतीने निभावत होते हेच यातून दिसते. त्याला कान्होबाही दुजोरा देतात. तुकोबा म्हणजे आमची ‘आंधळ्याची काठी’, आमचे ‘पांघरूण’.. ‘मायबाप निमाल्यावरी। घातले भावाचे आभारी॥’ – ‘मायबापांनी मरताना आम्हांस ज्याच्या पदरी घातले असा हा भाऊ’ अशा शब्दांत कान्होबांनी तुकोबांचे त्यांच्या जीवनातील स्थान अधोरेखित केले आहे. ‘मायबाप निमाल्यावरी’ या अभंगातच आपले घर ‘नांदते’ होते असे कान्होबा सांगून जातात. याचा अर्थ स्पष्ट आहे. तुकोबांच्या आयुष्यातील हा प्रापंचिक स्थर्याचा काळ होता..

पण त्यांच्या मनातील उलघाल मात्र सुरूच होती.

देवाचा शोध कोणत्याही तऱ्हेने घेता येत नाही, हे त्यांना येथवर कळून चुकले होते. मनावर एक उदासीनतेची छाया पसरली होती. ते म्हणतात-

‘शोधितांची न ये। म्हणोनि वोळगतों पाय॥

आता दिसो नये जना। ऐसें करा नारायणा॥’

देवा, तुझा शोध घेता येत नाही, म्हणून तुझ्याच पायावर मस्तक ठेवतो. आता एकच करा- मी कोणाला दिसू नये असे करा. ‘म्हणवितों दास। परि मी असें उदास॥’ अशी त्यांची मन:स्थिती होती. रोजचे जगणे सुरू होते. ‘दळी कांडीं लोकां ऐसे। परि मी नसें तें ठायीं॥’ – इतरांप्रमाणेच दळण-कांडण असे लोकव्यवहार ते करीत होते. पण त्यांचे मन त्यात रमत नव्हते.

पण तुकोबांच्या विरोधकांना त्यांच्या या वृत्तीशी काय देणेघेणे? ‘चंदनाच्या वासे धरितील नाक।’ असे ते लोक. तुकोबांना हे अजूनही समजत नव्हते, की- ‘तुका म्हणे माझें चित्त शुद्ध होतें। तरी कां निंदितें जन मज॥’ ..माझे चित्त शुद्ध असूनही हे लोक माझी निंदा का करीत आहेत?

पण हे केवळ निंदेवरच थांबणारे नव्हते. ‘निंदी कोणी मारी। वंदी कोणी पूजा करी॥’ – कोणी वंदितो, कोणी पूजा करतो, हा जसा तुकोबांचा अनुभव, तसाच कोणी निंदा करतो, कोणी मारहाण करतो, हाही अनुभव त्यांचाच. यावर ते जरी- ‘मज हेंही नाहीं तेंही नाहीं। वेगळा दोहींपासूनि’- असे म्हणत असले, तरी हे लोक कधीतरी आपणास मार्गातून दूर करणार, हे भय त्यांच्या मनात होतेच. तुकोबा स्पष्टपणे ही भीती बोलून दाखवतात..

‘लावूनि कोलित। माझा करितील घात॥

ऐसें बहुतांचे संधी। सापडलों खोळेमधीं॥

पाहतील उणें। तेथें देती अनुमोदनें॥’

हे दुष्ट लोक पेटलेले कोलीत लावून माझा घात करतील. अशा लोकांच्या तावडीत मी सापडलो आहे. माझ्यात काही उणे दिसले रे दिसले की ते त्याचा डांगोरा पिटतील.. जगजाहीर करतील.. घात करणारांना अनुमोदन देतील.

येथे प्रश्न असा येतो, की या घात करू पाहणाऱ्यांना शिवरायांची जरब नव्हती?

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्यात धर्मसत्तेचे पारडे जड असण्याचा तो काळ. त्या काळाच्या संदर्भात हा प्रश्नच गरलागू ठरतो. आणि तुकोबांना छळणारे लोक सनातन वैदिकधर्माचेच तर पालन करीत होते. या धर्ममरतडांचा हात पकडण्याचे बळ अद्याप शिवरायांच्या बाहूंत आले नव्हते. तशात नेमक्या त्याच काळात त्यांच्यासमोर एक नवेच संकट उभे ठाकले होते.

२५ जुल १६४८ रोजी आदिलशहाने शहाजीराजांना कैद करविले. त्यानंतर बंगळुरवर हल्ला करण्यास फर्हादखानास आणि शिवरायांविरुद्ध फतहखानला पाठविले.

पाच-सहा वर्षांचे स्वराज्य, अठरा वर्षांचे शिवराय आणि दोन-तीन हजारांपर्यंतची त्यांची फौज यांचा हा कसोटीचा काळ.

