– प्रदीप कोकरे

देशातील मोबाइल इंटरनेट धारकांचे एक सर्वेक्षण नुकतेच झाले. ज्यात ग्रामीण आणि निमशहरी भागांतील रोजचा डेटावापर दरडोई ३८ ते ४२ जीबी इतका होत असल्याचे समोर आले. दरदिवशी मुंबई दिल्ली शहरांपेक्षा १२ ते १४ जीबी अधिक या परिसरातील मोबाइलडेटा नंदादीपासारखा जळत राहतोय. त्यातून ज्ञानओरपणी होते की मनपोखरणी, हा पुढील काळात समाजअभ्यासकांना ताण देणारा विषय असणार आहे. तूर्त गाव आणि शहरातील दोन लिहित्या नजरांना आपल्या भवतालात याबाबत काय दिसते, त्याचा अहवाल…

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Dog Viral Video
‘सांगा, हे योग्य की अयोग्य?’ चक्क श्वानाच्या अंगावर लावली लायटिंग… VIDEO पाहून व्हाल अवाक्
Top 10 worst cities in Asia for traffic
पुणेकरांचा ट्रॅफिकमुळे ‘एवढा’ वेळ जातो वाया! वाहतूक कोंडीत आशियातील टॉप १० शहरात पुण्याचा समावेश
Ward Boy Performs ECG Jodhpur :
Jodhpur : धक्कादायक! यूट्यूबवर व्हिडीओ पाहून केला रुग्णाचा ‘ईसीजी’; व्हिडीओ व्हायरल, कुठे घडली घटना?
smartphone and career
तुमचा स्मार्टफोन पाहा- गरज ओळखून शिका… किंवा शिकलेले विसरा!
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
Mobile Phone Slips Into Boiling Oil
Mobile Blast News: जेवण बनवताना तरी मोबाइल दूर ठेवा! गरम तेलाच्या कढईत मोबाइल पडून झाला स्फोट, युवकाचा दुर्दैवी मृत्यू

‘सकाळी गार पाण्यानं अंघोळ केल्यावर अगदी दिवस ताजातवाना जातो’ वगैरे मुलाखतीतले कुणाकुणाचे चकचकीत सल्ले उगाचच आठवत राहतात. वैज्ञानिकदृष्ट्या असेलही बरोबर. साखरझोपेत का काय ते नळाला पाणी येऊन सकाळी दहाच्या आत नळ कोरडापण होतो अक्षरश: त्या धांदलीत ताजंतवानं होणं म्हणजे नेमकं काय, हे अनुभवायचं राहून जातं सारखं. दुर्मुखलेले चेहरे धावपळीत दिवस ढकलतात आणि मालडब्यात गालाला हात लावून स्टेशनं एकामागोमाग एक अशी पाठ सोडतात सराईतपणे वर्षानुवर्षं. स्वप्नातही आपली पावलं वळतीलच सवयीनं स्टेशन गाठायला. विरार फास्टमधलं धापकीर्तन ओठांवर असेल नि यांत्रिक बाई स्टेशनांची नावं मर्जीमापात घ्यायला कधीही विसरणार नाही. रोजचे सराईत आपण ‘कुर्ला कोनसे साइड आयेगा?’ विचारल्यावर बरोब्बर स्टेशन कोणत्या दिशेला येईल हे सांगताना जीभ फापलेल आपली. नंतर नंतर निष्ठुर प्रपंच उरकून पुन:पुन्हा घर गाठण्याचा, मागं परतायचा शाश्वत पुरावा नसतो कुणाकडे. सगळे खालमानेतले चोखंदळ व्यवहार फसवणूक करतात स्वत:च स्वत:ची. खोट्या अनाठायी समजुती घालत राहतात. अलार्म लावून डोळे बंद होतात तात्पुरते. पुन्हा आपण स्वत:ला फसवायला तयार होतो ताजेतवाने ‘ऑटोमोड अपडेट’ होणाऱ्या अ‍ॅप्लिकेशनसारखे.

