रिस्पेक्ट्स

काही प्रस्तावना या आत्मचरित्रपर असतात. विशेषत: प्रसिद्ध लेखकांच्या पुढल्या आवृत्त्यांच्या.

एक काळ असा होता की, नव्या लेखकांच्या पुस्तकाला मान्यवर लेखकाची जाडजूड प्रस्तावना असायचीच असायची. मग त्या प्रस्तावना थोडय़ा आखूड होऊ लागल्या. आणि कालांतराने त्यात केवळ आशीर्वादपर, उत्तेजनपर चार शब्द येऊ लागले. आजही अशा प्रस्तावना आढळतात. पण मधे नवा पायंडा असाही पडला, की लेखकानेच प्रस्तावना लिहायची. ती मनोगतरूपी प्रस्तावना असावी का नसावी, यावर अभ्यासकांचं दुमत आहे. अनेकांना वाटतं की, प्रस्तावना असू नये. ती ‘स्पॉइलर’सारखं काम करते. (कथेचा, कादंबरीचा विषय आधीच उघड करते; तपशीलही पुरवते.) खेरीज अनेकदा अशा प्रस्तावना या आत्मसमर्थनार्थ असतात, किंवा लेखकाचे ‘कॉन्टॅक्ट्स’, पुरस्कार खुबीने मिरवणाऱ्या असतात. अशावेळी समीक्षकांचा आक्षेप ग्राच धरावा लागतो. पण त्याच वेळी हे ध्यानात घ्यायला हवं की, कोण लेखक आणि त्याच्या कुठल्या, कितव्या पुस्तकाला काय प्रस्तावना लिहितोय यावरही पुष्कळ अवलंबून असतं. ताकदीचा लेखक त्याच्या चांगल्या पुस्तकाला चांगली प्रस्तावना लिहितो. कमअस्सल लेखक त्याच्या यथातथा पुस्तकाला जवळजवळ वाईटच प्रस्तावना लिहितो. पण कधी कधी मात्र प्रस्तावनाही सर्जनाची अत्युच्च खूण दाखवतात. जसं ज्ञानेश्वरीमध्ये आहे!

तो पहिला अध्याय आणि त्यातल्या ओवी क्र. एक ते चौऱ्याऐंशी या ओव्या! मला तो भाग म्हणजे ज्ञानेश्वरांनी लिहिलेली मनोगतरूपी प्रस्तावनाच वाटते. ते गणेशाला वंदन करतात. विश्वमोहिनी शारदेचे आशीर्वाद मागतात. आणि हे करताना स्वत:च्या आत्मरूपाला, ‘स्वसंवेद्य’ निर्मितीलाही साद घालतात. सद्गुरूचं ठायी ठायी स्मरण करतात. हे काहीसं सध्याच्या ऋ णनिर्देशासारखंच. (अनेकदा ऋणनिर्देश हा प्रस्तावनेतच सामावलेला असतो.) पण अजून काही गोष्टी या ‘प्रस्तावने’त आहेत. आपण काय लिहिणार आहोत, लिहिलं आहे, त्याचं रूप ज्ञानदेव विशद करतात. गीतेचा अनुवाद करताना मुळात  ती कथा ‘गहन’ आहे, हे ते सांगतात. तिथे ‘चातुर्य शहाणे झाले’ अशी भावावस्था होते, हेही ते म्हणतात. आणि मग श्रोत्यांकडून (वाचकांकडून) त्यांची काय अपेक्षा आहे ते सांगताना त्यांनी म्हटलंय, ‘तियापरी श्रोता/ अनुभवावी ही कथा/ अति हळुवारपण चित्ता/ आणुनिया..’ पुढे तर ते वाचकांना म्हणतात की, आई-वडील जसे अपत्याचे बोबडे बोलही आनंदाने ऐकतात, तसं तुम्ही मला, माझ्या लेखनाला स्वीकारा. (आणि ज्ञानेश्वरांनी असं काही म्हटलेलं मी वाचतो तेव्हा मला वाचक म्हणून कानकोंडं व्हायला होतं! आपण वाचक कसले मायबाप? ज्ञानेश्वरच माऊली!) आणि या प्रस्तावनेत निर्मितीच्या पारलौकिक अंगावर जो प्रकाश पडतो, तो तर मला नेहमीच वाचताना झळाळून सोडतो. गुरूंना उद्देशून ज्ञानदेव म्हणतात, ‘आता देईजो अवधान/ तुम्ही बोलविल्या मी बोलेन..’ मी कळसूत्री बाहुली आहे;  तुमचे हात मला हलवीत आहेत- असं पुढे ते म्हणतात. कुठल्याही बऱ्या लेखकाला हा अनुभव असतो. गुरू म्हणा, निसर्ग म्हणा, देव म्हणा, मनाची आतली शक्ती म्हणा; ती शेवटी बोटांत उतरते आणि लेखणी झरझर काम करते. (किंवा आता लॅपटॉपच्या की-बोर्डचा नाजूक, टपटप आवाज येत राहतो.)

