बघता बघता नव्या सहस्राकातल्या एकविसाव्या शतकाची पंचविशी संपलीदेखील. इ.स. २००० उजाडलं तेच मुळी Y2 K च्या काल्पनिक भीतीनं. त्याआधी तयार झालेले संगणक ३१:१२:१९९९ ला मध्यरात्रीच्या ठोक्याला ०:०० वेळ दाखवतील तेव्हा २००० साल सुरू होईल की कालचक्र मागे जाऊन संगणकांत १९०० साल उजाडेल हा प्रश्न सर्वांना पडला. त्यानिमित्तानं या सहस्राकातली पहिली जगबुडीची आवई साऱ्या जगाला ऐकू आली. जेव्हा ३१ डिसेंबर १९९९च्या मध्यरात्री घड्याळात ०:०० वाजतील तेव्हा विमानं कोसळतील, रेल्वे स्तब्ध होतील, सगळ्यांचे हिशेब चुकू लागतील, निवृत्ती वेतन, महिन्याचे पगार, आरोग्य अहवाल, विम्याच्या तारखा वगैरे सगळ्यात गोंधळच गोंधळ उडेल, आपलं आधुनिकतेच्या वाटेवरचं जगणं अडचणीत येईल असं सांगितलं गेलं. मग लगेच विज्ञानदुष्ट समाजातल्या विद्वानांनी ‘भोगा आता… तुमच्या संगणकप्रेमाचे परिणाम’ असं म्हणत एकमेकांना टाळ्या दिल्या.
पण यातली एकही भीती खरी ठरली नाही. तंत्रज्ञानानं आगामी संकटावर लीलया मात केली आणि Y2 K समस्या न उद्भवताच संपली.

खरं तर २००० साल उजाडेपर्यंत विसाव्या शतकानं काय काय करून ठेवलं. रशियन राज्यक्रांती, पहिलं महायुद्ध (१९१४-१९१८), ऑटोमन साम्राज्याचा अस्त (१९१९), दुसरं महायुद्ध (१९३९-१९४५), हिटलरसारख्याचा उदयास्त, संयुक्त राष्ट्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांचा उदय (सर्व १९४५ च्या सुमारास), युद्धोत्तर सोव्हिएत रशियाचं अमेरिकेला पर्याय म्हणून उभं ठाकणं, त्यातून अमेरिका विरुद्ध साम्यवादी गटातलं शीतयुद्ध, त्याचाच भाग म्हणून सोव्हिएत रशियाच्या फौजा अफगाणिस्तानात घुसणं (१९७९), इराणात अयातोल्ला रूहल्ला खोमेनी यांच्या निमित्तानं इस्लामी धर्मवादाचा उदय, गोर्बाचेव्ह यांच्याकडून १९८९ साली अफगाणिस्तानातून रशियन फौजा माघारीची घोषणा आणि बर्लिन भिंतीचा पाडाव (१९८९), टिम बर्नर्स लीकडून इंटरनेटचा जन्म, उपग्रह चित्रवाणीचा सर्वदूर प्रसार (१९९१), जागतिक व्यापार संघटनेची रीतसर स्थापना (१९९५), दहशतवादाचं बहुराष्ट्रीयीकरण (१९९३), दक्षिण आफ्रिकेतला वंशभेद संपून नेल्सन मंडेलांची सत्ता (१९९४), व्यक्तिगत संगणकांचा प्रसार (१९९५) या अशा आणि इतक्या घडामोडींनंतर आणखी काय ‘नवे जग’ घडायचं राहिलं आहे, अशी शंकासुद्धा ‘एकविसाव्या शतका’त प्रवेश करताना कुणाला नव्हती. आयुष्यात सर्व काही पाहून झालं असं वाटत असताना अचानक, आकस्मिक काही घडावं तसं मग २००० नंतर जगाचं होत गेलं. याची उदाहरणं बरीच आहेत. पण प्रत्येक उदाहरणातून, इतिहासापासून काही शिकण्यासाठी आपण कसे कमीच पडतो, हे दिसत राहिलेलं आहे.

हे नवं सहस्रक अधिक नव्या आकांक्षांचं, अधिक नव्या तंत्रज्ञानाचं असणार हे उघड होतं. पण तंत्रज्ञानामागचं विज्ञान जेव्हा विस्तारतं तेव्हा एका कोण्या देशाला त्यावर मालकी राखणं सहजशक्य होत नाही. गेल्या शतकातली अंतराळस्पर्धा हे उदाहरण. ती वाढली आहे, आपण मागे पडू शकतो हे अमेरिकेला उमगेस्तोवर तिथे खासगी कंपन्यांकडून अवकाश-सफरींची सुरुवात झालेली आहे.

