माणसाला चांगले वागण्यासाठी प्रत्येक वेळी धर्म सा करतोच असे नाही. माणसे धार्मिक असतात आणि वाईटही असतात. तुकाराम हे सारे अनुभवत होते. त्यांना जलदिव्य करावयास भाग पाडणारे रामेश्वरभट्ट किंवा त्यांना छळणारा मंबाजी हे धार्मिक नव्हते असे कोण म्हणेल? तेही देवपूजा करणारे होते, सर्व धार्मिक कर्मकांडे मनापासून करणारे होते, जप-तप, यज्ञ-याग करणारे होते. पण त्यांची ही धार्मिकता म्हणजे ‘अंतरीं पापाच्या कोडी। वरी वरी बोडी डोई दाढी।।’ या प्रकारची. बा उपचारांत रमणारी. अशी माणसे, असे स्वत:ला संत समजणारे पायलीला पन्नास मिळतील. पण त्यांना माणूस म्हणण्यास तुकोबा तयार नाहीत. सदाचार आणि नीती या त्यांच्या चांगुलपणाच्या कसोटय़ा होत्या. तोच त्यांच्या दृष्टीने ‘धर्मनीतीचा वेव्हार’ होता. ‘धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्हांसी’ असे तुकाराम ज्या धर्माबद्दल बोलत होते, तो धर्म रूढी, कर्मकांडाधिष्ठित, वरवरच्या उपाध्यांत रमणाऱ्या धर्माहून वेगळा होता.

तुकोबा मांडत होते ते तत्त्वज्ञान अद्वैताचे. ‘क्षर अक्षर हें तुमचे विभाग। कासयानें जग दुरी धरा।।’ – क्षर म्हणजे जग वा जीव आणि अक्षर म्हणजे माया हे तुमचेच दोन विभाग असताना तुम्ही जगाला आपल्यापासून दूर का ठेवता, असा सवाल तुकोबा परमेश्वरालाच विचारत होते. ‘उदका वेगळा। नव्हे तरंग निराळा।।’ पाणी आणि त्यावरील तरंग भिन्न नसतो. तसाच परमेश्वर या जगामध्ये. ‘जीव हा ब्रह्मरूपच’ ही यातील भूमिका. वैदिक धर्माचा गाभा तोच आहे. पण हा धर्म पाळणारे आचरण करीत होते ते नेमके याच्या उलट. यासंदर्भातील तुकोबांचा एक अभंग भला मार्मिक आहे-

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
Science Day is Not just to celebrate but to practice it
विज्ञान दिन साजरा करण्यासाठी नव्हे, आचरणात आणण्यासाठी…

‘कासयानें पूजा करूं केशीराजा।

हाचि संदेह माझा फेडी आतां।।

उदकें न्हाणूं तरी स्वरूप तें तुझें।

तेथें काय माझें वेचे देवा।।

गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ।

तेथें मी दुर्बळ काय करूं।।

फळदाता तूंच तांबोल अक्षता।

तेथें काय आतां वाहों तुज।।

वाहूं दक्षिणा तरी धातु नारायण।

ब्रह्म तेंचि अन्न दुजें काई।।

गातां तू ओंकार टाळी नादेश्वर।

नाचावया थार नाहीं कोठें।।

तुका म्हणे मज अवघें तुझें नाम।

धूप दीप रामकृष्णहरि।।’

देवा, तुझी पूजा कोणत्या उपचारांनी करावी, हे समजतच नाही. पाण्याने स्नान घालावे, तर पाणी तुझेच स्वरूप. फुले वाहावीत, तर फुलांतला सुगंध तूच आहेस. फळं, तांबूल, अक्षता तुला समर्पण करावे, तर त्यांचा दाता तूच आहेस. दक्षिणा द्यावी, तर धातूत तूच आहेस. आणि नैवेद्य दाखवावा, तर अन्न ब्रह्मरूपच आहे. ओंकाराचा उच्चार करून गावे, तर तू ओंकारस्वरूप. आणि टाळ्या वाजवत, नाचत भजन करावे, तर जेथे नाचायचे ती भूमी तुझीच. असे असताना आपण देवाला काय द्यावे? तुकोबा म्हणतात, ‘रामकृष्णहरि’ या नामातच ती धूप, दीप आणि तांबूलादी षोडशोपचारपूजा आहे. तेव्हा एक नामाचा उच्चार सगळ्या कर्मकांडाहून मोठा. तोच पुरेसा. बाकी सगळी फोलपटे. आज सगळा समाज- त्यात वारकरीही आले- अशाच फोलपटांमध्ये धार्मिकता शोधताना दिसत आहे. तुकोबा ‘अवगुणांचे हातीं। आहे अवघीच फजिती।।’ असे जे सांगतात ते हेच.

‘मन करा रे प्रसन्न’ हा तुकोबांचा लोकप्रिय अभंग या दृष्टीने पाहण्यासारखा आहे. तुकोबांना बंडखोर संतकवी का म्हणतात त्याचे उत्तर या अभंगात आहे. ते म्हणतात-

‘मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धींचे कारण। मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा तें।।’ मन हे सर्व सिद्धींचे कारण आहे. मोक्ष वा बंधन, सुख आणि समाधान मिळणे या सर्वाच्या मुळाशी हे मनच आहे. यानंतर ते जे सांगतात ते क्रांतिकारीच म्हणावयास हवे.

