पाऊस हा प्रेमासारखाच अनित्य असतो, बेभरवशी असतो. पाऊस काय, प्रेम काय, जगताना कधी या दोन गोष्टी आपल्याला गाठतील याचा काही नेम नसतो. पण पाऊस हा प्रेमाइतकाच सर्जक आणि उत्कट असतो. गाणीच आठवतात आपल्याला पाऊस बघितला की.. निदान पहिला पाऊस आला की! बाकी रखरखतं जगणं सुरू राहतंच. पण पहिल्या पावसामुळे आठवलेलं गाणं आपल्याला हायसं करून सोडतं. प्रत्येकाला आठवणारं पावसाचं गाणं वेगळं असतं. माझं गाणं ‘गारवा’ आहे. ते गाणं किती वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालंय. मिलिंद इंगळेची अप्रतिम चाल आणि गायकी मला तेव्हाही आवडलेली आणि आजही आवडते. गझलगायकीचा अंदाज त्या गाण्यात आहे. आणि तत्कालीन काळाच्या संदर्भात बघितलं तर खूप कसलेलं असं संगीत संयोजन आहे. त्याचा ताल वेगवान नाही, आणि अगदी हळू चालणाराही नाही. दुपारी पावसाची एका लयीत सर पडत असावी असा तो ताल आणि मिलिंद इंगळेचा कंट्रोल्ड असा गायन-बाज. तो लोकसंगीतासारखा आवाज ‘फेकत’ नाही. तो शास्त्रीय गायकासारखा आवाज ‘लावत’ नाही. तो बोलल्यासारखं सहज गातो. (आणि ते खूप अवघड असतं.) त्याच्या आवाजाचा व्हॉल्यूम हा वरच्या- खालच्या पट्टीतही सारखा राहतो. फार सुंदर! पण ते तरल गाणं ऐकताना मागे एक हट्टी, जिद्दी, चिवट, जिवट असा शब्दांचा अंगरखा दिसत राहतो. तो सौमित्रचा असतो. तो शब्दांचा पट वरून तुम्हाला रोमँटिक वाटेल- आणि तो आहेही- पण त्याच्या आतला कणखर, जगणं बघितलेला पोक्त सूर आपल्याला विसरून चालणार नाही! ‘सौमित्र’ नावही कसं तरल, हळवं इत्यादी आहे. अनेकांना जेव्हा किशोर कदम हा तेव्हा उदयाला येत चाललेला अभिनेता म्हणजेच ‘सौमित्र’ हे कळलं असेल तेव्हा बऱ्यापैकी धक्का बसला असणार. पुढे या अवलिया कलावंतानं अभिनय आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत मोठी कामगिरी केली, नावलौकिक मिळवला. कधी अभिवाचनाच्या निमित्तानं ती दोन क्षेत्रं त्यानं एकवटली. त्याच्या कवितासंग्रहावर अनेकांनी लेख लिहिले. ‘पॉप्युलर’ने काढलेला तो संग्रह उत्तम आहेच. पण या पावसाच्या गीतामधला सौमित्र मला तरी त्यात दिसला नाही! समीक्षकांनाही बहुधा हा पावसाळी रोमँटिक सौमित्र रुचत नसावा. फटकारे मारत अंगावर येणारी त्याची अस्तित्ववादी कविता त्यांना बहुधा अधिक आवडत असावी. पण ‘गारवा’ या अल्बममध्ये मुळात नुसती गीतं नाहीत; त्यात कविताही आहेत. त्या किशोरनं स्वत: वाचल्या आहेत. त्या त्याच्या खास ढंगात वाचल्या आहेत. ‘उशीखाली सुरी घेऊन झोप; बघ माझी आठवण येते का?’ असंही त्यानं म्हटलं आहे. आणि ते सारंही लोकांना आवडलं आहे. कारण मुळात त्याच्या आत जगण्यावरची आस्था आहे आणि त्यात सर्जक प्रेमही आहेच. ‘आकाश सारे माळून तारे.. आता रूपेरी झालेत वारे’ असं सौमित्र लिहितो तेव्हा तो केवळ आकाशावर बोलत नाही, केवळ गजरा माळलेल्या प्रेयसीवरही बोलत नाही. तो बोलतो संभवावर! तो बोलतो सर्जनाच्या प्रक्रियेवर! ते आकाश चित्रकारासाठी कॅनव्हासचं, आर्किटेक्टसाठी कमानी आणि खांबांच्या डिझाइन्सचं, लेखकासाठी शब्दांचं आणि कोपऱ्यावरच्या चहावाल्यासाठी उकळत येणाऱ्या दूध- साखर-चहाच्या मिश्रणाचंही असतं. साऱ्या सर्जनशील प्रक्रियाच असतात त्या.. प्रेमासारख्या! ‘वाऱ्यावर भिरभिर पारवा’ असं हा सौमित्र म्हणतो आणि तुमचं मनही तुमच्या नकळत तुम्हाला भेटलेलं प्रेम आठवत जातं. ती उत्कंठा, तो रुसवा, ती लगबग, ती सारी घालमेल.. आणि मग पावसातले तुम्ही दोघं. सौमित्रनं जरी गाण्यात ‘प्रिये’ असा शब्द वापरला असला तरी ते प्रेम काही प्रियकर-प्रेयसीचंच असायला हवं असं नाही! ते प्रेम अनेक वाटांनी भेटून गेलेलं असतं आपल्याला. उत्कट मैत्रीचं प्रेम हे लिंगनिरपेक्ष असतं. पण त्या मैत्रीच्या पोटातही कित्येकदा प्रियकर-प्रेयसीच्या प्रेमाइतकाच गहिरा अनुभव दडलेला असतो. ‘गवतात पाते झुलते कधीचे’ असं कुणी मागे गातं आणि तुम्हाला वाटतं, आता जुन्या प्रेमाच्या आठवानं डोळ्यांत पाणी येणार! अनेक घटकांनी असं सारं आपल्याला वाटतं. सौमित्रला हे गीत आहे- केवळ कविता नव्हे- याचं नकळत पक्कं भान असणार. (‘गीत’ आणि ‘कविता’ यावर बोलायचं आहेच मला सदरात. माडगूळकरांपासून सुरुवात करू या का?) ‘नवा, पारवा, काजवा, चांदवा, नाचवा, गोडवा’ हे सारे शब्द यमक साधतात. त्यात काही विशेष नाही; गीतरचनेची ती पूर्वअटच आहे. विशेष हे आहे, की त्यामध्ये ‘चांदवा’ आणि ‘नाचवा’ हे वेगळे शब्द येतात. ते कवीची ताकद सांगतात. विशेष हेही आहे, की ते शब्द फार सुंदर संदर्भासह येतात; ते उपरे वाटत नाहीत. असं नाही वाटतं, की उगाच हा शब्द इथे यमक जोडायला आलाय. ‘पाण्यावर सरसर काजवा’ म्हणताना त्या काजव्याची गतीही तुम्हाला जाणवते! किंवा त्यातले एकारान्त शब्द. ते असे थेट जोडलेले नाहीत. काजवा-ताजवासारखे. पण त्यामुळे नकळत त्या गीताची गेयता वाढण्यास हातभार लागला आहे. ‘प्रिये’, ‘हिरवे’, ‘किनारे’, ‘सारे’, ‘तारे’, ‘वारे’, ‘गाणे’, ‘कधीचे’, ‘नदीचे’ या सगळ्या शब्दांमधले हे एकार त्या गीताला सौंदर्य प्रदान करतात. अर्थात ही गीताची शाब्दिक पातळी झाली. गीत ठसतं ते अंती आशयामुळे. ‘गारवा’ हे गीत आशय म्हणूनही समृद्ध आहे. पण त्याआधी सौमित्र जी कविता वाचतो त्या पाश्र्वभूमीमुळे ते अधिक ठसतं.
‘चक्क डोळय़ांसमोर ऋ तू कूस बदलून येतो..
ढगांमधे पावसाआधी कुठून गारवा येतो?’
