वामन पंडित
रंगभूमीशी संबंधित विविध उपक्रम राबविणार्या तरुणाने चार दशकांपूर्वी कणकवलीला नाट्यनकाशावर आणले. नुसताच नाटक-एकांकिका महोत्सव भरवला नाही, तर मराठी नाटकांच्या संहिता उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रकाशन संस्था उभारली. ‘कनक-रंगवाचा’ हे फक्त नाट्यविषयाला वाहिलेले त्रैमासिक गेले दशकभर चालविले. नफ्या-तोट्याचा विचार न करता निसर्गातील झाडे- वनस्पती- फुले यांची माहिती सर्वसामान्यांना सहज व्हावी यासाठी प्रयोगशील पुस्तके काढली. त्या सार्याचा प्रवास कसा घडला?
जवळजवळ ६० वर्षे मी नाट्यक्षेत्रात वावरतोय. रंगभूमीचा सेवक ही ओळख. माझ्या कामाच्या एका टप्प्यावर लक्षात आले की नाट्यइतिहासाचे योग्य दस्तऐवजीकरण होत नाही, अजूनही ते तितकेसे गांभीर्याने झालेले नाही. म्हणूनच फक्त रंगभूमीला वाहिलेली प्रकाशन संस्था सुरू करण्याचा निर्णय दोन दशकांपूर्वी घेतला. वाचकांचा कल पाहिला तर कथा-कादंबर्या किंवा (काही प्रमाणात) कवितांचीच पुस्तके अधिक वाचली जातात. त्यामुळे त्यांचे प्रकाशक मुबलक असतात. पण नाटक काय, एकांकिका काय किंवा नाटक-रंगभूमी संदर्भ काय… अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित करायला कुठलेच प्रकाशक तयार होत नाहीत. त्या व्यवहारात नफा नसतो, हे कारण. कित्येक मोठ्या प्रकाशकांकडे प्रथितयश नाटककारांच्या संहितांची बाडे पडून आहेत. विशेषत: एखादे नाटक रंगभूमीवर प्रयोग स्वरूपात ज्या वेळी येते, त्या कालावधीत त्याची संहिता प्रकाशित झाली तर त्याला मागणी असते. पण आपल्याकडे या मागणीचा विचारच केला जात नाही. गाजलेल्या नाटकांच्या संहिता शोधायलादेखील त्रासच होतो. तो होऊ नये यासाठी मी ‘पंडित पब्लिकेशन्स’ हे प्रकाशन सुरू केले. आम्ही काढलेल्या पुस्तकांत नुसती नाटकांची पूर्ण संहिता दिली जात नाही, तर अशा पुस्तकांच्या वेष्टनाच्या आतील दोन्ही पृष्ठांवर त्या त्या नाटकाची प्रकाशचित्रे छापण्यात येतात. त्या काळात नेपथ्य कशा प्रकारे केले होते त्याचाही बोध व्हावा हा त्यामागचा उद्देश. बालनाट्याला आपल्याकडे फार आस्थेने किंवा तो एक रंगभूमीचा महत्त्वाचा भाग आहे म्हणून पाहिलेच जात नाही. त्यामुळे बालनाट्याची पुस्तके तशी फार कमीच निर्माण होतात. मी माझ्या प्रकाशनाची सुरुवातच दोन बालनाट्यांच्या पुस्तकांनी केली. पुढे ‘कनक रंगवाचा’ हे त्रैमासिक काढले आणि आता मराठी रंगभूमीच्या इतिहासातील विविध टप्प्यांची दखल घेणारे ग्रंथ प्रकाशित करीत आहे. हे सगळे कुठून आले आणि मला का करावेसे वाटले, ते जाणून घेण्यासाठी थोडे भूतकाळात जावे लागेल.
मी इयत्ता सहावीपासून नाटकात काम करायला सुरुवात केली. त्या वेळी माझ्या मूळ गावी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घावनळे या तळकोकणातील गावात मी मराठी शाळेत जात होतो. नाटकात काम करायला घरातून आईचा विरोध होता. वडील मुंबईला नोकरीला होते. पण शाळेतील शिक्षक आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी घरी येऊन आईची परवानगी मिळवली आणि मी ‘स्वराज्याच्या वाटेवर’ या ऐतिहासिक नाटकात संभाजीची भूमिका साकारली. पुढे आठवीपासून माध्यमिक शाळेत सावंतवाडीतील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये दाखल झालो. नववीत ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या नाटकात मला भूमिका मिळाली. आम्हाला तेव्हा पुष्पा नाबर नावाच्या बाई संस्कृत शिकवायच्या. त्यांनी आम्ही दहावीत असताना भासांचं संस्कृत नाटक ‘कर्णभारम्’ हे बसवले.
