स्पर्शाचं गाणं नेहमीच अवघड असतं, त्यातले आलाप बघता बघता कधी ताना होतील, हे सांगता येत नाही. ते गाणं अनवट रागासारखंही ओळखायला अवघड असू शकतं. वात्सल्याचा स्पर्श आणि झनझनाटी प्रेमाचा स्पर्श या दोन टोकांमध्येही अनेक तऱ्हांचे स्पर्श असतात. चांगला लेखक त्या अधल्या-मधल्या सुरांना, श्रुतींना, कणसुरांना हेरत स्पर्शाचं गाणं आपल्या लेखनात उतरवतो. इरावती कर्वे यांचं ‘परिपूर्ती’ हे पुस्तकच्या पुस्तक स्पर्शाची नानाविध रूपं कधी जात्याच तर कधी ओघात मांडत जाणारं आहे. त्या पुस्तकाकडे वाचकांनी, समीक्षकांनी अनेक तऱ्हांनी बघितलं आहे. कुणी त्यामध्ये स्त्रीवाद आहे का नाही हे बघितलं आहे, तर कुणी त्यात ललित गद्याचा घाट तपासला आहे. अनेक वाचकांनी ‘परिपूर्ती’ हा छोटासा लेख वाचून इरावती कर्वे यांना आईपण सर्वाधिक मोलाचं वाटत होतं, असा निष्कर्ष काढला आहे. तर कुणी त्यातच उपरोध बघितला आहे. पण मी जेव्हा जेव्हा हे पुस्तक वाचतो, तेव्हा मला मात्र दिसलं आहे गाणं – स्पर्शाच्या नाना सुरांनी सजलेलं गाणं. ते गाणं आवाजी नाही, जाहिरात करणारं नाही आणि इतकं तरल आहे की ते निसटलंही आहे अनेक वाचकांच्या नजरेतून.

पण ते आहे. त्यावर मला आज बोलायचंय – इरावतीबाईंच्या लेखनातल्या ‘पॉलिटिक्स ऑफ टच’ यावर बोलायचं आहे! तो पहिलाच खणखणीत ‘प्रेमाची रीत’ या शीर्षकाचा त्या पुस्तकातला लेख. सामन्यातल्या पहिल्याच चेंडूला फलंदाजाने षटकार मारावा, तसा तो लेख इरावतीबाई जर्मनीत असताना त्यांना जाणवलेल्या स्पर्शाच्या, प्रेमाच्या रीती आणि मग भारतात परतल्यावर घडणाऱ्या मजा, निरीक्षणं, किस्से, वस्तुस्थिती या सगळ्यांचा सहज गुच्छ बांधलाय इरावतीबाईंनी. ‘दोन वर्षे तेथे राहून मला वाटले, आता पुष्कळच प्रगती झाली आहे. कोणी बायांनी माझा मुका घेतला तर मी गाल पुसून टाकीत नसे. कोणी पुरुषांनी हाताचा मुका घेतला तर तोंड वाईट न करता व लगेच हात न धुता मी तशीच बसून राहत असे,’ असं इरावतीबाई लिहितात आणि वाचताना आपल्याला मजा वाटते. आज स्पर्शाची गणितं मोकळी आहेत, असं आपण आपल्याशी म्हणतोही. पण मग इरावतीबाईंनी लिहिलेला आधीचा परिच्छेद डोळ्यापुढे येतो. जर्मनीत इरावतीबाई एका आजींकडे येत-जात असतात. त्यांचं जवळच मैत्रीचं नातं असतं. पण प्रत्येक वेळी गालांचा मुका घेतल्यावर ही इरावती गाल पटकन हाताने पुसते हे बघून जर्मन आजी नाराज होते. तिला तो जवळजवळ अपमानच वाटतो. मग इरावतीबाई आजीला ही गोष्ट अहेतूकपणे, भारतीय सवयीने होत असणार हे पटवतात आणि मग दोघी ते लटकं भांडण मागे टाकतात. हातात हात अडकवून जाताना ती जर्मन आजी विचारते, ‘काय गं, तुझ्या सासूने तुझा मुका घेतला तर काय करतेस गं?’ इरावतीबाई हसत उत्तरतात, ‘माझी सासू तर मुका घेणार नाही, पण माझी आईसुद्धा एवढय़ा मोठय़ा लेकीचा मुका घेणार नाही.’ हे ऐकून ती जर्मन आजी चकित होते. आणि मी अशासाठी चकित होतोय की, हे आजही केवढं खरं आहे! खरंच, भारतीयांचा स्पर्शाचा ढंग बाहेरूनच बदलला का? त्यात आपण मराठी माणसं म्हणजे तर विचारायला नको. माझा पंजाबी मित्र कॉलेजमध्ये असताना मला नेहमी म्हणायचा, ‘आशु, तुम्ही मराठी लोक मिठी मारायची असते तेव्हा शेकहँड करता- अँड सो ऑन!’ आणि मग क्रमाक्रमाने स्पर्शाचं मोकळेपण गवसत गेलं, तसं पटलंच मला त्याचं. इरावतीबाईंचा काळ तर किती जुना! ते पुस्तकच १९४९चं आहे आणि तो जर्मनी प्रवास तर अजून जुना- बाईंनी त्यांच्या ऐन पंचविशीत केलेला. ते सारे अनुभव तत्कालीन समाजासमोर मांडताना इरावतीबाईंनी चातुर्य दाखवलेलं दिसतं. त्यांनी विनोदाचा पदर सोडलेला नाही. काहीसे असांकेतिक अनुभव त्या अशा काही खुबीने, मिश्कील तऱ्हेने मांडतात की, ती मांडणी कुणालाही सहज पचावी आणि पटावी. त्या युरोपातून परततात आणि वडिलांना वाकून नमस्कार करतात. सर्वाचे डोळे भरून आलेले असतात. मग त्या कुठल्याशा हुक्कीत- हा त्यांचाच शब्द आहे- त्यांच्या आईच्या गालाचा मुका घेतात. पुढे त्या ज्या तऱ्हेनं ते स्पर्शाचं गाणं विणतात, त्याला तोड नाही. एक तर त्यात धक्कादायक काही नसलं तरी वेगळेपण आहे, दुसरं म्हणजे त्या कृतीमागे एक मोठ्ठा मल्टिकल्चरल डिस्कोर्स आहे! पण आपली नर्मविनोदी शैली वापरत त्या लिहितात, ‘आई चकित होऊन विचारती झाली, ‘हे गं काय?’ मी काही बोलायच्या आतच वडील म्हणाले, ‘अगं हे विलायती चाळे!’’ किती वाक्यांपुढे अशा तऱ्हेच्या स्माईली अदृश्यपणे ठेवल्या आहेत इरावतीबाईंनी!

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

केवळ वात्सल्याच्या स्पर्शावर त्या मुळीच थांबत नाहीत. स्त्री-पुरुषांच्या वैषयिक स्पर्शाची त्यांना उत्तम जाणीव होती – केवळ लेखिका म्हणून नव्हे, तर समाजशास्त्रज्ञ म्हणूनही! एका लेखात त्यांनी एका मिशनरी ननचं जे व्यक्तिचित्र रेखाटलं आहे ते या कोनातूनच सुस्पष्ट दिसतं. त्या ननबाई व इरावतीबाई फॅमिली कोर्ट चालवत असताना एका तरुण वेश्येची केस त्यांच्यापुढे येते. पोलिसांचा तिला जामिनावर न सोडण्याचा आग्रह, तर तिची राहायची व्यवस्था कुठे करावी हा कोर्टापुढचा प्रश्न. यावर एकाएकी ननबाईंनी तिला आपल्या घरी पोलीस संरक्षणाखाली न्यायची दाखवलेली तयारी, त्या ढाराढूर झोपलेल्या वेश्येकडे बघत रात्र जागून काढणारी ती नन – हे सारं चित्र झरझर मांडून इरावतीबाईंनी अंताला पुन्हा मिश्किलीत त्या बाईंना उद्देशून म्हटलंय, ‘बाई गं, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!’ लेखिका वैषयिक स्पर्शाचंच समाजकारण, राजकारण, धर्मकारण – असं सारंच त्या विनोदात किती ऐटीत, सहजगत्या गुंफते! खेरीज इरावतीबाईंची ती साधी, नितळ भाषाशैली. ते स्पर्शाचं गाणं त्या सहजतेनंच कथनात येतं आणि ओघात येतं म्हणून ते नैसर्गिकही वाटतं. अर्थात, हे ध्यानात घ्यायला हवं की ती सहजता एका विदुषीची सहजता आहे! ती शैली ही एका विदुषीचा घरगुती बाज जात्याच दाखवणारी आहे. बाई केवढे स्पर्श मांडत राहतात. कधी दोन पुरुषांमधली शारीरिक हाणामारी, कधी नवऱ्यानं बायकोला मारणं, कधी अतोनात वात्सल्याने भरलेले आणि हास्यास्पद झालेले स्त्री-स्पर्श, कधी तर सांगाडय़ाचा जिवंत शरीराला होणारा स्पर्श. उत्खननात त्यांना तरुण स्त्रीचा सांगाडा सापडतो तेव्हा त्या म्हणतात, ‘तिच्या गुळगुळीत कवटीवर माझी बोटे फिरत होती.. माझे हात जबडय़ापाशी पोचले.. माझी बोटे तिच्या अरुंद निमुळत्या हनुवटीशी गुंतली होती, पण हृदय आर्तपणे त्या सांगाडय़ाला विचारीत होते, ‘तू ती मीच का गं? तू ती मीच का गं?’’ शतकांची अंतरं ओलांडून इरावतीबाईंना निर्जीव सांगाडय़ामध्येही सख्यत्वाचा स्पर्श शोधता आला हे केवढं विलक्षण आहे. त्यांच्यातलं बाईपणही त्यांना त्या स्पर्शाच्या दिशा दाखवत गेलं असलं पाहिजे. त्या मोकळ्या होत्या, काळाच्यापुढे चार पावलं चालणाऱ्या होत्या, नवऱ्याला ‘दिनू’ म्हणणाऱ्या आणि मुलांची  ‘इरु’ ही हाक रोज ऐकणाऱ्या त्या बाई होत्या. त्या फेमिनिस्ट होत्या, असं कुणी यामुळे म्हणूही शकेल. पण त्याच वेळी त्या समाजशास्त्रज्ञ होत्या. समाजाच्या रीती जाणणाऱ्या आणि पाळणाऱ्याही होत्या आणि समाजाशी बांधल्या गेलेल्याही होत्या. नीलिमा गुंडी यांनी ते सारं नेमकेपणाने टिपत एकदा म्हटलं होतं, ‘स्त्रीत्व ही कुठेही परजून ठेवायची गोष्ट नाही; तसंच ती मिरवायची पण गोष्ट नाही, हे इतक्या सहजपणे इरावती कर्वे यांनी मांडलं!’ मला ते पुरेपूर पटतंय. तसंही बाई कुठल्याही स्पर्शाला ज्या सहजपणे, आतूनच समजून घेते तसे आम्ही पुरुष बहुधा घेत नाही. मग पंढरीच्या वाटेवर ती विदुषी अडाणी बायांसोबत पायी पायी चालताना त्या बाया तिचा हात हातात गुंफत, संसारातल्या व्यथा या विदुषी-मैत्रिणीला सांगत माळ पार करतात. तो सख्यत्वाचा स्पर्श इरावतीबाईंना लाभला याचं साधं कारण त्यांनी बुद्धिमत्तेचं, हुशारीचं आवरण सहज दूर सारून या अडाणी बायांशी संवाद साधला, त्यांचे हात हातात घेतले – त्याच सहजतेनं जसा त्यांनी जर्मन आजीचा मुका स्वीकारला होता, आपल्यात सामावून घेतला होता! आमच्या त्या पंजाबी मित्राच्या मराठी स्पर्शाच्या व्याख्येपार त्या गेल्या! त्यांनी हात धरायचे तेव्हा हात धरले, मिठी मारायची तेव्हा मिठी मारली! आणि मुख्य म्हणजे ते सारं त्यांनी लेखनात गाजावाजा न करता, डीमडीम न वाजवता नैसर्गिकपणे उतरवलं.