असं विचारणारा तो डोळ्यांत कुतूहल दाटलेला सौमित्र कुठे नाहीसा झाला? त्याच्या पुढच्या कविताही मला आवडतात. त्याचं गद्यलेखनही अत्यंत विचारप्रवर्तक असतं. बाईचा रोल करताना त्याच्या आतल्या पुरुषाची झालेली घालमेल आणि पौरुषाचं स्फुरणं त्यानं एका लेखात ताकदीनं वर्णिलेलं आहे. ते सगळं सुंदरच आहे. प्रश्न एवढाच- ढगांमध्ये पावसाआधी येणारा गारवा त्यानंतरच्या कवितांमध्ये, लेखांमध्ये कितपत आहे! पण त्या पावसाच्या गार कवितेमध्येही अचानक मधे उनाड मुलगा येतो हेही विसरून चालायचं नाही!
‘वारा उनाड मुलासारखा सैरावैरा धावत सुटतो..’ त्यातलं ‘सैरावैरा’ शब्दामधलं संवेदन मला विलक्षण वाटतं. किशोर कदम आणि सौमित्र या दोघांमध्ये तो सैरावैरा वारा उनाड मुलासारखा लपून बसलाय की काय असंही वाटतं! आणि मग मला बोर्हेज आठवतो! का कुणास ठाऊक, पण त्या स्पॅनिश कवीची ती पावसाची कविताच मला ‘गारवा’नंतर आठवते. ‘The rain is one thing, that no doubt happened in the past’ असं बोर्हेज म्हणतो. आणि किती खरं आहे नाही? पावसासोबत सारा आपला भूतकाळ कसा जिवंत होतो! आणि मग कवितेअंती बोर्हेजला आठवतो त्याच्या वडिलांचा आवाज! ‘Afternoon brings me a voice, a longed for voice, of my father who is returning and has not died.’ (‘दुपार.. ही पावसाळी दुपार समोर आणते माझ्या, मला हवाहवासा सूर, माझ्या कधीच न मेलेल्या, सदा परतणाऱ्या वडिलांचा सूर!’) मग जाणवतं की, ‘गारवा’मधल्या उनाड मुलाला हा वडिलांचा सूर हवा होता की काय!
पाऊस हे असं करतो! काहीच्या काही आठवत राहतं मग. आणि मग लिहितानाही वेगळंच सुचतं. देवदत्त पट्टनायकांच्या ‘जय’मध्ये म्हटलंय (मराठी सघन शब्द अभय सदावर्ते यांचे.) : ‘पृथ्वीवर सलग चौदा वर्षे दुष्काळ पडला. सरस्वती नदी आटून अदृश्य झाली.. अखेरीस एकदाचा पाऊस पडला.’ आणि मग कोळणीच्या मुलाने- व्यासाने जे ज्ञान विखरून पडलेलं ते एकवटलं आणि ‘महाभारत’ साकार झालं. व्यासमुनींनाही साक्षात् सर्जनाचा शकुन देणारा हा पाऊस! त्याचं मोठेपण हे त्या सर्जनाच्या कळा मानवी मनाला देण्यातच आहे. बोर्हेज ते बोरकर ते सौमित्र यांचा पावसाचा शब्दपदन्यासही त्याच सर्जनाचं रूप. मग त्या पावसात रोमँटिक-अस्तित्ववादी हे ‘टॅग्ज्’ पुसले जातात. यमकांची गणितं वाहून जातात. मागे अनाहत सूर असतो, पुढे सौमित्रचं असं गहिरं गाणं असतं आणि मधोमध तुमचं-आमचं सर्जक प्रेम असतं! पावसाची आणि पावसाळी गाण्या-कवितेची तीच अंतिम फलश्रुती असते!
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com

Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Video Rice Papad Marathi Recipe In Cooker Becomes Four Times After Frying Khichiya Papad Dough Making Papad Khar At Home
कुकरच्या एका शिट्टीत बनवा तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड, लाटायची गरजच नाही, बघा सोपा Video
Budh Gochar 2024
होळीनंतर ‘या’ राशींचे सुखाचे दिवस सुरु? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात प्रचंड श्रीमंत
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही