मुलांच्या मे महिन्याच्या सुटय़ा पडल्या की मला ‘फास्टर फेणे’ आठवतो. सहावी का सातवीच्या उन्हाळी सुट्टीमध्ये मी आंबे आणि फास्टर फेणेची सचित्र रोमहर्षक पुस्तके या दोन्हींचा फडशा पाडला होता! आणि माझी खात्री आहे की, ‘वा म्हणताना’च्या अनेक वाचकांचाही तोच अनुभव असेल. या ‘फास्टर फेणे’च्या नावापासूनच सगळी गंमत आहे. त्यात नुसता ‘फ’चा झकास अनुप्रास नाही; नुसता इंग्रजी ‘फास्टर’ शब्दाचा ठसका नाही, तर त्या बनेश फेणेची सारी ईष्र्या, सारा वेग, गती आणि धडाडी त्या नावामध्ये उतरली आहे. भा. रा. भागवतांचा हा हीरो ‘फास्ट’च नव्हे, तर ‘फास्टर’ आहे. आणि मग त्याचे कारनामे वाचताना आपणही त्याच्यासारखं गतिमान व्हायला हवं की काय असं सतत मला वाटत राहिलं आहे. आणि ‘मुलांचे पुस्तक’ या सदरात तर मी त्या लेखनाला मुळीच टाकू इच्छित नाही. फास्टर फेणे ज्या रीतीने भागवतांनी जिवंत केला; ज्या तऱ्हेने त्याच्या कहाण्या त्यांनी युद्ध, चक्रीवादळ अशा भव्य पटांवर रचल्या; ते सारं अतिशय प्रगल्भ, अतिशय नेमकं, चोख आणि उत्तम सर्जनाची खूण सांगणारं लेखन आहे. फुरसुंगीचा हा फास्टर फेणे पुण्यात येतो आणि बघता बघता भारतभर जातो. तो कधी हेर होतो, कधी योद्धा, कधी सवंगडय़ांचा निखळ मित्र; कधी अगदी कोवळा मुलगाही. ‘नेफा आघाडीवर फास्टर फेणे’ या नितांतसुंदर कथेत हा पठ्ठय़ा जमशेदपूरची शैक्षणिक सहल सोडून कलकत्त्याकडे पळ काढतो. तिथे हुशारीने विमानात सामानाच्या खोक्यांमध्ये लपून बसतो आणि युद्धभूमीवर पॅरेशूटने उतरतो. तिथे एक भारतीय सैनिक जेव्हा त्याला हेरतो तेव्हा हा शूरवीर मुलगा काय करतो हे बघणं महत्त्वाचं आहे.
‘‘..आणि मग एकदम झेप घेऊन त्याने त्या जवानाच्या कंबरेला विळखा घातला आणि रक्ताने नि काळ्या दारूने माखलेल्या त्याच्या लष्करी सदऱ्यात आपले तोंड खुपसले. बन्या ऊर्फ फास्टर फेणे याच्या भावना यावेळी इतक्या अनावर झाल्या होत्या की त्याने ढळाढळा रडायला सुरुवात केली.’’
आणि मग जाणवतं, की या आणि अशा प्रसंगांमुळे फास्टर फेणेचं पात्र हे जिवंत झालं आहे. त्या पात्राची विश्वासार्हता या मानवी भावनांमुळे अधोरेखित होते आहे. दुसऱ्या लेखकाने बहुधा फास्टर फेणे पॅरेशूटमधून उतरून समोर आलेल्या सैनिकाला मजेत हसत सलाम ठोकतो असंही रंगवलं असतं. भा. रा. भागवत त्या प्रसंगात शूर फेणेचं कोवळं मन नीट टिपतात आणि म्हणून मग तो कोवळा मुलगा आधीच्या साऱ्या ताणाचं विसर्जन त्या सैनिकाला मारलेल्या मिठीत आणि अश्रूंमध्ये करतो!