आणि मग आमच्या पिढीचं स्पर्शाचं गाणं माझ्यासमोर तरळतंय. म्हटलं तर मोकळं-चाकळं, म्हटलं तर त्या मोकळीकेचंही दडपण देणारं ते आम्हा पस्तिशी – चाळिशीच्या, नव्यानं टिनेजर होऊ पाहणाऱ्या मधल्या पिढीचं स्पर्शाचं गाणं-

‘‘ ये मोह मोह के धागे

तेरे ऊंगलियों से जा पहुंचे

कोई टोह टोह ना लागे

किस तरह गिरहा ये उलझे’’

असे शब्द हा अनु मलिक सुंदर चालीत गुंफतो आहे आणि मग पुन्हा इरावतीबाई समोर येताहेत. त्यांचा तो शेवटचा ‘धडा’ – परिपूर्ती. त्याचा फोकस अगदी निराळा आहे; पण नवऱ्याविषयी – दिनूविषयी – त्या पटकन बोलतात, ‘एकमेकांची मन:स्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजतं की आज काही तरी बिघडले आहे म्हणून? मला लांबूनच पाहून तो नाही का विचारत, ‘आज काय आहे गं?’’ प्रत्यक्ष स्पर्श इथे नाहीच, पण तरी किती एकजीव झालेले दिसतायत मला हे इरू-दिनू नावाचे काळाच्या पुढे चालणारे नवरा-बायको! त्यांच्या अदृश्य स्पर्शामध्येही कुठली ‘गिरहा’ नाही. स्पर्शाचे ते उखाणे त्यांनी लीलया सोडवले आहेत आणि त्यांचं स्पर्शाचं गाणं इरावतीबाईंनी मोहाचे आणि मोहापलीकडचेही अनेक धागे एकवटत कसं कसदारपणे गायलं आहे! त्या गाण्यात अवघडेलपण नाही, ताना नाहीत, आलाप नाहीत. एक संपूर्ण षड्ज आहे – लोभस, आत्मीय स्पर्शाचा आणि तो आपल्यालाही क्षणमात्र का असेना, स्थैर्य देतो आहे!

डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com