‘शहरी वस्त्यांना ‘मास’चा आधार’ हा लेख (२७ जून ) वाचला. शहरात राहायचे म्हटले तरी घरापासून ते इच्छित ठिकाणी कामाला जाण्यासाठी सामान्य माणूस, त्यातही स्त्री वर्गाची खूप तारांबळ उडते. सामान्य कुटुंबाला तर साधे भाड्याचे घर मिळवण्यासाठीही आटापिटा करावा लागतो. जवळ घर हवे तर भाडे अधिक, शिवाय तिथे सर्वच सुविधा उपलब्ध असतीलच असे होत नाही. शौचालय असते तर पाणी मुबलक प्रमाणात नसते. जे पाणी येते ते आपल्याला हव्या त्या वेळेत येईल याची शाश्वती नसते. आता आरोग्याच्या बाबतीत विचार केला तर त्यात काडीचाही बदल नसतो. सर्वसाधारण कामामुळे तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यात कुटुंब जर चौकोनी असेल तर मुलांच्या शाळेचा खर्च, त्यांच्या आरोग्याचा खर्च पेलताना उधार उसनवारीही करावी लागते. मूळ विचार केला तर शहरी भागात राहताना जो आर्थिक त्रास होतो तोही वेगळाच. शासकीय दवाखान्यात जावे तर तो दूर अंतरावर असतो. मग खासगी रुग्णालयात जावे तर परिस्थिती नसल्याने आजार अंगावर काढावा लागतो. त्यामुळे सामान्य माणसाला शहरी भागात राहताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांच्यासाठी ही महिला आरोग्य समिती नक्की उपयोगी पडतील.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</strong>

आधार देणे महत्त्वाचे

‘बाळा, मी आहे तुझ्या पाठीशी!’ हा लेख मला मनापासून प्रचंड आवडला. मानसशास्त्र विषयात पीएच.डी.प्राप्त वनिता पटवर्धन यांनी या विषयाचा केलेला हा ऊहापोह खरोखरच पालकांना मार्गदर्शन करणारा आहे. त्यात महत्त्वाचं अवाढव्य लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शेकडो पर्याय उपलब्ध आहेत ते निवडले पाहिजेत. फक्त आणि फक्त अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी यांनाच प्रतिष्ठा आहे, असे पालकांनी समजू नये. त्यासाठी आपल्या पाल्याला मानसशास्त्रीय मार्गदर्शनाची मदत घेऊन त्याची बुद्धिमत्ता, आवड, अभिक्षमता, व्यवस्थापन इत्यादी व्यक्तिमत्त्व गुण यांचा अभ्यास करून त्याला कोणता अभ्यास पेलेल हे पाहिले पाहिजे. असे जर पालकांनी केले तर मुले नैराश्याच्या गर्तेत सापडली जाणार नाहीत. पालकांनी मुलांना स्पर्धेत नक्की पाठवावे परंतु हे ठासून सांगावे की, अपयश ही यशाची पहिली पायरी असते. तसेच पालकांनी त्याची क्षमता, आवड-निवड आणि कल हे पाहून त्याला योग्य तो अभ्यासक्रम निवडून घ्यावा. बाळा, कोणत्याही परिस्थितीत आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा आधार देणे फारच महत्त्वाचे आहे.

उज्ज्वला मालाडकर, पुणे</strong>