अशाच विलक्षण एकतानतेने टॉनी मॉरिसननं तिच्या ‘दि ब्लूएस्ट आय्’ या कादंबरीची प्रस्तावना लिहिली असणार. एकतर ते पुस्तक म्हणजे पसायदानच आहे! पिकोला या बारा वर्षांच्या कृष्णवर्णीय मुलीची ही उद्विग्न करणारी करुण कहाणी आहे. जगानं नाकारल्याचा त्या छोटय़ा मुलीला आलेला करडा प्रत्यय आणि त्यावर मात करण्यासाठी खरंच लहान असलेलं  तिचं शरीर आणि मन. शाळेतल्या मुली तिला गरीब, काळी मुलगी म्हणून नाकारतात. कोपऱ्यावरचा दुकानदार टॉफी देताना तिच्या आरपार बघतो. आणि मुख्य म्हणजे तिचे आई-वडील तिला नाकारतात. पालकांनी दिलेलं नाकारलेपण पचवायला लागणारी शक्ती त्या मुलीत कुठून असणार? मग सुरू होतो भयाण प्रवास. वर्गातल्या गोऱ्या मॉरीनसारखे निळेभोर डोळे मिळवण्याचे पिकोलाचे प्रयत्न आणि त्याचं अंती वेडात होणारं पर्यवसान! अशा कादंबरीला जेव्हा लेखिका प्रस्तावना लिहिते तेव्हा ती प्रस्तावनाही अर्थपूर्ण असणार यात शंका नसते. टोनी मॉरिसन यांनी त्या प्रस्तावनेत त्यांनी केलेल्या भाषिक प्रयोगाबद्दल लिहिलंय. त्यांची ‘नॅरेटिव्ह ब्रेक’ची कल्पना कशी फसली, हेही प्रांजळपणे मांडलंय. (“Readers were touched, not moved….” असं त्या वर लिहितात.) पण महत्त्वाचं आहे ते त्या निर्मितीमागचं सूत्र. ‘‘आपल्या साऱ्यांनाच नाकारलेपणाचा कधी ना कधी अनुभव आलेला असतोच. काही झगडतात, काही व्यवस्थेला शरण जातात. पण काही असे अभागी असतात, जे कोसळतात..’’ असं लेखिका म्हणते तेव्हा तिची मूळ विचारप्रक्रिया कळते. ते मूळचं इंग्रजी वाक्य फार अद्भुत आहे : ‘‘But there are some who collapse, silently, anonymously, with no voice to express… The death of self esteem can occur quickly, easily in children.’’ अन् मग जाणीवपूर्वक तिने पिकोला हे पात्र कसं उभं केलं, नकारांचे डोंगर कथनात कसे ठरवून उभे केले, हे मांडलं आहे. ती प्रस्तावना वाचली की त्या कादंबरीचा घाट आणि विषय हे दोन्ही अजून सुस्पष्ट दिसू लागतं.

