scorecardresearch

‘यू-मर्’

सध्याची ही शाळकरी पोरं ‘फोनिक्स’च्या नादानं चमत्कारिक इंग्रजी बोलतात आणि जाम हसायला येतं.

विनोदी साहित्य मला बेक्कार आवडतं. अर्थात ते ‘विनोदी’ असणं आणि ‘साहित्य’ही असणं या दोन छोटय़ा पूर्वअटी आहेत. त्यात उदात्त सामाजिक आशय किंवा करुण काव्य मागे लपून बसलेलं असलंच पाहिजे असं तर मला मुळीच वाटत नाही. तसंच कमरेखालच्या, वात्रट, वाह्य़ात ‘इनोदा’लाही माझी काहीच हरकत नसते. पण या सगळ्यामध्ये मुळात उत्तम, बुद्धिमान, खराखुरा विनोद असणं हे मला अपेक्षित असतं. आणि अनेकदा जी पुस्तकं विनोदी मराठी पुस्तकं म्हणून माझ्यासमोर  येतात; ती ही साधी अपेक्षाही पुरी करू शकत नाहीत! बायकांची जाडी, पारशी म्हाताऱ्याचं मराठी, शहरी लोकांना कॉम्प्लेक्स द्यायच्या इराद्यानं पेटलेला कुणी खेडय़ातला पाटलाचा, पण आता शहरात असणारा मुलगा; झालंच तर बायकांचं ड्रायव्हिंग या सरधोपट फॉम्र्युल्यांचा कंटाळा येतो राव! आणि या लेखकांनी जरा पूर्वसुरींकडे नजर टाकली तर केवढय़ा तऱ्हेचे विनोद दिसतील त्यांना मराठीत! स्टेज गाजवायचंय? आधी आचार्य अत्रे आणि पु. लं. कोळून प्या! प्रादेशिक बोली वापरायची आहे विनोदाला? मच्छिंद्र कांबळींच्या नाटकांमधली खळखळती मालवणी ऐका! थोडं नॉन-व्हेज विनोदाकडे झुकायचं आहे का? वेल.. ‘ढगाला लागली कळं’सारखं इरसाल लिहिता येत नाही, तोवर प्लीज प्लीज लिहू नका! विनोदात कारुण्य पेरायचं आहे? हा बघा तुकोबा- ‘तुज मज नाही भेद/ केला सहज विनोद/ तू माझा आकार/ मी तो तूच निर्धार/’ कळलं? गाऽऽऽट इट्? आणि व्यासपीठावर हास्यकविता गाजवायची असेल तर ‘झेंडूची फुले’ ते अशोक नायगावकर हा अभ्यास आधी पुरा करा! विनोदी लिहिणं सोप्पं नसतं म्हाराजा!

आणि विनोदी लेखन वाचणंही! खूपदा होतं असं, की आपण कोटय़ांना दाद देतो, विनोदी कथेतल्या पात्रांना हसतो, घटनांमुळे खी-खी करत बसतो. पण चांगला लेखक विनोदापलीकडेही काही मांडत असतो. आणि जो विनोद तो मांडतो, तोही जर उत्तम असेल तर कवितेसारखे त्याला अर्थाचे अनेक धुमारे फुटू शकतात! प्रत्येक लेखकाला आपल्या भवतालाचं जे आकलन होतं ते तो विनोदात त्याच्या शैलीत आणतो. कधी तो अतिशयोक्ती वापरेल विनोदासाठी, कधी शाब्दिक कोटी करेल, कधी उपहासाचं शस्त्र उगारेल, तर कधी बोलीभाषा-प्रमाणभाषा यांचा खेळ विनोदनिर्मितीसाठी करेल. आणि सगळ्यात आधी विनोदासाठी तो चांगली अनुभवांची सामग्री गोळा करेल. विनोदी लेखकाकडे खूप उत्तम अनुभवांचं ‘मटेरिअल’ हवं. ते मटेरिअल गोळा करणं हे त्याचं पहिलं काम आहे. मग तो पुढे जाऊ शकेल विनोदी लिहायला.