हेही वाचा – ‘इरू’ समजून घेण्यासाठी…

तर सांगत होतो, माल डब्यात अष्टौप्रहर रेंगाळणारं कुणी तरी असतंच एकटक मागेमागे पळणाऱ्या सावलीशी छेडछाड करणारं. आणि हे न्याहाळणारंही असतं कुणी तिऱ्हाईत. सगळे एकमेकांना बघत असतात. बघणाऱ्यांना बघणारं आणखी कुणी तरी असतं हवेसारखं. डोळ्यांची चुकामूक झाली की सगळे सावरतात. पुन्हा मश्गूल होतात. ओळखीचे सगळे पुरावे पेरत कोण काय काय डब्यात ठेवून आपला आपला निघून जातो.

कुणी तरी असतं खालमानेत सदैव बुडालेलं ‘बिगबॉस’प्रेमी. नाही तर आवाजाचं सर्वोच्च टोक गाठून मराठी सीरियलींचे एपिसोड्स बघत. सुखवस्तू घरातला सेटअप असतो. बेडरूमच्या कपाटात व्यवस्थित कपड्यांचे रकाने असतात कैक. तरीही अंगावर चढवलेल्या शर्टाचं बटण तुटलं तर बायकोने तिथल्या तिथं सुईदोरा घेऊन ते लावून देऊन नवरा-बायकोतलं प्रेम वृद्धिंगत करण्याची जी अशक्य क्रिएटिव्हिटी सीरियलवाले दाखवतात ती अजूनही जोमात आहे, हे आपल्यालाही दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये डोकावल्यावर लक्षात येतं बारीक बारीक.

कुणी तरी रुळांखाली आलं, कुणाच्या हातावर गर्दुल्ल्यांचा फटका बसून त्याचा पाय गेला, चालत्या ट्रेनमधून कुणी घसरत गेला, कुणी धडधाकट अचानक गर्दीत गुदमरून गेला, पूल कोसळला, पाणी भरलं, सिग्नल पडलं, रूळ घसरले अशी कैक कारणं आहेत लेट होण्याला. मग काय करायचं बसल्या बसल्या. मग स्क्रोल कर, भेंडीच्या भाजीचा चिकटपणा कसा घालवायचा त्याच्या रेसिपी, आज कुणी बलात्कार केला, कुठल्या नेत्याच्या पोरानं किती जणांना उडवलं, एअरपोर्टवर कोण कुठल्या ड्रेसमध्ये दिसलं, मलायका कशी चालते, कुठली अभिनेत्री सलूनमधून जिममधून कधी बाहेर पडली, कुणाचा तीळ कुठे लपलाय, हे वाचून थक्क व्हाल, वगैरे क्लिकबेट असतं पॉपअप करत. एका क्लिकवर अनेक क्लिक लपलेल्या असतात. इंटरनेट स्पीड भरघोस असतो नि एका लिंकवरून दुसऱ्या, या अ‍ॅपवरून त्या मग निराळ्या, ओटीटी प्लॅटफॉर्म, पॉडकास्ट, स्टँडअप करत करत वेळ क्षणार्धात निघून जातो. मान खालीच असते नि बोटं सर्च करण्यात गुंतलेली असतात निगुतीनं.

नोटिफिकेशन येत जातात. आणि ‘तुला ते पाठवलंय जरा बघून लवकर कळव’ असा सक्तीचा फोनही केलेला असतो. स्वत:च्या सोयीप्रमाणे ज्याला-त्याला जे-ते करून देणं डोक्यातून निघून गेलेलं आहे. आपल्याला दुसऱ्यांचे क्षण बरबाद करायची सवय लागली आहे आणि ती वरचेवर वाढत जातेय. घरात जेवताना कुणाचं अवाक्षर निघत नाहीय. एका हातात फोनय आणि दुसऱ्या हातात घास. ‘गुलामा जेवताना तरी ठेव ते चोपनं’ (चोपनं म्हणजे कोकणातल्या अजूनही लादीने काबीज न केलेल्या घरात मातीची जमीन करण्यासाठी वापरण्यात येणारं लाकडी अवजार) असं दरडावलं जाई. शांतपणे समजावण्याची ती सोय आता राहिलेली नाही. कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत राहिलेलं नाही. कुणाला कुणाचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीय. कुणाला काहीही बोलायची बाजू राहिलेली नाहीय. लोक ऑफेन्ड होतायत, तुम्हाला काय करायचंय म्हणत पळ काढतायत. उत्तरं टाळायची आहेत. कुणी कुणाला बांधील राहिलेलं नाहीय. आपण बांधिलकी म्हणून खूप काळ प्रामाणिक राहू शकत नाही. स्पष्ट खरं सांगितलं की दुरावा वाढतो. दुरावा वाढला की नाती संपतायत. लोक एकमेकांना जशास तशी स्वीकारत नाहीत. घोळच घोळ होऊन बसलाय.