बाकी हे जमशेदपूरहून पलायन, कलकत्त्याला डमडम विमानतळावर सैनिकी विभागात लपून बसणं, सैनिकांच्या मदतीच्या खोक्यांसह पॅरेशूटने खाली उतरणं- या सगळ्या घटना शांतपणे पाहिल्या तर अतिरंजित वाटतील. पण भागवत प्रसंग असे खुबीने विणतात, की ते सारं ‘Probable impossible’ वाटावं. म्हणजे खरं तर अशक्यकोटीमधलंच; पण जर का शक्य झालं तर खास, वैशिष्टय़पूर्ण असणारं- आणि एखाद्यालाच शक्य होणारं असं हे चित्रण! आणि ते अॅरिस्टॉटलला रुचलं असतं! खरं तर समग्र फास्टर फेणेच! ही मघाचची संज्ञाही अॅरिस्टॉटलच्या ‘पोएटिक्स’मधलीच. पण त्याला फास्टर फेणे आवडला असता कारण अॅरिस्टॉटल ज्या लेखनसूत्रांना महत्त्व देतो ती सारी सूत्रे जातीने भा. रा. भागवतांच्या या पुस्तकांमध्ये हजर आहेत. अॅरिस्टॉटल हा ‘कॅरॅक्टर’पेक्षा ‘प्लॉट’ला महत्त्वाचं मानतो. आणि ‘प्लॉट’ म्हणजे तरी काय? तर घटनांची साखळी. अशी छान घट्ट बांधलेली. त्यात उपरं, बिनमोलाचं असं काही असायला नको. असा एकही प्रसंग कथनात नको, की जो वगळला तर कथनाला बाधा येणार नाही! फास्टर फेणे हे पात्र म्हणून गाजलेलं असलं तरी त्या कथनामध्ये महत्त्वाची आहे ती ‘अॅक्शन’- म्हणजे ढुशूम ढुशूम या अर्थानेही- पण ‘घटना’ या अर्थानेही. एका छोटय़ा कथेतही भागवत प्रसंगांची घट्ट साखळी विणतात. ते सारे प्रसंग एकमेकांशी निगडित असतात आणि त्यातला एखादाही प्रसंग काढला तर कथा धोक्यात येऊ शकते. डमडम विमानतळावर तिथला कर्मचारी मुलगा फास्टर फेणेला भेटतो आणि कपडय़ांची अदलाबदल करून बनेश फेणे त्या विमानतळाच्या हद्दीत शिरतो. आता या प्रसंगामधले दोघांमधले संवाद हे काहीसे पसरट आहेत. मूळ कथेची गती त्याने रेंगाळतेदेखील. पण त्याचवेळी तो प्रसंग काढला तर फास्टर फेणेचं लष्करी विमानात जाणं हे तद्दन असंभाव्य वाटेल! या साऱ्या कथेला नीट सुरुवात, सुविहित शेवट आणि नेमका मध्य आहे. चिनी युद्ध (१९६२ चं!) आणि त्यामुळे फास्टर फेणेचा उसळलेला जोश हा सुरुवातीला येतो. विमानतळाचा प्रसंग मध्याला कलाटणी देतो आणि पॅरेशूटचं उतरणं आणि कमांडरसाहेबांपुढे त्याचं पोचणं हा सुस्पष्ट शेवट असतो. हे तर अॅरिस्टॉटलसाहेबांना भलतंच आवडावं. त्यांनी म्हटलंच आहे ना : ‘A whole is that which has beginning, middle and end.’ पण भागवतांची किमया अशीही आहे की, जो सुस्पष्ट शेवट एखाद्या प्रकरणाचा असतो, तोच धागा बरोबर उचलत पुढचं प्रकरण/ कथा सुरू होते!
अर्थात अॅरिस्टॉटलला समोर ठेवून भागवतांनी या कथा रचल्या नसणार! कदाचित त्यांच्यासमोर एच. जी. वेल्ससारखे कथाकार असावेत. त्यांनी वेल्सच्या कथांचं भाषांतर केलं नव्हतं का? आणि खेरीज १९४२ च्या भूमिगत चळवळीमधले त्यांचे स्वत:चे अनुभवही या लेखनामागे असणार. ते दोन वर्षे तुरुंगात होते. फास्टर फेणेची जाज्ज्वल्य देशभक्ती, त्याचं साहस, धाडस याचा उगम इथे असावा असं वाटतं. पण फास्टर फेणेचं वैशिष्टय़ केवळ त्याच्या साहसी घडामोडींनी संपृक्त अशा कथनातच नाही. एकतर त्या संहितेची शैली ही अत्यंत स्वतंत्र असा बाज घेऊन उभी आहे. गरजेनुसार भागवत त्या शैलीची गती मंदावतात, जलद करतात. कधी ते लेखन काव्यात्म होतं (‘चेहऱ्यावरची उग्रता मावळली आहे. डोळे- डोळे वाफाळ बनले आहेत.’); कधी ती शैली बोलीभाषेची मजा दाखवते (‘असेल. पण इथे कुठे आहे बाईकबिईक!’); कधी ती शैली बहुभाषिक बनते (‘इथला एकही माणूस स्पेअर करणं शक्य नाही आपल्याला.’ किंवा ‘हुश्शारी से जाना! गोलाबारी शुरू है!’); कधी ती शैली भाषेच्या मर्यादा दाखवीत फास्टर फेणेला टाळूला जीभ लावायला लावून ‘टॉक्क’ असा आवाजही काढते!