महाविद्यालयात मग माझ्या सांस्कृतिक उपक्रमाला धुमारे फुटले. शाम फडकेंची नाटके – ‘माझा कुणा म्हणू मी’ या आणि अशा नाटकातून भूमिका केल्या. ‘माझा कुणा म्हणू मी’ या नाटकाची तालीम सुरू असताना युद्ध सुरू झाले आणि ‘ब्लॅक आऊट’ जाहीर झाले. वार्षिक स्नेहसंमेलन रद्द झाले. नाटक तर बसवले होते. या नाटकाचा मग ‘डिफेन्स फंड’साठी शासनाने प्रयोग केला आणि त्यातून तहसीलदारांनी त्या वेळी बरीच रक्कम उभी केली. सुरक्षा निधीला मदत केल्याचे प्रमाणपत्रही आम्हा कलाकारांना मिळाले. महाविद्यालयात प्रा. विजयकुमार फातर्पेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महाविद्यालयात ‘थिएटर युनिट’ स्थापन केले. मी या युनिटचा पहिला कार्यवाह. शशिकांत निकते, मुकुंद नाईक अशा एनएसडीमधून शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांना आम्ही महाविद्यालयात बोलवून चर्चा-संवाद घडवले. पुण्या-मुंबईच्या बाहेर महाविद्यालयात असा विभाग सुरू करणे हे वैशिष्ट्यपूर्ण होते हे आज जाणवते.
पुढे मग सावंतवाडीतील धारणकरांच्या ‘नाट्यदर्शन’ या संस्थेत दाखल झालो. तिथे दिनकर धारणकर या मोठ्या अभिनेता- दिग्दर्शकाच्या मार्गदर्शनाखाली नाटके केली. तिथले संस्कार घेऊन महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला असतानाच महाविद्यालयाला रामराम करून गरजेपोटी कणकवलीत बँकेत नोकरीला आलो. पुढे स्वत:चे मुद्रणालय सुरू करून व्यवसायात पदार्पण केले.
कणकवलीत समविचारी रंगकर्मी शोधले, एकांकिका केल्या. विजय तेंडुलकरांच्या ‘दाणादाण’ एकांकिकेने खूप बक्षिसे मिळवून दिली. मग आम्हा सगळ्यांना वाटले की आपण एकांकिका स्पर्धा सुरू करू. ‘नाथ पै एकांकिका स्पर्धा’ सुरू केली. त्यातूनच मग ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली. हे काम करत असताना प्रा. सतीश आळेकरांसारखा मार्गदर्शक भेटला. संस्थेतर्फे विविध एकांकिका, नाटक, अभिवाचन कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन प्रत्यक्ष सहभाग घेतला. ‘अंबा’, ‘थँक यू आजोबा’, ‘चाफा’, ‘एक दिवस मठाकडे’, ‘महापूर’ अशा नाटकांतून अभिनय-दिग्दर्शन केले. दरम्यान, फोर्ड फाउंडेशन, अमेरिकेच्या अनुदानातून समांतर रंगभूमीवरील नाटकांचा ‘मच्छद्रिं कांबळी नाट्य उत्सव’ सुरू झाला. फोर्ड फाउंडेशनची ग्रॅॅण्ट बंद झाल्यानंतर ‘रतन टाटा फाउंडेशन’ची ग्रँट सुरू झाली. आज जवळजवळ ३० वर्षे हा उत्सव गाजतोय. नाथ पै एकांकिका स्पर्धेला पुढच्या वर्षी ५० वर्षे पुरी होतील.