मुलाच्या हातात खेळणं म्हणून मोबाइल आहे. जेवताना तो त्याच्या हातात असावा लागतो, नाही तर जेवण संपत नाही. पालक नको ती कटकट म्हणून सवयीनं वेळ मारून नेण्यासाठी लावून देतात काहीही. पुढंपुढं ते मूल स्वत:च हाताळायला शिकतं. व्हिडीओ यूट्यूबवर लागतात. फोन अ‍ॅप्लिकेशनमध्ये हे चिन्ह म्हणजे यूट्यूब हे ओळखून ते स्वत:च सुरू करून, क्षणाक्षणाला अ‍ॅप्स बदलत स्विच होत राहायचं यात ती अक्षरश: सराईत होतात. रडलं की मोबाइल, पाहुणे आले की शांत बसावं म्हणून मोबाइल, झूम मीटिंग्समध्ये अडथळा नको म्हणून मोबाइल, पालक सभेत मोबाइल, शाळेतले प्रोजेक्ट्स, शाळेचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, ट्यूशनचा ग्रुप अशा कैक जंजाळात सगळे चिडखोर झालेत. शांत बसून विचार करणं शक्य राहिलेलं नाही. स्क्रीनटाइम कसा कमी करायचाचे व्हिडीओ पाहून वेळ निघून जातोय. फोन हातावेगळा करणं मात्र राहून जातंय.

गल्लीत, नाक्यावर सुशिक्षित घोळके आहेत. बंद पडलेल्या दुकानाच्या पायरीवर सिगरेटी आणि विमल चघळत स्क्रोलिंग चालूय. अटेन्शन स्पॅन कमी झालाय म्हणजे लक्ष दुर्लक्षित करणाऱ्या वस्तूंची निर्मिती वाढलीय. इन्स्टा रिल्स २५ सेकंदांच्या पुढं बघवत नाही. नि ट्रेंडिंग गाणे आठवड्याभरात गायब होते ट्रेंडमधून. तरीही स्क्रीनटाइम वरचेवर वाढतोय. इतक्या गोष्टी आपल्यासाठी का तयार होतायत आणि आपण त्यासाठी आहोत का, असा विचार करण्याइतकी उसंतही मिळत नाहीय. मला खायच्या आधी स्टोरी टाकायचीय, त्याने शिमला-मनालीचे फोटो टाकलेत मलाही तिथं बर्फ पडताना जायचंय, मलाही फोटो टाकायचेत कॅप्शनसहित. मलाही प्लिटेड कोरियन पॅन्ट हवीय. कार्टमध्ये अ‍ॅड केलीय. खरेदी न करता बाहेर पडलात तर पॉपअप पाठलाग करतात कुठंही गेलं तरी. मग तसेच प्रोडक्ट विकणाऱ्या आणखी साइट्स, भरघोस सवलती, फोटो बरे काढतो तर नावाजलेल्या फोटोग्राफरसोबत फोटोटूर, स्पॉन्सर्ड पेजेस, दुर्मीळ पुस्तकांचे ऑक्शन, अल्गोरिदम, फिल्म अ‍ॅप्रिसिएशन कोर्स… हे सगळं सगळं अडकवत जातं एकात एक गोफ बनून. बाकीचे सगळे हे करतात या पिअर प्रेशरखाली आपल्याला न आवडणाऱ्या, सूट न होणाऱ्या, आवश्यकता नसलेल्या कैक गोष्टी करून बसतो विनाकारण. याची काहीही गरज नसताना. ‘आवर्जून पाहायला हवेत असे दहा चित्रपट, आवर्जून वाचावीत अशी दहा पुस्तकं’ अशा थंबनेल्स पाठलाग करतातच त्या त्या प्रवाहात असल्यावर. हे टाळलं तर माझं काहीही नुकसान होणार नाहीय. मी अनिंद्यासुंदर अनुभवाला मुकणार नाहीय. माझा आनंद निराळ्या गोष्टीत आहे हे स्वीकारणं शक्य व्हायला हवं. निसर्गाला जशी काहीही सिद्ध करायची घाई नाही तशी ती आपल्यालाही असायला हवी. डोकं शांत ठेवण्याचा तो सुखकारक मार्ग असू शकेल कदाचित. आयुष्य आणि जीवन यातला भेदही तेव्हाच कळेल बहुतेक. चिडचिड होणार नाही आणि तणावापासून किंचित सुटका करून घेऊ शकू आपण.