पण शिवरायांनी फतह मिळविली. १६४८ च्या बहुधा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये त्यांनी फतहखानाचा पराभव केला. आता शहाजीराजांची सुटका बाकी होती. शिवाजीराजांनी अवघी मुत्सद्देगिरी पणाला लावली आणि अखेर आदिलशहाने १६ मे १६४९ रोजी शहाजीराजांना बंधमुक्त केले.

अशा प्रकारे जुल १६४८ ते मे १६४९ या काळात शिवाजीराजे पूर्णत: युद्ध आणि राजकारणात गुंतलेले होते. त्यानंतरही त्याच वर्षी स्वराज्यावर आणखी एक संकट चालून येणार होते. ते म्हणजे अफझलखानाचे. १६४९ मध्ये जावळीवर स्वारी करण्याची त्याची योजना होती. तो बेत तडीस गेला नाही. पण शिवाजीराजांना मात्र त्यात नाहक गुंतून पडावे लागले.

या सर्व धामधुमीत एके दिवशी अचानक इंद्रायणीच्या तीरावरून जिजाईंचा हंबरडा ऐकू आला. पोटात बाळ असलेली ती माता आक्रंदत होती. तुकयाबंधू कान्होबा शोकाने वेडेपिसे झाले होते. बाजूला मुले आक्रंदन करीत होती. त्या शोकाने पृथ्वी फुटते की काय असे वाटत होते.

‘दु:खें दुभागलें हृदयसंपुष्ट। गिहवरें कंठ दाटताहे॥

ऐसें काय केलें सुमित्रा सखया। दिलें टाकोनियां वनामाजीं॥

आक्रंदती बाळें करुणावचनीं। त्या शोंकें मेदिनी फुटो पाहे॥’

हा शोक, हे दु:ख होते तुकोबांच्या नाहीसे होण्याचे.

फाल्गुन वद्य द्वितीया. शके १५७१. सन १६४९.

त्या वर्षी या मितीला शिमग्याचा सण होता. देहूत धुळवड साजरी केली जात होती आणि त्याच दिवशी तुकोबा अचानक गायब झाले होते. त्यांचे प्रयाण झाले होते.

शोकसंतप्त कान्होबा म्हणत होते-

‘कान्हा म्हणे तुझ्या वियोगें पोरटीं। झालों दे रे भेटी बंधुराया॥’

तुकोबा, तुझ्या जाण्याने आम्ही पोरके झालो आहोत रे. बंधुराया, परत ये रे.

विठ्ठला, तूच तो घरभेदी आहेस. तुझ्यामुळेच मी माझा भाऊ गमावला आहे. तुझ्या पाया पडतो मी. ‘घरभेद्या येथें आहे तें सुकानु। धरितों कवळून पाय दोन्ही॥’ आता माझ्या भावाला पुन्हा भेटव, त्याशिवाय मी हे पाय सोडणार नाही. ‘तुकयाबंधु म्हणे करील भेटी भावा। सोडीन तेधवां या विठ्ठला॥’

तुझ्या भक्ती-मुक्तीला, ब्रह्मज्ञानाला आग लागो. तू माझ्या भावाला लवकर आणून दे. नाहीतर पांडुरंगा, त्याची हत्या तुझ्या माथी लागेल.

‘भुक्ति मुक्ति तुझें जळो ब्रह्मज्ञान। दे माझ्या आणोन भावा वेगीं॥..

तुकयाबंधु म्हणे पहा हो नाहीं तरी। हत्या होईल शिरीं पांडुरंगा॥’

माझ्या भावाला पुन्हा भेटवले नाहीस तर तुझ्या चिंधडय़ा करीन. काय समजतोस काय स्वत:स तू? ‘धींद धींद तुझ्या करीन चिंधडय़ा। ऐंसें काय वेडय़ा जाणितलें॥’

कान्होबा शोकसंतापाने देवाला शिव्या घालत होते. रडत होते. तुकोबांना पुन्हा भेटवा म्हणून विनवीत होते. अनाचार संपवा म्हणत होते..

‘असोनियां मालखरा। किती केल्या येरझारा।  धरणेंही दिवस तेरा। माझ्या भावें घेतलें॥

अझून तरी इतुक्यावरी। चुकवीं अनाचार हरी। तुकयाबंधु म्हणे उरीं। नाहीं तरी नुरे कांहीं॥’

ते म्हणत होते, तुकोबा संतसज्जन. परंतु त्यांना किती त्रास सहन करावा लागला. तेरा दिवस धरणे धरावे लागले. जलदिव्य करावे लागले. पण इतके होऊनही अनाचार संपलेला नाही. तो संपव. नाहीतर या उरात तुझ्याबद्दल काहीच राहणार नाही.

कान्होबा कोणत्या अनाचाराबद्दल बोलताहेत हे समजण्यास मार्ग नाही. पण एक खरे की, पांडुरंगाने विमान पाठवून तुकोबांना सदेह वैकुंठाला नेले याबद्दल ते बोलत नव्हते.

तुलसी आंबिले tulsi.ambile@gmail.com