राजधानीतल्या बुद्धिजीवी वर्तुळात, विशेषत: प्रकाशक आणि पुस्तकप्रेमी मंडळींमध्ये उर्वशी बुटालिया म्हणजे बस नाम ही का़फी है! ‘काली फॉर वीमेन’ (१९८४) या भारतातल्या पहिल्या आणि आजवर आघाडी टिकवून असलेल्या स्त्रीवादी प्रकाशनाची सहसंस्थापक ही तिची छोटीशी ओळख.
निवडलेला रस्ता धाडसाचा होता, पण लंबे रेस के घोडे जाणून असतात स्वत:ला. ध्येयावर पूर्णपणे केंद्रित केलेलं लक्ष, आपण काय करत आहोत याची जाण व भरपूर मेहनतीमुळे तिचं आणि तिच्या पुस्तकांचं जागतिक पातळीवर नाव व्हायला फार वेळ लागला नाही. उत्कृष्ट प्रकाशक, संपादक असण्याबरोबरच संवादी-शैलीतली वक्ता असल्याने ती जागतिक व्यासपीठावर भारतीय स्त्रीवादाचा सुस्पष्ट आवाज बनली. तिला जगभरातल्या सामाजिक शोधसंस्था व विद्यापीठांकडून व्याख्यानांसाठी आमंत्रणं येत असतात. पंजाबी, हिंदी आणि इंग्रजीवर समान प्रभुत्व असलेल्या उर्वशीला, भाषिक अस्मिता वगैरेचा संसर्ग नसल्याने फ्रेंच, जर्मन आणि इटालियनही फर्राटेदार बोलता येतं. तिच्या प्रकाशनाने अनेक भारतीय लेखिकांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आणलं, परिणामी सैद्धांतिक चर्चांना विस्तृत व्यासपीठ मिळालं. व्यवसायात फक्त मेड इन इंडियाचा आग्रह न धरता नीरक्षीरविवेकाने वेगवेगळ्या संस्कृतीत सहज मिसळून उभयपक्षी काहीतरी फायद्याचं निर्माण करण्याचं व्यवसायकौशल्य तिच्यात असल्यानं तिच्याबरोबर पेंग्विन, अटलांटिक, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेससारखे प्रकाशक/ वितरक सहयोगासाठी तयार असतात. पुढे ‘काली’चं विघटन झालं. उर्वशीने ‘झुबान’ स्त्रियांना बोलतं करणारी याअर्थी) व रितू मेनन ने ‘वीमेन अनलिमिटेड’ ही आपापली प्रकाशनं सुरू केली. उर्वशी दिल्ली विश्वविद्यालय, नॅशनल बुक ट्रस्ट, अशोका युनिव्हर्सिटीत वेगवेगळे कोर्सेसही शिकवते.
उर्वशीच्या कुटुंबातच प्रश्नांना भिडणारं सुधारणावादी समाजकार्य आहे. आई सुभद्रा बुटालिया अतिशय बाणेदार स्त्रीवादी! शेजारच्या घरात हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळल्याचं पाहून त्यांनी हुंड्याविरुद्ध जनमत तयार करण्याच्या कार्याला वाहून घेतलं. तिच्या भावाने- पंकज बुटालियाने वृंदावनच्या परित्यक्त विधवांवर बनवलेली ‘मोक्ष’ ही कुप्रथेवर भाष्य करणारी फिल्म देशोदेशीचे सन्मान मिळवणारी ठरली.
उर्वशी म्हणते, ‘‘मी माझ्या अनेक वर्षांच्या कामाकडे मागे वळून पाहते तेव्हा मला आशा वाटते आणि निराशाही. आशा यासाठी की मला अशा अनेक प्रेरक कथा दिसतात- जिथे स्त्रिया अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लढा देतात आणि यशस्वी होतात. काही यशस्वी नसल्या तरी त्यांचं धैर्य आणि जिद्द प्रेरणादायी असते. या कुणी विशेषाधिकार असलेल्या स्त्रिया नव्हेत- भंवरी देवीकडे पाहा, ज्यांच्या सामूहिक बलात्काराविरुद्धच्या लढ्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा आला. शरीफा खानम- ज्या मुस्लीम स्त्रियांच्या हक्कांसाठी लढल्या. किंवा सत्याराणी चड्ढा आणि शाहजहान आपा, ज्यांनी हुंडाविरोधात लढा दिला… अशा अनेकजणी.
