सुनंदा भोसेकर
‘ओळखीची अनोळखी अक्षरे’ हा ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता यांचा सातवा कवितासंग्रह. उषा मेहता दीर्घकाळ अत्यंत निष्ठेने सकस कविता लिहीत आहेत. संग्रहाच्या सुरुवातीलाच त्यांनी कुसुमाग्रजांच्या काही ओळी उद्धृत केल्या आहेत. त्यात कुसुमाग्रज म्हणतात की, ‘कवितेने मला मार्गदर्शन वगैरे केले नाही. दीर्घकाळ दिवली घेऊन ती माझ्यासोबत चालत राहिली. तिच्या या दिवलीमुळे जे सुंदर होते ते अधिकच सुंदर झाले, जे विद्रूप होते ते असह्य होण्याइतके कुरूप वाटले.’ ज्या अर्थी उषाताईंनी हे उद्धृत केले आहे त्या अर्थी त्यांची स्वत:चीही तीच भावना असावी.
किंबहुना कवितेकडे गांभीर्याने पाहणाऱ्या कोणत्याही कवीची हीच भावना असेल. कवितेच्या या दिवलीसोबत उषाताईंनी दीर्घकाळ प्रवास केला आहे आणि वैविध्यपूर्ण कविता लिहिली आहे. त्यांची कविता चढ्या सुरात बोलत नाही. तिला स्वत:चा स्वर, स्वत:चा रंग आहे आणि उदार मानवतावादी दृष्टिकोन आहे. हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी त्यांना मुद्दाम काही आवेशपूर्ण भूमिका घ्यावी लागत नाही.
आपल्या मनोगतात त्या लिहितात की, ‘कविता हा एक आत्मशोध असतो. तो कधी अंतर्वेधी होतो, तर कधी बाह्य विश्वाचा वेध घेत राहतो, पण असतो तो एक आत्मशोधच.’ ओळखीची अनोळखी अक्षरे’ या संग्रहातल्या सगळ्या कवितांना ही आत्मशोधाची बैठक आहे. हा शोध घेणारं मन लीलया भूतकाळातून वर्तमानात आणि भविष्यात फिरते आहे. या संग्रहात त्यांच्या २०१६ च्या ‘काटेसावर’ या कवितासंग्रहानंतरच्या कविता आहेत आणि त्याआधीच्या संग्रहांमध्ये समावेश न झालेल्या जुन्या कविताही आहेत. तरीही प्रामुख्याने वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर मनात जे विचार येतात त्यांचे प्रतिबिंब कवितांमध्ये पडले आहे. उदाहरणार्थ :
काही काळ
जगण्यासाठी थोडं काही प्रयोजन
सापडल्यासारखं वाटत असेलही
तेही शेवटी संपणारच तर असतं
विदारक असते सारं संपत आल्याची जाणीव (विदारक)
किंवा
सरळ सरळ अर्थ बदलताहेत शब्दांचे
गळून पडताहेत संदर्भ
वेगाने उडणारी काळाची पिसं
अंधारी आणताहेत नजरेसमोर (अर्थच बदलताहेत)
निसर्गाच्या या ओढीमुळेच त्यांना, ‘निसर्गानंद मुक्त करतो छोट्या-मोठ्या चिंतांमधून / काही काळापुरता तरी…’ त्यांच्या कवितेत आयुष्याची मर्यादा समजलेली गुलबक्षीची फुलं येतात, निळाजर्द रंग घेऊन गोकर्णीची फुलं येतात, पारिजात अनमोल फुलांना जमिनीवर सांडतोय आणि रस्त्यावरचा गुलमोहोर सजलाय लालेलाल फुलांनी त्याच्या मनात तलवारी शेंगांची स्वप्न असतील. जीवन क्षणभंगुर आहे हे तर खरंच, पण त्याचबरोबर सिमेंटच्या जंगलातल्या या उरल्यासुरल्या झाडांनी जीवनाचा उत्सव मांडला आहे.
‘अचानक दचकवते उडी तळ्यातली / मखमली गवतात लपलेल्या हिरव्या बेडकाची… जाणीव… / दबा धरून बसलेल्याची’. या नुसत्याच निसर्गवर्णनपर प्रतिमा नाहीत तर त्यांच्यातून भावार्थाचे अन्वयार्थाचे प्रसरण होत राहते. ‘आभाळभर बदलत जाणाऱ्या ढगांसारखे फुलार फुलार (एक आपण असतो) अशी एक सुरेख ओळही सापडली.
‘मनस्वी फुलले आहेत गुलाब’ या कवितेत त्या कुणा डॉक्टरला उद्देशून बोलत आहेत. त्या म्हणतात, जन्मभर मुलांना संतवाङ्मय शिकवलं त्याचा काही उपयोग नाही या प्रदूषित वातावरणात, पण लगेच पुढे म्हणतात, ‘पण गुलाब पाहिलेत का डॉक्टर?
