छळ झाला, मारहाण झाली, खटले घालण्यात आले, धर्मद्रोहाचे आरोप करण्यात आले. फार काय, तुकोबांना राज्यद्रोही ठरविण्याचेही प्रयत्न झाले. हे सारे आजच्या काळाशी एवढे साधम्र्य साधणारे आहे, की ते अतिशयोक्तच वाटावे. विशेषत: राज्यद्रोहाचा आरोप. परंतु मंबाजी गोसावी याने आपाजी देशपांडे यांना लिहिलेल्या पत्रात अत्यंत स्पष्टपणे हा आरोप आलेला आहे. मंबाजीने लिहिले होते- ‘याचा कीं अपमान न करितां जाण। राज्यही बुडोन जाय तरी।।’ तुकारामांच्या शिकवणीमुळे राज्याला धोका निर्माण होऊ शकतो असे तो सांगत होता! पण तुकाराम या सर्व गोष्टींना पुरून उरले आहेत. यातून त्यांना त्रास होत नव्हता असे नाही. तो होतच होता. ‘सर्वाविशीं माझा त्रासलासे जीव।’ किंवा ‘कोणाच्या आधारें करूं मी विचार। कोण देईल धीर माझ्या जीवा।।’ असे अनेक अभंग
याचे साक्षी आहेत. पण या
सर्वावर मात करून ते उभे होते. ‘आम्ही बळकट झालों फिराऊनि’
असे म्हणत होते. त्यांचे एक सोपे
तत्त्व होते-
‘भुंकती ती द्यावी भुंको।
आपण नये त्यांचे शिकों।।
भाविकांनी दुर्जनांचें।
कांहीं मानूं नये साचें।।’
काय कोणाला आरोप करायचे आहेत, टीका करायची आहे, ती खुशाल करू द्या. कारण या दुर्जनांचे काहीच खरे नसते. ही सोपी गोष्ट नाही. भोवती विरोधाची वादळे उठलेली असताना एका जागी स्थिर उभे राहायचे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी खासेच आत्मबळ हवे. अशी ताकद असलेली माणसे थोडीच असतात. पण ती सगळ्याच काळात अन् सगळ्याच क्षेत्रात असतात. इकडे तुकोबांचा गाथा नदीत बुडविला जात असताना तिकडे युरोपात गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञाच्या पुस्तकविक्रीवर चर्चने बंदी आणली होती. दोघेही एकाच काळातले. देश, क्षेत्र भिन्न; पण आत्मबळ तेच. ते कोठून येते, हा खरा जाणून घेण्याचा भाग आहे.
तुकारामांनी आपल्या भक्तीने आणि बुद्धीने हे बळ कमावले होते. विठ्ठलावरची अगाध श्रद्धा हा त्यांच्या विचारांचा पाया होता. तुकाराम हे ‘नरोटीची उपासना’ करणाऱ्या सनातन्यांचा धर्म बुडवायला नक्कीच निघाले होते. पण ते काही अधार्मिक वा नास्तिक नव्हते. ते नक्कीच बंडखोर होते. पण म्हणून लगेच त्यांचा पाट चार्वाकाच्या शेजारी मांडण्याचे कारण नाही. तसे पाहता नैतिकता हा दोघांच्या विचारांतील समान धागा आहे. चार्वाक वेदांना भंड, धूर्त आणि निशाचरांचे कारस्थान मानतात. तुकोबा वेदांचा वेगळा अर्थ लावून धर्मशास्त्राच्या दृष्टीने वेदद्रोह करतात. चार्वाक नास्तिक-शिरोमणी. तुकोबाही ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनीं अनुभवावा।।’ – म्हणजे तोंडाने सांगावे की, देव आहे, पण मनातून जाणावे की नाही, असे अत्यंत धाडसी विधान करून जातात. पण तेवढेच. कारण त्यांच्या अशा काही मोजक्या विधानांच्या समोर त्यांचेच हजारो अभंग उभे आहेत. अखेरीस ते अद्वैतवादी आस्तिकच आहेत.
आपण ज्यावरून चाललो आहोत तो विचारमार्ग योग्यच आहे ही त्यांची खात्री आहे आणि त्या विचारांमागे साक्षात् ‘विश्वंभर’ आहे ही त्यांची भावना आहे. ते म्हणतात- ‘आपुलियां बळें नाहीं मी बोलत। सखा कृपावंत वाचा त्याची।।’ साळुंकी मंजुळ आवाजात गाणी गाते, पण तिचा शिकविता धनी वेगळाच असतो. त्याचप्रमाणे ‘मला पामराला तो विश्वंभर बोलवितो,’ असे ते सांगतात. आणि हे एकदाच नव्हे, तर वारंवार सांगतात.