हे सहस्रक सुरू होताना रशियाच्या पाडावानंतरचं जग एकधृवीयच असणार असा अमेरिकी तोरा १९९० च्या इराण-इराक युद्धापासून दिसू लागला होता. तो २००१ मध्ये ‘९/११’च्या संहारानंतर काहीसा कमी झाला. तरीही ‘अॅक्सिस ऑफ एव्हिल’ आम्हीच संपवणार, या चढाईतून- आणि त्याच्या परिणामी अफगाणिस्तान आणि इराकमध्ये केलेल्या दु:साहसांतून अमेरिकेनं आपण किती चुका करू शकतो ते दाखवून दिलं. इराकमधून अमेरिकेस हाती काही लागलं नाही. अफगाणिस्तानातनं रशियाला माघार घ्यावी लागली आणि पश्चिम आशियातनं अमेरिकेला. आधीच्या शतकात अमेरिकी राजकारणानं ‘तालिबान’चा जन्म झाला आणि एकविसाव्या शतकात त्याच देशाच्या विध्वंसवादी राजकारणातनं ‘आयसिस’चा उदय झाला.

इतिहास दाहीदिशांना घडत असतो म्हणून तो चटकन चिमटीत धरता येत नाही. यावर तंत्रज्ञानाची रेषा मात्र एकाच दिशेनं पुढे जाते, असं कोणी म्हणेल. पण मुळात हे लागू पडतं तंत्रज्ञानाच्या प्रसारापुरतं. आधी मोबाइल आणि हल्ली ‘एआय’मुळे तो प्रसार गावगन्ना दिसला. पण ‘एआय’च्या प्रसारानंतर जग कसं पालटून जाणार वगैरे मनोराज्यं काही थांबत नाहीत. तंत्रज्ञान असेल तर त्यावर काबू ठेवणारेही असतात. मोबाइल वापरणाऱ्या जनसामान्यांपर्यंत ‘एआय’ अधिक अल्गोरिदम अशा युतीनं फरक पडलाच तर तो ‘वापरकर्त्याची ओळख अधिकाधिक इत्थंभूत होणं’ अशा प्रकारचा असेल. याचं हास्यास्पद उदाहरण म्हणजे, तुमचा आवडता मोबाइल गेम तुम्ही नेहमीच अटीतटीनं जिंकावा, अशी तुमच्यापुरती व्यवस्था केली जाईल.

इतिहासाच्या कोणत्या टोकावर आपण आहोत हे लक्षात घ्यायचं आणि मग तिथून पुढे जायचं, अशी एक आदर्श अपेक्षा असते. तिला पुरोगामी म्हणता येईल. पण या पुरोगामी अपेक्षेचा भंगच बहुतेकदा होतो; कारण मुळात इतिहास कशाकशाला म्हणायचं आणि त्याचं टोक कसं शोधायचं इथून गुंता सुरू होतो. घडत्या इतिहासाच्या नेमक्या खाणाखुणा कोणत्या, हे सांगणारे अनेकजण असतात. वेळोवेळी ट्रेण्डस्पॉटिंग होतच असतं. पण कोणता ट्रेण्ड पुढे जाणार आणि कोणती खूण ऐतिहासिक ठरणार हे अजिबात सांगता येत नाही.

उदाहरणार्थ, ‘सार्स’ या लघुनावानं ओळखला जाणारा रोग एकविसाव्या शतकाच्या दुसऱ्या वर्षात – २००२ मध्ये दाखल झाला आणि पुढल्या दोन वर्षांत चीनपासून केवळ आग्नेय आशियाई देशांतच नव्हे, तर भारतासह एकंदर ३० देशांत पसरला. त्यानंतर श्वसनयंत्रणेवर हल्ला चढवू पाहणारे अन्य विषाणूही ओळखले गेले. त्यांचा परिणाम पहिल्या ‘सार्स’पेक्षा भिन्न कसा यावरही संशोधन झालं. पण तरी ‘करोना’ आलाच. मुळात ‘करोना व्हायरस’ आणि ‘मानवी आजारांना कारणीभूत ठरणारा प्राणिजन्य विषाणू’ हे ज्ञान जगात सुमारे दोन दशकं असूनसुद्धा २०२० मध्ये याच जातकुळीच्या विषाणूनं जगाला खुराड्यात बंदिस्त केलं. मग कसलं नि काय शिकतो आपण इतिहासापासून?