आर्ट गॅलऱ्या पाहणाऱ्यांची निराळी गंमत असते एकेक. सुरुवातीच्या चित्रापासून मोबाइल आडवा धरून सरळ शेवटच्या चित्रापर्यंत व्हिडीओ करून मग लोक चित्रं पाहतात हल्ली. म्हणजे जे प्रदर्शन आहे समोर साक्षात चित्र आहे, अडलं तर चित्रभाषा समजावण्याकरता चित्रकार आहे संवाद साधायला. हे लक्षात न घेता आपल्याला कुणाला तरी व्हिडीओ कॉल करून समोरच्याला दाखवायचं आहे. ज्या माध्यमाची जी भाषा आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या अवकाशाची निकड आहे ते ध्यानात न घेता आपण भलत्याच अनावश्यक गोष्टींना महत्त्व देत आलो आहोत हे लक्षात येतं. प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन म्युझिअम बघायचं मोबाइलमधल्या फोटोंमध्ये, प्राचीन शिलालेखांची लिपी झूम करून बघायची. इतक्या कॅलरीज बर्न करायच्या म्हणून दहा हजार पावलं चालायचं ठरवून घराबाहेर पडणारी माणसं मोबाइलमध्ये डोकं खुपसून बळजबरी चालतात. आपल्याला वाटतं आपण आनंदी आहोत. आपल्याला वाटतं आपण सुखी आहोत. आपल्याला वाटतं आपण खूप पुढे प्रगत होत चाललो आहोत. आपलं सगळं वर्तुळ आनंदी आहे. आपण हे सगळं निश्चितच एन्जॉय करतोय.

आमदाराच्या निधीतून तयार झालेल्या मंडपात पोरं सकाळ-संध्याकाळ पडीक असतात. थंब स्लीव्ह घालून पब्जीचे लेव्हल्स पार करतात. बाकड्यांवर बसलेली म्हातारी माणसं एकमेकांच्यात होणारी बाचाबाची निर्विकार डोळ्यांनी बघत बसतात. स्वत:शीच चाललेली त्यांची बडबड ऐकून ती आपापल्या घरात निघून जातात. शुद्ध हरपून गेल्यासारखी पोरं दिवसेंदिवस आत आत शिरत जातात. सगळ्यांना कसं पद्धतशीर त्या त्या वयात गुंतवून टाकलंय कुणी तरी. वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या पॉलिसी असतात तशा कॅटेगरी पडल्या आहेत माणसांना विभक्त करण्याच्या. निर्माता अज्ञात. निवड आपली. जे जे समोर स्क्रीनवर येईल ते स्क्रोल करून बघण्याचं स्वातंत्र्य आपलं. दाखवलं मात्र अमर्याद जाईल. सर्चला टॅप करून प्रिव्हिअस हिस्ट्रीशी सुसंगत असंच पुढ्यात वाढलं जाईल. टाळता न येण्याची नामुष्की ओढावेल अशी सतर्कता त्यात जाणवेल.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…