थोडीही संधी मिळाली तर ्त्रिरया कठीण अडथळ्यांवर मात करून स्वत:चं आयुष्य बदलू शकतात. पंचायती आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांत उभ्या राहिलेल्या ्त्रिरयांकडे पाहा- आरक्षित जागांमध्ये केवळ ३३ टक्क्यांपासून सुरुवात करून, आज त्या जवळपास ४५-४८ टक्के जागांवर पोहोचल्या आहेत आणि वारंवार निवडून येत आहेत. पण त्याच वेळी निराशा यासाठी वाटते की, इतकी क्षमता असूनही हा देश अजूनही स्त्रियांचे अवमूल्यन करतो, त्यांना पूर्ण हक्क असलेले नागरिक म्हणून मान्यता देत नाही. त्यांना स्वत: विचार करण्यास अक्षम समजतो… मी काही विद्यापीठांमध्ये शिकवते. तिथे मला असे अनेक तरुण दिसतात जे स्त्रियांच्या हक्कांबद्दल प्रथमच विचार करू लागले आहेत- हेही आशादायी आहे. कदाचित जगातील सर्वोच्च सत्तास्थानांवर श्रीमंत, बेईमान आणि भ्रष्ट पुरुषांऐवजी स्त्रिया असत्या, तर काही बदल दिसू लागला असता.’’
लंडन विद्यापीठातून ‘साऊथ एशियन स्टडीज’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उर्वशीच्या पहिल्याच पुस्तकामागची गोष्ट म्हणजे १९८६ मध्ये तिला ब्रिटिश टीव्हीसाठी फाळणीच्या कहाण्यांवर शोधकार्याची संधी मिळाली. त्यासाठी ती पंजाब व दिल्लीतून तो कालखंड जगलेल्यांच्या मुलाखती घेऊन, कहाण्या बोलक्या करू लागली. इतकी वर्षं लोटल्याने आणि आता ताटातूट स्वीकारल्याने लोक जरा शांतपणे बोलू शकत होते. त्यातून ते सगळं आपल्या कल्पनेपेक्षा केवढं भयंकर होतं आणि झालेली हानी कितीतरी प्रकारची होती हे उलगडलं.
१९८४ मध्ये, इंदिरा गांधींच्या निर्घृण हत्येनंतर शिखांना दिल्लीत जे भोगावं लागलं तीही धार्मिक दंग्यांनीच आरंभलेली कत्तल होती. उर्वशीचं कुटुंब पगडी वगैरे बांधत नसलं तरी आडनावावरून शीख हे उघडच होतं. माणसाने माणसाशी धर्माच्या नावांवर दाखवलेलं आंधळं क्रौर्य, दहशत आणि असुरक्षितता परत अनुभवायला लागली. अशातून लिहिलं गेलं. ते खूप गाजलं. मराठीसकट अनेक भाषांत अनुवाद झाले.
फाळणी हा उर्वशीच्या कुटुंबानेही भोगलेला कालखंड, आपण इतिहासात वाचतो त्यापेक्षा खूप वेगळा, अनेक प्रकारच्या वेदनांनी भरलेला- ज्या फक्त ज्यांनी तो काळ जगला, तेच सांगू शकतात. अशांची संख्या वीसेक लाख होती. आईचं माहेर लाहोरमधलं. निर्णय घेणं कठीण होतं, पण वीस वर्षीय मामा मागे राहिला. त्याने उर्वशीच्या आजीला म्हणजे स्वत:च्या आईला मात्र जवळ ठेवून घेतलं. कदाचित यासाठीही की राहतं घर तिच्या नावावर होतं. बाकी सर्व भारतात आले आणि मग संपर्क तुटला. नव्वदच्या दशकांत उर्वशीला कामासाठी पाकिस्तानचा व्हिसा मिळाला आणि कधी न पाहिलेल्या मामाला शोधता आलं.