आणि म्हणून कुणी ‘फेमस फाइव्ह’ वगैरेची तुलना फास्टर फेणेशी करतात तेव्हा वाटतं की, साहसाचा समान धागा असला तरी भाषिक पातळीवर फास्टर फेणेची सारी पुस्तकं ही पुष्कळ उंचावर आहेत. आता ‘हॅरी पॉटर’च्या सान्निध्यात शाळेतल्या मुलांच्या सुट्टय़ा जाताना दिसतात तेव्हाही जाणवतं की, अखेर हॅरी पॉटरचं जग हे जादूटोण्याचं, अतार्किकाचं, अद्भुत असं आहे (आणि ते छानंच आहे.). पण फास्टर फेणेचं जग मात्र खऱ्याखुऱ्या युद्धाचं, चक्रीवादळांचं असं आहे. कुठली जादूची कांडी त्याच्याजवळ नाही. त्याचं उपजत धाडसच त्याला कार्यप्रवण करतं आहे.
आणि मग मला ‘गोटय़ा’ही आठवतोय. ‘फास्टर फेणे’ आणि ‘गोटय़ा’ यांच्यात अनेक गोष्टी समान आहेत. दोघे चतूर आहेत. खोडकर आहेत. हट्टी आणि हिकमतीही आहेत. काळाचं अंतर आहे दोघांमध्ये; पण भागवत आणि ताम्हणकर हे दोघेही लेखक तत्कालीन कालासंदर्भात मधेच अनपेक्षितरीत्या असांकेतिक मांडणी करणारेही आहेतच.
आणि मग लंपन! तो अर्थातच स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण जरा पावसाचा सुगंध आला की मला प्रकाश नारायण संतांकडे वळू द्या! एक मात्र नक्की, वरवर बघता फास्टर फेणे आणि लंपन हे अगदी उलटय़ा स्वभावाचे वाटतात. फेणे चटाचट मित्र जोडणारा, सतत पळणारा, दंगा करणारा, ‘अॅक्शन हीरो’! आणि लंपन? – तो तर तुलनेने पुष्कळच शांत, अंतर्मुख. काहीसा लाजराबुजरा. पण का कुणास ठाऊक, मला वाटतं, फास्टर फेणे आणि लंपन हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र झाले असते! कारण फेणेच्या आत एक हळवं पोर आहेच. आणि लंपनच्या आत अनेक खोलवरच्या युद्धांना निर्धारानं, आपल्या कुवतीनं सामोरं जाणारा एक योद्धाही आहे! कुणास ठाऊक, या लंपनला हा फास्टर फेणे अधेमधे आग्रह करून डोंगरदऱ्यांवर घेऊन गेला असता. आणि कुणास ठाऊक, या फास्टर फेणेची सारी युद्धं झाल्यानंतर लंपननं त्याला आपल्या घरी बोलावलं असतं आणि मग सुमीसोबत ते दोघं फुलं वेचायलाही गेले असते!
हे सारं लिहिताना या कॉफी हाऊसमध्ये माझ्यासमोरच्या टेबलावर हातातल्या मोबाइलवर अखंड गेम्स खेळणारी तीन कोवळी पोरं आहेत. आणि त्यांना हे फास्टर फेणे, लंपन किंवा फेमस फाइव्हचं समृद्ध करणारं, बालपण आणि कुमार वयाला संपूर्णता देणारं जग ठाऊकच नाही! हे असं कसं झालं? कधीपासून झालं? – कुणास ठाऊक!
डॉ. आशुतोष जावडेकर ashudentist@gmail.com

kannada producer Soundarya Jagadish found dead
घरात मृतावस्थेत आढळले प्रसिद्ध चित्रपट निर्माते, काही दिवसांपूर्वी त्यांच्या पबविरोधात दाखल झाला होता गुन्हा
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?