कसे मनस्वी फुललेत
आणि कळ्याही फुलणारच,
उद्या… परवा…’ हा आशावाद आहे पण तो एक भूमिका म्हणून घेतलेला नाही तर एका हाडाच्या कार्यकर्त्याचा अंगात असतो तसा तो उपजत आहे. ‘रेखाव्यात नव्या रेषा’ या कवितेत निवांत घाटाच्या पायरीवर प्रवाहात पाय बुडवून प्रवाहाकडे पाहताना त्या म्हणतात,
‘माथ्यावरच्या गडद होत जाणाऱ्या निळाईतून
ओढून घ्यावी थोडी शाई
रेखाव्यात नव्या रेषा तळहातांवर
मूठ बंद करून
सरत्या संध्याकाळी
वाट धरावी घराकडची
पाहावी वाट नव्या पहाटेची’
‘झाड’ असं शीर्षक असलेली कविता सुरू होते झाडाच्या वर्णनाने. ते झाड त्यांच्या दारातलं बहरलेलं, सुगंधाने दरवळणारं झाड, अटकर बांध्याच्या मध्यमवयीन स्त्रीने भरघोस आंबाड्यावर फुलं माळून देवदर्शनाला निघावं तसं दिसतं पण ते निघालं आहे ‘देव’दर्शनाला, रस्तारुंदीकरणाच्या निमित्ताने!
‘एकूण पानगळ सुरूच आहे वहीमध्ये आणि वाट पाहणंही थांबत नाही वसंतागमनाची’ (पानगळ सुरूच). कुठल्याही संवेदनशील माणसाला क्लेश व्हावेत असेच विपरीत सामाजिक, राजकीय वातावरण भोवताली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पर्यावरणाचा तोल ढळल्यामुळे ओढवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, शाळकरी वयात फशी पडलेल्या मुलीचा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न असे विषयही त्यांच्या कवितेत येतात. ‘देवदानवा नरे निर्मिले’ एवढं जरी काहींना कळलं तरी पुरे असं त्या म्हणतात. (एवढं जरी कळलं काहींना…) गांभीर्याने कविता लिहिणारा कवी हे विषय टाळून पुढे जाऊच शकत नाही पण इथेही हे विषय उपजत करुणेच्या पोटी येतात. त्यात काही स्वत:ला सिद्ध करण्याचा अट्टहास नाही.
मात्र त्याच वेळी जुन्या काही प्रेमकविताही आहेत. त्यांच्या रचनेच्या धाटणीवरून त्या जुन्या आहेत हे लक्षात येते. असे गीतात्मक घटक ( lyrical element) असणारी कविता सहसा लिहिली जात नाही. काही कवितांना चाली लावून त्यांची गीतेही होऊ शकतील इतका त्यांचा छंद सहज आहे. प्रेमाची स्वाभाविक परिणती होते त्या वियोगाविषयीच्या कविताही खोलवर भिडतात (थोडी तरी उसंत दे, अम्लान, चाहूल).
‘नाती’ या कवितेत अद्वातद्वा, काटेरी, हिंसक बनलेली नाती असली तरी कालांतरानं शहाणी माणसं मतभेद, विद्वेष, सुडाची भावना विसरतात, विसरू शकतात कारणाकारणानं आणि मग हिरवीगार होतात नाती आणि ‘माणूस’ म्हणून माणसंही माणसासारखी वागू लागतात. जीवन जगून आलेलं एक खोलवरचं विश्रब्ध शहाणपण असं उषाताईंच्या कवितांमधून भेटत राहातं.
कवितासंग्रहाचं शीर्षक ‘ओळखीची अनोळखी अक्षरे’ असे आहे. सातत्याने इतकी वर्षं अक्षरांच्या सहवासात काढलेल्या ती अनोळखी का वाटावीत हा म्हटलं तर सहज पडणारा प्रश्न आहे म्हटलं तर नाही. त्या म्हणतात, ‘खचाखच शब्द भांडारात,
भवतालातील, काळोखकल्लोळ मात्र शब्दातीतच…’
भोवतालचा काळोखकल्लोळ व्यक्त करण्यासाठी ओळखीची अक्षरे पुरेशी नाहीत म्हणून कदाचित ती अनोळखी होत गेली असावीत. वाढत्या वयाबरोबर एकूण अस्तित्वालाच निबरपणा येत जातो. काळाशी सुसंगत जगणे कमी होते. वर्तमानाशी सांधा तुटला की कवितेमधला उत्स्फूर्तपणा कमी होतो, कवितेतून व्यक्त होणाऱ्या विचारांना साचलेपणा येतो तसं झालं की कवितेची साथ सुटते. काही कवी थांबतात तर काही स्वत:चीच नक्कल करत राहतात. समकालीन आहोत असे दाखवण्याची धडपड करत राहतात. उषा मेहता या सापळ्यातून अलगद निसटल्या आहेत. जीवनाविषयीची आस्था, कुतूहल त्यांच्यात जागे आहे. क्रिकेटच्या भाषेत बोलायचे तर उषाताईंमध्ये अजून पुष्कळ कविता शिल्लक आहे.
‘ओळखीची अनोळखी अक्षरे’ उषा मेहता, सृजन संवाद, पाने ८८, किंमत २५० रुपये
●sunandabhosekar@gmail.com