आपण भक्तिमार्गाचा जो विचार मांडत आहोत, तो धर्माच्या नरोटय़ांची पूजा करणाऱ्या सनातन्यांच्या विरोधात आहे याची नक्कीच जाणीव तुकोबांना आहे. वेदांचा धर्मपरंपरामान्य अर्थ गोब्राह्मणहितास अनुकूल असा. पण आपण ‘गोब्राह्महिता होऊनि निराळे। वेदाचे ते मूळ तुका म्हणे।।’ असे सांगतो तेव्हा तो धर्मबा असतो हेही ते जाणून आहेत. हा विचार पुसण्याचा प्रयत्न केला जाणार हेही त्यांना माहीत आहे. (पुढे वेगळ्याच पातळीवर झालेही तसे. तुकोबांची ही ओळ ‘ओमतत्सदिती सूत्राचे ते सार’ या अभंगातली. पंडिती गाथ्यात ती आहे. जोगमहाराजांच्या गाथ्यातही आहे. देहू संस्थानाच्या गाथ्यात हा अभंग आहे. पण त्यात ‘गोब्राह्मणहिता होऊनि निराळे’ ही ओळ ‘सर्वस्व व्यापिलें सर्वाही निराळें’ अशी होऊन आली आहे! असो.) तर यामुळेच तुकोबा सांगत होते, की ‘मज मुढा शक्ती। कैचा हा विचार।।’ – मी अडाणी. माझ्याकडे कुठून हा विचार असणार? तुम्हाला तर माझे जातिकूळ माहीतच आहे. तेव्हा मी जे बोलतो ते माझे नाहीच. मला देवच बोलवितो. ‘बोलिलों जैसें बोलविलें देवें। माझें तुम्हां ठावें जातिकुळ।।’ सनातनी विचारांना धर्मसुधारणावादी विचारांनी धडक देण्यासाठीची ही खास तुकोबानीती दिसते! अर्थात यामागे काही योजना आहे असे नाही. तो तुकोबांचा आंतरिक विश्वास आहे. ते म्हणतात-
‘कोण सांगायास। गेलें होतें देशोदेश।।
झालें वाऱ्याहातीं माप। समर्थ तो माझा बाप।।
कोणाची हें सत्ता। झाली वाचा वदविती।।
तुका म्हणे या निश्चयें। माझें निरसलें भय।।’
हा जलदिव्यानंतरचा अभंग असेल तर त्याला आणखी वेगळाच संदर्भ लागू शकतो. तुकोबांचे अभंग ‘उदकी राखल्याची’ गोष्ट आता सर्वदूर पसरली होती. संत बहिणाबाई कोल्हापुरात असताना त्या जयरामस्वामी यांच्या कीर्तनास जात. त्यात तुकोबांची पदे म्हटली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. ‘तुकोबांचा छंद लागला मनासी। ऐकतां पदांसी कथेमाजीं।।’ तेथेच त्यांच्या कानी ‘तेरा दिवस ज्यानें वह्य उदकांत। घालोनीया सत्य वांचविल्या।।’ ही गोष्ट आली होती. या पाश्र्वभूमीवरचा हा अभंग असेल तर जलदिव्याची, छळाची ती घटना उलट तुकोबांचे आत्मबळ वाढविण्यासच साभूत ठरली असे म्हणता येईल. समर्थ तो विठ्ठल हाच आपला पिता आहे, या निश्चयामुळे आपले भय संपले आहे असे ते सांगत आहेत. त्या बळावरच ते भक्तिमार्गाचा झेंडा घेऊन ठाम उभे राहिलेले आहेत. पण भक्तीच्या या शक्तीबरोबर तुकोबांचे व्यक्तित्व बळकट करणारी आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांची नैतिक ताकद.
बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या ‘डेक्कन व्हन्र्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीनें बक्षीस’ दिलेल्या तुकारामबोवा या ‘निबंधा’त (दुसरी आवृत्ती- १९१५), तसेच ‘द लाइफ अँड टीचिंग्ज ऑफ तुकाराम’ या जे. नेल्सन फ्रेझर आणि रेव्ह. जे. एफ. एडवर्ड्स यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथात (१९२२) एका विचित्र घटनेचा उल्लेख आहे. त्यानुसार, एकदा एक सुंदर तरुण स्त्री तुकोबांकडे वैषयिक बुद्धीने एकांती आली होती. पण तुकोबा म्हणजे काही ‘दावूनि वैराग्याची कळा। भोगी विषयांचा सोहळा।।’ या जातीतील पंचतारांकित संत नव्हेत. त्यांनी त्या स्त्रीला सांगितले-
‘पराविया नारी रखुमाईसमान।
हें गेलें नेमून ठायींचेंचि।।
जाईं वो तूं माते न करी सायास।
आम्ही विष्णुदास तैसें नव्हों।।
न साहावे मज तुझें हें पतन।
नको हें वचन दुष्ट वदों।।’
एवढे सांगून झाल्यानंतर- तुला भ्रतारच पाहिजे ना? मग बाकीचे नर काय मेले आहेत? ‘तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार। तरी काय नर थोडे झाले।।’ असे म्हणत त्यांनी तिला हुसकावून दिले. ही घटना घडली तो सतराव्या शतकाच्या पूर्वार्धातील काळ आणि तुकारामांना असलेला धर्मसत्ताधाऱ्यांचा विरोध या दोन्ही बाबी ध्यानी घेता त्या स्त्रीने अशा विरागी वृत्तीच्या संताकडे स्वत:हून येणे हे अवघडच. तुकारामांना बदनाम करण्याचा हा डाव असावा असा संशय घेण्यास येथे वाव आहे. ते काहीही असो; तुकोबा मात्र अशा चारित्र्यहननाच्या कारस्थानांनाही पुरून उरले आहेत. याचे कारण त्यांची जाज्वल्य नैतिकता.
ते सामथ्र्य घेऊन तुकोबा उभे होते. त्या बळाने ललकारत होते-
‘भले तरी देऊं गांडीची लंगोटी।
नाठय़ाळाचे काठी देऊं माथां।।’
 तुलसी आंबिले – tulsi.ambile@gmail.com

Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला
Parakala Prabhakar
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पतीची निवडणूक रोख्यांवर टीका; आता भाजप विरुद्ध भारतीय जनता अशी लढाई – पी.प्रभाकर
Stray Dog
भटक्या कुत्र्यांना मांस खाऊ घालणे महिलेला पडलं महागात, धार्मिक भावना दुखावल्याने गुन्हा दाखल