‘ऊन मी म्हणत होतं…’,

‘सूर्य आग ओकत होता…’ ,

‘आसमंतात जणू वणवा पेटला होता…’

यांसारख्या परिचित वाक्यांनी उन्हाळ्याचं चित्र अनेकदा साहित्यापासून वृत्तपत्र-वाहिन्यांत रंगवलं जातं. ओसाड आणि रखरखीत माळावर एखाद्या हिरव्या झुडपाच्या फाटलेल्या सावलीत कुणी डोळे लावून बसलेला आहे, अथवा वाळवंटासारखं दिसणारं एखाद्या नदीचं कोरडं पात्र यांसारखी शब्दचित्रंही आपण ऐकलेली असतात. किंवा विहिरीच्या तळाशी हंडा बुडण्याइतपतही पाणी नाही, तरीही त्या खोल खोल विहिरीत सगळीकडून पोहरे सोडलेले… यांसारखी छायाचित्रं वैशाखात पाहिलेली असतात. आश्चर्य वाटू नये इतकी त्यांची आता सालाबादप्रमाणे उजळणी होतेच. या सगळ्या गोष्टी चलचित्रात पाहण्यासाठी, वाचण्यासाठी आपले डोळे सरावलेले असतात… पण हा उन्हाळा ज्यांना सोसावा लागतो त्यांच्यासाठी हे जणू भिंती नसलेलं लाक्षागृहच. ‘ज्याचं जळतं, त्यालाच कळतं’ या म्हणीचा आणखी वेगळा अर्थ असू शकत नाही.

अशाच एका भाजून काढणार्‍या उन्हाळ्यात खानदेशातल्या एरंडोलजवळच्या अंजनी धरणावर पाहिलेलं दृश्य मनावर पक्कं गोंदलं गेलं आहे. धरणाचा सगळा तळ उघडा पडलेला. नजर जाईल तिथपर्यंत विस्तीर्ण अशा पार्श्वभूमीवर असंख्य जनावरं विखुरलेली. जणू एखादा गुरांचा बाजार भरलेला आहे, असं दुरून वाटावं. खुरटलेलं वाळलं गवत आणि कुठं कुठं डबक्यांमध्ये साचलेलं पाणी एवढाच या सगळ्यांसाठी आधार. धरणाच्या अगदी तळाशी असलेलं जे थोडं पाणी आहे ते धरणाच्या दरवाजांमधून पाझरणारं. त्या ठिकाणी एक डोह साचलेला. आसपासच्या वस्त्यांवरून तिथं धुणी धुण्यासाठी आलेल्या बाया-बापड्या. घरी पाणीच नाही त्यामुळे धुणी धुणार कुठे? याच ठिकाणी त्यांनी आपल्या लहान लेकरांनाही आणलेलं. कशासाठी तर त्यांनाही इथेच अंघोळी घालायच्या म्हणून. इतक्या रणरणत्या उन्हात ही सगळी लेकरं अनवाणी पायांनी आलेली. जरा उन्हाची तीव्रता वाढू लागली की सजग होणं, वातानुकूलित जागेत स्वत:ला जखडून घेणं, उन्हाळ्यात कपडे कसे वापरावेत इथपासून ते कुठली शीतपेयं घ्यावीत इथपर्यंत काळजी घेणार्‍यांपेक्षा हे जग पूर्णपणे भिन्न.

उन्हाळ्यात बहुतांश जलसाठे तळ गाठतात. मोठमोठ्या धरणांच्या जवळची गावं मात्र तहानलेली. भल्यामोठ्या लोखंडी पाइपद्वारे पाणी जवळच्या शहरांना जातं. ज्या गाव, शिवारातून हे पाइप जातात ती गावं मात्र तहानलेली. ना त्यांना या पाइपातलं पाणी दिसतं ना त्याचा वाहता आवाज कानी येतो. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ ही म्हण त्यातूनच आलेली.