काही प्रस्तावना या आत्मचरित्रपर असतात. विशेषत: प्रसिद्ध लेखकांच्या पुढल्या आवृत्त्यांच्या. आणि त्या कंटाळवाण्याही होऊ शकतात. पण हारुकी मुराकामीसारखा अफाट जपानी लेखक अशी आत्मचरित्रपर प्रस्तावना लिहितो तेव्हा त्यातून निर्मितीप्रक्रियेवर कवडसे पडत जातात. ‘हीअर दी विंड सिंग’ या लघुकादंबरीच्या प्रस्तावनेत त्यानं त्याची व्यक्तिगत कहाणी मांडलीय. नोकरीमध्ये अडकू न इच्छिणारा तो उत्साही, तरुण हारुकी.. त्यानं आणि त्याच्या बायकोनं कर्ज घेऊन सुरू केलेलं छोटेखानी हॉटेल.. आणि तिथे पियानो वाजवू बघणारा हारुकी.. कष्टपूर्ण तारुण्य.. ते सारं वाचताना वाटतं, जग इकडून तिकडून सारखंच असतं, नाही? कष्ट करणारी जोडपी जगभर अशीच तर दिसतात. कर्जाचा डोंगर असताना मध्यरात्री हारुकी पत्नीसोबत रस्त्यावरून चक्कर मारत असतो आणि त्याला समोर बरोब्बर हप्त्याच्या रकमेइतकं जपानी चलन रस्त्यावर आढळतं. असा अदृष्टाचा संकेत त्याला लवकरच झडझडून पुन्हा एकदा येतो. बेसबॉलची मॅच बघत असताना एकाएकी कारणाविना त्याला झडझडून वाटतं, की त्यानं कादंबरी लिहायला हवी! निर्मितीची ओढ ही अशी अनपेक्षित, अकल्पित वेळी बळावू शकते, हे खरंच. तशी साद अनेकांना येते, हेही खरं. पण बेसबॉलची मॅच बघताना आलेल्या अदृष्टाच्या संकेताचा ‘कॅच’ झेलणं हे एखाद्या मुराकामीलाच जमतं!

जसे आपल्या विजयाबाईंनी अव्याहत निर्मिती- क्षण झेलले! त्यांनी तर संशोधनात, समीक्षकीय अभ्यासातही सर्जन साकार केलं. ‘शोध मर्ढेकरांचा’ या पुस्तकाची दीर्घ प्रस्तावना ही विजया राजाध्यक्षांचा व्यासंग, मेहनत तर दाखवतेच; पण त्यापलीकडे जात त्यांची प्रगल्भ समजूत- माणूस म्हणून असलेली; केवळ लेखक म्हणून नव्हे- तीही दाखवते. बा. सी. मर्ढेकर यांच्या पत्नी अंजना व पुत्र राघव यांच्याकडून व्यक्तिगत नव्हे, तर साहित्यिक सामग्री गोळा करण्यासाठी विजयाबाईंनी प्रयत्न केले. (ती पत्रंच या  प्रस्तावनेत आहेत.) १९७६ ते २००७ असा, इतका काळ हा प्रयत्न चालू असतो. अंजनाबाई दाद देत नाहीत. (राघव मर्ढेकरांची भेट दिल्लीत होते- ते पुढे पुस्तकात आहे. तिथे तर राघव मर्ढेकर हे औद्धत्यपूर्ण तऱ्हेने विजयाबाईंशी वागतात असं माझं मत झालं.) पण गंमत म्हणजे विजयाबाईंच्या प्रस्तावनेत कटुता नाही! खंत, हळहळ आहे; पण ती विस्तारलेली नाही. (आणि अभिमानापोटी लपवलेलीही नाही.) ‘‘..(मग) मीही माझ्या बाजूने हा आशा-निराशेचा खेळ संपवला आणि नंतर अंजनाबाईंकडून मिळू शकणाऱ्या अशा सामग्रीचा नाद सोडून, मनात कुठलीही कटुता न ठेवता माझा प्रबंध पूर्ण केला..’’ असं त्या प्रस्तावनेच्या शेवटी आहे. अशी प्रगल्भ समजूत वाचकालाही नकळत प्रगल्भ बनवते.