तेव्हा ‘पुढला काळ’ वगैरे विचार पर्यावरणाच्या बाबतीत योग्यच. कारण तिथं केवळ मानवी वर्तनाचा नसून या वर्तमानामुळे निसर्गावर होणाऱ्या परिणामाचा संबंध आहे. तो परिणाम कितपत रोखायचा आणि कसा याविषयीची इच्छाशक्ती तयार करण्यासाठी अधिकाधिक अभ्यास आवश्यकच आहे. भूजलसाठे आटून कोरडे होतील, हिमनद्या वितळून पूर येतील, उष्मा वाढेल आदी प्रकारची भीती रास्तही आहे. पण याच प्रकारचे रास्त भीतीवजा अंदाज राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांबद्दल मांडता येत नाहीत, हेच वारंवार सिद्ध झालंय- गेल्या शतकात, त्याच्या आधीसुद्धा आणि या शतकाच्या पहिल्या २५ वर्षांतदेखील.

मग राजकीय/ आर्थिक/ सामाजिक क्षेत्रातल्या ‘डूम्स डे’… म्हणजे जगबुडीबादी- भाकितांवर विश्वास ठेवायचा का? एकोणिसाव्या शतकात जगावर डाव्यांचा प्रभाव होता. सर आर्थर कोस्लर वगैरेंनी दाखवून देईपर्यंत स्टालिनच्या सोव्हिएत रशियाचा लाल रंग अनेकांना गुलाबी वाटत होता. जगाच्या प्रगतीचा, समतेचा मार्ग हाच असणार याची खात्री अनेकांना वाटत होती. त्या ‘बौद्धिक प्रणया’वर (इंटलेक्चुएल रोमँटिसिझम) गोर्बाचेव्ह यांनीच पाणी ओतलं. जग भानावर आलं. पण तोपर्यंत जगभरातले समस्त उजवे हे डाव्यांना पाण्यात पाहत होते आणि त्यांच्यामुळे जग बुडणार असं मानत होते. शीतयुद्ध, बे ऑफ पिग्ज संकट, झिबिग्न्यु ब्रेझिंस्की यांच्यासारख्याचा ‘साम्यवादाला रोखण्यासाठी इस्लामवाद’ पुढे करण्याचा पर्याय वगैरे त्या काळच्या गोष्टी आता आठवल्या तरी बावळटपणाच्या वाटतात.

या साम्यवादाला पर्याय ठरण्यासाठी जगभरातल्या उजव्यांनी कंबर कसली. डाव्यांचा अर्थविचार एकांगीच होता. जगातील कामगार कधीही एक होणार नाहीत, असं म्हणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्क्सनं सामाजिक बाजू पाहिलेल्याच नाहीत, यावर नेमकं बोट ठेवत होते. त्यामुळे तो डोलारा कोसळणार हे उघड होतंच. पण त्याच्या कोसळण्याआधी जगभरातले बुद्धिवंत, पत्रकार वगैरेंचे विचारविश्व लाल रंगानं रंगून गेलं होतं. ‘मर्सिडिज मार्क्सिस्ट’ आणि ‘लिमोझीन लिबरल’ विद्वान हे त्याचं प्रतीक. त्यांच्या संपत्तीनिर्मितीच्या धोरणाविरोधात जगभरात नाराजी दाटून आली आणि निवडकांची भलामण करण्याच्या वृत्तीमुळे डाव्यांविरोधात नकळतपणे उजवे एकत्र येऊ लागले. त्यांच्या एकीला यशही मिळू लागलं. आज जगात सर्वत्र उजव्यांची सरशी झाल्याचं चित्र दिसतं ते यामुळे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ‘कम्युनिस्ट’ हा शब्द शिवी म्हणून उच्चारतात आणि आपल्याकडेही कोणाला ‘अर्बन नक्षल’ ठरवताना तसाच सूर असतो; हेही याचमुळे. हा योगायोग नाही.