मनोमन हिंदू राहिलेल्या मामाचं व्यक्तिमत्त्व दुभंगलं होतं, त्याचा त्याला खूप त्रास होत होता. उर्वशीमुळे कुटुंब परत एकत्र आलं. ती मावशी आणि आईला लाहोरला घेऊन जाऊ शकली आणि चाळीस वर्षांनी सख्ख्या बहिणी आणि भाऊ भेटले. वास्तविक दिल्ली ते लाहोर फ्लाइट फक्त अर्धा तासाची. पण फाळणीनंतरच्या राजकीय वैरभावामुळे सामान्य कुटुंबं एकमेकांना पारखी होऊन बसली… शक्य तितक्या वस्तुनिष्ठतेने लिहिलेलं पुस्तक (उर्वशी एक संतुलित लेखिकाच नव्हे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसमध्ये तयार झालेली साक्षेपी संपादकही आहे ) प्रकाशित झाल्यावर मामाने तिच्याकडून एक प्रत आग्रहाने मागितली. अपेक्षेप्रमाणे त्याला प्रथम राग आला, पण आता पुलाखालून बरंचसं पाणी वाहून गेलंय, भांडणं कोणालाच नको आहेत.
हिंसा व असुरक्षिततेच्या ग्रहणाखाली घालवलेली हयात आणि अनेकींच्या वाट्याला आलेलं समूळ उखडले जाण्याचं दु:ख बोलतं करणारं, उर्वशीचं काश्मिरी स्त्रिच्या समस्या व वेदनांचा शोध घेणारं पुस्तकही खूप महत्त्वाचं.
उर्वशीचं आणखी एक लक्षणीय काम म्हणजे प्रेमचंदांचे नातू प्राध्यापक प्रबोध कुमार यांच्या घरी हलाखीच्या परिस्थितीतून, घरकामाला आलेल्या बेबी हलदार यांनी शिकत-वाचत राहून लिहिलेल्या ‘आलो आंधारी’ या आत्मकथेचा इंग्रजी अनुवाद करून प्रकाशित केला. तो नंतर १३ परदेशी भाषांसह २१ भाषांमध्ये अनुवादित झाला आणि बेबी झुबानने छापलेली सर्वात सफल लेखिका ठरली, तिची आर्थिक स्थिती आणि व्यक्तिमत्त्व जादू झाल्यासारखं बदललं. बेबी अजूनही इमानदारीने तीच नोकरी करते आहे हे विशेष!
प्रकाशकाला त्याचं प्रत्येक पुस्तक पोटच्या पोरासारखं असतं, तरीपण तुझं एखादं काकणभर जास्त लाडकं पुस्तक? या प्रश्नाच्या उत्तरात उर्वशी सांगत, ‘‘आमची अनेक पुस्तके ्त्रिरयांच्या चळवळीतून जन्माला आली आहेत, गरजांना प्रतिसाद देत. यामुळे ‘झुबान’ इतरांपेक्षा वेगळं ठरतं. आमचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक ‘शरीर की जानकारी’ असावं. हे पुस्तक राजस्थानमधील ७५ खेडूत स्त्रियांनी स्त्रियांच्या शरीरावर कार्यशाळा घेऊन तयार केलंय. या पुस्तकामागेही कहाणी आहे. एकदा काही ्त्रिरया आमच्या कार्यालयात आल्या- चार ओळखीच्या खेड्यातल्या आरोग्य कार्यकर्त्या आणि बाकी चौघी थेट राजस्थानी पारंपरिक वेशातल्या. म्हणाल्या की, त्यांनी हे पुस्तक हाताने दोन प्रती बनवून गावात दाखवलं. पण लोकांनी त्यातल्या नग्न चित्रांवरून त्याची टर उडवली.