‘मनें प्रतिमा स्थापिली। मनें मना पूजा केली।

मनें इच्छा पुरविली। मन माऊली सकळांची।।

मन गुरू आणि शिष्य। करी आपुलेंचि दास्य।

प्रसन्न आपआपणांस। गति अथवा अधोगति।।

साधक वाचक पंडित। श्रोते वक्ते ऐका मात।

नाहीं नाहीं आन दैवत। तुका म्हणे दुसरें।।’

म्हणजे मनानेच दगडाचा देव केला. मी या देवाचा भक्त आहे, ही कल्पना मनानेच केली. तेव्हा मी या देवाची पूजा केली असे आपण म्हणतो तेव्हा ती मनानेच मनाची केलेली पूजा असे होते. हे मन सर्वाची इच्छा पूर्ण करणारे आहे. ते सर्वाची माऊली आहे. मन हेच गुरू आणि मन हेच शिष्य. तेच आपली सेवा करते. ते आपणास प्रसन्न असेल तर गती देते, नाही तर अधोगती. तेव्हा हे पंडितांनो, साधकांनो, वाचकांनो, ऐका- मनाशिवाय दुसरे दैवत नाही!

हे मन प्रसन्न करणे हीच आत्मोन्नती. समाजोन्नतीचा मार्ग त्यातूनच जातो. त्यासाठी तुकोबांनी सांगितले ते निष्काम कर्मयोगाचे आणि भक्तीचे रोकडे तत्त्वज्ञान. त्यात सनातनी विचारांना स्थान नाही. कर्मकांडाला, अंधश्रद्धेला थारा नाही. सतराव्या शतकातील त्या समाजासमोर अत्यंत परखडपणे तुकाराम आपले हे आत्मोन्नतीबरोबरच समाजोन्नती साधणारे सुधारणावादी तत्त्वज्ञान मांडत होते. ते सांगत होते, तीर्थ, जप, तप, नवससायास यांत धर्म नाही. त्या तीर्थामध्ये असतो काय, तर देवाच्या नावाने धोंडा आणि पाणी. (तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जनीं।।) कशाकरिता हिंडता ती तीर्थे करीत? काय साधते त्याने?

‘जाऊनियां तीर्था काय तुवां केले।

चर्म प्रक्षाळिलें वरी वरी।।

अंतरींचें शुद्ध कासयानें झालें।

भूषण तों केले आपणया।।

तुका म्हणे नाहीं शांती क्षमा दया।

तोंवरी कासया स्फुंदां तुम्ही।।’

तीर्थास जाऊन वरवर अंघोळ केली, पण मनच शुद्ध नसेल तर काय होणार? ‘काय काशी करिती गंगा। भीतरी चांगा नाहीं तो।।’ ज्याचे मन शुद्ध नाही, त्याला ती काशी आणि ती गंगा तरी काय करील? मनामध्ये दया, क्षमा आणि शांतीची वस्ती नाही तोवर या अशा कर्मकांडांचा काहीही उपयोग नाही.

कुणाच्या अंगात दैवते संचारतात, कुणी शकुन सांगते. कोणी शुभाशुभ सांगते. पण-

‘सांगों जाणती शकुन। भूत भविष्य वर्तमान।।

त्यांचा आम्हांसी कांटाळा। पाहों नावडती डोळां।।’

या फालतू गोष्टी आहेत. कारण ‘अवघा तो शकुन। हृदयीं देवाचे चिंतन।।’

तुकारामांच्या काळात मुहूर्त काढण्याचा आणि वास्तुशास्त्राचा धंदा किती जोरात होता हे कळावयास मार्ग नाही. पण ‘तुका म्हणे हरिच्या दासां। शुभ काळ अवघ्या दिशा।।’ असे त्यांनी सांगून ठेवले आहे. त्या काळात गायीला माता नक्कीच मानले जात होते. पण म्हणून तिचे शेण-मूत प्राशन करण्यात धर्म आहे, हे मान्य करण्यास तुकाराम तयार नव्हते. ‘उदकीं कालवी शेण मलमूत्र। तो होय पवित्र कासयानें।।’ हा त्यांचा सवाल होता. दानदक्षिणेला त्यांचा मुळातूनच विरोध होता. ‘द्रव्य असतां धर्म न करी’ अशा मनुष्याला तर ते ‘माय त्यासी व्याली जेव्हां। रांड सटवी नव्हती तेव्हां।।’ अशा शिव्या देतात. पण हा धर्म ‘क्षुधेलिया अन्न’ देण्याचा, रंजल्या-गांजल्यांस आपले म्हणण्याचा आहे. तो देवाला नवस करून दान वगैरे देण्याचा तर मुळीच नाही. ‘नवसें कन्यापुत्र होती। तरी का करणें लागे पती।।’ देवाला नवस केल्याने पोरे होत असतील तर नवऱ्याची गरजच काय, असा थेट बुद्धिवादी प्रश्न ते करतात. ‘अंगी दैवत संचरे। मग तेथें काय उरे।।’ हा त्यांचा सवालही असाच अंधश्रद्धेवर घाला घालणारा.

अशा प्रकारे रूढ धार्मिक विचारांना धक्का देत असतानाच तुकारामांनी समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी आणखी एक विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. तो होता- एकेश्वरवाद.

तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com