शारीरिक कष्टाची बरीचशी कामे उन्हाळ्यातच असतात. विहिरी फोडणं, बंधार्‍याची कामं, शेतातल्या पावसाळापूर्व मशागतीची कामं या दिवसात काढलेली. काही ठिकाणी रोजगार हमीची कामं चालतात. कामाच्या ठिकाणी सावली नाही. अशा वेळी लहान लेकरांचे सर्वांत हाल. त्यांना झोळणीत टाकलं जातं. पिण्यासाठी म्हणून जे पाणी ठेवलं जातं ते एखाद्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात असतं. दिवसभर हे पाणी कोमट, त्यात थंडाव्याचा जराही लवलेश नसतो पण दुपारचे काही तास हे पाणी अक्षरश: गरम होतं, पोळायला लागतं. अशा पाण्याने तहान जाता जात नाही पण घसा मात्र ओला करावा लागतो. शहरात एक दिवस नळाला पाणी आलं नाही तर किती ओरड होते. इकडे पाण्याचाच पत्ता नाही. कुठे नळ योजनेतल्या पाण्याच्या टाकीचा केवळ सांगाडाच उभा तर कुठे हंडाभर पाण्यासाठी झुंबड. घरातली मोठी माणसे कष्टाच्या कामाला पण लहान मुलंसुद्धा पाणी आणण्याच्या कामासाठी जुंपली जातात. लेकरांची उन्हाळ्याची सुट्टी अशा कामांमध्येच निघून जाते. घोटभर पाण्यासाठी शिवार पालथा घालणं म्हणजे काय, याचा अनुभव तापत्या उन्हात डोंगराळ भागातल्या माणसांना घ्यावा लागतो. यात अजून कित्येक गावांत बदल झालेला नाही.

उन्हाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधून मराठवाडा, विदर्भात शेळ्या-मेंढ्यांचे कळपच्या कळप येतात. शिवारातली पिके काढल्यानंतर रानं सर्वत्र मोकळी असतात. बरं या जितराबाला खायलाही कुठे हिरवळ दिसत नाही. सगळीकडे वाळलेलं गवत, पालापाचोळा. आज इथं तर उद्या तिथं असं करत या माणसांची पायपीट चालते. पाण्याच्या आधारे त्यांच्या मुक्कामाच्या जागा ठरतात. कधी कधी अख्खा दिवस प्यायला पाणी मिळत नाही. घशाची कोरड तशीच राहते. सुकलेल्या ओठांवरून फिरणारी जीभही कोरडी वाटू लागते. आता जंगलं उरली नाहीत. पडीक जमिनी लोकांनी वहीतीखाली आणल्या. उन्हाळ्यातले दिवस कुटुंबकबिल्यासह ही माणसे चारापाण्याच्या शोधात वणवणत असतात. जर ऊन कडक असेल आणि शेळ्या-मेंढ्यांना प्यायला गरम पाणी असेल तर त्यांचा गर्भ राहात नाही. कलकलत्या दुपारी एखाद्या मोठ्या झाडाखाली काही तास सावलीत थांबायचं. पण आता अशी मोठी झाडंच उरली नाहीत.

वाळल्या गवतासह काही झाडपाला खात ही शेळ्या-मेंढरं काळ्याभोर रानातून उन्हातान्हात फिरतात. पाण्याची सोय पाहून या मेंढपाळांची कुटुंबं जागा बदलत राहतात. कधी कधी शेतकरी आपलं रान खतविण्यासाठी या मेंढ्या-शेळ्या रानात बसवतात. एक तर आता जंगलं राहिली नाहीत. चराईचं क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. सहा ते सात महिने या मंडळींना बाहेर फिरून काढावी लागतात. किती तरी गावं, डोंगर अन् शिवार पालथे घालावे लागतात.

जेव्हा घसा कोरडा पडतो आणि जीभ आतल्या आत ओढायला लागते, तेव्हा सुकलेले ओठ पाण्यासाठी आसुसलेले असतात. एका तरुण मेंढपाळाने तहान भागवण्याची सांगितलेली गोष्ट अशीच चटका लावणारी… उन्हाळ्यात सगळ्या विहिरींचे तळ आटलेले. कुठेच पाणी नाही. शिवारात जराही हिरवळ नाही. सगळीकडे करपलेली राने. ढोरांना घेऊन पाण्याच्या शोधात वणवण चाललेली. जित्राबाच्या डोळ्यातही प्राणांतिक आर्तता. शेतात तुरळक असलेल्या आखाड्यावर चार-दोन ठिकाणी पाणी विचारलं, पण तिथेही कोरडंठाक. पाऊल जड पडायला लागले. एकीकडे कासावीस आणि दुसरीकडे शिणलेल्या पायांनी रान तुडविणं सुरू. काय करावं? असं एकमेकांना विचारत आपल्या जनावरांसह नदीच्या दिशेने हे दोघं-तिघं निघाले. नदीचं पात्र कोरडंच, हे माहीत असूनही.