प्रकाशनाला सुरुवात केली तेव्हा डॉ. राजेंद्र चव्हाण यांच्या बालनाट्यावरचे पुस्तक पहिल्यांदा छापले. २५-३० वर्षे शिरगावसारख्या गावात राहून मुलांबरोबर त्यांनी काम केले. त्यांच्याकडे कुणी तरी लक्ष देण्याची गरज होती. माझ्या सार्या पुस्तकांमध्ये १० पुस्तके फक्त बालनाट्यांची आहेत. त्यातील एक तर संजय हळदीकर यांचे ‘रंग भावनाचे मंच बालकांचे’ हा संदर्भग्रंथ विशेष लक्ष द्यावा असा. भारतभर फिरून त्यांनी बालनाट्य शिबिरे घेतली. तसेच वेश्यावस्तीत जाऊन तिथल्या कलाजाणिवांच्या नोंदी केल्या. ते सारे या ग्रंथात उतरले. इतर पुस्तकांच्या लेखकांमध्ये शफाअत खान, मकरंद साठे, विक्रम भागवत, प्रेमानंद गज्वी, योगेश सोमण अशा नाटककारांचा समावेश आहे. मराठीतील आद्य स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांच्या चरित्रावरील नाटकदेखील मी प्रकाशित केले. ज्या संहितांचे प्रयोग झालेले नसतात, त्या संहितांची पुस्तके प्रकाशित करायला कोणी तयार होत नाही. ही परिस्थिती प्रकर्षाने लक्षात येत होती. रंगभूमीवरील तपशिलांच्या नोंदींची कमतरता ओळखून मी धाडस केले. धाडसच म्हणावयास हवे. कारण नाटक आणि नाटक संदर्भ या विषयीच्या पुस्तकांना म्हणावा तसा उठाव नाही. कमलाकर नाडकर्णींचे १०० वर्षांच्या प्रदीर्घ काळातील रंगभूमीवरील नाटकांची नोंद घेणार्या ‘नाटकं ठेवणीतली’ पुस्तकाच्या १००० प्रती संपायला दहा वर्षे लागली. शिवाय पुण्या-मुंबईबाहेरील विविध प्रदेशांतील स्थानिक नाटककारांच्या नाटकांना-एकांकिकांचे पुस्तक प्रकाशित करायला कोणी वाली नाही. असे असताना रंगभूमीचा एक पाईक म्हणून नैतिक जबाबदारीने प्रकाशन व्यवसाय चालवीत आहे. मी आजवर कुणाही लेखकाकडून पैसे घेऊन पुस्तक प्रकाशित केले नाही. हल्ली प्रकाशन व्यवसायात हा प्रकार वाढत चाललाय आणि लेखकही असे पैसे देऊन आपले पुस्तक प्रकाशित करण्यात धन्यता मानतात. तिथे मग दर्जाचा प्रश्नही निकालात निघतो. असा दर्जा सांभाळणे खूप महत्त्वाचे बनलेय.
आजवर नाटके, एकांकिका संग्रह, रंगभूमी संदर्भग्रंथ, विष्णुदास भावेंचे चरित्र अशा प्रकारची जवळजवळ ६० पुस्तके प्रकाशित केली. जयंत पवार यांच्या एकांकिकांचे ‘नाद’, ‘निनाद’ आणि ‘प्रतिसाद’ असे तीन एकांकिका संग्रह प्रकाशित केले. जयंतने त्यासाठी विचारले होते. मी हो म्हटल्यावर तो म्हणाला की, ‘‘मी निवडून एकांकिका देतो. त्यांचे पुस्तक करू या.’’ मी म्हणालो, ‘‘निवडू नको, मला तू लिहिलेल्या काळाप्रमाणे सर्व अनुक्रमे छापू. त्यामुळे तुझा रंगभूमीवरील प्रवास वाचकांच्या समोर येईल.’’ त्यालाही ते आवडले आणि मग त्याच्या ‘नाद’ (१९८० ते १९८५ साल), ‘निनाद’ (१९८६ ते १९९० साल) आणि ‘प्रतिसाद’ (नव्वोदत्तर) असे तीन संग्रह केले. डॉ. तारा भवाळकर यांनी लिहिलेले विष्णुदास भावेंचे चरित्र, २००१ ते २०२० सालापर्यंतच्या २० नाट्य संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे पुस्तक किंवा मराठी नाट्यसृष्टीत आजवर रंगभूमीबाबत काय काय आणि कशा प्रकारचे लेखन झाले याचा इतिहास मांडणारे डॉ. मेधा सिधये यांचे ‘मराठी नाट्य विचार’ हा संदर्भग्रंथ. १८७२ ते २००० म्हणजे जवळजवळ सव्वाशे वर्षांच्या कालखंडात जे नाट्य विचारांचे आकृतिबंध पुस्तकरूपाने तयार झाले. त्याचबरोबर कवी नाटककार सावरकरांच्या लेखनाचा आढावा मांडणारा ग्रंथ. या ग्रंथात फक्त सावरकरांचा अंतर्भाव नाही, तर जे जे महत्त्वाचे कवी आणि नाटककार झाले त्यांच्यासह या पुस्तकाची मांडणी झालीय. यात गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, मर्ढेकर, पुशी रेगे आणि चिं. त्र्यं. खानोलकर यांचाही संदर्भ आहे. डॉ. श्रीराम लागूंच्या ‘गणूचा सदरा’ या एकांकिकेचे पुस्तक मी प्रकाशित केले. एवढा मोठा उत्तुंग कारकीर्द असलेला अभिनेता ज्याने फक्त एकच एकांकिका लिहिली. ती मी प्रथमत: प्रकाशित केली. नंतर ती लागूंवरच्या संपादित पुस्तकात प्रसिद्ध झाली. मला वाटते, अशा माहितीचे, संदर्भमूल्यांचे जतन करणे गरजेचे आहे.