चाळीतली शाळकरी पोरं केन्ड्रिक लामार ऐकतात. संबाटा ऐकलायस का विचारलं तर केन्ड्रिकसमोर सगळे पानीकम आहेत असं उत्तर मिळतं. ऐकलेलं नसतं तरीही. युवाल हरारी जगातल्या सगळ्यात प्राचीन ग्रंथालयात मिळणारी माहिती आत्ता कुठल्याही क्षणी कुठल्याही कोपऱ्यात एका सर्चसरशी मिळते अशा आशयाचं काही तरी म्हणालेला. या पोरांच्या हातात करोनाकाळात मोबाइल आला आणि हिपहॉपमधलं सगळ्यात मोठं नाव मध्य मुंबईतल्या रॅप कल्चरशी जराही संबंध नसलेल्या एका झोपडपट्टीत राहणाऱ्या पोरांच्या ओठांवर आलं. पुढं पुढं असंच ट्रम्प प्रकरणामुळे डॅनी डॅनियल्स समोर येते. मग खालमानेतली डीप खोदाखोद. बेसिक माहिती. मग उलटतपासणी. फॅक्ट चेक. सत्यता. अंतिम सत्य अशा कैक पायऱ्या उत्सुकतेपोटी क्षणात चढता येतात. बऱ्याचदा क्लिकबेट्स चौकटी आणि सोशल मीडियावरील खोटे फॉरवर्ड जिज्ञासा खंडित करतात. पुढच्या पायऱ्या चढून खरी माहिती तपासावी असं अभावानंच पाहायला मिळतं. मग मॉबलिंचिंग उसळते. मॉर्फ केलेल्या प्रचारार्थ व्हिडीओला लाखो शेअर पडतात. कुणाच्या तरी भावना दुखावतात. अभिजन-बहुजन सांस्कृतिक प्रतीकांचा अपमान होतो. हा थ्रेड पसरवण्यात- वाढवण्यात भलतीच यंत्रणा उभी असते. जाणीवपूर्वक याची रचना केलेली असते हे कुणालाही आकळत नाही. सत्तेच्या समक्ष सगळं घडत असतं. त्याकडे कुणीही बोट ठेवत नाही. आपल्यातला सगळा संताप तुटून पडतो झुंड बनून. कुणी तरी पसरवलेल्या अफवेमुळे मरतं विनाकारण कुणी तरी. चौकशी लांबते. गुन्हे दाखल होतात. पुढं पुढं आधीचं सगळं विसरून दुसरंच स्क्रीनवर आदळतं. त्याची गुंगी चढते. आपण दिवसेंदिवस असाच रवंथ करण्यात माहीर झालेलो आहोत. हिंसेची विविध प्रारूपं आपण शोधलेली आहेत. यातला आपला सहभाग लक्षात ठेवायला हवा. स्वत:ला ऐकताना, तपासताना या घटनांची क्रमवारी लावायला हवी.
डेटा साक्षरता किंवा डेटा लिटरसी स्किल्ससंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या संस्थांमध्ये संशोधनं सुरू आहेत. त्याचा स्वतंत्र अभ्यासही सुरू आहे. काही धक्कादायक खुलासे त्यांच्या अहवालांमधून समोर येतायत. लोक प्रामाणिकपणे पॉडकास्ट करून यासंबंधी जागरूकता निर्माण करतायत. स्वत:ला आणि इतरांनाही या धोक्यापासून सावध करतायत. पण ही संख्या मोजकीच आहे. साक्षरता आणि ती रुजवण्यासाठीची पार्श्वभूमी तयार करण्यासाठीचे प्रयत्नही आपल्यालाच करावे लागणार आहेत. मोबाइलचा हॉटस्पॉट दिला नाही म्हणून कोयत्याने वार करण्यापर्यंत आपण मजल मारलीय. खरंच!

आपल्या हातून काय काय घडलंय आणि काय काय आपण घडवून आणलंय याचं धारदार निरीक्षण कोण करेल? हे सगळं मागे टाकता येणार नाही याची स्पष्ट कबुली स्वत:लाच द्यायला कोण तयार होईल? येणाऱ्या बदलत्या व्यापक संरचनांना स्वीकारून विचारी व्यक्ती म्हणून डेव्हलप होत जाणं स्वीकारायला कोणाची छाती होईल? आपल्याला काय हवं, काय नको हे कोणतेही आडपडदे न ठेवता ठरवता यायला आणखी किती वेळ, ताकद खर्ची होईल? आपल्या सजीव असण्याला काहीएक अर्थ आहे याची निकड लक्षात घेऊन किती काळ आपण त्यावर ठाम राहू? या खालमानेतल्या डेटामग्न प्रहारांची दिशाभूल ओळखण्याइतपत आपण शाबूत राहायला हवं!

pkokare26 @gmail.com