पण मला आज लिहायला हवं ते विजयाबाईंच्या ‘अन्वयार्थ’ या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेविषयी. विजयाबाईंच्या निवडक कथांचा तो संग्रह आहे. त्याची प्रस्तावना वाचताना पहिलंच वाक्य मला गारद करतं आहे.. ‘‘गेली पन्नास वर्षे मी कथालेखन करत आहे.’’ – एक मिनिट.. प-न्ना-स! टोटल रिस्पेक्ट्स! पाच वर्षांत दोन पुस्तकं प्रकाशित झाल्यावर त्या हळकुंडाने पिवळी होणारी मंडळी दिसताना हे सरळ वाक्य मला झुकवतं आहे, खूप शिकवतं आहे! पुढे त्या प्रस्तावनेमध्ये लेखिकेची बदलत गेलेली कथा- रूपं, त्यामधली स्त्री, तिचं बदलणं हे सारं विजयाबाईंनी एकाच वेळी लेखिका आणि समीक्षिका म्हणून त्याकडे बघत मांडलंय. कोल्हापूर ते एलफिन्स्टन कॉलेज- मुंबई, कुलाब्याचं अमराठी वातावरण हे सारे व्यक्तिगत तपशील त्यांनी त्या प्रस्तावनेत निर्मितीप्रक्रियेशी जोडले आहेत. ‘‘(असे) अनुभव दीर्घकाल घेत असताना झालेली अगदी पहिली जाणीव ही, की ‘मी स्त्री आहे’.. स्त्रीचं गुंतणं हेच शाश्वत असते. तसे गुंतता येणं हीच तिची शक्ती असते..’’ असं विलक्षण निरीक्षणही विजयाबाई त्यात मांडतात. पण सगळ्यात देखणा त्या प्रस्तावनेत काय असेल, तर पन्नास वर्षांचा अनुभव.. आत्मप्रत्यय. ‘‘प्रत्येक लेखकाला दैनंदिन आयुष्य जगावेच लागते. त्यात तऱ्हेतऱ्हेचे ताण असतात. पण सर्जनाचा सूर मनात घुमत असला की या व्यावहारिक व्यापातापांचेही फारसे काही वाटत नाही. कारण त्यांच्यापासून खूप दूर असलेली अशी एक लहानशीच, पण स्वत:ची  जागा मला सापडलेली आहे. मी फार लहान असेन; पण मी कधी उन्मळून पडणार नाही. मी बरे-वाईट काहीतरी निर्माण करत राहीन.’’

माझा एक लेखकमित्र मला खूपदा काहीसा वैतागून म्हणतो, ‘‘साला, आपण लेखक काय मिळवतो? ना पैसा, ना प्रसिद्धी. कोपऱ्यावरचा टपरीवालाही आपल्याला ओळखत नाही.’’  त्याला सांगायला हवं की, लेखकमित्रा, तुला तुझी हक्काची जागा मिळाली आहे. विजयाबाई सांगतात तशी. त्या जागेवर नेटाने उभा राहिलास तर हरवणार नाहीस. आणि आपणा वाचकांनाही अशी जागा मिळतेच की! आपण सारे काही छान वाचतो अािण उन्मळून पडण्याची शक्यता कमी होते! पुढे विजयाबाईंनी वेळेचा अभाव, लेखनाला न मिळालेली शांतता, त्यावर काढलेला मार्ग यावर लिहिलं आहे. ते केवळ लेखकांना लागू नाही. आपण साऱ्यांनाच जगण्यात ते लागू होतं. ‘‘पण या परिस्थितीपासून पळून न जाता, किंवा तिच्याबद्दल फार तक्रार न करता मी जुळवून घेतले, किंवा मला जुळवून घेता आले.. उद्वेग आणि उद्रेक हे तात्पुरते विक्षेप समजून आधी जुळवून घेतले पाहिजे, आणि नंतर त्यातून लाभणारी शांती स्वत:त रिचवली पाहिजे. निर्मितीच्या चकव्यात मला अशांती व शांती या दोन्ही वाटा दिसल्या. पुढे पुढे अशांतीची वाट शांतीच्या वाटेला येऊन मिळाली. आज मी बरीचशी शांत आहे. पण त्या शांतीत एक उदासीही लपलेली आहे. ती उदासीही मला हवी आहे..’’

आता यावर मी काही लिहायलाच हवं आहे का? किती सशक्त.. वाचकालाही आतून मोठं करत जाणारं हे वाक्य आहे! ज्ञानदेवांच्या पसायदानासारखंच हेही उत्कट आहेच. आपण सारेच उद्रेक, उद्वेग या चक्रात फिरत असतोच. त्याला तात्पुरते विक्षेप समजून जुळवून घ्यायला हवंच! आणि आहात ना तुम्ही विजयाबाई, आम्हाला आशीर्वाद द्यायला. टोनी मॉरिसनही बळ देत आहेत. मुराकामीसान, आहात ना जपानी आशीर्वाद द्यायला! आणि हे ज्ञानदेव सांगताहेत, ‘‘आता देईजो अवधान.’’ लक्ष देऊन, न घसरता, पिकोलासारखं न हरवता, तुटता हे रस्ते आम्हाला पार करायचे आहेत. आणि तुम्ही चौघं आम्हाला बळ देत आहात, प्रेरित करीत आहात. टोटल रिस्पेक्ट्स.. बस!

डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr ashutosh javadekar article on various novel books

ताज्या बातम्या