पात्रात आल्यावर तापलेल्या वाळूची रखरख जास्तच जाणवायला लागली. कडक उन्हाच्या लाटा अंगावर येत असल्यासारखं भासू लागलं. अवतीभवती कुठे कुठे पाण्यासाठी लोकांनी खड्डे केलेले तेही आटलेले. एका मोठ्या खड्ड्याकडे या दोघा-तिघांचं लक्ष गेलं. खड्डा खोल होता. वाळू वरचेवर त्यात घसरत चाललेली. बुडाशी जरा पाणी दिसलं. पण काढायचं कसं? शेंदायला जवळ काहीच नाही. एकाने शक्कल लढवली. नदीच्या काठावर असलेल्या लव्हाळ्या तोडून आणल्या, हिरवी लव्हाळी लवचीक असते. एकाला एक जोडून त्यांची लांबी वाढविली. खालच्या टोकाला पायातला बूट काढून बांधला आणि पाणी शेंदून वर काढले. पहिल्यांदा काढलेल्या पाण्यात बूट धुऊन घेतला आणि मग एकेकाने घोटघोट पाणी घेतले. पाण्याविना जीव जायची पाळी आली होती. तेही एकाच्या पायात बूट होता म्हणून जमले. अशी ही तहान भागवल्याची कथा सहजासहजी कशी विसरता येईल ?

छोट्या-मोठ्या तलावांवर मासेमारी करणारा भोई समाज आहे. तलावातले पाणी जसजसे आटत जाते तसतसा यांचा मासेमारीचा व्यवसाय संपुष्टात येतो. त्यातही काही मोठे तलाव खासगी तत्त्वावर दिलेले आहेत. निविदा भरून हे तलाव घ्यायचे तर लाखो रुपये भरावे लागतात. पारंपरिक मासेमारी करणारे एवढे पैसे भरू शकत नाहीत. मग अनेक ठिकाणी ठेकेदार विरुद्ध हे मच्छीमार यांच्यातही संघर्ष चालूच राहतो. ठेकेदारांचे काही भाडोत्री गुंड त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतात. अनेकदा हा संघर्ष हाणामारीवर येतो, त्यातून भीषण हिंसेचे प्रसंग घडतात.

सावलीला हद्दपार करण्याचं कारस्थान तर सगळीकडेच सुरू. शेतातली मोठमोठी झाडं कापून टाकली. नव्या पिढीला वाटतं अशा झाडांनी जमीन अडते. मोठमोठ्या झाडांच्या सावलीखाली पिकं वाढत नाहीत. म्हणून आधीच्या दोन-तीन पिढ्यांपासून असलेली झाडं भुईसपाट करण्यात आली. शिवारात पिकं दिसतात. पण मोठ-मोठी झाडं कुठेच दिसत नाहीत. इकडे महामार्गाची जी कामे झाली त्यातही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या असंख्य झाडांची कत्तल झालेली. दोन-तीन माणसांच्या कवेतही मावणार नाहीत अशी वड-पिंपळाची झाडं कापून टाकण्यात आली. प्रत्यक्षात रस्त्याची कामे झाली तेव्हा या झाडांचा कोणताच अडसर नव्हता, हे आज त्या झाडांचे छाटलेले बुंधेच सांगतात. आता एखाद्या भट्टीसारखा शिवार पेटलेला असतो. गरम झळा सर्वांगाला भिडत असतात. भवताल जणू निखार्‍यांनी फुललेला. अशा वातावरणात जवळपास कुठंच झाड न दिसणं ही किती पोळणारी गोष्ट आहे याचे चटके त्याच माणसांना माहीत, ज्यांच्यासाठी सावली दुर्मीळ झालेली असते.

इथल्या काही गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागते. टँकर कधी येईल याचा नेम नाही. अनेकदा मध्यरात्रीही टँकरच्या भोवती गराडा असतो. अख्खा गाव जणू जागा असतो. टँकरमधून रांगेत आधी पाणी मिळवणे हेच त्यांच्यासाठी अशा वेळी एक ध्येय होऊन जातं. कधी कधी दिवसभराच्या ढोर कष्टाने जमिनीला पाठ टेकवल्याबरोबर डोळा लागणार एवढ्यात गावात शिरलेल्या टँकरचा आवाज आणि त्याचबरोबर बाया माणसांची पळापळ. जिथे टँकरची सुविधा नाही तिथे लोक शेतातून परतत असतानाच संध्याकाळी बैलगाडीत पाण्याच्या टाक्या भरून पाणी आणतात.

