वर्षा गजेंद्रगडकर यांचे ‘गोष्ट त्यांची ऐका’ हे नवे पुस्तक लक्ष वेधून घेणारे आहे. अवघ्या सजीव सृष्टीचे रहस्य लहानशा बीजात सामावलेले असते. त्या बीजाचे मनोगत पद्यरूपात व्यक्त करणारे हे पुस्तक म्हणजे वैज्ञानिक सत्याचा अद्भुत आविष्कार आहे. यात तीस पद्यरचनांच्या माध्यमातून देशी बीजाचे महत्त्व बिंबवले आहे. निरोगी जगण्याचा बीजमंत्र सांगताना पर्यावरण रक्षणाचे भान अलवारपणे जागे केले आहे, तसेच धावत्या लयीतील विविधढंगी रचनाप्रकार योजून मूळ आशय प्रवाहीपणे खेळता ठेवला आहे.
‘चिनूमिनूचा दोस्त’, ‘टुन्नूनं पेरलं बी’ अशा गमतीदार गोष्टीही त्यात आहेत. ‘रे बीजा’ असे संबोधन करून साधलेला संवाद आहे. ‘सांगा काय होईल?’अशी कोडी आहेत. ‘जग पाहावं हिंडून’ मधली हापूसच्या कोयीची सैर मोठी रंगतदार माहितीपूर्ण झाली आहे. ‘आला चेंडू, गेला चेंडू’, ‘आम्ही कोण?’ अशा लोकप्रिय ओळींचा खुबीदार वापर यात आहे. ‘ते आम्हीच सष्टीचक्र फिरते नियमित ज्यांच्यामुळे’ अशी सार्थ कौतुकाची उक्तीही आहे.
‘‘अंकुरली बी, डोकावली वर
सहन होईना उन्हाचा कहर
केला आडोसा, घातलं पाणी
वाढली वेल, गात गाणी’’
असा तालबद्ध ‘झिम्मा’, तसेच ‘जोडी तुझी माझी ’ ( बी व भूमी ), ‘गुपित’, ‘निरोप’, ‘इवल्या इवल्या बिया’ आदी यातल्या काही रचना म्हणजे छान उमललेल्या कविताच आहेत.
प्रस्तावनेत भारत सासणे यांनी म्हटले आहे की या कविता ‘दृक् श्राव्य माध्यमाची मागणी करतात. ते अगदी पटते. अभिजित प्रकाशनाने हे पुस्तक आकर्षक रूपात प्रसिद्ध केले आहे. हे पुस्तक हसतखेळत मूल्यसंस्कार घडवणारे म्हणून संग्राह्य ठरते. हे पुस्तक मुलांनी तर वाचायला हवंच, पण शिक्षक-पालकांनीही आवर्जून वाचायला हवं.
‘गोष्ट त्यांची ऐका…’,
वर्षा गजेंद्रगडकर, अभिजित प्रकाशन,
पाने-५६, किंमत- १९० रुपये.