मग त्यांनी एक कल्पक उपाय शोधला- लोकांची पूर्ण वेषातली चित्रे काढली, पण शरीरावर छोटे उघडता येणारे फ्लॅप्स लावले, जे उघडल्यावर आतले अवयव दिसत. अशाने पुस्तक स्वीकार्ह राहिलं आणि अचूकही. शहरापलीकडे, विशेषाधिकारांपलीकडे जाऊन, प्रत्यक्ष अनुभवातून आलेलं ज्ञान प्रकाशित करणं हे प्रत्येक स्त्रीवादी प्रकाशकाचं स्वप्न असतं. हे पुस्तक त्याचं उत्तम उदाहरण आहे. प्रभावशाली पुरुषांच्या जागी प्रभावशाली ्त्रिरया आणणं पुरेसं आहे का? यासारख्या मूलभूत प्रश्नामुळे आम्ही अधिकाधिक वंचित आवाजांकडे वळलो. आम्ही ईशान्य भारत, काश्मीर, तसेच दलित, क्विअर, ट्रान्स, अल्पसंख्याक, आदिवासी समुदायांचे आवाज प्रकाशित करतो.’’
व्यक्तिगत सांगायचं तर, आयुष्यात एका वाईट कालखंडातून गेले तेव्हा उर्वशीचं नुसतं जगातलं अस्तित्व मला आत्मविश्वास परत मिळवायला मदत करणारं ठरलं. असं फक्त बरोबर राहून जजमेंटल न होता मित्रमैत्रिणींना, विशेषत: मैत्रिणींना सबळ बनवण्याची भूमिका तिने अनेकांच्या बाबतीत अतिशय संवेदनशीलतेने निभावली आहे. आणि त्याचा उच्चार कुठे बाहेर करणं सोडाच, पण त्या व्यक्तीलाही कधी आठवण करून न देण्याचं मनाचं मोठेपण तिच्यात आहे. अनेकांचे विश्वास ती राखून आहे. तिच्या शब्दाखातर लोकांना नोकर्या मिळाल्या आहेत, व्यवसायात संधी मिळाल्या आहेत, तुटत आलेली नाती सावरली आहेत, पण अमुकसाठी मी हे केलं, असं कधी तिच्याकडून बाहेर पडत नाही, तिसर्याच कोणाकडून ते कानी येतं. हा तिच्या स्वभावातला चांगुलपणा! वाकडं वागणार्यांशीही तिचं समजूतदार वागणं, त्यांच्या दोषांवर पांघरूण घालणं मी पाहत आले आहे.
इतरांवर होणार्या अन्यायाविरुद्ध लढायला तयार असलेली उर्वशी, स्वत:वर होणारे अन्याय सहजपणे शहाण्या आणि अधिक सशक्त मनाच्या व्यक्तीच्या शांतपणे पडतं घेऊन मैत्री, नाती सांभाळत असते. फ्रें च सरकारचा ‘शेव्हेलिए दे आर्ट्स एट दे लेट्रेस’ (२००२), जपानचं ‘निक्केई एशिया अवॉर्ड’ (२००३), गोएथे-इ्स्टिटट्यूटचं ‘गोएथे मेडल’ (२०१७) आणि २०११ मध्ये पद्मश्रीसारखे मानमरातब मिळवूनही तिला सगळ्यांची साथ आवश्यक वाटते. माणसं जोडायलाच आवडतात, तोडायला अगदी नाही, हे मी जवळून पाहात आले आहे. स्त्रीवादी आहे खरी, पण लढाई आहे ती पितृसत्ताक पारंपरिक असमानतेशी, समाजात रुजलेल्या अन्यायकारक पुरुषी अरेरावीशी. अतिशय निरोगी मैत्र स्त्रियांइतकंच पुरुषांशीही आहे.
स्त्रीवादाच्या भारतातील वाटचालीबद्दल, उर्वशी इतक्यातच एका परिसंवादात म्हणाली, ‘‘जे म्हणतात की आता काही आपल्याला स्त्रीवादाची गरज नाहीये, त्यांनी कुठल्याही एका दिवसाचं वर्तमानपत्रं उघडून पाहावं आणि बघून घ्यावं, आपण स्त्रियांबाबतीत किती ‘प्रगती’ केलीये ते…’’ पटतंय ना?