अगदी काही वर्षांपूर्वी घडलेली बीड जिल्ह्यातली एक घटना. वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा या गावात पिण्याचे पाणी नाही म्हणून बळीराम हरिभाऊ राठोड यांनी आपल्या बैलगाडीत पाण्याच्या दोन टाक्या भरल्या. गाडी घरासमोर उभी केली. त्यांची दोन लहान मुलं, जयदेव आणि आविष्कारही बैलगाडीच्या मागच्या बाजूला होती. वजनाचं संतुलन बिघडलं. अचानक गाडीच्या दांड्या वर झाल्या. क्षणात दोन्ही पाण्याच्या टाक्या खाली कोसळल्या. या भरलेल्या पाण्याच्या टाकीखाली दबून गेल्याने दोन्ही लेकरांचा जागेवरच मृत्यू झाला. एकाचं वय आठ तर दुसर्‍याचं चार. पाण्याच्या शोधात निघालेल्या कुणाचा विहिरीत पाय घसरून मृत्यू होतो तर कोणाचा बंधार्‍यात. फक्त पाण्यासाठी होणारे मृत्यूही ग्रामीण भागातच आढळतात. जेव्हा टँकरचं पाणी गावातल्या सार्वजनिक विहिरीत ओतलं जातं तेव्हा बुडाशी असलेला सगळा गाळ वर येतो. हे गढूळ पाणी नितळ होईपर्यंत कोण थांबणार? आपापलं भांडं भरून नेण्यासाठी तिथे रेटारेटी चाललेली असते. तोटी फिरवल्याबरोबर फेसाळत्या पाण्याची धार पाहणं या लोकांना माहीतच नाही. शुद्ध पाणी ही तर त्याहून कितीतरी पुढची गोष्ट!

जंगलाजवळच्या गावातल्या बाया कधी लाकूडफाटा तोडून, गवत कापून, रानातल्या काही वस्तू गोळा करून जवळच्या आठवडी बाजारात विकायला आणतात. दिवसभराच्या धडपडीला चार पैसे गाठी आले तरच चूल पेटणार अशी परिस्थिती. जगण्यासाठी चिमूटभर साधनं हाताशी असलेली ही माणसं. यातल्या अनेकींच्या पायात चपलाही नसतात. झाडांची पानं तळव्याला बांधून फिरणार्‍याही काही बाया दिसतात. दिवसभर कष्ट करूनही पोट भरण्याचा संघर्ष थांबत नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी तो आणखी कितीतरी तीव्र होतो. देह भाजून निघतो… या माणसांच्या आयुष्यात असा उन्हाळा आणि ही रखरख एकदाच येत नाही, ती पुन्हा पुन्हा… जन्मासाठी कायमचीच राहाणार असते. पावसाकडे लक्ष लागून राहिलेले पुढले दोन-तीन आठवडे उन्हापासून बचावात तसेच घोटभर पाणी मिळविण्यात कित्येकांचं आयुष्य खर्च होईल. अन् जगण्याची आणि तगण्याची त्यांची लढाई दूरून त्याबाबतची केवळ शब्दचित्रे-छायाचित्रे ऐकणार्‍या-पाहणार्‍या अनेकांच्या खिजगणतीतही नसेल.

जीवावर उठणारं ऊन

शिवारात पाण्याचा थेंब नसेल तर नजर भिडेल तिथपर्यंत मृगजळाच्याच लाटा दिसू लागतात. हे ऊन किती पेटतं? जुनी माणसं सांगतात, ‘चालतं माणूस एका ठिकाणी थांबलं तर जागेवरच पेट घेईल. एवढं भयंकर असतं वैशाखातलं ऊन. या उन्हाचा दाह सहन न होणारी चिमण्यांसारखी पाखरं, पक्षी पाण्याविना तडफडतात तर कधी त्यांची चोच तापलेल्या भुईत रुतते. ते जीव सोडून देतात. अशा असंख्य मुक्या जीवांच्या जीवावर उठते हे ऊन.’

aasaramlomte@gmail.com