वयाच्या साठीनंतर निसर्ग छंद जोपासत असताना त्याबाबत अभ्यास सुरू झाला. माझे मार्गदर्शक गुरू वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली मग रानफुलांची प्रदर्शने भरवली. ‘झाडांच्या कविता’ हा अभिवाचनाचा कार्यक्रम आखला. महर्षी व्यासांपासून- संतकवी, अर्वाचीन कवी ते आजच्या पिढीच्या कवींच्या कविता यात मांडल्या जातात. झाडे, पर्यायाने निसर्गच कसा माणसाला जगायला शिकवतो हा त्यामागचा उद्देश. दोन दिवस पुस्तक प्रदर्शनांच्या दरम्यान हा कार्यक्रम करतो. या प्रदर्शनामध्ये येणार्या लोकांची मागणी आणि आग्रह झाला की या मांडलेल्या माहितीची पुस्तके करा. सामान्य माणसाला विज्ञान कळावे म्हणून गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली अशा पुस्तकांची मालिका करायचे ठरवले. त्यांतून ‘१०० वेलीफुले’, ‘१०० वर्षायूफुले’, ‘१०० झुडूपफुले’, ‘१०० वनस्पतिशास्त्रज्ञ’, ‘६० रानभाज्या’ अशी पुस्तके होऊ शकली. ही सर्व पुस्तके पूर्णपणे आर्टपेपरवर चाररंगी छपाईची आहेत. झाडे, फुले, पाने अबालवृद्धांना सहज ओळखता यावीत, शहरात- निसर्गापासून लांब राहणार्यांनादेखील त्यांची नावे आणि माहिती कळावी यासाठी हा खटाटोप. या मालिकेत आणखी पुस्तके पुढल्या काळात येणार असून त्यांच्यावर काम सुरू आहे.
एका टप्प्यावर लक्षात आले, रंगभूमी वगळता सर्व कलाप्रकारांचे आपआपले नियतकालिक आहे. पूर्वी बरीच सुरू होऊन बंद पडली होती. म्हणून ‘कनक रंगवाचा’ या नावाने माझ्या संस्थेच्या, आचरेकर प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्रैमासिक सुरू केले. गेली दहा वर्षे ते नाट्यप्रेमी वाचकांच्या बळावर निघत आहे.
माझ्या कामाचा गौरव अनेक पुरस्कारांनी झाला. ‘वसंत सोमण नाट्य कार्यकर्ता पुरस्कार’, ‘चतुरंग कृतज्ञता सन्मान’, ‘तन्वीर सन्मान’, ‘मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार’, महाराष्ट्र फाउंडेशन यांचा ‘रा. शं. दातार पुरस्कार’ आणि २०२६ सालचा ‘झी नाट्य गौरव विशेष योगदान पुरस्कार’. पुरस्कार महत्त्वाचेच असतात. त्या त्या टप्प्यावर मिळालेल्या सन्मानामुळे कामाला प्रेरणा मिळते आणि प्रोत्साहन मिळते. नाटकाचे प्रेम पुढल्या पिढीत झिरपावे यासाठी अद्याप सक्रिय आहे. रंगभूमीच्या इतिहास आणि वर्तमानावर अधिकाधिक माहितीने संपृक्त ग्रंथ प्रकाशित कसे करता येतील हेही पाहत आहे.
wapandit@gmail.com