हे शरद वर्दे पाहा ना! जगभर व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जी भटकंती केली आहे, ती सारी निरीक्षणं त्यांच्या विनोदाला बळ पुरवतात. मराठीतला ‘मल्टिकल्चरल विनोदिस्ट’ अशी बहुभाषिक उपाधीही मी त्यांच्या नावापुढे, आधी (किंवा कुठे मधेही!) जोडायला तयार आहे! अमेरिकेत कॉफी ही चहापेक्षा अधिक प्रेमाने तयार केली जाते आणि प्यायली जाते. यावर भाष्य करताना शरद वर्दे म्हणतात, ‘‘पण कॉफीइतक्याच, किंबहुना जास्तच तेजस्वी आणि बहुगुणी चहाची अशी अनुल्लेखाने हेटाळणी का? माझ्यासारखे अनेक भारतीय, अरब, रशियन, इंग्लिश, आणि झालंच तर सर्व चिनी आणि जपानी स्त्री-पुरुष चहावर नितांत प्रेम करतात. अशा सुसंस्कृत महाजनांना अमेरिकेत टी-बॅगचा चहा देऊन चहाचा आणि त्यांचा सामुदायिक अपमान करणं हे अमेरिकन उडप्यांना शोभतं का?’’ आता ही एक खास शैली आहे विनोदाची. फुटकळ  गोष्टींना अभिजन भाषाशैली वापरली की आपसूक विनोदनिर्मिती होतेच. पण वर्दे हे काही अशा एका तंत्रात अडकलेले नाहीतच. त्यांच्या काही लेखांची सुरुवात ही ‘क्लिशे’ पद्धतीची झाली तरी पुढे तो ओघ खूपच स्वतंत्र रस्त्यावर जातो. याचे चांगले उदाहरण म्हणजे त्यांचा ‘सुदृढनिश्चयी’ हा लेख. अमेरिकेतल्या अतिस्थूल बाईपासून जरी तो विनोद सुरू झाला तरी तो एकतर केवळ बायकांपर्यंत थांबत नाही. पुरुषही तिथले तसेच असतात, असं लेखक सांगतो. मग थोडी थट्टा-टिंगल करताना तो त्याचा रशियातला अनुभव सांगतो. तिथे त्याच्या कंपनीचं फ्रूट-ज्यूस बघून तो हरखतो खरा; पण आसपासचे धट्टेकट्टे रशियन तरुण-तरुणी त्या पेयाच्या अवगुणांची जंत्री लेखकासमोर सादर करतात. (म्हणजे इथे विनोदाचा ओघ आपसुक विस्तारत तुलनेचं परिमाण देतो.) आणि अंती- लेखक या ‘सुदृढ’ अमेरिकन स्त्री-पुरुषांपलीकडे जात अमेरिका नावाच्या स्वप्नावर बोलतो. ‘‘अमेरिकेत बिग इज ब्युटीफूल हा साक्षात्कार मला न्यूयॉर्कमधल्या एका वस्त्रप्रावरणांच्या परिसंवादात झाला. वेफर्स चघळत श्रोतृवृंद ऐकत होता- ‘निसर्गानेच आम्हा अमेरिकन स्त्री-पुरुषांना फुलवलंय. आमचा पिंडच जोरकस. जशी अमेरिका भव्य, तसे आम्ही अमेरिकन्सही भव्य. आमच्या नद्या रुंद, लांब. धबधबे प्रचंड. जंगलं विस्तीर्ण.. विमानतळ, विद्यापीठं, कुत्री, मांजरं, खारी, झुरळं- सगळ्या सगळ्यांचे आकार मोठे!’’ आता हे वाक्य उद्धृत करतानाही मी खोकत हसतो आहे. मांजरं, खारी, झुरळं तिथे जेव्हा शरद वर्दे आणतात तेव्हा ते फक्त विनोद करत नाहीत, तर अमेरिकेच्या सुपिरिऑरिटी कॉम्प्लेक्सवरही नेमकं बोट ठेवतात. शरद वर्दे यांचा विनोद हा प्रत्येक वेळी असा बहिर्मुख असतोच असं नव्हे. कधी कधी ते सारं कथन एकत्र विनोदाचा परिणाम घडवतं. इटलीत बिजनेस डीलसाठी गेलेला लेखक, त्याचे सहकारी स्वामी, त्या दोघांचे दोन नुकतेच पास झालेले आणि अति-आत्मविश्वासाचे धनी असलेले एम. बी. ए. पदवीधारक साहाय्यक- एक पंजाबी मुलगा आणि एक बिहारी तरुणी, त्यातल्या बिहारी तरुणीच्या प्रेमात पडलेला इटालियन अधिकारी आणि त्याच्या स्त्री-साहाय्यकाच्या प्रेमात पडलेला हा पंजाबी मुलगा- हे सगळं कडबोळं वाचताना मला सारखी कॉनग्रेव्ह या नाटककाराचं ‘द वे ऑफ द वर्ल्ड’ हे खुमासदार नाटक आठवत होतं! आणि असा मल्टिकल्चरल विनोदी गोंधळ शरद वर्दे मांडतात म्हणून ते उत्तम विनोदी लेखक आहेत असं नव्हे. त्यांचा विनोद हा उपजत, नैसर्गिक आहे.

थेट आपल्या मंगला गोडबोल्यांच्या विनोदासारखा. वरकरणी ती दोन टोकं वाटू शकतील; पण ती तशी नाहीत. वर्दे हे जागतिक परिप्रेक्ष्यात ‘मॅक्रो’ विनोद लिहितात; मंगला गोडबोले या त्याचंच अगदी निखळ ‘मायक्रो’ रूप दाखवतात. मंगला गोडबोले यांच्या विनोदावर बायकी, घरगुती, उच्च-मध्यमवर्गीय असे अनेक शिक्के नीट न अभ्यासता मारता येऊ शकतात. त्यांच्या लेखनाचा वरवरचा स्तर तसा असेलही; पण जरा खरवडलं की आत तोच मल्टिकल्चरल डिस्कोर्स आहे. पण वर्देच्याइतका तो आवाजी नाही. जगातल्या साऱ्या माणसांच्या आत जी सामायिक संवेदना वसत असते, तिथे गोडबोल्यांचा विनोद पोचत असतो; त्यावर भाष्य करीत असतो. सत्यनारायणाच्या कथेची शैली उचलत त्यांनी घर आणि दार दोन्ही सांभाळणाऱ्या नव्या बाईची दुखरी नस अचूक पकडली आहे. तो मॉडर्न नवरा म्हणतो, ‘‘बायको, बायको, रडू नको, कांदाभजी सोडू नको.’’ त्याच्या प्लेटमध्ये गरम कांदाभजी मिळाल्याशी कारण! मग बाकी बायको काही का करेना. अखेर स्वातंत्र्यदेवता तिला पडतं घ्यायला शिकवते. मंगलाताई लिहितात, ‘‘ती रडत नाही. तिला तेवढा वेळ कुठला? तीच राणी, तीच दासी, तीच घरधनीण. ती वनवासी. तुरुंगात ती स्वतंत्र.. ही साठा प्रश्नांची कहाणी, पाचा उत्तरी, देवा- ब्राह्मणांचे दारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी आणि टेम्स-अ‍ॅमॅझॉनच्या किंवा हडसनच्या तीरी सुफळ संपूर्ण!’’ ती बहुसांस्कृतिकता मग सत्यनारायणाच्या कथेत परदेशी नद्यांच्या रूपाने घुसते. त्या नद्या केवळ एनआरआय बायकांना कवेत घेत नाहीत, जगभरच्या साऱ्याच अर्थार्जन करणाऱ्या आणि घरही सांभाळणाऱ्या बायकांना त्या उराशी धरतात! म्हणून म्हटलं, वर्दे जे मॅक्रोरूप दाखवतात, त्याचं मायक्रोरूप मंगला गोडबोले दाखवतात. या दोघांमधले फरक आणि साम्यं बघायला हवीत. दोघे शहरी, उच्च-मध्यमवर्ग ते श्रीमंत, स्मार्ट, पण भवतालापासून न तुटलेला नैसर्गिक विनोद पेश करतात. वर्दे यांच्या लेखनात ही वर्गजाणीव अधिक ठळकपणे आढळते. पु.लं.चा अभ्यास असल्याने असेल कदाचित; पण मंगला गोडबोले स्वत:ची वर्गजाणीव पुष्कळदा झाकून ठेवतात. आणि खरं तर पुष्कळदा त्यापलीकडे त्या सहज बाईपणाचं बोट पकडून जातात. दोघे आपापल्या लिंगजाणिवेपलीकडेही सहज जातात. जरी वर्दे बऱ्याचदा ‘सौ’ हे पात्र सरधोपटपणे मांडतात, तरी एकंदर त्यांना स्त्रीची प्रगल्भ जाण आहे. बिहारी ज्युनिअर मुलीला ते इटलीत त्यामुळेच सहज समजून घेऊ शकतात. मंगला गोडबोले अनेकदा खास बायकी विषयांवर बोलत राहिल्या, कदाचित तिथे रेंगाळल्या, तरीही पुरुषांचा त्यांना नीटच अंदाज आहे! (कुठल्या हुशार बाईला नसतो? ) कित्येकदा तर साच्यात अडकलेल्या पुरुषाकडेही त्या करुणेनेच बघतात. खेरीज जसा वर्दे यांचा जगण्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या विनोदाला जेंडर-फ्री करण्याचा प्रयत्न करतो, तसं गोडबोले यांनीही पुरुषी जगाचा अनुभव घेतला आहे. नवऱ्याच्या व्यवसायात त्यांनी हिरीरीने घेतलेला भाग आणि त्यामधून मिळालेली व्यवहाराची, सरकारी यंत्रणांची, अधिकारीवर्गाच्या भ्रष्टाचाराची जाणीव त्यांच्या ‘माझा अव्यापारेषु व्यापार’ या लेखात स्पष्टच दिसते. समीक्षकांना हे ध्यानात आलंय का, की या लेखात इंटेन्स असा डार्क ह्य़ुमर आहे! तो नकळतही उतरला असेल! लाच द्यायला लागल्यानंतर हताश झालेला पुरुष घरी येऊन बायकोला आणि मुलांना पार्टीला घेऊन जातो भारी हॉटेलात! ‘‘नाही तरी ओळख ना देख अशा कोणाच्या तरी डोमलावर पैसा फेकायचाच आहे. मग स्वत:च्या पोराबाळांची तरी हौस भागू दे. उद्याचं उद्या बघता येईल..’’ असं नवरा त्या लेखात जेव्हा म्हणतो तेव्हा तो सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार समूर्त उभा राहतो. आणि ‘डोमलावर पैसा’ या फ्रेजनं जरी हसू आलं, तरी ते हसू ‘डार्क’ असतं! ‘when the truth hurts, tell a joke’’ या उद्धृताची आठवण करून देणारं असतं. पु. ल. देशपांडय़ांनीही ‘हसवणूक’ आणि ‘फसवणूक’ या शब्दांवर खेळ करताना तेच म्हटलं नव्हतं का? जगण्यानं फसवणूक केली की हसवणूक करण्याखेरीज काही पर्याय नसतोच! मग अमेरिकेत मुलाकडे जाऊन बिनपगारी घरकाम करणारी, नातवाला सांभाळणारी आजी वरून पेहराव मॉडर्न करते आणि ‘टर्न मी ऑन’ असं लिहिलेला टी-शर्ट घालते तेव्हा वर्दे लिहितात, ‘मला मान वर करायचा धीर होत नव्हता. टी-शर्टवर ठळक मेसेज होता- ‘टर्न मी ऑन’! वाचून मीच ओशाळलो. मराठीत बी. ए. केलेल्या काकूंना या वात्रट अमेरिकन सुभाषिताचं भाषांतर ‘मला वळव’ असं शब्दश: होत नसून ‘मला चाळव’ असं होतं हे जावयानं सांगायला नको?’’ मग त्यात विनोद असतोचच पण अजूनही पुष्कळ काही असतं! राजकारण, समाजकारण, भावनाकारण आणि भाषा!

विनोद दोन कलांमधून फार सहज भिडतो. अभिनय आणि साहित्य. चित्रांमधून आणि संगीतातून विनोदनिर्मिती  होण्याच्या शक्यता असतातच. (आठवा : व्यंगचित्रं किंवा गोविंदाची गाणी!) पण विनोद आणि भाषा यांचं सगळ्यात अधिक मेतकूट आहे. साध्या व्यंजनांच्या खेळांनीही विनोद होतो आणि चांगले लेखक तो खेळ पुष्कळच विस्तारतात. त्या खेळाला कवितेच्या पातळीला नेतात! ‘टची गोची’ हा वर्दे यांचा अख्खा लेख ‘ट’ हे व्यंजन अमेरिकेत कसं उच्चारतात किंवा उच्चारत नाहीत, या भाषिक मजेवर आहे. ‘ट’च्या जागी अनेकदा ‘ड’ येतो आणि मग वर्दे एकांना कोडं घालतात – ‘लेड्डर गेड्डा बेडर वाडर हीडऽऽऽ..’ त्याचं उत्तर- ‘लेट हर गेट अ बेटर वॉटर हीटर!’ विनोदनिर्मिती अशी साध्या व्यंजनांत लपलेली असते!

सध्याची ही शाळकरी पोरं ‘फोनिक्स’च्या नादानं चमत्कारिक इंग्रजी बोलतात आणि जाम हसायला येतं. परवाचाच किस्सा- मी आणि माझा मित्र घरी चहा घेताना समोर माझी कन्यका आणि तिचा मित्र सीनिअर केजीचे फोनिक्सचे धडे घोकत होते. ‘सऽऽऽर’, ‘काऽऽऽर’ वगैरे ऐकताना भारीच हसू येत होतं. तो तोडलेला ‘र’ मजेशीर, ठाशीव वाटत होता. तितक्यात पोरीनं विचारलं, ‘‘आशु, तू असा शब्द सांग.’’ मी हा आत्ताचा लेखाचा विषय घोळत असल्यानं म्हटलं ‘ह्य़ूमर’! दोघी पोरटी डोळे उगारत म्हणाली, ‘‘असं नाही म्हणायचं. म्हण- ‘यू-मर्.’ माझा मित्र आणि मी बेक्कार हसत एकमेकांना म्हटलं की, आता थेट मरायचंच की रे! अन् मग वाटलं, खरंच, मरू तेव्हा उगाच सगळ्या आयुष्याचा फिल्मस्टाईल चित्रपट न आठवता एखादा हक्काचा ‘यू-मर्’ आठवला तरी पुरे झालं की राव!

डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com

मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. ( Vah-mhantana ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Humorous books in marathi

ताज्या बातम्या