पण यातला धडा असा की डाव्यांमुळे जगबुडी होईल, ही उजव्यांची भीती खरी ठरली नाही. आणि इतिहासाची पुनरावृत्ती अशी की आता डावेही जगात उजव्यांच्या सरशीमुळे असंच भाकीत वर्तवताना दिसतात. अमेरिका आणि भारत ही याची उदाहरणं. ट्रम्प यांच्यामुळे सगळी अर्थव्यवस्थेची माती होईल, असं अनेक मानत होते. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कारकीर्दीला एक वर्ष होऊन गेलं. जी अपेक्षित होती तशी अमेरिकेची माती काही झाली नाही. याचं कारण ट्रम्प यांच्या धोरण शहाणपणामध्ये अजिबात नाही, तर ते अमेरिकी माध्यमं, व्यवस्था यांनी निर्माण केलेल्या दबावात आहे. त्यामुळे ट्रम्प यांना अनेक धोरणांवर आपली अनेक पावलं मागे घ्यावी लागली. ते सुरुवात मोठ्या जोमात करतात. पण नंतर इतकी माघार घेतात की त्यामुळे होते त्यापेक्षा अधिक मागे जातात. ‘फायनान्शियल टाइम्स’नं म्हणून त्यांना नाव दिलं ‘टॅको’ (ट्रम्प ऑल्वेज चिकन्स आऊट).

आपल्याकडचं चित्र कुठं यापेक्षा वेगळं आहे? पं. नेहरू हा भले या सरकारचे उठता-बसता त्यांच्या नावे बोटं मोडायचा विषय असेल. पण काँग्रेसने जितकी नेहरू अर्थनीती अनुसरली नसेल त्यापेक्षा अधिक हे स्वत:ला उजवं मानणारं सरकार त्यांच्या अर्थविचारांचा पुरस्कार करताना दिसतं. सरकारी मालकीच्या कंपन्यांत अधिकाधिक गुंतवणूक करणं, सरकारी बँकांच्या मुंड्या अधिकाधिक पिरगाळणं, खासगीकरणाला विरोध… सगळं काही पं. नेहरू सांगत होते तसंच. आणि हे नुसतं अर्थनीतीबाबत नाही. तर परराष्ट्र धोरणाबाबतही तेच. काय वेगळं घडलंय परराष्ट्र संबंधांबाबत २०१४ पासून? अरब देशांशी जुळवून घेणं, अमेरिका आणि रशिया या दोन्ही डगरींवर पाय ठेवणं आणि व्यापारासाठी सीमा खुल्या करण्याऐवजी दरवाजे आणखीच बंद करणं ही सगळी नरसिंह रावपूर्व काँग्रेसचीच धोरणं. तीच तर आता अधिक जोमानं राबवली जातायत? वेगळं काही घडलंय काय?

अमेरिकेत डेमॉक्रॅट्सची आणि भारतात काँग्रेसची अडचण होताना दिसते ती याचमुळे. दोन्ही देशांचे प्रमुख जनप्रिय धोरणं तर राबवतात. त्या धोरण अंमलबजावणीत ट्रम्प यांच्यापेक्षा आपले पंतप्रधान अंगुळभर अधिक डावे असतील, इतकाच काय तो फरक. त्याचमुळे ट्रम्प आणि मोदी यांना दैत्य ठरवण्याच्या अनुक्रमे डेमॉक्रॅट्स आणि काँग्रेस/ डावे यांच्या प्रयत्नांना लोकांचा प्रतिसाद मिळत नाही.

हे वाचून ‘मग पुढे काय?’ हा प्रश्न पडेल… त्याचंही उत्तर इतिहासाच्या आधारे शोधायचं झालं तर दिसतं ते असं की, डाव्यांना दैत्य ठरवण्याचा प्रयत्न जसा अयशस्वी झाला तसाच उजव्यांनाही राक्षस ठरवणं अपयशी ठरेल. यामागचं साधं कारण असं की डावे काय की उजवे काय… तो त्यांचा केवळ आविर्भाव होता. सत्ता मिळाली की डावे जरा उजवीकडे सरकतात आणि उजवे प्रत्यक्षात डावीकडच्यांचीच धोरणं राबवतात. तरीही त्यांचा पराभव होऊ शकतो.

तो होतो वैचारिकतेतल्या अप्रामाणिकपणामुळे. आताही तोच अप्रामाणिकपणा निर्णायक ठरेल. तेव्हा परस्परांनी उगाच आपापल्या विरोधकांचं दैत्यीकरण करायची किती गरज आहे, हा प्रश्न. नव्या शतकाची पंचविशी पूर्ण होत असताना गेल्या शतकातल्या इतिहासाच्या आधारे तो विचारायला हवा इतकाच काय तो मुद्दा.

●girish.kuber@expressindia.com

@girishkuber

●abhijit.tamhane@expressindia.com